१९२३ साली डिस्ने ब्रदर्स कार्टून स्टुडियो या नावाने सुरू झालेली व नंतर वॉल्ट डिस्ने प्रोडक्शन्स आणि अखेर १९८६ पासून द वॉल्ट डिस्ने कंपनी या नावाने जनमानसात लोकप्रिय असलेल्या मनोरंजन कंपनीने एक अफाट जादूई जगच निर्माण केले आणि त्याने लहानांसह मोठय़ांनाही वेड लावले. पण साधारण वीसेक वर्षांपूर्वी बदलते तंत्रज्ञान आणि वाढत्या स्पर्धेत ही कंपनी तगणार की बुडणार, अशी स्थिती आली असताना तिला नुसती टिकवलीच नाही, तर वाढवली ती रॉबर्ट आयगर यांनी. ते २००५ साली ‘डिस्ने’चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांच्या १४ वर्षांच्या कार्यकाळात ‘डिस्ने’चे अर्थकारण पाच पटीने वाढले. तिचा विस्तार झाला, आणि पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठी मनोरंजन-माध्यम कंपनी म्हणून ती नावारूपाला आली. उत्तम व्यवस्थापन व प्रशासकाचा नमुना म्हणून आयगर यांच्या ‘डिस्ने’तील या कारकीर्दीकडे पाहिले जाते. त्यांनी हे कसे साधले, याचे उत्तर पुढील महिन्यात प्रकाशित होणाऱ्या त्यांच्या आत्मचरित्रातून मिळणार आहे. ‘द राइड ऑफ अ लाइफटाइम’ हे त्याचे शीर्षक! पेंग्विन रॅण्डम हाऊसकडून प्रसिद्ध होणाऱ्या या पुस्तकात आयगर यांनी त्यांच्या या क्षेत्रातील चार दशकांहून अधिक काळच्या प्रवासाविषयी लिहिले आहे. स्टीव्ह जॉब्ज या आपल्या अवलिया मित्राविषयीच्या आठवणीही त्यांनी त्यात सांगितल्या आहेत. जॉब्जप्रमाणेच सर्जनशील नेतृत्व करण्यावर त्यांचा विश्वास आहे. आशावाद, धाडस, निर्णयक्षमता आणि पारदर्शकता हे गुण नेतृत्वाकडे असायला हवेत, हे ते नेहमीच सांगत असतात; पण या पुस्तकात ते अधिक उलगडून सांगितले आहे!