जामीन मिळालेला नसल्यानं कन्हैया कुमारला तिहार तुरुंगातल्या कोठडीत राहावं लागलं आणि दिल्लीतल्या वकिलांनी न्यायालयाच्या आवारातच केलेल्या हुल्लडबाजीचा हेतूच तिहारमधून हा बिहारी विद्यार्थी-नेता बाहेर येऊ नये असा होता, हे अनेकांनी विविध चित्रवाणी वाहिन्यांवर, विविध कोनांतून पाहिलेलं आहेच. त्याही आधीची घटना म्हणजे ती तथाकथित ‘देशद्रोही’ चित्रफीत! ती मात्र एकाच कोनातली, त्यातही सत्यासत्यतेबद्दल संसदीय समितीलाही शंका असलेली, अशी. एवढय़ामुळे कन्हैया कुमारच्या बाजूनं अनेकांची सहानुभूती वळली, हे त्याच्या सभांना होणारी गर्दी पाहाता मान्य करावं लागेल. पण कन्हैया कुमारला ही अशी विनाकारण प्रसिद्धी मिळण्यापूर्वीही तो ‘जेएनयू’सारख्या ठिकाणी विद्यार्थी-श्रोत्यांची गर्दी जमवू शकत होता, याचं कारण त्याच्या भाषणांतलं खरेपणा, हजरजबाबी आणि खिल्ली यांचं उत्तम मिश्रण. त्याहीआधी कन्हैया कुमार काय / कोण होता?
या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्यानंच लिहिलेलं ‘बिहार टु तिहार’ हे इंग्रजी पुस्तक ३१ ऑक्टोबर २०१६ पासून उपलब्ध आहे. पुढे याच पुस्तकाची हिंदी आवृत्तीही (‘बिहार से तिहाडम्’) प्रकाशित झाली. एवढय़ा एका आत्मकहाणीनं कोणी ‘लेखक’ होत नाही, असं मानणारे खूपचजण असतील, तरीही कन्हैया कुमारला ‘कोलकाता बुक फेस्टिव्हल’मध्ये अगदी शनिवारच्या (२८ जाने.) संध्याकाळी जाहीर मुलाखतीसाठी पाचारण आहे, ते तो ‘लेखक’ झाला म्हणून!
जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल (लिटफेस्ट) आधीपासून उजवाच होता की यंदा त्यानं उजव्या राजकारणाचं वळण घेतलं हाच प्रश्न असल्यानं ‘लेखक’ कन्हैया अर्थातच तिथे नव्हता. बेंगळूरु लिटफेस्टला म्हणे त्याला निमंत्रण होतं पण तो गेला नाही. ‘कसौली लिटफेस्ट’ , मग दिल्लीतला एक लिटफेस्ट (पुस्तकमेळा नव्हे), चेन्नईत ‘द हिंदू लिट फॉर लाइफ’ या साहित्योत्सवांना मात्र तो लेखक म्हणून सहभागी होऊन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलला. मोदींच्या ‘पगारी ट्विटरसमर्थकां’बद्दलही बोलला. कदाचित हेच तो कोलकात्यातल्या मुलाखतीत ऐकवेल.. पण ‘लेखक’ म्हणून आणवला गेलेला कन्हैया कुमार नामक वक्ता लोकांना ऐकावासा वाटतो आहे, पटतोही आहे, हेही यातून दिसू लागलं आहेच.