अमेरिकेच्या हेरगिरीचा खरा चेहरा जगासमोर उघड करणारा एडवर्ड स्नोडेन आपले अनुभव पुस्तकरूपात आणतोय, याच्या बातम्या गेल्या दोनेक महिन्यांत जगभरच्या प्रसारमाध्यमांतून आल्या. याआधी ‘बुकबातमी’मध्येही त्याबद्दल लिहिले होतेच; त्याप्रमाणे ते पुस्तक आलेही. मात्र, या पुस्तकाला अमेरिकी व्यवस्थेकडून विरोध होणार, असा अनेकांकडून व्यक्त झालेला अंदाज किती खरा होता, यावर शिक्कामोर्तब करणारी बातमी मंगळवारी- म्हणजे पुस्तक प्रकाशनानंतर लगेचच- आली. ती अशी की, अमेरिकी सरकारच्या न्याय विभागाने स्नोडेनच्या या पुस्तकाविरोधात न्यायालयात रीतसर खटला दाखल केला आहे. स्नोडेन याने अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांमध्ये कामास सुरुवात करण्याआधी अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थेच्या आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या करारावर स्वाक्षरी केली होती. त्या करारानुसार त्याने गोपनीय माहिती उघड करू नये, अशी सक्ती आहे, असे अमेरिकी सरकारचे म्हणणे आहे. परंतु स्नोडेन याने हे पुस्तक लिहून त्या कराराचा भंग केला आहे, असे त्याबद्दलच्या निवेदनात अमेरिकी सरकारच्या वतीने म्हटले आहे. याआधी स्नोडेन आणि त्याचे पुस्तक प्रकाशित करणारी ‘मॅकमिलन’ ही प्रकाशन संस्था यांच्यातील आर्थिक व्यवहाराविरोधात अमेरिकी जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आलेला होताच; आता प्रकाशनानंतर अमेरिकी न्याय विभागाने सध्याचा खटला दाखल केला आहे. मात्र, प्रकाशकांच्या वतीने त्याबद्दलचे आरोप फेटाळण्यात आले असून स्नोडेनचे पुस्तक त्याच्या आठवणी सांगणारे असून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या वाटचालीत त्याने कसा हातभार लावला, याविषयी सांगणारे आहे, असे स्पष्ट केले आहे. अमेरिकी सरकारने या पुस्तकाविरोधात हालचाली सुरू केल्या असल्या, तरी पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे!
संग्रहित लेख, दिनांक 21st Sep 2019 रोजी प्रकाशित
बुकबातमी : प्रकाशनापाठोपाठ खटलाही..
अमेरिकी सरकारने या पुस्तकाविरोधात हालचाली सुरू केल्या असल्या, तरी पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे!
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 21-09-2019 at 00:44 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review of permanent record by edward snowden zws