|| आसिफ बागवान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटिश सरकारविरोधात लढा देत असताना, बंदिवानाचे आयुष्य जगत असताना आलेले अनुभव अनेकांनी पुस्तकरूपात आणले. त्याच पठडीतले हे पुस्तक सात दशकांनंतर सुधारित स्वरूपात वाचकभेटीस आले आहे..

  • ‘प्रिझन डेज्’
  • लेखिका : विजयालक्ष्मी पंडित
  • प्रकाशक : स्पीकिंग टायगर
  • पृष्ठे: १३६, किंमत : ४९९ रुपये

‘तुरुंगात जाऊन आलेल्यासाठी अतिशय छोटय़ा छोटय़ा गोष्टीही खूप समाधान देऊन जातात. आपल्याला हवं तेव्हा सहज फेरफटका मारणं, एखाद्या दुकानात जाऊन वर्तमानपत्र खरेदी करणं, एखाद्याशी गप्पा मारणं किंवा अगदी गप्प राहणं.. स्वत:च्या मर्जीनुसार वागण्यासारखं सुखदायक काही नाही,’ असं नेल्सन मंडेला यांनी एके ठिकाणी लिहून ठेवलं आहे. तुरुंग, कारागृह, जेल म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चार भिंतींच्या आत कधी एक पाऊलही न टाकलेल्यालाही हे विधान पटेल. प्रत्यक्ष कारावास भोगून आलेल्यांकडे तर या विधानास पुष्टी देणारे असंख्य अनुभव असतात. तुरुंगातल्या एकाकी, उदासवाण्या वातावरणात शिक्षा भोगताना अनेकांच्या लेखण्यांना धार चढली, हा आजवरचा इतिहास आहे. अगदी नेपोलियन बोनापार्टपासून अ‍ॅडॉल्फ हिटलपर्यंत अनेकांनी कारावासातल्या वास्तव्याचा वापर करून आपला आयुष्यपट जगासमोर मांडला. कारागृहातल्या कोंदट आणि चहुबाजूंनी अंगावर येऊ पाहणाऱ्या कळकट भिंतींच्या सान्निध्यात उत्तमोत्तम साहित्यकृती निर्माण झाल्या आणि साहित्याचा प्रवाह समृद्ध करून गेल्या.

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात तर कारागृहात निर्माण झालेले साहित्य केवळ त्या काळाचे नव्हे, तर त्यानंतर येणाऱ्या अनेक पिढय़ांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. अंदमानच्या शिक्षेदरम्यान तुरुंग अधिकाऱ्यांनी पेन आणि कागद न दिल्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कारागृहाच्या भिंतींवरून आपल्या कवितांना मोकळी वाट करून दिली. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगवासादरम्यान भगवद्गीतेवरील ‘गीतारहस्य’सारखा ग्रंथ लिहिला. ब्रिटिश सरकारविरोधात या ना त्या मार्गाने लढा देत असताना, बंदिवानाचे आयुष्य जगत असताना आलेले अनुभव अनेकांनी पुस्तकांतून व्यक्त केले आहेत. अशाच अनुभवांचे एक पुस्तक सुमारे सात दशकांनंतर नव्या रूपात वाचकांच्या भेटीला आले आहे. विजयालक्ष्मी पंडित यांचे ‘प्रिझन डेज्’ हे पुस्तक पहिल्यांदा १९४६ मध्ये प्रकाशित झाले होते. मात्र, आता याच पुस्तकातील निवडक भाग वगळून ते नव्याने प्रसिद्ध झाले आहे. विजयालक्ष्मी पंडित यांच्या कन्या व ख्यातनाम लेखिका नयनतारा सहगल यांची प्रस्तावना हे ‘प्रिझन डेज्’च्या नव्या आवृत्तीचे एक वैशिष्टय़!

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची धाकटी बहीण ही विजयालक्ष्मी पंडित यांची ओळख आहेच; पण स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री त्या होत्या. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सोव्हिएत रशियातील भारताच्या राजदूतापासून महाराष्ट्राच्या राज्यपालपदापर्यंत विविध पदे भूषवली. १९६९ नंतर सक्रिय राजकारणातून निवृत्त झालेल्या विजयालक्ष्मी पंडित यांनी आपली भाची इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला विरोध म्हणून १९७७ मधील निवडणुकीत त्यांच्याविरोधात झंझावाती प्रचार केला होता. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान संपूर्ण नेहरू कुटुंबाने उडी घेतली असताना विजयालक्ष्मी पंडित यांनीही १९३२-३३, १९४० आणि १९४२-४३ या कालावधीत तुरुंगवास भोगला. ‘प्रिझन डेज्’ हे त्यांनी तिसऱ्या कारावासाच्या कालावधीदरम्यान लिहिलेल्या रोजनिशीचे प्रतिबिंब आहे.

स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये ती चळवळ, ब्रिटिशांची जुलमी राजवट, तत्कालीन भारतीय समाजाची स्थिती अशा अनेक गोष्टी प्रामुख्याने आढळतात. त्यामुळे ही पुस्तके केवळ आत्मचरित्र किंवा चरित्रपर पुस्तके न ठरता एक संदर्भग्रंथही ठरतात. विजयालक्ष्मी पंडित यांचे ‘प्रिझन डेज्’ मात्र या पठडीतले पुस्तक नाही. वर म्हटल्याप्रमाणे, ‘प्रिझन डेज्’ ही १२ ऑगस्ट १९४२ ते ११ जून १९४३ या काळातील तुरुंगवासादरम्यान विजयालक्ष्मी यांनी लिहिलेली रोजनिशी आहे. पण ही रोजनिशी स्वातंत्र्य चळवळीबद्दल सांगत नाही, ती त्या लढय़ात सहभागी झालेल्या प्रभृतींबद्दलही बोलत नाही किंवा ती स्वातंत्र्याबद्दलच्या तात्त्विक चर्चेतही रमत नाही. ही रोजनिशी म्हणजे विजयालक्ष्मी यांनी कारावासादरम्यान जे अनुभवले, त्याचे प्रामाणिक वर्णन आहे. कदाचित त्यामुळेच ‘प्रिझन डेज्’ हे वेगळे आणि वैशिष्टय़पूर्ण ठरते. कारण यामध्ये आपल्याला विजयालक्ष्मी पंडित ही व्यक्ती भेटत नाही, तर स्वातंत्र्यलढय़ादरम्यान तुरुंगवास भोगलेल्या अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे अनुभव भेटतात. ब्रिटिश राजवटीत सर्वसामान्य कैद्याला जे अनुभव आले असतील, ते अनुभव ‘प्रिझन डेज्’च्या रूपाने उलगडतात.

अलाहाबादमध्ये १२ ऑगस्ट १९४२ रोजी विजयालक्ष्मी पंडित यांना अटक झाली. तेव्हा ती त्यांची तुरुंगातली तिसरी खेप होती. त्याआधी त्यांनी साधारण दोनेक वर्षे तुरुंगवास भोगला होता. त्या अनुभवानंतर त्यांना तुरुंगवास सवयीचा होणे अपेक्षित होते. परंतु ते तसे न झाल्याची खंत ‘प्रिझन डेज्’मधील रोजनिशीच्या सुरुवातीच्या पानांतून विजयालक्ष्मी यांनीच व्यक्त केली आहे. बर्नार्ड शॉ यांच्या एका विधानाचा त्यांनी उल्लेख केला आहे. ‘देदीप्यमान शौर्य, सौंदर्य, सत्य, ज्ञान आणि शाश्वत प्रेम या गोष्टी मानवतेसाठी आजही केवळ कागदावरच आहेत,’ हे बर्नार्ड शॉ यांचे वाक्य तुरुंगातील उदासवाण्या, अर्थहीन वातावरणात आपल्याला आठवते, असे त्या म्हणतात. पण पुढच्याच वाक्यात- ‘आमच्यासारख्या स्वातंत्र्य चळवळीत गुंतलेल्यांनी अगदी नैराश्याच्या प्रसंगीही अशा तत्त्वज्ञानाचा विचार करणे योग्य नाही.. मी सावध राहायला हवं,’ असं लिहून त्या असा विचार आपल्या डोक्यात आल्याबद्दल अप्रत्यक्ष खंतच प्रकट करतात.

असे असले तरी, या रोजनिशीत विजयालक्ष्मी यांनी तुरुंगातल्या परिस्थितीचे वास्तवदर्शी वर्णन केले आहे. त्या काळी तुरुंगात असलेल्या कैद्यांना तयार जेवण क्वचितच मिळायचे. त्याऐवजी त्यांना स्वत:च स्वयंपाक करावा लागत असे. याकरिता तुरुंग प्रशासनाकडून ठरावीक (म्हणजे, अपुराच!) शिधा पुरवला जात असे. या शिध्याबद्दलचे उल्लेख पंडित यांच्या रोजनिशीत सातत्याने येतात. तांदूळ आणि इतर धान्यांत इतके खडे असायचे की, ते निवडून झाले की प्रत्यक्षातले धान्य फारच कमी उरायचे, असे त्या सांगतात. खरे तर त्या काळात सर्वसामान्य कैदी म्हणून कोठडीत असलेल्या इतर महिलांना विजयालक्ष्मी यांच्यापेक्षाही वाईट दर्जाची वागणूक मिळाली असेल. पं. नेहरू यांची बहीण आणि स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेली एक महिला म्हणून त्यांना अधिक चांगल्या वागणुकीची अपेक्षा असणेही स्वाभाविक. परंतु तसे या तुरुंगवासात घडले नसल्याचे या रोजनिशीतून सातत्याने समोर येते. खुद्द विजयालक्ष्मी यांनाही कदाचित याचे शल्य असावे. म्हणूनच एका ठिकाणी त्या म्हणतात : ‘अन्न हा अवाजवी चर्चेचा विषय आहे. तुरुंगात तुम्हाला सक्तीने याची जाणीव होते.’ आपल्याला आदिम काळातील पद्धतीनुसार जेवण बनवायला लागत असल्याबद्दल होणारा त्रासही त्या व्यक्त करतात व ते टाळण्यासाठी चहा आणि पाव यांवर गुजराण केल्याचेही त्यांनी या रोजनिशीत नमूद केले आहे.

जशी खाण्याची गोष्ट तशीच कोठडीची. आपण राहात असलेल्या कोठडीचे त्यांनी सविस्तर वर्णन एका नोंदीत केले आहे. आयताकाराची एक खोली, त्यात बारा कैद्यांसाठीची जागा, एका कोपऱ्याला असलेली चौथरारूपी मोरी, कळकट भिंती, वारंवार पडणारे छताचे, भिंतींचे पोपडे हे सगळे त्यांनी रोजनिशीत मांडले आहे. तुरुंगात पिण्याच्या व अंघोळीच्या पाण्यासाठी एकच नळ असायचा, हेही त्या सांगतात.

तुरुंगातील गैरव्यवस्थेचे वर्णन करतानाच या रोजनिशीच्या काही पानांत तुरुंगातल्या अन्य महिला कैद्यांबद्दलही त्यांनी लिहिले आहे. या महिला कैदी स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित नव्हत्या, तर छोटय़ा-मोठय़ा गुन्ह्यांची शिक्षा भोगणाऱ्या होत्या. त्यात छळ करणाऱ्या पतीला ठार करणारी एखादी दुर्गी आहे, तुरुंगातल्या झाडावर चढून आत्महत्येची धमकी देणारी नारायणी आहे, चादर चोरल्याबद्दल सात वर्षांची शिक्षा झालेली एक मुलगी आहे. काळाच्या घावांनी या महिलांना कसे कणखर बनवले, याचे वर्णन ‘प्रिझन डेज्’मध्ये वेळोवेळी येते. महिला कैद्यांवर लक्ष ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्वभावचित्रही विजयालक्ष्मी यांनी रेखाटले आहे. या सगळ्यांबद्दलचे अनुभव सांगताना, तुरुंगातल्या अप्रत्यक्ष श्रेणीव्यवस्थेवरही त्या भाष्य करतात. खुनाच्या गुन्ह्यप्रकरणी शिक्षा झालेल्याचा अधिक दरारा आणि किरकोळ चोऱ्यांमध्ये शिक्षा झालेल्यांबद्दलची तुच्छता, पुरुष कैद्यांच्या तुलनेत दुय्यम मानल्या जाणाऱ्या महिला कैदी अशी व्यवस्था तुरुंगातही पाहायला मिळत असल्याचे, त्या सांगतात.

या रोजनिशीतला आणखी एक महत्त्वाचा भाग विजयालक्ष्मी पंडित यांची कन्या चंद्रलेखा आणि त्यांची भाची इंदिरा गांधी यांचे याच तुरुंगात आगमन झाल्यानंतरच्या कालावधीचा आहे. अर्थात, त्यातून काही गौप्यस्फोट वा खुलासे होत नाहीत. उलट एक आई म्हणून विजयालक्ष्मी यांची होणारी घालमेल त्यातून वारंवार दिसते. ‘आनंद भवन’मध्ये एकटय़ा पडलेल्या दोन कन्यांबद्दलची चिंता त्यांच्या रोजनिशीत वारंवार व्यक्त होते. त्याच वेळी पती रणजित पंडित यांच्याबद्दलची ओढही त्यात जाणवत राहते.

‘प्रिझन डेज्’मधून काही नवीन तपशील, ऐतिहासिक संदर्भ मिळतील, विजयालक्ष्मी या अभ्यासक, उत्तम संसदपटू असल्यामुळे त्यातले काही हाती लागेल, अशी पुस्तक वाचताना अपेक्षा असते. पण या पातळीवर ‘प्रिझन डेज्’ निराशा करते. मात्र, एका मोठय़ा घराण्यातल्या व्यक्तीने कुटुंब, नाव, नाती यांच्या प्रतिष्ठेचा बाऊ न करता आपल्या अनुभवांचे कोणताही आडपडदा न ठेवता केलेले वर्णन म्हणून ‘प्रिझन डेज्’ वेगळे ठरते.

asif.bagwan@expressindia.com

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prison days book by vijaya lakshmi pandit mpg
First published on: 24-08-2019 at 02:49 IST