वसंत माधव कुळकर्णी

आशिया खंडातील सर्वात मोठे कारागृह असलेल्या तिहारच्या चार भिंतींआतील अद्भुत दुनियेचे दर्शन घडवणारे हे पुस्तक तिहार कारागृहाशी संबंधित गेल्या सुमारे चार दशकांतील अनेक घडामोडींची रोचक माहिती देणारे आहे..

once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
msrtc buses, Scrapped msrtc buses, Maharashtra ST Corporation, Scrapped buses, no data msrtc, good buses, bad buses, out of order buses, rti, maharashtra st, maharshtra buses, marathi news, maharashtra news,
धक्कादायक! ‘एसटी’कडे चांगल्या, नादुरुस्त बसेसची माहितीच नाही!
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?

तिहार कारागृह नेहमीच बातम्यांच्या केंद्रस्थानी असते. कधी कैद्यांवर अत्याचार, कधी एखाद्या वलयांकित व्यक्तीस तिहारमध्ये आणल्याच्या निमित्ताने, तर कधी एखाद्या कैद्यास न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीमुळे पत्रकार तिहारकडे लक्ष वेधत असतात. अशा तिहार कारागृहाशी तब्बल ३५ वर्षे संबंधित असलेल्या आणि तिहारचे कायदा अधिकारी व प्रवक्तेपदी राहिलेल्या सुनील गुप्ता यांचे ‘ब्लॅक वॉरंट : कन्फेशन ऑफ ए तिहार जेलर’ हे पुस्तक कारागृहाच्या चार भिंतींच्या आतील अद्भुत दुनियेचे वाचकांना दर्शन घडवते. लेखकद्वयीने आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. सुनील गुप्ता यांची भूमिका सत्य सांगण्याची, तर मूळच्या ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या पत्रकार व आता चित्रवाणी माध्यमात गेलेल्या सुनेत्रा चौधरी यांची भूमिका कथनकाराची आहे. त्यामुळे लेखन प्रवाही झाले आहे. कधीकाळी रेल्वेत नोकरी करणारे सुनील गुप्ता १९८०च्या दरम्यान भारतीय तुरुंगसेवेत साहायक पर्यवेक्षक म्हणून रुजू झाल्यापासून सुरू झालेला हा प्रवास २०१६ मध्ये तिहार कारागृहाचे कायदा सल्लागार म्हणून निवृत्त होण्यापर्यंतची ही स्मरणयात्रा. या यात्रेत आशिया खंडातील सर्वात मोठय़ा असलेल्या या कारागृहात घडलेल्या निवडक घटनांचा घेतलेला मागोवा वाचायला मिळतो.

तिहार कारागृहाची क्षमता सहा हजार कैद्यांची असली, तरी दहा हजारांहून अधिक कैद्यांना या कारागृहात ठेवण्यात येते. दिल्लीतल्या ‘पहिल्या निर्भया’ प्रकरणात फाशी दिलेल्या रंगा आणि बिल्लाची फाशी, चार्ल्स शोभराजचे तुरुंगातून पलायन, बिस्किटसम्राट राजन पिल्लेचा तुरुंगात झालेला मृत्यू, केंद्रीय गृहमंत्री असताना झैलसिंग यांची तिहारभेट आणि या भेटीत खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांना कैद्यांकडून दारू पिण्यासाठी झालेला आग्रह व त्यामुळे लेखकाचे झालेले तात्पुरते निलंबन अशा अनेक घटनांची, प्रसंगांची माहिती यात वाचायला मिळते. दिल्लीतील २०१२ सालच्या निर्भय बलात्कार आणि हत्याकांडातील एक आरोपी असलेल्या रामलालची आत्महत्या नसून ती अन्य कैद्यांनी केलेली हत्या असल्याचा दावा लेखकांनी केला आहे. रामलालच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या शरीरात मद्याचा अंश सापडल्याची नोंद आणि त्याने ‘आत्महत्या’ केल्यावेळची वास्तवता लक्षात घेता, ही हत्या असल्याचा लेखकाचा दावा वाचकांना पटवून देण्यात पुस्तक यशस्वी होते. अशा काही धक्कादायक, पडद्याआडच्या गोष्टीही वाचकांना पुस्तकातून कळतात. पुस्तकातील रामलालवरील प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाने पुढील एका खटल्याच्या सुनावणीसंदर्भात दाखला दिला आहे.

अण्णा हजारेंच्या २०१२ मधील रामलीला मैदानातील आंदोलनात अण्णांना अटक करून तिहार कारागृहात नेण्यात आले. सरकारवरील दबावामुळे पुढे अण्णांची सुटका करण्याचा सरकारी निर्णय तिहार कारागृहाच्या प्रशासनाला कळवण्यात आला. अण्णांना लवकरात लवकर तुरुंगाबाहेर काढावे, असा सरकारचा मनसुबा होता; परंतु अण्णांचा ‘जेल मॅन्युअल’चा चांगला अभ्यास होता. त्यामुळे सुटका होऊनही तुरुंगाबाहेर न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, या निर्णयामुळे तुरुंग अधिकारी आणि तत्कालीन दिल्ली पोलीस आयुक्त यांच्या तोंडाला फेस आणल्याचा किस्सा रंजक आहे. अशा अनेक नाटय़पूर्ण प्रसंगांचा या पुस्तकात समावेश आहे. याच दरम्यान अरविंद केजरीवाल आणि त्यांचे विश्वासू सहकारी मनीष सिसोदिया हेही तिहारचा पाहुणचार घेऊन गेले. या काळात राजकीय पक्ष स्थापन करून सत्ता काबीज करण्याचा या दोघांचा विचार नसावा, अशी टिप्पणी लेखकांनी केली आहे.

कायम तिहार कारागृहाच्या बातम्यांना अग्रस्थानी ठेवल्याने ‘तिहार’च्या अंतर्गत वर्तुळात ‘द इंडियन एक्स्प्रेस’चा उल्लेख ‘तिहार एक्स्प्रेस’ असा होत असल्याची गमतीशीर नोंद पुस्तकात आहे. गुप्ता यांनी आपल्या कारकीर्दीत १४ गुन्हेगारांच्या फाशीसाठी आवश्यक असलेले ‘ब्लॅक वॉरंट’ (ज्या वॉरंटमध्ये कैद्याला फासावर चढविण्याची तारीख आणि वेळ नमूद केलेली असते.) मिळवून गुन्हेगारांना फाशीवर चढवण्याचे कर्तव्य बजावले. यापैकी तिहार कारागृहात फाशी दिलेल्या आठ गुन्हेगारांच्या फाशींचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होते. कैद्यांच्या हक्कांचे तिहार कारागृहात (कदाचित देशातील कुठल्याच कारागृहात) पालन होत नाही, असे खेदाने नमूद करतानाच ‘सहारा’चे सुब्रतो राय, जेसिका खून खटल्यातील गुन्हेगार मनु शर्मा, नितीश कटारा खून खटल्यातील आरोपी यादव बंधू आणि भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात असलेले सुरेश कलमाडी यांसारख्या वलयांकित कैद्यांच्या तुरुंगातील विलासी जीवनाचे किस्से अचंबित करून टाकतात. कैद्यांना तुरुंगात कराव्या लागणाऱ्या कामांपैकी नाभिकाचे काम करण्यास अनेक अनुभवी कैद्यांमध्ये चढाओढ असते. कारण अधिकाऱ्याला चंपी-मालीशच्या कामातून खूश करून, त्या बदल्यात अनेक सेवासुविधा घेता येतात, असे अनुभवही लेखकाने मांडले आहेत. तुरुंग व्यवस्थापनाचे औपचारिक प्रशिक्षण न मिळाल्याचे नमूद करत, खरे तुरुंग व्यवस्थापनाचे शिक्षण कैद्यांनीच दिल्याचे गुप्ता सांगतात. तुरुंग अधिकाऱ्यांचे मदतनीस म्हणून काम करणाऱ्यांपैकी खुनाच्या गुन्ह्य़ात शिक्षा झालेले कैदी तुरुंगातील सर्वात विश्वासू साथीदार असल्याचा लेखकाचा दावा थक्क करून जातो. कारागृहाचे  औपचारिक व्यवस्थापन तुरुंग प्रशासनाकडून होत असले, तरी शिक्षा भोगणारे कैदीच खऱ्या अर्थाने तुरुंगाचे व्यवस्थापन करत असतात, असा दावा लेखक करतात. कैद्यांच्या सहकार्याशिवाय तुरुंग प्रशासन काम करूच शकत नाही. आणीबाणीदरम्यान १९७७ साली स्थानबद्ध असलेल्या अनेक जणांचा मुक्काम तिहार कारागृहात होता. पुढे जनता पक्षाची स्थापना एका अर्थाने तिहार कारागृहातच कशी झाली, हेही पुस्तकात वाचायला मिळते. ‘बाहेर’च्या जगाला अज्ञात असलेल्या ‘आतल्या’ जगातल्या अनेक रोचक गोष्टी लेखक विस्ताराने सांगतात.

फाशी देण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. या प्रक्रियेची सर्व तयारी जल्लाद करतात. फाशीच्या साखळीचा जल्लाद हा महत्त्वाचा घटक असतो. काळू आणि फकिरा या दोन जल्लादांविषयी लेखकांनी विस्ताराने लिहिले आहे. शत्रुघ्न चौहानला फासावर चढवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केल्याचे लेखक सांगतात. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याने किमान २० जणांची फाशी रद्द केली गेली. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार फाशीनंतर शवविच्छेदन सक्तीचे करण्यात आले आहे. फाशी देताना फाशी दिली जाणाऱ्या व्यक्तीस कमीत कमी त्रास व्हावा, हा त्यामागचा हेतू आहे. फाशी देताना या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्याची खात्री करून घेण्यासाठीच शवविच्छेदन करण्यात येते, असे लेखक नमूद करतात.

राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज नामंजूर केल्यानंतर, ज्या न्यायालयाने त्या गुन्हेगाराला पहिल्यांदा फाशीची शिक्षा सुनावली असेल, मग ते सत्र न्यायालय असो किंवा जिल्हा न्यायालय असो, त्या न्यायालयातून त्या आरोपीला फाशी देण्याचे ‘डेथ वॉरंट‘ (ब्लॅक वॉरंट) मिळवण्यात येते. या वॉरंटमध्ये त्या गुन्हेगाराला फाशी देण्याचा दिवस आणि फाशी देण्याची वेळ निश्चित केलेली असते. सर्वसाधारण सूर्योदयावेळी, इतर कैद्यांना फाशीची खबरबात न लागता शिक्षा झालेल्या कैद्याला फाशी देण्याचा प्रघात आहे. सकाळी इतर कैदी झोपून उठण्याआधी फाशीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.

सर्वोच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करते किंवा आरोपीस संशयाचा फायदा देत निर्दोष ठरवते. गुन्हा शाबीत होऊन सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारास फाशी निश्चित केल्यानंतर गुन्हेगार शेवटचा मार्ग म्हणून राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करतात. राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज पोहोचल्यावर या अर्जावर किती दिवसांत निर्णय घ्यावा, याबाबत निश्चित कालमर्यादा नसल्याचे लेखक नमूद करतात. अफजल गुरूच्या बाबतीत, त्याचा अर्ज राष्ट्रपती कार्यालयाला माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या कारकीर्दीत प्राप्त झाला. कलाम यांच्यानंतर राष्ट्रपतिपदी आलेल्या प्रतिभा पाटील यांनी अफजलच्या अर्जावर निर्णय घेतला नाही. प्रणब मुखर्जी यांनी राष्ट्रपती कार्यालयाचा कार्यभार सांभाळण्यास सुरुवात केली तेव्हा देशभरातून फाशी ठोठावलेल्या ३१ गुन्हेगारांचे अर्ज दयेच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत होते. मुखर्जी यांनी त्यांच्या पूर्वसुरींच्या राहून गेलेल्या कामाची पूर्तता केली. यापैकी अफजल गुरूचा दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याच्या फाशीचे ‘ब्लॅक वॉरंट’ मिळवल्यापासून अफजलला फासावर लटकवण्यापर्यंतचा पुस्तकात वर्णिलेला प्रवास एखाद्या चित्रपटकथेसारखा खिळवून ठेवतो आणि फाशी जाण्यापूर्वी एक कप चहा पिण्याची अफजलची इच्छा राहून गेल्याचे वाचून आपसूक हळहळायला होते.

तिहार हे एक कुटुंब आहे. या कुटुंबात असलेल्या प्रत्येकाने गंभीर गुन्हा केला असला, तरी फाशी जाताना त्याच्या मानवी हक्कांवर गदा येणार नाही याची काळजी न्यायालय आणि कारागृह प्रशासनाने घ्यायला हवी, हा लेखकाचा विचार पुस्तक वाचून खाली ठेवताना अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो. हेच या पुस्तकाचे यश म्हणायला हवे!

shreeyachebaba@gmail.com