शशिकांत सावंत shashibooks@gmail.com

साहित्यिकांच्या प्रत्यक्ष लेखनातून त्यांच्याबद्दलचं औत्सुक्य तयार होतं, मग त्यापल्याड त्यांना शोधण्याचा प्रयत्न वाचकांकडून केला जातो. ते औत्सुक्य साहित्यिकांचं चरित्र वा आत्मचरित्र काही प्रमाणात शमवतं खरं; पण तरीही काही उरतंच. ते कदाचित त्यांच्या पत्रसंग्रहांतून मिळतं. ब्रिटिश लेखिका आयरिस मडरेकनं तिच्या सुहृदांना लिहिलेली पत्रंही नेमकं तेच करतात..

आयरिस मडरेकचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. १५ जुलै रोजी तिच्या जन्माला शंभर वर्षे पूर्ण झाली. एक मोठी ब्रिटिश कादंबरीकार म्हणून तिचा परिचय जगाला आहे. १९९३ साली लंडनच्या ‘द टाइम्स’ने इंग्रजी भाषेत लिहिणारी सर्वोत्कृष्ट इंग्रजी लेखिका म्हणून तिचा गौरव केला. अर्थात, इथे इंग्रजी म्हणजे अमेरिकी इंग्रजी नव्हे, तर ब्रिटिश इंग्रजी! जॉन बेली या समीक्षक-लेखकाशी तिने लग्न केले. बेली यांनी लिहिलेली तिच्यावरची पुस्तके गाजली. त्या पुस्तकांत त्यांच्या सहजीवनाचे सुंदर वर्णन आहे. नंतर यांच्यावर चक्क सिनेमाच निघाला. तिला लैंगिक संबंधात रस नव्हता, उलट अनेक पुरुषांच्या प्रेमात ती पडत गेली. या साऱ्या संबंधांबद्दल बेली यांना माहीत होतं आणि त्यांनी ते चरित्रात लिहिलेही.

पण आयरिसने ३३ कादंबऱ्या लिहिल्या आहेत, तत्त्वज्ञानातही मुशाफिरी केली आहे. १९५८ साली आलेली तिची ‘द बेल’ कादंबरी असो वा अगदी १९९३ साली प्रसिद्ध झालेली तिची ‘द ग्रीन नाइट’ ही कादंबरी असो, कादंबरीलेखनात तिने मानवी मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. दस्तेएव्हस्की, इलियट यांच्या प्रभावाखाली ती आहे, हे तिच्या कादंबऱ्यांतून दिसते.  तत्त्वज्ञानपर लेखनही तिने केले. नैतिकतानिष्ठ वास्तववाद यावर तिने केलेले भाष्य महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे विसाव्या शतकातील एक बुद्धिमान तत्त्वज्ञान अभ्यासक आणि लेखिका म्हणून आज शंभर वर्षांनी तिच्यावर सर्वच वाङ्मयीन नियतकालिके गौरवाने लिहीत आहेत. मात्र, मधला एक काळ असा होता की, उत्तर-आधुनिकतेच्या वादामुळे तिला जुन्या पद्धतीची लेखिका ठरवले गेले. त्यामुळे ती विस्मृतीत जाते की काय, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, तिचे व्यवस्थित मोठे चरित्र २००२ साली आले. त्यातून जसे आयरिसचे व्यक्तिमत्त्व जाणून घेता आले, तसेच तिच्या पत्रांचा संग्रह- ‘लिव्हिंग ऑन पेपर’मधून तिच्या व्यक्तिमत्त्वाचे निराळे पैलू समोर येतात.

या संग्रहात जवळपास तेराशे पत्रं आहेत आणि एक एक पत्र, त्यास प्रस्तावना अशा स्वरूपात ती वाचायला मिळतात. पत्रांच्या पुस्तकांचे एक सुख असते, ते म्हणजे तुम्हाला ही पुस्तकं अधेमधे कशीही वाचता येतात. आपल्या आवडीच्या माणसांबद्दल आयरिस काय म्हणते किंवा लेखक काय म्हणतो, तेही बघता येते आणि अर्थात, सर्वात मोठा फायदा म्हणजे लेखकाच्या लेखनात रस असेल, तर त्याच्यातल्या फटी काही पत्रांमुळे उजळून निघतात. उदाहरणार्थ, बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारे पात्र निर्माण करताना नेमके कोणते पुस्तक संदर्भासाठी वाचले होते, वगैरे गोष्टी अशा पत्रांतून कळतात. मात्र, त्यासाठी लेखकाबद्दल इतके कुतूहल असायला हवेच का, हा प्रश्न वेगळा! कारण जी. ए. कुलकर्णी म्हणायचे की, लेखकाच्या चरित्रातून त्याची माहिती करून घेणे म्हणजे ताजमहालचा संगमरवर इराणमधून आणलाय म्हणून तिथे जाणे होय!

पाच दशकांच्या या पत्रव्यवहारात भवतालातील सामाजिक बदल, वाङ्मय क्षेत्रातील उलथापालथी अशा अनेक गोष्टी ध्यानात येतात. शिवाय अशा पुस्तकांतून शेकडो संदर्भ पुढे येतात, ते वेगळेच. उदाहरणार्थ, सगुण रामनाथन यांना लिहिलेल्या एका पत्रात आयरिस उत्तर-आधुनिकवादाबद्दलच्या लेखनाविषयी नाराजी व्यक्त करते आणि ‘ते सत्याला पारखे झाले आहेत,’ असे म्हणते. या प्रकारचे कितीतरी संदर्भ पुस्तकात येत राहतात. पण त्याहीपेक्षा महत्त्वाच्या आहेत त्या प्रत्येक दशकाबद्दल लिहिलेल्या संपादकीय प्रस्तावना. चरित्राला असे पुस्तक पर्याय ठरू शकते का? अर्थातच नाही; पण जवळपास तेराशे पत्रं आयरिसने लिहिली होती आणि त्यावर आलेल्या प्रत्येक पत्राला ती उत्तर देत होती. हे पाहिले तर अशा पत्रांतील गंमत लक्षात येते. चरित्राचे प्रतिबिंब या पुस्तकातून उमटले आहे. आणि मुख्य म्हणजे सुंदर, झुळझुळती इंग्रजी हे या पत्रांचे वैशिष्टय़!

संपादक प्रस्तावनेत सांगतात, आयरिसच्या ऑक्सफर्ड-मधल्या घरात दोन स्टडीज् होत्या. घरात वरच्या मजल्यावर बसून ती कादंबरी आणि इतर गंभीर तत्त्वज्ञानपर लेखन करत असे. तर नंतर  दुपारी खालच्या स्टडीमध्ये बसून ती पत्रं लिहीत असे. वरच्या स्टडीत तत्त्वज्ञान, कथा-कविता, प्रवासवर्णन, धार्मिक अशी विविध प्रकारची हजारो पुस्तके होती. तिथेच बसून तिने आपल्या कादंबऱ्या लिहिल्या. खालच्या स्टडीत बसून ती रोज चार तास पत्रं लिहीत असे. अनेक पत्रांना ती तात्काळ उत्तर देई. पत्रलेखनासाठी खास तिने वापरलेले टेबल पूर्वी जे. आर. आर. टॉल्किनच्या मालकीचे होते!

प्रस्तावनेनंतर तात्काळ आपण पत्रांकडे वळतो, तर आयरिसने तरुण वयात पॅशनेटली लिहिलेली अनेक पत्रं येथे वाचायला मिळतात. १९४६ च्या पत्रात ती म्हणते की, ‘पॅरिसमध्ये आपण भेटलो आणि तुझा निरोप घेणे मला जड झालं होतं.’ एका लेखकाला लिहिलेल्या पत्रात ती म्हणते, ‘तू तुझ्या कादंबरीच्या स्वरूपाबद्दल काहीच ठरवलेलं नाहीस. ती डिटेक्टिव्ह कथा आहे की प्रेमकथा? आणि अशी वर्गवारी तुला कृत्रिम वाटेल, पण मग पुढं काय?’ तर एका वर्तमानपत्राला लिहिलेल्या पत्रात ती म्हणते, ‘गेल्या काही काळात शिक्षणावर तुमच्याकडं लिहिलेले लेख हे उंच स्वरात आणि थोडेसे आक्रमक होते. मला असं वाटतं की, शिक्षण हे विद्यार्थ्यांना निवांत होण्यासाठी असू नये, तर त्यांना भरपूर काम करायला लागलं पाहिजे आणि शिक्षणाचा हेतू हा जुन्या गोष्टी दूर सारण्यासाठी नसावा.’ वाचत असलेली पुस्तके, त्याविषयीची चर्चा हे सगळे आपल्याला एका वेगळ्या जगात नेते. उदाहरणार्थ, आत्महत्येबद्दलचे पुस्तक वाचताना ती म्हणते, ‘एक गोष्ट नक्की, तू काही आत्महत्या करणार नाही. पण तरीही लेखक आत्महत्येबद्दल ज्या प्रकारे लिहितो, ते वाचनीय आहे. अस्तित्वाच्या चर्चेत आत्मविनाश यास महत्त्वाचे स्थान आहे.’

आयरिसच्या जवळची अनेक मंडळी पत्रांतून भेटतात. त्यांनी लिहिलेली पत्रं आपल्याला वाचता येत नाहीत. पण आयरिस त्यांच्यासमोर वारंवार मन मोकळे करते. कॅन्सरग्रस्त लेखिकेला लिहिताना सतत ‘माय डिअर फ्रेण्ड’ म्हणते. आयरिसची जगण्याविषयीची आणि लेखनाविषयीचीही सर्व मते पत्रांतून प्रकट होतात. तिच्या अनेक पात्रांमध्येही ती दृश्य स्वरूपात दिसत होतीच. गेल्या काही वर्षांत आयरिसच्या कादंबऱ्या पुन्हा खपू लागल्या आहेत, तिच्या कादंबऱ्यांवर चर्चा झडू लागल्या आहेत, असे संपादक आवर्जून सांगतात. या संग्रहातील अनेक पत्रं वाचताना आपल्याला तिच्या कादंबऱ्या वाचायला हव्या असे वाटते. तिच्या कादंबऱ्यांमध्ये आलेले व्यक्तिगत जीवनातील संदर्भ शोधण्याचीही खटपट मग या पत्रांतून करावीशी वाटते. उदाहरणार्थ, कृष्णमूर्तीनी आयरिसची मुलाखत घेतली आहे. तिचे कृष्णमूर्तीच्या तत्त्वज्ञानाबद्दल काय मत होते, हे जाणण्याची उत्कंठा कोणालाही वाटेल. म्हणूनच पाहिले, तर त्या म्हणतात, ‘त्यानं एकाच छापाची मुलाखत घेतली. मला त्याचं लेखन आवडत नाही; पण त्याचं बोलणं मात्र आवडलं.’

शेवटी असे पुस्तक तुम्हाला काय देते? विसाव्या शतकात इंग्रजी लेखन करणे कठीण होते. आज परिस्थिती निराळी आहे. आता केवळ इंग्रजांची मक्तेदारी राहिलेली नाही. सलमान रश्दींपासून ते चीनुआ अचेबे वा हारुकी मुराकामीपर्यंत अनेक लेखक इंग्रजीत लिहितात किंवा आपण ते इंग्रजीतून वाचतो. अशा परिस्थितीत जगावर राज्य केलेला एक देश, त्याची माणसं आणि त्यांच्या जगण्याच्या धारणा काय होत्या, हे अशा संग्रहांतून आपल्यासमोर येते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जसे व्ही. एस. नायपॉल यांनी सुरुवातीच्या काळातल्या थायलंडमधील लेखात लिहिले आहे की, ‘समोरचे ब्रिटिश लेखक होते; ही मंडळी त्यांच्यासारख्या- म्हणजे दिवाणखान्यात जगणाऱ्या, मध्यमवर्गीय नोकरी करणाऱ्या माणसांबद्दल लिहीत होती.’ ते सांगून नायपॉल लिहितात, ‘त्याउलट माझ्याकडेच मटेरियल प्रचंड होतं आणि त्याला तुटवडा नव्हता.’ तर.. लेखनासाठीच्या अनुभवांची जमापुंजी नसली तरी काही लेखक कादंबऱ्यांची प्रभावळ कशी तयार करतात, याचे उत्तर काही पत्रांमधून मिळते आणि ते महत्त्वाचे आहे.