विज्ञानावर सोप्या भाषेत लिहिणे सोपे नसते, अगदी थोडय़ाच वैज्ञानिकांना ते जमले आहे, त्यातच गेल्या काही वर्षांत रुळलेला विज्ञान-कॉमिक्स हा प्रकार आणखी अवघड. एकेकाळी कॉमिक बुक्समध्ये वेगवेगळ्या पेहरावातील नायक- नायिका असायच्या व त्यातून कथा रंगवली जात असे; त्यात पृथ्वी ग्रह वाचवणे व इतर अनेक साहस कथांचा समावेश असे. परंतु वैज्ञानिक माहिती कॉमिकच्या माध्यमातून मांडणे सोपे नाही. बहुतेकदा ‘विज्ञान-काल्पनिका’ म्हणून खपवल्या जाणाऱ्या  कॉमिकवजा पुस्तकांत माहितीपेक्षा चमत्कारच जास्त असतात.  फर्स्ट सेकंड बुक्सने मात्र याला फाटा देऊन ‘कॉमिक’मध्येही माहितीवर भर दिला. त्यांची दोनच पुस्तके  आजवर प्रकाशित झाली असली, तरी आणखी १३ पुस्तके २०१७ ते २०१९ दरम्यान प्रसिद्ध होतील.  त्यात ड्रोन विमानांचा इतिहास, मानवी मेंदूची उत्क्रांती, कावळ्याची बुद्धिमत्ता, वनस्पतींचे जीवन असे वेगळे विषय हाताळले आहेत. चित्रांच्या मदतीने विज्ञान मुलांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न स्वागतार्हच आहे. मार्च २०१६ मध्ये द फर्स्ट सेकंड बुक्सने दोन खंड प्रसिद्ध केले होते, त्यांची नावे ‘कोरल रीफस-सिटीज ऑफ द ओशन’ व ‘डायनॉसॉर्स- फॉसिल्स अँड फीदर्स’ अशी होती. आता ‘व्होल्कॅनोज-फायर अँड लाइफ’ तसेच ‘बॅटस लर्निग टू फ्लाय’ ही पुस्तके  रांगेत आहेत.