‘मॅगसेसे’ पुरस्काराने सन्मानित, ख्यातनाम पत्रकार पी. साईनाथ यांनी आतापर्यंत केलेली शोधपत्रकारिता सर्वज्ञात आहे. ग्रामीण भारताबद्दल इंग्रजीत लिहिण्याचे त्यांचे कार्यही प्रेरक आहे. आता त्यांनी सातारा जिल्ह्य़ात छोडो भारत चळवळीच्या वेळी स्थापन करण्यात आलेल्या पत्री सरकारबाबत (प्रति सरकार) नवी माहिती त्यांच्या खास संशोधन शैलीत सादर केली आहे. ‘तुफान सेना’ या नावाने समांतर लष्करच क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केले होते. त्यावरील पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीत लढलेल्या, पण इतिहासात पुरेशी दखल न घेतली गेलेल्या लोकांचे धैर्य व शौर्य याची गाथाच त्यांनी वर्णन केली आहे. त्यात ९४ वर्षांचे रामचंद्र श्रीपती लाड यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा समावेश आहे. लाड यांनी साईनाथ यांना जी माहिती दिली, त्यातून त्या वेळी शिर तळहातावर घेऊन ‘तुफान सेने’त लढणाऱ्यांच्या आणि कुटुंबियांसह त्यांना साथ देणाऱ्या लोकांच्या आशाआकांक्षा काय होत्या यावर प्रकाश पडतो. लाड म्हणतात, ‘‘सामान्य माणसासाठी स्वातंत्र्य’ हे आमचे स्वप्न होते, पण आपण स्वातंत्र्य मिळवले पण ते सामान्यांसाठी राहिले नाही. आजही ज्यांच्याकडे पैसा आहे तेच सत्ताधारी आहेत,’ आपल्या स्वातंत्र्याची ही दशा व दिशा आहे. फार थोडय़ा लोकांना माहिती असेल, पण ‘तुफान सेने’तील सैनिक ब्रिटिशांना हाकलवून लावण्यासाठी रेल्वेवर दरोडय़ांसारख्या पद्धतींचा अवलंब करीत होते.सातारा जिल्ह्याच्या परिसरात त्यांना यशही मिळाले, पण त्यांची बूज आपण प्रजासत्ताक भारतात राखली नाही.
साईनाथ यांच्या लेखनातून या स्वातंत्र्यसैनिकांचे पुढे काय झाले याचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात त्या काळात नाना पाटील, नागनाथ नायकवडी, जी. डी. बापू लाड, कॅप्टन भाऊ व अनेक नेते या चळवळीतून घडले, पण स्वातंत्र्यानंतर त्यांना महत्त्व दिले गेले नाही. पत्री सरकार व तुफान सेनेत खरेतर अनेक राजकीय शक्तींचा समावेश होता. त्यातील काहीजण नंतर भाकपचे सदस्य होते. नाना पाटील हे पुढे अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष होते व ते १९५७ मध्ये साताऱ्यातून भाकपच्या तिकिटावर निवडून आले होते. कॅप्टन भाऊ व बापू लाड हे शेतकरी कामगार पक्षात गेले. माधवराव माने व इतर काहीजण काँग्रेसमध्ये गेले. आता जिवंत असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी सर्वजण त्यांची विचारसरणी किंवा पक्षीय बांधिलकी काहीही असली तरी त्यावेळच्या सोविएत रशियाचा उल्लेख करतात. रशियाने त्यावेळी हिटलरला विरोध करून इतरांना प्रेरणा दिली होती. त्यात भारतातील स्वातंत्र्यलढाही होता. १९४७ नंतरही रशियातील धाडसी लोकांची प्रेरणा भारतात कायम होती.
यापैकी कॅप्टन भाऊ यांना भेटून साईनाथ यांनी जो ताजा रिपोर्ताज लिहिला आहे तो https://ruralindiaonline.org/articles /captain-elder-brother-and-the-whirlwind-army या ब्लॉगवजा संकेतस्थळावर वाचता येईल. लेफ्टवर्ड बुक्स कंपनी ‘द लास्ट फ्रीडम फायटर’ या नावाने पुढील वर्षी प्रकाशित करणार आहे. मात्र तोवर इंटरनेटवरून या आगामी पुस्तकाचे अंश वेळोवेळी वाचायला मिळतील!
याखेरीज, जॉन रीड संपादित ‘टेन डेज दॅट शुक द वर्ल्ड’ या दुसऱ्या पुस्तकास पी. साईनाथ यांची प्रस्तावना आहे. १९१७ च्या रशियन राज्यक्रांतीवरील हे महत्त्वाचे पुस्तक, त्या इतिहासजमा क्रांतीच्या शंभरीनिमित्त पुढील वर्षी ‘लेफ्टवर्ड बुक्स’तर्फेच प्रकाशित होणार आहे!