मासिक पाळी हा विषय आजही तसा ‘अस्पृश्यच’. म्हणूनच ‘पीरियड मॅटर्स : मेन्स्ट्रुएशन इन साउथ एशिया’ या फराह अहमद यांनी संपादित केलेल्या संग्रहाविषयी उत्सुकता आहे. ३० जून रोजी हा संग्रह प्रकाशित होणार आहे. यात अनेक मान्यवरांबरोबरच लिंगबदल केलेल्या व्यक्ती, तुरुंगातील महिला, बेघर व्यक्ती अशा अनेकांचे मासिक पाळीविषयीचे अनुभव, आठवणी, कथा आणि व्यथा यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर संपादिकेचे मनोगत असे :

‘सर्जनशीलता अनेक दरवाजे खुले करते. आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा अनेक क्षेत्रांत बदल घडवण्याची क्षमता तिच्यात असते. हा स्वत:विषयीची कोडी सोडवण्याचा, अस्तित्वाचे रहस्य उलगडण्याचा प्रवास असतो. सरधोपट मार्गापेक्षा वेगळय़ा मार्गाने अधिक खोलात जाऊन रजोस्रावाविषयीच्या (मासिक पाळीविषयीच्या) कथा सांगणे हा माझ्या या कथासंग्रहामागचा हेतू आहे. मी स्वत:लाच प्रश्न केले- विविध दृष्टिकोन कसे सामावून घेता येतील? कोणते लेखक किंवा कलावंत हे वैविध्य टिपू आणि मांडू शकतील? पूर्ण कलात्मक स्वातंत्र्यातच याचे उत्तर सापडू शकेल, असे मला वाटले. शैलीविषयी किंवा स्वरूपाविषयी कोणताही साचा नाही. तुमचे स्वत:चे अनुभव तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मांडा, एवढीच अपेक्षा होती.

पुस्तक आकार घेऊ लागले, तसे एक सूत्र हाती लागले. सर्व कथांच्या मुळाशी एकच अपेक्षा होती, आणखी थोडय़ा स्वातंत्र्याची. हवे तर स्पष्टपणे बोला, नाही तर शांत राहा, खोलीत बंद करून घ्या किंवा बाहेर पडा, देवळात जा, नाहीतर कौटुंबिक समारंभात सहभागी व्हा, हवे तसे वागण्याचे स्वातंत्र्य! काय शिकावे, कोणाशी लग्न करावे, काय खावे याची निवड करण्याचे स्वातंत्र्य. आणि हो..  इतर सर्व मूलभूत गरजांप्रमाणेच पाळीशी संबंधित हवी ती उत्पादने निवडण्याचा हक्क.

काहींसाठी हे लेखन म्हणजे अगदी खासगी स्वरूपाच्या आठवणी होत्या. अशा आठवणी, ज्यांचा त्यांच्या भविष्यातील अस्तित्वावर आणि नातेसंबंधांवर अमीट ठसा उमटला. या सर्व लेखकांच्या अनुभवांचा पहिला वाचक असणे, ही माझ्यासाठी भाग्याची आणि काही वेळा अतिशय वेदनादायी गोष्ट होती. त्यांच्या भूतकाळात डोकावणे, लेखनातून, चित्रातून, नृत्यातून आपल्या कथा मांडण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची प्रक्रिया जाणून घेणे हा माझ्यासाठी एक मोलाचा अनुभव ठरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यातील काही लेखकांचा या उपक्रमात सहभागी होण्यापूर्वीपासूनच माझ्यावर मोठा प्रभाव होता आणि इतर नंतर या प्रक्रियेत सहभागी होत गेले. यातील काही जण सांस्कृतिक, आर्थिक, कौटुंबिक आणि आरोग्यविषयक समस्यांशी झगडत होते. जिथे इंटरनेट नाही, वीज सतत खंडित होत राहते, अशा दुर्गम भागांत राहणाऱ्यांपुढील आव्हाने वेगळीच होती. माझे हे प्रयत्न हळूहळू फलद्रूप झाले. एकातून दुसरा मार्ग गवसत गेला.’ कथा, लेख, कविता यांसोबत काही चित्रांतूनही पाळीसारख्या अस्पर्शित विषयावर या पुस्तकात सहभागी झालेल्या लेखिका आणि काही लेखकही- कसे व्यक्त होतात, याविषयीची उत्सुकता अशा संपादकीय टिपेमुळे वाढलीच आहे.