एकवेळच्या जेवणाची तजवीज करता न येणाऱ्या मोरोक्कन इसमाच्या हाती काही पैसे पडल्यास त्याचा कल टीव्हीसंच विकत घेण्याकडे का असतो? किंवा मागास भागांतील गरीब विद्यार्थी कसेबसे शाळेपर्यंत पोहोचत असले, तरी त्यांना शिक्षण घेण्यात अडचणी का येतात? अथवा महाराष्ट्रातील गरिबातील गरीब कुटुंब त्यांच्या एकूण उत्पन्नातील पाच टक्के रक्कम साखरेवर का खर्च करते? अंधाऱ्या वास्तवाच्या आत असे प्रश्न दडलेले आहेत, त्यांची उत्तरे शोधायला हवीत आणि त्यासाठी नव्या पद्धतींचा वापर करायला हवा, हे कळण्यासाठी अर्थशास्त्राचे ज्ञान हवेच; पण दारिद्रय़ाच्या भीषण स्वरूपाची जाणीवही हवी. यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी आणि आधी त्यांची विद्यार्थीनी, मग सहकारी व पुढे जीवनसाथी झालेल्या ईस्थर डफ्लो यांच्याकडे ती होती. म्हणूनच त्यांनी अन्य सहकाऱ्यांसह २००३ साली स्थापन केलेल्या ‘पॉव्हर्टी अॅक्शन लॅब’च्या माध्यमातून जगभरच्या गरिबीचा आणि गरिबांच्या स्थितीचा प्रत्यक्ष त्या-त्या ठिकाणी जाऊन धांडोळा घेतला. त्यात वरील प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळाली आणि ती त्यांनी २०११ साली संयुक्तपणे लिहिलेल्या ‘पूअर इकॉनॉमिक्स’ या पुस्तकात मांडली. या पुस्तकातून त्यांनी दाखवलेला ‘प्रयोगशील अर्थशास्त्रीय दृष्टिकोन’ किती महत्त्वाचा आहे, हे या आठवडय़ात त्यांना जाहीर झालेल्या नोबेल पुरस्काराच्या निवड समितीनेही अधोरेखित केले. नोबेलच्या या आनंदवार्तेपाठोपाठ आणखीही एक बातमी आली, ती म्हणजे अभिजित बॅनर्जी आणि ईस्थर डफ्लो यांनी संयुक्तपणे लिहिलेले नवे पुस्तक पुढील महिन्यात- नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध होत आहे! ‘गुड इकॉनॉमिक्स फॉर हार्ड टाइम्स’ या शीर्षकाचे हे पुस्तक ‘जगरनॉट’ या प्रकाशनसंस्थेतर्फे प्रकाशित होत आहे. ‘आजच्या आपल्या मोठय़ा समस्यांना उत्तरे’ असे उपशीर्षक असलेल्या या पुस्तकात-स्थलांतरितांचा प्रश्न, विकास की प्रगती हे द्वंद्व इथपासून कृत्रिम बुद्धिमत्ता ते हवामान बदल अशा मुद्दय़ांची चर्चा आहे. काळ कठीण आहेच; पण तो सुसह्य़ होण्यासाठी बुद्धिवंतांचे साहाय्य राज्यसंस्थेने घ्यावे, असे सांगणारे हे पुस्तक धोरणकर्त्यांना दिशा देणारेच असेल. प्रश्न आहे तो त्या दिशेने जायचे की नाही, हा!
संग्रहित लेख, दिनांक 18th Oct 2019 रोजी प्रकाशित
बुकबातमी : नोबेलपाठोपाठ नवे पुस्तक!
‘गुड इकॉनॉमिक्स फॉर हार्ड टाइम्स’ या शीर्षकाचे हे पुस्तक ‘जगरनॉट’ या प्रकाशनसंस्थेतर्फे प्रकाशित होत आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 18-10-2019 at 23:45 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: About book good economics for hard times zws