थॉमस रिक्स हे दोनदा पुलित्झर पुरस्कार मिळविलेले लेखक. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ अशा अमेरिकी वर्तमानपत्रांचे संरक्षणविषयक स्तंभलेखक अशी त्यांची ओळख. ‘फियास्को- द अमेरिकन मिलिटरी अ‍ॅडव्हेंचर इन इराक’ हे अमेरिका-इराक युद्धावरील २००६ साली प्रकाशित झालेलं त्यांचं पुस्तक बरंच गाजलं. याच पुस्तकाचा पुढचा भाग म्हणून २००९ मध्ये प्रसिद्ध झालेलं ‘द गॅम्बल’ हे पुस्तक किंवा त्यांची ‘द सोल्जर्स डय़ुटी’ ही कादंबरी अशा काही पुस्तकांमुळे भारतीय वाचकांनाही ते परिचित आहेत. गेली सुमारे चार दशकं संरक्षणविषयक विश्लेषणपर लेखन करणाऱ्या रिक्स यांचं नवीन पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालं. बातमी त्या पुस्तकाचीच आहे. याचं कारण रिक्स यांचं नवं पुस्तक त्यांच्या आजवरच्या लिखाणापेक्षा- म्हणजेच संरक्षणक्षेत्रापेक्षा- निराळ्याच विषयावरचं आहे. ‘चर्चिल अ‍ॅण्ड ऑर्वेल’ हे त्या पुस्तकाचं शीर्षक. ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि लेखक जॉर्ज ऑर्वेल हे विसाव्या शतकातील दोन महानुभाव. या दोघांच्या स्वातंत्र्यविषयक विचारांचं विवेचन या पुस्तकात करण्यात आलं आहे.

चर्चिल आणि ऑर्वेल हे दोघं समकालीन. १९२९ची जागतिक आर्थिक महामंदी आणि त्यानंतरच्या दशकात युरोपात विविध देशांत उदयाला आलेल्या हुकूमशाही राजवटी, त्याचं फलित म्हणून झालेलं दुसरं महायुद्ध.. हा या दोघांच्या कर्तृत्वाचा काळ. तत्कालीन जागतिक घडामोडी, एकाधिकारशाही प्रवृत्तींची झालेली वाढ आणि त्याचे मानवी समाजावरील परिणाम हे सारं या दोघांनी प्रत्यक्ष अनुभवलं. त्याला प्रतिसाद म्हणूनच ऑर्वेलच्या ‘अ‍ॅनिमल फार्म’, ‘नाइन्टीन एटी फोर’ या कादंबऱ्या आल्या. तर चर्चिल यांच्या असामान्य नेतृत्वामुळे महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव झाला. एकाधिकारशाही.. मग ती डावी असो की उजवी.. या दोघांनी त्याविरुद्ध लेखणी आणि कृतीतून आपापल्यापरीने लढा दिला. सध्याचा जागतिक राजकीय लंबक हा एकाधिकारशाहीकडेच झुकत असताना चर्चिल आणि ऑर्वेल यांच्यावरील रिक्स यांचं हे पुस्तक आलं आहे. त्यामुळे त्याचं महत्त्व अधिक आहे.