गोदावरी डांगे, तुळजापूर तालुक्यातल्या कार्यकत्र्या. त्यांची शहरी वाचकांना चटकन ‘इम्प्रेस’ करणारी ओळख म्हणजे, १४ देशांना आजवर भेद दिलीय त्यांनी. संयुक्त राष्ट्रांमध्येही जाऊन आल्यात त्या. ‘शाश्वत शेती’ हा केवळ बोलण्याचा विषय न राहाता दुष्काळी भागात कमी पाणी वापरूनही मुलं आणि महिलांना पोषक आहार मिळावा, भाज्या पिकवता याव्यात, यासाठी भरपूर काम केलंय त्यांनी. ‘एका एकरात भाज्यांची शेती’ हा प्रयोग अनेक गावांमध्ये त्यांच्यामुळे यशस्वी होऊ शकला, कारण त्यांनी  अन्य कायकर्त्यांनाही घडवलंय. उभं केलंय. अर्थात याकामी त्यांना पुण्याच्या एका स्वयंसेवी संस्थेचं पाठबळ होतं. पण संस्थेला काम वाढवणारे कार्यकर्ते हवे असतात, तशा गोदावरी डांगे. त्यांची कहाणी आता इंग्रजी आणि मराठीत पुस्तकरूपानं आलेली आहे… हे छोटेखानी (३२ पानी) पुस्तक म्हणजे चित्रकथा आहे! रीतिका रेवती सुब्रमणियन या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका, तर मैत्री डोरे या चित्रकार आहेत. पुस्तकासाठी ‘गटे इन्स्टिट्यूट’ या जर्मनमैत्री संस्थेच्या इंडोनेशिया शाखेनं साह्य केलं.  अशी पुस्तकं निघत असूनही जर ‘हल्ली चांगली पुस्तकंच नाहीत हो?’ असाच सूर लावायचा असेल तर बसा रडत! पण रडत न बसणाऱ्यांची ही गोष्ट वाचायची नि पाहायची असेल, तर उगाच ‘कुठे मिळेल’ वगैरे नका विचारू. संगणकाच्या पडद्यावर त्याची ‘पीडीएफ आवृत्ती’ अत्यंत अधिकृतपणे, https://www.goethe.de/ins/id/en/kul/kue/mmo/brg.html   या लिंकवरून  वाचता येईल!