अरविंद अडिगा हे ‘२००८ सालचा बुकर पुरस्कार विजेते’ वगैरे असले, तरी कादंबरीकार आहेत. कथाही लिहितात अधूनमधून. मग त्यांची नवी कादंबरी क्रिकेटच्या पाश्र्वभूमीवर आहे, तर ‘अडिगांच्या नजरेतून क्रिकेट-अर्थकारण’ अशी तिची भलामण का ?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– उत्तराचे दोन भाग करावे लागतील.

एक- कोणत्याही चांगल्या सामाजिक कादंबरीकाराप्रमाणे अरविंद अडिगा हेही फक्त  छानपैकी गोष्ट सांगून न थांबता समाजचिंतनही मांडतात. समाजाबद्दलची निरीक्षणंही नोंदवतात. दोन- अडिगा यांना आपल्या देशातल्या अर्थकारणाचं उत्तम भान आहेच आणि आज अगदी ‘सर्वहारा’ असलेल्या वर्गाच्या आर्थिक आकांक्षांकडे पाहाणं, त्या जाणून घेणं, यासाठीचे प्रयोग अडिगा यांनी यशस्वीपणे केले आहे. त्यांची ‘सिलेक्शन डे’ ही नवी कादंबरी मंजुनाथ आणि राधाकृष्ण या दोघा भावांबद्दल आहे. थोरल्याला क्रिकेटर बनवण्याचं स्वप्न बाप बाळगतो. त्यासाठी पैसा नसूनही, उकिरडय़ावर फेकलेलं जुनं क्रिकेटसाहित्य पोरांना देऊन सरावाची सुरुवात करून देतो आणि ‘एकविसाव्या वर्षांपर्यंत दाढीच नाही करायची- उगाच हार्मोन नको वाढायला’ असे विचित्र आग्रह लादून पोराच्या पौगंडसुलभ लैंगिक ऊर्मीही नाकारतो. या बापाला क्रिकेटरांचा पैसा दिसतो आहेच, पण पोरं चांगलं खेळणारी आहेत. त्यांच्या गुणांना वाव मिळालाच पाहिजे, अशी खूणगाठ एन. एस. कुलकर्णी ऊर्फ ‘टॉमी सर’ नावाचा एक पारखी माणूस बांधतो. पण या पोरांना उत्तम सुविधा मिळणार कशा? त्यांच्या भवितव्यात आपला पैसा लावणारं आणि त्या बदल्यात ‘पुढे तुम्ही कमवाल त्यातला एकतृतीयांश वाटा- तुमची कारकीर्दभर- माझा’ अशी अट घालणारं आनंद मेहता हे पात्र कादंबरीत येतं!

ही कादंबरी आनंद मेहताच्या आणि राधाचा लहान भाऊ मंजू याच्या दृष्टिकोनातूनच वाचकांपुढे उलगडत जाते. आनंद मेहता अमेरिकेहून भारतात आला आहे. श्रीमंत तर आहेच, पण शेअर बाजारात चांगला पैसाही कमावतो आहे. त्याची स्वत:च्याच देशाकडे आणि त्यातल्या लोकांकडे पाहण्याची काहीशी तुच्छतावादी- पण आरपार दृष्टी वाचकांना भिडणारी ठरू शकते. तितकंच, मंजू ऊर्फ मंजुनाथ याची काहीशी निरागस, पण ‘मी वाटतो तितका लहान नाही राहिलेलो’ अशा कुऱ्र्यात केली गेलेली वर्णनंही वाचकांवर आदळत राहतात. ही दोन पात्रं आणि त्यांची निवेदनं, ही या कादंबरीला धावतं ठेवणारी चाकं आहेत. यापैकी मेहता, मंजू-राधाचे वडील आणि ‘टॉमी सर’ यांच्या संवादांतून आणि निवेदनातून अडिगा यांचं चिंतन उलगडतं.

अडिगांच्या ‘द व्हाइट टायगर’ला बुकरचा जागतिक सन्मान मिळाला होता. नंतर आलेल्या ‘लास्ट मॅन इन टॉवर’ आणि ‘बिटवीन टू असासिनेशन्स’ या कादंबऱ्या तितक्या गाजल्या नाहीत हे खरं, पण म्हणून त्या बिनमहत्त्वाच्या नव्हत्या. विशेषत: ‘बिटवीन टू असासिनेशन्स’मध्ये त्यांची स्थळवर्णनांतल्या इतिहास  वा भूगोलातूनही सामाजिक निरीक्षणं नोंदवण्याची पद्धत पुढे ‘लास्ट मॅन..’मध्ये खुलली होती. समाज कसा हिंसक होत जातो हे ‘बिटवीन टू..’मध्ये आणि बिल्डर आदींची हाव वाढल्यामुळे मध्यमवर्गीयही कसे बिचारे ठरतात हे ‘लास्ट मॅन..’मध्ये प्रभावीपणे दिसलं होतं. नवी कादंबरी आणखी मोठा षट्कार मारणारी ठरेल, असं समीक्षकांचं मत आहे. या कादंबरीत क्रिकेट आहे, गरिबांची श्रीमंत होण्याची इच्छा आणि तिचा पाठपुरावा यांची गोष्ट आहे, वांद्रे- दहिसर- शिवाजी पार्क अशी मुंबई आहे.. त्याहीपेक्षा, क्रिकेटमधल्या पैशाच्या खेळाचं दर्शन घडवताना एका किडलेल्या समाजाचे किडके आर्थिक व्यवहार कसे असतात, याचं चिंतन अडिगा मांडत आहेत. या कादंबरीचं आगमन नुकतंच पुस्तक दुकानांमध्ये झालं आहे. तिचं स्वागतही होत आहे.

 

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selection day by aravind adiga
First published on: 27-08-2016 at 02:40 IST