जपानी लेखक हारुकी मुराकामीचे साहित्य खूपविके आणि खूपप्रतीक्षित असते, कारण आपल्या मनात सतत सुरू असणाऱ्या सरळ-साध्या प्रश्नांना, जगण्यातल्या सर्वसाधारण घटकांना तो असाधारण सोपेपणाने व्यक्त करतो. बाईशिवाय बाप्याचे जगणे किती अशक्य आहे, याचा दाखला त्याच्या कोऱ्या करकरीत कथासंग्रहामधील सर्वच कलाकृतींमधून आला आहे..

‘मेन विदाऊट विमेन’ या जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्या ताज्या पुस्तकावर बोलण्याआधी लेखनातील आदिम लिंगधारणांच्या संकल्पनांविषयी बोलणे महत्त्वाचे आहे. पुरुष लेखकांनी रंगविलेली स्त्रीपात्रं आणि महिला लेखकांनी रंगविलेली पुरुषपात्रं यांचा लिंगाधिष्ठित मसावि-लसावि काढला, तर पुरुष बोरूबहाद्दरांनी आजवर स्त्रीविषयक अनुदारात्मक, अपमानात्मक लिहिल्याची ओरड मणभर उदाहरणांसह महिला वाचक करतील, तर स्त्रीलेखिकांनी पुरुषांना दुर्बलोत्तमच ठरविल्याचे संशोधन पुरुष वाचक करू धजतील. अगाथा ख्रिस्ती, आयन रॅण्ड प्रभृतींपासून जेनिफर एगान, एलिझाबेथ गिल्बर्ट, अ‍ॅलिस मन्रो, अरुंधती रॉय, झुंपा लाहिरी आदींच्या काही अपवाद वगळता सशक्त स्त्री आणि अशक्त पुरुष पात्रांना पाहिले, तर ‘पुरुष सारे असेच’ या सदोदित उद्गारल्या जाणाऱ्या वैश्विक म्हणीची सार्वत्रिक दाहकता जाणवून येईल. पुरुष लेखक बलदायी व्यक्तिरेखा तयार करू शकत नाही, कारण त्यांना स्त्रीच मुळी कळत नाही, असा एक ठाशीव शिक्का मारला जातो. वर चुकून एखाद्या पुरुष लेखकाने स्त्रीशक्तीचा आदर करीत तिला सक्षमतेच्या देव्हाऱ्यात बसविले, की त्याला दांभिकतेच्या पोत्यात कोंबून बडविण्याची अद्दलही घडविली जाते. पुरुषवादी आणि स्त्रीवादी दृष्टिकोनाचा हा संघर्ष अवतीभवती वेळेच्या विद्युत वेगाने सुरूच राहणारा असला तरी जगप्रिय लेखक हारुकी मुराकामी यांनी ‘मेन विदाऊट वुमन’ कथासंग्रहात बाईशिवाय बाप्याचे जग रंगवताना स्त्रीशक्तीचे तसेच स्त्रीवादी, स्त्रीमुक्तीवादी रूपांचे तटस्थ विच्छेदन केले आहे. त्याच्याकडे लिंगाधिष्ठित नजरेने पाहायचे की नाही, हा मुद्दा सापेक्ष असला तरी ही मुराकामीय स्त्रीसूत्रे कथावाचनाच्या नेहमीच्या आनंदाला जराही बाधा न आणणारी आहेत.

हारुकी मुराकामीचे नवे पुस्तक बाजारात दाखल होण्याची तुलना ब्लॉकबस्टरी सिनेमा थिएटरमध्ये लागण्याशी करता येईल. अर्थात ब्लॉकबस्टर सिनेमाही काही आठवडय़ांनंतर तिकीटबारीशी काडीमोड घेतो. मुराकामींच्या पुस्तकांबाबत तो दुर्योग येत नाही. अडुसष्टाव्या वर्षांतही या लेखकाचा कथनपल्ला अफाट आहे. त्याच्या कथेच्या गुहेत शिरल्यानंतर वाटा-आडवाटांच्या आकर्षक वळणांतून तुम्ही त्याला सांगायच्या असलेल्या घटकाकडे येता. मुराकामीच्या आयुष्यावर बिटल्स या ब्रिटिश पॉप बॅण्डच्या गाण्यांचा, काफ्का आणि जगभरातील साहित्यिक संदर्भाचा असलेला पगडा त्याच्या कथन साहित्यामध्ये लखलखीतपणे डोकावतो. नव्वद वर्षांपूर्वी अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी लिहिलेल्या कथासंग्रहाचेच नाव त्यांनी या कथासंग्रहालाही दिले आहे. या शीर्षकाची कथा संग्रहात आहेच, वर ‘यस्टर्डे’ आणि ‘ड्राइव्ह माय कार’ नावाच्या बिटल्सच्या गाण्यांची शीर्षके घेऊन कथा साकारण्यात आलेल्या आहेत. गाण्यांचे, ‘अंकल वान्या’सारख्या चेकॉव्हच्या नाटकाचे संदर्भ, अरेबियन नाइट्सची विचित्र जपानी आवृत्ती आणि काफ्काच्या ‘मेटामॉर्फेसिस’चे आजच्या काळातील रूपांतरण असा भरीव कुतूहलपूर्ण ऐवज यात असला, तरी सगळ्या कथांचे मूळ लेखकाच्या डोक्यातील स्त्रीसूत्रांची किंवा बाईशिवाय पोरक्या पडलेल्या, होरपळल्या जाणाऱ्या व्यक्तींची गुंतवळ उलगडण्याशी झगडताना दिसते.

‘ड्राइव्ह माय कार’ या पहिल्याच कथेमध्ये काफुकू नावाचा विधुर अभिनेता सापडतो. सहअभिनेत्री असलेल्या पत्नीच्या मृत्यूनंतर कैक वर्षे एकांत हाच सुखांत मानत सहचरणीच्या लग्नबाह्य़ ज्ञात संबंधांविषयी अधिक माहिती थेट तिच्या प्रियकरांना विचारून तिच्या वागण्याचे विच्छेदन करू पाहणारा हा काफुकू आपल्या मनात येणाऱ्या विचारांकडे नव्याने पाहायला लागतो. त्याच्या नजरकमजोरीतून आणि मद्यप्राशनाच्या अतिरेकातून त्याची टीव्ही कंपनी त्याला कार ड्रायव्हर देते. कार ड्रायव्हर म्हणून दाखल होणाऱ्या मिसाकी या मुलीच्या आगमनानंतर काफुकूच्या मानसिक आयुष्यात होणारा बदल हा कथेचा गाभा आहे. दुर्गम डोंगराळ भागातून शहरात किडूकमिडूक कामांसाठी आलेल्या मिसाकीशी वाहन चालवण्याच्या काळात होणाऱ्या गप्पा आणि  घटनांनी कथा घडते. कथा गाडीची वैशिष्टय़े, गॅरेजमधून मिसाकीचे शिफारसपत्र यांच्या लांबलचक वळणांनी काफुकूच्या डोक्यात दडलेल्या आदिम घुसमटीच्या प्रगटनातून होते. जिवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीला प्रियकरांची गरज का लागावी, याचा न संपणारा शोध त्याला हतबल करून टाकतो. मिसाकीकडे तो त्याची कबुली देतो व मिसाकी त्याला उत्तरांद्वारे नव्या प्रश्नांच्या जगात प्रवेश करायला लावते.

‘यस्टर्डे’ कथेतील नायक आपल्या गावंढळ भाषेशी आणि प्रेयसीशी काडीमोड घेऊन शहरी भाषेचा अंगीकार करण्यासाठी जाताना दिसतो. टोकियोमधील दोन वीस वर्षीय व्यक्ती, त्यांचा एकाच स्त्रीशी आलेला संपर्क यांची गुंतादायक कथा अनुभवल्यानंतर ‘अ‍ॅन इण्डिपेण्डण्ट ऑर्गन’ ही डॉ. टोकोई नावाच्या रगेल-रंगेल व्यक्तीची स्त्रीदाह कथा पाहायला मिळते. हा टोकोई अविवाहित आहे. त्याची अर्थातच त्याच्यासारख्या व्यक्तीला शोधण्याची धडपड सुरू आहे. प्लास्टिक सर्जन असल्याने त्याची प्रॅक्टिस उत्तम सुरू आहे. सोबत कैक स्त्रियांशी कोणताही मानसिक गुंता निर्माण होऊ न देता त्याची प्रकरणे सुरू आहेत. आत्यंतिक व्यवस्थितरीत्या ती प्रकरणे तो जगाशी नामानिराळा होऊन हाताळतो; पण एका विशिष्ट स्त्रीच्या भेटीनंतर त्याची तिच्याबाबतची ओढ भीषण अशा प्रेमात परावर्तित होते. आपल्या पतीच्या प्रतारणेचा सूड म्हणून टोकोईशी शय्यासोबत करणाऱ्या या स्त्रीच्या ताकदीने तो भारावून जातो. त्याचे जगण्यातले सारेच निष्णातत्त्व नष्ट होते आणि या स्त्रीच्या ध्यासाने तो मरणपंथाकडे वाटचाल करू लागतो.

अरेबियन नाइटमधील शेहराझादे या शिरच्छेदाच्या दडपणाखाली हजार रात्री राजाला गोष्टी सांगणाऱ्या नायिकेप्रमाणे नायकाला दरएक शय्यासोबतीनंतर भवतालच्या स्त्री-पुरुष संबंधांच्या तर्कटी गोष्टी सांगणारी नायिका याच नावाच्या कथेत छानपैकी गुंफली आहे. लग्नबाह्य़ संबंध बिनदिक्कत मिरविणारी आधुनिक काळातील ही निनावी मात्र शेहराझादे या टोपणनावाने बद्ध असलेली नायिका आजच्या नातेसंबंधांतील वाढत चाललेल्या जटिलतेवर प्रकाश टाकते. ‘किनो’ या कथेचा धागाही शेहरझादेतल्या नायिकेशी समांतर आहे. इथे पत्नीच्या बाहेरख्याली संबंधांचा उलगडा होताच लग्नसंन्यास घेऊन एका दुर्गम भागात छोटेसे रेस्टॉरण्ट-मद्यालय उघडणाऱ्या किनो या नायकाची गोष्ट आहे. आत्यंतिक आध्यात्मिक संयततेमध्ये सुरू राहणारी ही कथा किनोच्या बारमध्ये येणाऱ्या व्यक्तिरेखांशी विविध पातळीने एकरूप होते. जपानमधील भीषण भूकंपाची पाश्र्वभूमी आखून यातला बाईशिवाय बाप्या रंगविला आहे.

‘साम्सा इन लव्ह’मधील नायकाला आपण काफ्काच्या मेटामॉर्फेसिसमधील व्यक्तिरेखेत रूपांतर झाल्याचे लक्षात येते. या बदलाच्या जाणिवांचा पट रुंदावण्याआधीच त्याची भेट घरातील बिघडलेल्या कुलपांना सुधारण्यास आलेल्या कुबडय़ा नायिकेशी होते. त्यांच्यात अतिगमतीशीर संवाद झडत ही कथा फुलते. या कथेलाही अज्ञात अशा सामाजिक कटू प्रसंगाशी जोडण्यात आलेले आहे, ज्याचा उलगडा कथा पूर्णपणे वाचताना मिळविणे आनंददायी ठरेल. संग्रहाची शीर्षककथा पूर्णत: फॅण्टसीयुक्त रहस्य असून एका दूरध्वनीद्वारे ती सुरू होते. आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीने आत्महत्या केल्याचा दूरध्वनी तिच्या पतीकडून आल्यानंतर मधल्या सर्व वर्षांच्या दरीला बुजवणारे सरधोपटतेच्या बुरख्याआडील कथानक ‘मेन विदाऊट वुमन’ची परिस्थिती विस्ताराने विशद करते.

मुराकामीच्या पहिल्या कादंबरीपासून आत्तापर्यंतच्या सर्व साहित्यांत स्त्री व्यक्तिरेखा अनाकलनीय, विक्षिप्त वागणाऱ्या सापडतात. त्या बहुशिक्षित, साहित्य-संगीताधिष्ठित असल्या तरी विविधांगांनी पोखरलेल्या पाहायला मिळतात. त्या जाणीवपूर्वक स्त्रीवादी नसतात, तरी पुरुषपीडेने आत्महत्येच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्याही निघतात. मन:शस्त्राने त्या पुरुषाला नामोहरम करण्याची ताकद ठेवतात आणि कथानकांमधील पुरुष पात्रांसाठी उकलण्याच्या शंभर शक्यता ठेवूनच त्यांना पश्चात्तापाच्या तळात झोकून देतात. स्त्रीत्वाचा अजाणतेपणाने अपमान करणाऱ्या पुरुषांना इथे एकटेपणाच्या काळ्या पाण्याची शिक्षा अटळ असते. मुराकामीचे साहित्य खूपविके आणि खूपप्रतीक्षित असते, कारण आपल्या मनात सतत सुरू असणाऱ्या सरळ-साध्या प्रश्नांना, जगण्यातल्या सर्वसाधारण घटकांना तो असाधारण सोपेपणाने व्यक्त करतो. बाईशिवाय बाप्याचे जगणे किती अशक्य आहे, याचा दाखला या सर्वच कलाकृतींमधून आला आहे. आपल्याला ज्ञात असलेले हे सूत्र मुराकामीच्या कुंचल्यातून पाहणे ही सुंदर अनुभूती आहे.

(इंग्रजी वाचकांसाठी वर्षांला एक पुस्तक देणाऱ्या  मुराकामी यांच्या ‘द एलिफण्ट व्हॅनिशेस’, ‘ब्लाइण्ड विलो, स्लीपिंग वुमन’ आणि ‘मेन विदाऊट विमेन’ या गाजलेल्या कथासंग्रहांतील काही कथांचे एकत्रीकरण असलेले ‘डिझायर’ नावाचे पुस्तक पुढील आठवडय़ामध्ये प्रकाशित होणार आहे. मुराकामी यांच्या जाडजूड कादंबऱ्या वाचण्याआधी त्यांच्या लेखनाशी परिचित व्हायचे असल्यास हा कथांचा नजराणा उपयुक्त ठरेल. याशिवाय त्यांची ताजी कादंबरी जपानी भाषेत आली असून ती वर्षअखेर किंवा पुढील वर्षांरंभी इंग्रजीमध्ये उपलब्ध  होण्याची शक्यता आहे.)

  • ‘मेन विदाऊट विमेन’
  • मूळ लेखक : हारुकी मुराकामी
  • इंग्रजी अनुवाद : फिलिप गॅब्रीएल, टेड गूसेन
  • प्रकाशक : रॅण्डम हाऊस
  • पृष्ठे : २४०, किंमत : ५८३ रुपये

पंकज भोसले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

pankaj.bhosale@expressindia.com