आपण जे बोलतो ते एकतर सत्य असते किंवा असत्य, परंतु यंदा आणखी एक प्रकार उदयाला आला आहे. तो म्हणजे ‘सत्योत्तर’! ऑक्सफर्ड शब्दकोशात नव्याने भर पडलेल्या ‘पोस्ट ट्रथ’ या शब्दाने हा तिसरा प्रकार सध्या चर्चेत आणला आहे. आताआतापर्यंत सत्य-असत्य यांच्याभोवती फिरणारी चर्चा यंदा ‘पोस्ट ट्रथ’ म्हणजेच ‘सत्योत्तर’भोवती कधी गेली हे अनेकांच्या ध्यानातच आले नाही. युरोपीय महासंघातून ब्रिटनने केलेले ब्रेग्झिट आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली सरशी, या दोन घटनांनी दिलेला हा शब्द. गेल्या महिन्यात तो ऑक्सफर्डने जाहीर केला. विशेषण म्हणून नोंदवलेल्या या शब्दाचा अर्थ असा- ‘लोकांची मते ठरवण्यासाठी तथ्यांपेक्षा भावना महत्त्वाच्या ठरवले जाण्याची परिस्थिती.’ तथ्य आणि भावना यांच्यातील हे द्वंद्व वरील दोन घटनांनी जवळपास नाहीसेच केले. त्यामुळे ‘आता भावना हेच तथ्य’ हाही या शब्दाचा आणखी एक गर्भित अर्थ. सर्बियन-अमेरिकन नाटककार स्टीव्ह तेसीच याने १९९२ साली लिहिलेल्या लेखात हा शब्द पहिल्यांदा वापरला. २००४ मध्ये तर राल्फ केइस या लेखकाने ‘पोस्ट ट्रथ इरा’ नावाचे पुस्तकच लिहिले. परंतु राजकीय भाषेशी पोस्ट ट्रथला सर्वात प्रथम जोडले ते डेविड रॉबर्ट या ब्लॉगरने. २०१० साली लिहिलेल्या ब्लॉगमध्ये रॉबर्टने हा शब्द वापरला. त्यानंतर २०१६ मध्ये तर पोस्ट ट्रथचा वापर अनेकदा झाला. पोस्ट ट्रथच्या वापराबद्दल हे सारे ऑक्सफर्डनेही नोंदवले आहे.
‘भावना हेच तथ्य’ या तत्त्वावर चालणाऱ्या राजकारणासाठी ‘सत्योत्तर’ हा शब्द वापरण्याची सुरुवात झाली १९९० च्या दशकात. पण याला पाश्र्वभूमी आहे ती विसाव्या शतकाच्या पूर्वार्धाची. युरोप- अमेरिकेत १९३०-४० च्या दशकांत मार्केटमधील बदलांविषयी संशोधन करणाऱ्या संस्थांची झालेली सुरुवात, पुढे महायुद्धोत्तर काळात अमेरिकन इंटरप्राइज इन्स्टिटय़ूटसारख्या विचारगटांचा तिथल्या सरकारी धोरणांवरचा वरचष्मा, याच काळात वर्तणुकीच्या अर्थशास्त्राचा वाढलेला दबदबा, याने तथ्यांवर आधारित अर्थकारण- राजकारणाला उठाव मिळाला होता. पण पुढे १९९०च्या दशकापासून यायला लागलेली नवी माध्यमे आणि त्याला इंटरनेटने मिळालेल्या गतीमुळे माहितीची प्रचंड निर्मिती होऊ लागली. आता या प्रचंड माहितीसाठय़ात नक्की कोणत्या माहितीत तथ्य आहे हा प्रश्न निर्माण झाला. आधुनिकतेत दिलेली तथ्ये ही विशेषज्ञांनी निर्माण केलेली होती, तर आता उत्तरआधुनिक- माध्यमयुगात सर्वचजण विशेषज्ञ ठरतात. त्यामुळे या काळात अनेक तथ्ये, अनेक वास्तवे पुढे येऊ लागली. त्याचा लाभ झाला तो राजकीय वर्गाला. तथ्यांविषयीच्या या संभ्रमामुळेच भावनिक आवाहनावर लोकमानस अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न या काळात होऊ लागला. त्याचे सर्वात यशस्वी उदाहरण म्हणून ब्रेग्झिट किंवा ट्रम्पविजयाकडे पाहता येईल. या सर्वाला पोस्ट ट्रथ म्हणण्यामागे हे सर्व येते. याचा अर्थ आधी सत्याला पर्यायाने तथ्यांना महत्त्व होते, ते आता नाहीसे झाले असेही हा शब्द सांगू पाहतोय.
ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडावे यासाठी केले गेलेले युक्तिवाद किंवा ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात केलेली वक्तव्ये यांच्यात तथ्य म्हणून हाती फारच कमी लागते. तरीही या सर्वाला पाठिंबा मिळाला. याचे कारण ‘भावना हेच तथ्य’! जनमानसाला भावनिक आवाहन केले की तथ्यांची फारशी आवश्यकता नसते. भावनिक लाटेवर तितक्याच भावनिकतेने स्वार झाल्यास तथ्यांची विचारणा होत नाही, हेच या घटनांनी दाखवून दिले. ज्या दिवशी पोस्ट ट्रथ हा शब्द ऑक्सफर्डने जाहीर केला, त्याच दिवशी आपल्याकडे निश्चलनीकरणाची घोषणा झाली. या निर्णयाला जनतेने पाठिंबा द्यावा यासाठी केले गेलेले व सुरू असलेले युक्तिवाद हे तथ्यांपेक्षा भावनिकतेवर आधारलेले का आहेत, याची मुळे पोस्ट ट्रथमध्येच पाहावी लागतील.
तथ्य मांडून लोकमानसाचे प्रबोधन करण्याऐवजी भावनिक आवाहन करणाऱ्या घोषणा करणे, किंवा ऐकणाऱ्यांना संभ्रमात पाडणारी चमत्कृतीपूर्ण भाषणे करणे ही या पोस्ट ट्रथ काळातील नेतृत्वाची शैली. समर्थ रामदासांच्या काळात ‘सत्योत्तर’ हा शब्द नव्हता, पण वक् त्याने काय करू नये, याची जाण रामदासांना तरी नक्कीच होती. गोंधळ उडवणारी वक्तव्ये केली गेलीच तर श्रोत्यांमधील अल्पमती-धारकांना ‘सत्य उत्तर’ मिळेनासे होते, हे सांगताना ‘अल्पास न घडे सत्योत्तर’ अशी स्थिती रामदासांनी वर्णिली आहे. मात्र असत्य उत्तरांमध्येच सुज्ञदेखील रममाण होऊ लागल्याची अनेक उदाहरणे गेल्या दोन-तीन वर्षांपासून जगभरात दिसून येतात. हीच ती सत्त्यानंतरच्या- सत्योत्तर राजकारणाची स्थिती! राजकीय नेतृत्वाच्या या अशा ‘श्रोत्यांस घडे सत्योत्तर’ शैलीमुळे पोस्ट ट्रथ राजकारणाची सध्या तरी सरशी दिसत आहे.