शेक्सपिअरच्या स्मृतिदिनी, २३ एप्रिल रोजी ‘युनेस्को’च्या ठरावानुसार ‘जागतिक पुस्तक दिन व स्वामित्वहक्क दिन’ साजरा होतो. या खास दिवशी ‘बुकमार्क’मध्ये तीन विशेष लेख.. पैकी दोन वाचनानंद आणि  वाचनालयातल्या अनुभवांविषयी. सोबत, एका प्रकाशकानं आजच्या भारतीय आणि महाराष्ट्रीय वाचनसंस्कृतीचा घेतलेला वेध!

शेक्सपिअरच्या स्मृतिदिनी, २३ एप्रिल रोजी ‘युनेस्को’च्या ठरावानुसार ‘जागतिक पुस्तक दिन व स्वामित्वहक्क दिन’ साजरा होतो. या खास दिवशी ‘बुकमार्क’मध्ये तीन विशेष लेख.. पैकी दोन वाचनानंद आणि  वाचनालयातल्या अनुभवांविषयी. सोबत, एका प्रकाशकानं आजच्या भारतीय आणि महाराष्ट्रीय वाचनसंस्कृतीचा घेतलेला वेध!

गेली दोन-तीन र्वष मराठी पुस्तकांची विक्री सातत्याने कमी होत आहे. महत्त्वाच्या काही प्रकाशकांबरोबर चर्चा करताना असं ऐकायला येतं की विक्रीतली ही प्रत्यक्ष घट आठ ते दहा टक्के आहे. प्रत्यक्ष असं म्हणण्याचं कारण अप्रत्यक्षपणे ही विक्री आधीपासूनच कमी व्हायला सुरुवात झाली होती. गेल्या चाळीस वर्षांत महाराष्ट्रातलं शिक्षणाचं प्रमाण खूपच वाढलं आहे. पुस्तकांच्या वाचकांचं प्रमाण या शिक्षणाशी निगडित असायला हवं. पण या काळात वाचकांच्या संख्येत झालेली वाढ फारच थोडी आहे. म्हणजे सुशिक्षितांच्या तुलनेत पुस्तकांच्या वाचकांचं प्रमाण घटायला आधीच सुरुवात झालेली होती.

साहित्य संमेलनाच्या वेळी झालेली पुस्तक विक्रीची चर्चा, त्याचे प्रसिद्ध झालेले आकडे हे  सारं अजूनही स्मरणात असताना, ‘पुस्तकांची विक्री घटली’ यावर सामान्य माणूस विश्वास ठेवणं कठीण आहे. पण संमेलनातले आकडे  पाहून एकंदर पुस्तक व्यवहाराबद्दल आडाखे बांधणं हे दिवाळीच्या दिवशी एखाद्या दुष्काळग्रस्त गावात फेरी मारून इथे सारं आलबेल आहे, असा निष्कर्ष काढण्यासारखं होईल. आणि हे आकडे संमेलनाचं यश दाखवणारी फूटपट्टी ठरू लागल्यामुळे संमेलनकर्त्यांकडून आकडे फुगवले जातात, हे या व्यवसायातील लोकांना माहीत असलेलं उघड गुपित आहे.

वाचनाचं घटलेलं प्रमाण चटकन लक्षात येणारी एक महत्त्वाची जागा म्हणजे लोकल प्रवास. पूर्वी ट्रेनच्या प्रवासात अनेक लोकांच्या हातात पुस्तकं अथवा साप्ताहिकं दिसत असत. मराठीतल्या तीन-चार वर्षांपूर्वी प्रसिद्ध असणाऱ्या साप्ताहिकांचे विक्रीचे आकडे सध्या निम्म्याच्या जवळपास आलेले आहेत. सामान्यत: वेळ काढण्यासाठी आणि थोडय़ा प्रमाणात उद्बोधनासाठी वाचणाऱ्या लोकांच्या हातातले मोबाइल स्मार्ट झाले आणि हाताशी असणारा त्यांचा प्रवासातला वेळ हसत-खेळत जाऊ लागला.

पुस्तक विक्री उतरणीला लागली आहे की काय, अशी शंका येणारं चित्र साऱ्या देशभरच दिसत आहे. १९९५-९६ पासून मी नियमितपणे दिल्ली येथे नॅशनल बुक ट्रस्ट भरवत असलेल्या जागतिक पुस्तक मेळ्याला उपस्थित राहतो. २००० पासून तर तिथे ज्योत्स्ना प्रकाशनचा स्टॉलही असतो. पूर्वी हे प्रदर्शन दोन वर्षांतून एकदा होत असे. २०१२ पासून ते दरवर्षी भरतं. त्याआधी, २००८ ते २०१० पर्यंत या प्रदर्शनाच्या लोकप्रियतेचा आलेख चढता होता. स्टॉलधारकांची संख्या वाढत वाढत या दरम्यान १३०० पर्यंत पोहोचलेली होती. नंतर ती कमी होऊ लागली आणि या वर्षी ती ७५० पर्यंत खाली आली आहे.

पुस्तकांची ओढ कमी होत आहे, हे सत्य सर्वच पुस्तकप्रेमींना मान्य होईल असं नाही; रुचेल असं तर नाहीच नाही. काही पुस्तकांच्या विक्रीचे आकडे वाढलेही आहेत. पण अशा काही अपवादात्मक पुस्तकांच्या विक्रीवरून वाचन-संस्कृतीचा आडाखा बांधताना आणखीही काही मुद्दे विचारात घ्यायला हवेत.

(१) आजच्या वाचकाचं सरासरी वय काय? ते जर ४५-५० च्या दरम्यान जात असेल तर ती उद्यासाठी धोक्याची घंटा असू शकते.

(२) वाचक विकत घेत असलेल्या पुस्तकांच्या निर्मितीचा काळ कोणता? वाचक जर जुन्या काळातील चांगली पुस्तकंच आज विकत घेत असतील तर तेही भविष्याच्या दृष्टीने धोकादायक वाटतं.

साहित्यातली ‘क्लासिक्स’ हा जगभरचा मोठा व्यवसाय होता. पण कॉपीराइट संपलेली पुस्तकं नेटवर ई-बुक स्वरूपात फुकट मिळायला सुरुवात झाल्यावर जगभरातून अशा पुस्तकांचे गठ्ठे रद्दीच्या स्वरूपात भारतात आले. दिल्लीच्या वर्ल्ड बुक फेअरमध्ये ही पुस्तकं १०० रुपयांना तीन ते पाच या दरात उपलब्ध झाली. गेल्या दोन-तीन प्रदर्शनांत यांचं प्रमाण लक्षणीय होतं. परिणामी प्रदर्शनाला आलेल्यांनी आपले खिसे तिथे रिकामे केले आणि भारतीय प्रकाशकांना त्याचा काही प्रमाणात तरी फटका बसलाच. लवकरच आपल्याकडची जुनी चांगली पुस्तकं वाचकांना ई-बुक स्वरूपात फुकट उपलब्ध होऊ लागतील.

(३) वाचक विकत घेत असलेल्या पुस्तकांत ललितपेक्षा ललितेतर किंवा माहितीपूर्ण पुस्तकांचं प्रमाण जास्त असेल (आणि ते असतंच), तर या प्रकारच्या पुस्तकांना भविष्यच नाही.

इंटरनेटच्या आगमनानंतर माहितीपूर्ण पुस्तकांची चलती संपत आली आहे. यात पहिलाच बळी गेला तो विश्वकोशाचा. आता शब्दकोशासाठीही नेट हा उत्तम पर्याय आहे. त्यामागोमाग विविध प्रकारच्या माहितीसाठी पुस्तकांपेक्षा इंटरनेट हाच पर्याय सोयीचा ठरणार आहे. अजूनही पन्नाशीच्या आसपासची पिढी या प्रकारची पुस्तकं खरेदी करते, पण उद्याचं काय? दिल्लीच्या पुस्तक मेळ्यात पाच वर्षांपूर्वी खाद्यपदार्थाच्या पुस्तकांची आणि प्रकाशकांची चलती होती. आज त्यांची संख्या व त्यांचे स्टॉल खूपच घटले आहेत. आज जादूच्या दिव्याप्रमाणे स्मार्टफोनच्या काचेवर बोट घासलं की क्षणार्धात गुगल राक्षस साकार होतो आणि सांगू त्या पदार्थाच्या पाककृतीच्या अनेक वेबसाइट पुढय़ात ओततो. याच नव्हे, तर कोणत्याही माहितीसाठी तो तत्पर असतो. आणि ही माहिती अद्ययावत असू शकते.

सध्या मराठीत प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांत भाषांतरित पुस्तकांची संख्या जास्त आढळते. पण जसजसा शिक्षणातला इंग्रजीचा प्रभाव वाढत जाईल तसतशी ही पुस्तकं मराठीतून वाचणाऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. पण जगभर प्रकाशित होणारी अशी वेगवेगळ्या विषयांवरची चांगली पुस्तकं पाहून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे जगभर विविध विषयांवर पुस्तकं प्रकाशित होत आहेत. आणि लोक ती वाचतही आहेत. मग मराठीत किंवा भारतीय भाषांतील पुस्तक व्यवसायाला अवकळा येण्याची कारणं काय?

पुस्तकांचा हा व्यवहार चालतो वाचकांच्या जिवावर. महाराष्ट्रभर पसरलेल्या गावोगावच्या वाचकांच्या वाचनाची भूक भागवण्यासाठी असलेला महत्त्वाचा पर्याय म्हणजे अ, ब, क, ड अशा गटांत विभागणी केली गेलेली व शासकीय पाठबळावर चालणारी वाचनालयं. या वाचनालयांना वरच्या गटात प्रवेश मिळवण्यासाठी एक महत्त्वाचा निकष असतो, तो पुस्तकांच्या संख्येचा. वरचा गट म्हणजे अधिक अनुदान! मग संख्या वाढवण्यासाठी स्वस्त पुस्तकांची खरेदी केली जाते. हा व्यवहार अर्थपूर्णही असतो. मग वरचा गट, त्यामुळे जास्त अनुदान आणि त्यातून अधिक अर्थपूर्ण व्यवहार अशा चक्रात या साऱ्या व्यवहाराच्या मुळाशी असणाऱ्या बिचाऱ्या वाचकाचीच हत्या होते. चांगली वाचनालयंही आहेत. सगळाच अंधार आहे असं नाही, पण बऱ्याच ठिकाणचं चित्र थोडय़ाफार फरकानं असंच भीषण आहे.

खरं म्हणजे वाचनाची गोडी लागली पाहिजे ती लहानपणीच. बालवाङ्मय हा वाचन-संस्कृतीतला अत्यंत महत्त्वाचा दुवा. इथूनच उद्याचा मोठय़ा पुस्तकांचा वाचक जन्माला येत असतो. पण मराठीत या क्षेत्रात निर्मिती, प्रसार, विक्री आणि खरेदी या साऱ्याच पातळींवर कमालीची अनास्था आहे. आपलं बालवाङ्मय १९७० नंतर आशय आणि निर्मिती या कुठल्याच बाबतीत काळाबरोबर राहिलंच नाही.

चित्रं हा बालवाङ्मयाचा आत्मा असतो; जो मुलांना पुस्तकाकडे आकर्षति करतो. सुरुवातीच्या टप्प्यावर तर चित्रं हीच पुस्तकाची भाषा असते. बालवाङ्मयात चित्रकाराचं स्थान लेखकाइतकंच, किंबहुना काकणभर जास्तच महत्त्वाचं असतं. जगभर मुलांसाठी अशी असंख्य सचित्र पुस्तकं प्रकाशित होत असतात. आपल्याकडील उदाहरण द्यायचं झालं तर मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या मंगेश पाडगावकर यांच्या बालकविता आणि पुंडलिक वझे यांची चित्रं, आमच्या ज्योत्स्ना प्रकाशनाने प्रकाशित केलेली स्वाती राजे यांची ‘रस्ता’, ‘पाऊस’ व ‘प्रवास’ ही तीन पुस्तकं व त्यातील चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रं किंवा आमच्याच प्रकाशनाची माधुरी पुरंदरे यांची सर्व पुस्तकं. यांत चित्र आणि शब्द यांची जणू स्पर्धाच असते आणि यात सरस कोण हे ठरवणं कठीण असतं. परंतु आपल्याकडे अशी पुस्तकं फारच दुर्मीळ आहेत.

मोठय़ांच्या साहित्यातही अशी नेत्रसुखद पुस्तकं असू शकतात, किंवा जुन्या चांगल्या पुस्तकांची पुनर्माडणी होऊ शकते. पण प्रकाशक बऱ्याच वेळा लोकांना फक्त लेखकाच्या शब्दावरच प्रेम करायला लावतात! त्यांचा शब्दांवर इतका विश्वास असतो की ते जुनी लेटरप्रेसच्या काळातली पुस्तकं त्यांचे फोटो काढूनच पुनर्मुद्रित करतात. त्यांची नव्याने अक्षरजुळणी करण्याची तसदीही ते घेत नाहीत.

मराठी बालवाङ्मयात चित्रकारांना योग्य स्थान दिलं गेलं नाही. बालकुमार साहित्याची संमेलनंही केवळ लेखकांचीच राहिली. ते लेखन तरी सकस असायला हवं होतं, पण ती बाजूही लंगडीच. सध्याचे मराठीतले चांगले बालसाहित्यिक कोण, या प्रश्नाचं उत्तर कदाचित एकाच हाताची बोटं मोजून संपवता येईल. आपलं बरंचसं बालसाहित्य पारंपरिक संस्कारात अडकलेलं आहे. पारंपरिक म्हणण्याचं कारण निसर्ग, पर्यावरण, दृश्यकला यांचेही संस्कार व्हावे लागतात, हे या बाबतीत बरंच काही गमावूनही आम्हाला कळलं नाही. अशा रीतीने जन्माला आलेली मुलांची पुस्तकं सरकारी/निमसरकारी खरेदीतून अर्थपूर्ण व्यवहार करून गावोगावच्या शाळांमधील मुलांच्या माथी मारली जाणं ही वाचकांची भ्रूणहत्याच.

आता परिस्थिती खूपच हाताबाहेर गेली आहे. आज यात, म्हणजे मुलांपासून मोठय़ांपर्यंत, सर्वच पुस्तकांच्या निर्मितीत बदल करायचा म्हटला तरी कठीण जाणार आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे अर्थव्यवहार (इथे हा शब्द मी चांगल्या अर्थाने वापरत आहे). लेखक, चित्रकार, संपादक, प्रूफरीडर या साऱ्यांना सध्या मिळणारं मानधन इतकं तुटपुंजं असतं, की कोणताही शहाणा माणूस भविष्यात या क्षेत्रात येऊन स्वत:च्या पायावर उभं राहण्याचं स्वप्नही पाहू शकणार नाही. साठ-सत्तर सालपर्यंत नाटक, चित्रपट, संगीत, साहित्य या सर्वच क्षेत्रांतील लोकांना काम करण्यात आनंद होता. पसे कुठेच फारसे मिळत नव्हते, पण नंतर मात्र साहित्य वगळता बाकी सर्व क्षेत्रं काळानुरूप आíथक व्यवहाराशी जमवून घेऊ लागली. नाटक, सिनेमांच्या सत्तर सालच्या व आजच्या तिकिटांच्या किमती पाहिल्या तरी हे लक्षात येऊ शकतं. १९७० नंतर पुस्तकांच्या किमती मात्र त्या प्रमाणात वाढल्या नाहीत. साहजिकच या क्षेत्रातलं मानधनही वाढलं नाही.

त्यात भरीला काही प्रकाशकांचे गरव्यवहार आहेतच. लेखक व प्रकाशक यांच्यातील व्यवहाराबद्दल नुकतंच राजन खान यांनी साहित्य परिषदेत जाहीरपणे भाष्य केलं आहे. हे शंभर टक्के खरं नसलं तरी ते खोटं आहे, असं म्हणण्याची हिम्मत या व्यवसायाशी निगडित असलेला कुणीही करू शकणार नाही. त्यामुळे अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक केलेलं लेखन इथे परवडणारं नाही.

एकंदरीत पुस्तकांशी संबंधित असलेल्या वाचन-संस्कृतीच्या भविष्याबद्दल आज माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

 

मिलिंद परांजपे
लेखक मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांतील प्रकाशनसंस्थेशी संबंधित आहेत.
ईमेल: milind@jyotsnaprakashan.com