नरेंद्र मोदी वा अन्य कोणी नेता आला की असेच होते, तेव्हा केजरीवाल यांच्यावरच टीका का, असा प्रश्न केजरीवाल यांच्या मुंबई-भेटीनंतर ‘आप’चे कार्यकर्ते करीत होते. अन्य पक्षांचे नेतेही असेच वागतात हा युक्तिवाद केजरीवाल यांच्या बचावार्थ कसा काय होऊ शकतो? अन्यांपेक्षा आपण वेगळे असणार आहोत, हा मुद्दा कोठे गेला?
आम आदमी पक्षाचे अस्तित्व हा परमेश्वर आणि अल्ला यांनी घडवून आणलेला एक चमत्कार आहे, असे या पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल म्हणाले. या चमत्कारकर्त्यांच्या श्रेय नामावलीत त्यांनी येशू ख्रिस्ताचा समावेश का केला नाही, हे कळावयास मार्ग नाही. कदाचित गोवा किंवा अन्य ख्रिस्तधर्मीयांचे प्राबल्य असलेल्या प्रदेशात ते परमेश्वराच्या बरोबरीने येशूलाही घेतील. कारण अल्लाचे आभार त्यांनी मानले ते मुंबईतील मुसलमानबहुल प्रदेशात बोलताना. म्हणजे कोणत्या प्रदेशात काय बोलावे आणि कोणाचे आभार मानावेत याचे अन्य राजकीय नेत्यांसारखेच..आणि तितकेच..चातुर्य केजरीवालदेखील दाखवतात असे मानण्यास त्यांचा प्रत्यवाय नसावा. याचाच दुसरा अर्थ की अन्य राजकीय नेते आणि केजरीवाल यांच्यातील कथित भेदाच्या ज्या काही जागा होत्या, त्यातील एक कमी झाली. वास्तविक परमेश्वर आणि अल्ला यांच्या जोडीला केजरीवाल यांनी आप-चमत्कारासाठी आणखी एका घटकाचे आभार मानावयास हवेत. तो घटक म्हणजे आपली जनता. जनतेचा नितांत भोळसटपणा मदतीला नसता तर आप पक्षाला तसूभरही पाठिंबा मिळता ना. कमालीची अंधश्रद्धा आणि भाबडेपण असल्याखेरीज हे घडत नाही. अन्य राजकीय पक्षांच्या अकार्यक्षम वा भ्रष्ट कारभारास कंटाळलेल्या या जनतेने आपमध्ये आपला आधारस्तंभ पाहिला आणि कोणाच्या ना कोणाच्या खांद्यावर मान टाकल्याखेरीज चैन न पडणाऱ्या या समाजाला तारणहार भेटल्याचा आनंद झाला. याच्याच जोडीला समाजातील आणखी एका वर्गाला केजरीवाल यांची भुरळ पडलेली दिसते. खाऊनपिऊन सुखी असलेल्यांचा आणि त्यामुळे भरल्या पोटाने देशातील व्यवस्था बदलायची निकड वाटू लागणाऱ्यांचा मोठा वर्ग आपल्या समाजात आहे. आर्थिक व्यवस्थेचे सर्वाधिक फायदे याच वर्गाने घेतलेले असतात आणि त्याचा प्रवास उन्नतीकडून अधिक उन्नतीकडेच सुरू असतो. तरीही व्यवस्थेच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांत आणि रडणाऱ्यांत हा वर्ग आघाडीवर असतो. अण्णा हजारे यांच्या मागे काही काळ निर्माण झालेल्या मेणबत्ती संप्रदायात याच वर्गाचा भरणा होता. आता केजरीवाल हे व्यवस्था बदलण्याची भाषा करू लागल्यानंतर या वर्गाने आपल्या हातातील मेणबत्त्या फुंकून आपले डोके आप टोप्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. या अशा टोप्या घातलेली मंडळी संधी मिळाल्यास कशी वागतात त्यांचा घृणास्पद आणि तितकाच भीतीदायक अनुभव मुंबईकरांनी बुधवारी घेतला. आपचे आणि समाजाचे तारणहार असलेले केजरीवाल यांच्या पहिल्यावहिल्या मुंबई स्वारीत शहराचे जे काही हाल झाले त्यावरून हाच का तो वेगळा म्हणवून घेणारा पक्ष असा प्रश्न कोणाही किमान विचारी व्यक्तीस पडला असेल. रिक्षांना लटकणारे उन्मादी कार्यकर्ते, वाहतुकीचे नियम खुंटीवर टांगणारे समर्थक आणि या सगळय़ा कौतुकसोहळय़ाच्या केंद्रस्थानी राहून आनंद लुटणारे केजरीवाल हे दृश मुंबईने बुधवारी दिवसभर अनुभवले. गेल्याच वर्षी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने भाष्य करताना केजरीवाल यांनी मुद्दा कितीही न्याय्य असला तरी कायदा, नियम कधीही मोडता नये असे विधान केले होते. कायद्याशी तेव्हा असलेली ती बांधीलकी आता कोठे गेली? या प्रश्नाने अस्वस्थ झालेले आप नेते जे काही झाले त्याचे समर्थन करताना नरेंद्र मोदी वा अन्य कोणी नेता आला की असेच होते, तेव्हा केजरीवाल यांच्यावरच टीका का, असा प्रश्न करीत होते. अन्य कोणा नेत्यांकडून होते म्हणून केजरीवाल यांचे कृत्य कसे काय समर्थनीय ठरते? अन्य पक्षांचे नेतेही असेच वागतात हा युक्तिवाद केजरीवाल यांच्या बचावार्थ कसा काय होऊ शकतो? कारण अन्यांपेक्षा आपण वेगळे असणार आहोत, हा त्यांचा विक्रयमुद्दा होता. पण जर ते वेगळेपण वागण्यात-बोलण्यात दिसणार नसेल तर केजरीवाल उजवे कसे काय ठरतात? म्हणजे अन्य राजकीय पक्ष कार्यकर्त्यांच्या उन्मादास बोटे मोडायची आणि आपले कार्यकर्तेही तसेच वागले तर त्याचे समर्थन करायचे, ही कोणती नैतिकता? इतरांनी खाल्ले तर ते शेण आणि आपण खाल्ले तर मात्र तो श्रावणीचा प्रसाद ही लबाडी फार काळ टिकू शकत नाही.
आपचे अन्य बाबतीतही तेच होताना दिसते. आपच्या दिल्ली दिग्विजयातील उन्मादी साथीदार कुमार विश्वास, शाझिया इल्मी आदींनी गेल्या दोन दिवसांत दिलेल्या प्रतिक्रिया आपमधील हे बदल ठळकपणे समोर आणतात. गटाराचे पाणी गंगेला मिळू लागले की ते गंगाजल अपवित्र होते, असे काव्यात्म भाष्य या कुमारकवीने आपमधील घटनांच्या अनुषंगाने केले. या कुमारात विश्वास ठेवावा असे तेव्हाही काही नव्हते. आणि आता तर तसे अजिबातच नाही. तरीही त्यांची प्रतिक्रिया दखलपात्र ठरते. ती यासाठी की आपच्या गंगाजलात जे काही गटार येऊन मिळाल्याचे त्यांना वाटते ते सर्व आपचे उमेदवार आहेत. आपने अलीकडे काही पत्रकार, पडद्यावरून गायब झालेले तारेतारका आयात केले त्यावर या कुमाराने विश्वासू प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याच्या कुमारकुजबुजीचा अर्थ असा की आपच्या स्थापनेपासून जे कोण बरोबर होते त्यांना उमेदवारी न देता आपचे नेतृत्व अशा आयात केलेल्यांना उमेदवारी देते. तसे करणे त्यांना मंजूर नाही. त्यावर आपचा खुलासा असा की निवडून येण्याची क्षमता असल्यामुळे अशांना उमेदवारी देण्यात आली असावी. म्हणजे निवडून येण्याची क्षमता ही निवडणूक काळात महत्त्वाची ठरते. मग याही मुद्दय़ावर आप आणि अन्य राजकीय पक्षांत भेद तो काय? बाकीचे पक्षही निवडणुकीच्या काळात असाच विचार करतात. बरे, आपने समाजात दुर्लक्षिले गेलेले सद्गुणांचे पुतळे शोधून काढून त्यांना उमेदवारी दिली आहे, असे म्हणावे तर तेही नाही. हलकेसलके, निवृत्त पत्रकार आणि पडद्यावरून उतरलेल्या तारेतारका यांचाच या उमेदवारांत समावेश आहे. पत्रकार उमेदवार तरी आपल्या व्यावसायिकतेसाठी प्रसिद्ध आहेत असेही नाही. कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणाच्या तरी मदतीने कोणाच्या तरी विरोधात गुप्त छायाचित्रण करून एखाददोन दिवस खळबळ माजवून देण्याव्यतिरिक्त या पत्रकारांनी काही केलेले नाही. शाझिया इल्मी यादेखील याच कारणासाठी संतापल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या काळात चॅनेलीय चर्चात अन्य पक्षीय नेत्यांविरोधात वाटेल ते बोलणे हे त्यांचे कर्तृत्व. त्याही पत्रकार. पण माजी. परंतु केजरीवाल यांना दिल्लीतून लढण्यासाठी आजी पत्रकार मिळाल्यावर त्यांनी या माजी पत्रकाराची उमेदवारी कापली. परिणामी इल्मीबाई संतापल्या. केजरीवाल यांचे लक्ष जेव्हा या धुसफुशीकडे वेधण्यात आले तेव्हा ते म्हणाले, हे दोघे आमच्याच कुटुंबातील आहेत, मी त्यांच्याशी बोललो की सर्व काही ठीकठाक होईल. तेव्हा प्रश्न असा की केजरीवाल यांच्या या विधानात आणि पक्षांतर्गत बंडाळी निकामी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अन्य कोणा पक्षप्रमुखांत फरक तो काय?
तात्पर्य हे की आपण कोणी पवित्र, पडदानशीन आहोत हा केजरीवाल यांचा बुरखा विरू लागला असून जनतेचा भाबडेपणा किती टिकतो त्यावर या विरण्याची गती अवलंबून असणार आहे. या ‘आप’त्तीचे व्यवस्थापन थंड डोक्याने आणि विचारी वृत्तीनेच व्हायला हवे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Mar 2014 रोजी प्रकाशित
‘आप’त्ती व्यवस्थापन
नरेंद्र मोदी वा अन्य कोणी नेता आला की असेच होते, तेव्हा केजरीवाल यांच्यावरच टीका का, असा प्रश्न केजरीवाल यांच्या मुंबई-भेटीनंतर ‘आप’चे कार्यकर्ते करीत होते.

First published on: 14-03-2014 at 01:09 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal mumbai visit more disastrous