बातमी फक्त इतकीच की, ‘हॅरी पॉटर’कर्त्यां लेखिका जे. के. रोलिंग यांची दोन पुस्तकं २०१७ सालात प्रकाशित होणार आहेत. ‘हॅरी पॉटर’ मालिका तर बंद झाली आहे. नवा ‘न्यूट स्कमँडर’ हा नायकही म्हणे दोन्ही आगामी कादंबऱ्यांचा नायक नाही! मग कशाबद्दल आहेत या कादंबऱ्या? माहिती देण्यात येत नाही. कादंबऱ्या येताहेत, एवढंच सांगायचं आहे का? हो! आणि तेवढंच, तेही एका ट्विप्पणीत सांगूनसुद्धा लगेच त्याची बातमी ‘टाइम’ आणि ‘गार्डियन’मध्ये झळकू लागली; म्हटल्यावर तेवढीच बातमी अन्य वृत्तवाहिन्या, संकेतस्थळं यांनीही उचलली. वास्तविक, गेल्या जुलैमध्येच रोलिंग या नवी कादंबरी लिहीत असल्याचं लोकांना माहीत झालं होतं. एक नसून दोन कादंबऱ्या, ही माहिती मात्र ताजी आहे. कादंबरीत काय आहे हे जरी सांगायचं नव्हतं, तरी दोन-दोन कादंबऱ्या एकाच काळात कशा काय लिहिणं जमतं, दोन कथानकं कशी निरनिराळी उतरत राहातात, याविषयी रोलिंग यांनी अधिक बोलायला काहीच हरकत नव्हती. ते त्यांनी स्वत न करता, जणू प्रसारमाध्यमांना मुलाखतीसाठी अजिजी करण्याचं निमंत्रणच दिलंय. रोलिंग या कादंबरीमालिकांच्याच लेखिका म्हणून लोकांना परिचित असल्यानं, नव्या कादंबऱ्या न्यूटच्या नाहीत मग कुणाच्या, हे कुतूहल आहे. कदाचित आदल्या कादंबरीतलं दुर्लक्षित पात्र पुढल्या कादंबरीत नायकपदी नेण्याचं तंत्र रोलिंग वापरणार असाव्यात, असा अंदाज बांधता येतो.
पैशाकडे पैसा जातो म्हणतात, तशी प्रसिद्धीकडे प्रसिद्धीही जातेच. पण रोलिंग या तंत्रावर जबरदस्त पकड असलेल्या लेखिका असल्यानं त्यांची दखल माध्यमंही घेतात, इतकंच!