scorecardresearch

बदलत्या काळाची अवघड आव्हानं

‘गो सेट अ वॉचमन’ ही कादंबरी एका बाजूने नवी आहे आणि त्याच वेळी ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ या एका अभिजात कलाकृतीचा पुढचा भाग आहे.

आपल्या इथल्या इतिहासाकडे, वर्तमानाकडे पुन्हा एकदा बघण्याची इच्छा जागते.

‘गो सेट अ वॉचमन’ ही कादंबरी एका बाजूने नवी आहे आणि त्याच वेळी ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ या एका अभिजात कलाकृतीचा पुढचा भाग आहे. साहित्यिक मूल्यांचा विचार बाजूला ठेवून या मांडणीकडे पाहिलं तर ती आपल्याला किती परिचयाची आहे! स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्याकडे चालू असलेल्या सामाजिक संघर्षांची रूपं यात परावर्तित होताना दिसतात. आपल्या इथल्या इतिहासाकडे, वर्तमानाकडे पुन्हा एकदा बघण्याची इच्छा जागते.
कुठल्याही कादंबरीविषयी लिहिताना कादंबरीचं कथानक, कादंबरीची शैली, कादंबरीने स्वीकारलेली स्थळ-काळाची चौकट आणि कादंबरीचा आशय, असं बऱ्याच अंगांनी लिहिता येतं. कादंबरी जर सर्वाना माहीत असलेली अशी एखादी ‘क्लासिक’ असेल, तर तिच्या कथानकाची उघड चर्चा केल्याने काही बिघडत नाही; पण दुसऱ्या कुठल्या कादंबरीबाबत तसं करता येत नाही. नव्या कादंबरीतील मध्यवर्ती पेच, वाचकासाठी औत्सुक्य निर्माण करणारी घटना अशा गोष्टी उघड करणं अशिष्ट ठरतं. हार्पर ली लिखित ‘गो सेट अ वॉचमन’ ही कादंबरी एका बाजूने नवी आहे आणि त्याच वेळी ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ या एका अभिजात कलाकृतीचा पुढचा भाग आहे. वर्णभेदाची प्रखर जाणीव बाळगणाऱ्या अमेरिकेतील अलाबामा या दक्षिणेकडील राज्यात महामंदीच्या काळात घडणारी ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ १९५५ ते ६० या काळात लिहिली गेली आणि वाचक, समीक्षक, समाजशास्त्रज्ञ अशा विविध वर्गाच्या पसंतीला उतरली. कादंबरीवर निघालेल्या चित्रपटातील प्रमुख भूमिकेबद्दल ग्रेगरी पेक या नटाला अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड मिळालं. हे पुरेसं नाही म्हणून की काय हार्पर लीने त्यानंतर थेट एकविसाव्या शतकाचं एक दशक पूर्ण होईपर्यंत काहीही नवीन लिहिलं नाही आणि स्वत:ला प्रसिद्धीपासून लांब ठेवलं. अशा स्थितीत ‘गो सेट अ वॉचमन’ या कादंबरीविषयी अपार कुतूहल जागृत होणं स्वाभाविक आहे. म्हणजे, एका बाजूने क्लासिकशी नातं सांगणाऱ्या या लिखाणाची चिकित्सा करणं आवश्यक ठरतं आणि त्याच वेळी तिच्यातले कळीचे तपशील पूर्ण उघड न करण्याचं पथ्यही सांभाळावं लागतं.
अगोदरची ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ तीन पातळ्यांवर वावरते. एक- रूढ, पारंपरिक संस्कारांपासून मुक्त अशा एका सात-आठ वर्षांच्या मुलीच्या नजरेतून जगाचं दर्शन घडवणे; दोन- वर्णभेद या सामाजिक वास्तवाला न्यायदेवतेच्या तराजूत तोलणे आणि तीन- वर्षांनुर्वष समाजापासून पूर्ण तोडलेल्या एका मनुष्यजीवाच्या भावविश्वाला बाहेरून न्याहाळणे. संवेदनशीलता हाच मध्यवर्ती मुद्दा असलेल्या या कादंबरीत अर्थातच मानवी संवेदनेच्या आणखीही काही पलूंचं दर्शन होतं.
‘टू किल अ मॉकिंगबर्ड’चं सामथ्र्य प्रथमपुरुषी निवेदनात होतं. सगळी कादंबरी स्काऊट िफच सांगते. ‘गो सेट अ वॉचमन’ सुरू होते, तेव्हा काही वर्षांपासून न्यूयॉर्कमध्ये राहात असलेली स्काऊट – आता ते लहानपणचं नाव राहिलेलं नाही, आता ती जीन लाउज आहे – २६ वर्षांची झाली आहे आणि घरी परत येते आहे. कादंबरी जरी तिच्याचबरोबर सरकत असली, तरी आता ती निवेदक नाही. सात-आठ वर्षांच्या ‘नायिके’ने भल्या-बुऱ्या, साध्या वा हादरवणाऱ्या घटनांचं वर्णन करण्यातून उत्पन्न होणारा आशय त्याच नायिकेने तरुणी होऊन केलेल्या वर्णनात अजिबात मिळणार नाही. तेव्हा निवेदक तिच्यापासून वेगळा काढण्यातून काहीच गमावत नाही.
पहिल्या कादंबरीवर फिदा झालेला वाचक हे नवीन कथानक वाचताना स्मरणरंजनात रमू पाहतो; पण लेखिकेने तोच उद्देश समोर बाळगला असता, तर दुसरी कादंबरी पहिलीच्या छायेत राहिली असती आणि ‘मोठी’ होण्याच्या शक्यतेच्या जवळही गेली नसती. म्हणून मूळ कथानकातली (तेव्हा महत्त्व असलेली) काही पात्रं आता गायब आहेत, काहींचा तर उल्लेखही नाही; यालासुद्धा दोष न मानता गुणच मानलं पाहिजे.
यातून काही वाचकवर्ग दुरावतो, ही गोष्ट खरी; पण निर्मितीक्षम कलावंताने आस्वादकाच्या अपेक्षांना रस्ता विचारायचा नसतो. एक प्रकारे, यातून लेखिका ‘जुन्या पात्रांची ही नवी गोष्ट आहे’, असंच वाचकाला बजावते आहे.
जीन लाउज जरी जवळजवळ २० वर्षांनी वाढली असली, तरी वाचकाला जीन लाउज आणि तिचा बाप अ‍ॅटिकस ५० पेक्षा जास्त वर्षांनी भेटत आहेत! मध्यंतरी काय आणि कोण, कसं आणि किती बदललं, याचं गणित गमतीशीर झालं आहे. अ‍ॅटिकसच्या तालमीतली स्काऊट वय वाढून जणू न्यूयॉर्कसारख्या उदारमतवादी, प्रागतिक वातावरणाचीच नागरिक होणार असते. त्यामुळे तिची ओळख पटायला वेळ लागत नाही. तिच्या बोलण्यात, विचारांत येणारे साहित्य, इतिहास, समाजशास्त्र यांतले संदर्भ तिच्या समृद्धवाढीची खूण सांगत राहतात. आता जरी तिचं नाव ते राहिलेलं नसलं; तरी बुद्धिमान, संवेदनशील, विचारी आणि पूर्णतया स्वतंत्र वृत्तीच्या जीन लाउजमध्ये वाचकाला वाढून प्रगल्भ झालेली स्काऊट दिसत राहते.
अ‍ॅटिकसमधला बदल मान्य करता येतो का? ‘गो सेट अ वॉचमन’वरच्या प्रतिक्रियांमध्ये सर्वात तिखट प्रतिक्रिया अ‍ॅटिकसच्या नव्या रूपाबद्दल आहेत. पण अ‍ॅटिकसमधला बदल विसंगतच आहे, असं नाही; त्यात संगती आहे. अ‍ॅटिकस गावाचा भाग होऊन गावात राहिला आहे. मागच्या वेळी गोऱ्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या कृष्णवर्णीय टॉमचा बचाव करताना तो गावाच्या संवेदनेचा भाग होता, गावाचा सदसद्विवेक होता आणि आज कृष्णवर्णीयांना हक्कांची जाणीव झाल्यानंतरच्या गढूळ वातावरणातही तो त्याच गावाचा भाग आहे. त्याच्या मते तो प्रगतिशीलच आहे. तरुण आणि ताकदवान जीन लाउजला जगाशी टक्कर घेऊन परिवर्तन घडवण्याची उमेद असेल; सत्तरीला आलेल्या अ‍ॅटिकसचा दृष्टिकोन संघर्ष टाळण्याचा, प्रस्थापितांचं मन वळवून सर्वाचं भलं साधण्याचाच असणार.
त्या वेळचा आरोपी टॉम थोटा होता; सरळ सरळ अन्यायाचा बळी होता. तेव्हाचे काळे दबलेले, दीन-दुबळे होते. आता ते व्यवस्थेत वाटा मागताहेत. पण अजूनही ते आत्मनिर्भर होण्याइतके समंजस झालेले नाहीत. उलट, आता त्यांना विकासाची गाजरं दाखवणाऱ्यांच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम, जिव्हाळा नाही; त्यांच्या जागलेल्या आकांक्षांचा गरफायदाच घेतला जाणार आहे. म्हणून काळ्यांनी सबुरी दाखवावी, अ‍ॅटिकससारख्या शहाण्या गोऱ्यांवर विश्वास टाकावा, शहाणे गोरे जर काळ्यांचा द्वेष करणाऱ्यांना जवळ घेताना दिसत असतील, तर त्यामागचा उद्देश काळ्यांनी समजून घ्यावा – ही अ‍ॅटिकसची आजची भूमिका आहे. जी वर्णभेदाचा मन:पूर्वक तिरस्कार करणाऱ्या जीन लाउजला अजिबात पटत नाही.
या, दुसऱ्या कादंबरीतला संघर्ष हा आहे. सत्प्रवृत्ती विरुद्ध आडमुठी, अन्याय्य परंपरा हा मागच्या वेळचा संघर्ष सोपा होता. त्यात इजा, नुकसान होण्याची शक्यता जरी असली तरी नतिक पेच नव्हता. उलट आता ‘जीन लाउज शेवटी िफच आहे, मनस्वी िफच असेच वागणार,’ हे समाजमान्यतेचं कवचकुंडल तिला लाभलं आहे. पण आताचा संघर्ष स्वकीयांशी आहे, किती तरी जास्त मनस्तापदायक आहे!
‘गो सेट अ वॉचमन’च्या साहित्यिक मूल्यांचा विचार बाजूला ठेवून या मांडणीकडे पाहिलं तर ती आपल्याला किती परिचयाची आहे! स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्याकडे चालू असलेल्या सामाजिक संघर्षांची रूपं यात परावíतत होताना दिसतात. आपल्या इथल्या इतिहासाकडे, वर्तमानाकडे पुन्हा एकदा बघण्याची इच्छा जागते.
आणि साहित्यिक मूल्यांची चर्चा करायचीच, तर मूळ कादंबरीची सहज सफाई यात नाही. पहिल्या पुस्तकात अगदी सुरुवातीपासूनच कथानकातले प्रवाह दिसू लागतात. इथे तसं होत नाही. नाटय़पूर्ण घटनांनी गच्च भरलेल्या त्या कादंबरीचा शेवटही रोमांचकारक होता, वर वर चढत जाऊन तृप्त करणारा होता; या वेळी तसं अजिबात नाही. या वेळी संघर्षांची तयारी करण्यात जेवढा वेळ आणि अवकाश घातला आहे, त्या मानाने संघर्षांचा निकाल आपसूक उलगडत जात नाही. ‘मन बसेल त्या कुणावरही प्रेम करावं; लग्नासाठी जोडी मात्र आपल्याचसारख्या कुणाशी तरी जुळवावी’ या आरंभीच्या भागात येणाऱ्या वचनात शेवट काय होणार, याचं सूचन आहे. बापाशी दावा घ्यायला न चाचरणारी जीन लाउज तिच्या विचारांच्या हँकचा स्वीकार करताना किती घुटमळते, यावरून लेखिकेचा न्याय कुठल्या दिशेने झुकला आहे, हे समजतं; पण कृतीमध्ये उतरणाऱ्या मूल्यांमधला संघर्ष कृतीमधून न सुटता शाब्दिक मांडणीमधून, वैचारिक मंथनातून मोकळा होतो, हे खटकतं.
असो. पहिली कादंबरी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, या देशातल्या विशिष्ट स्थितीविषयी होती; इथला विषय जास्त सार्वत्रिक आहे, असं मात्र म्हणता येतं.
hemant.karnik@gmail.com

६ गो सेट अ वॉचमॅन
लेखिका : हार्पर ली
प्रकाशक : रँडम हाउस इंडिया
पृष्ठे : २८८, किंमत : ४९५ रुपये

मराठीतील सर्व बुकमार्क ( Athour-mapia ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Harper lee go set a watchman

ताज्या बातम्या