फेसबुकसारखी समाजमाध्यमं दुष्टप्रवृत्तींना खतपाणी घालतात ती कशी, याचं हे प्रथमपुरुषी निवेदन…

‘कोणतंही एखादं नाव सांगा’

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

‘हम्म्म… हे घे — ’

‘आता एक राज्य निवडा’

‘नेब्रास्का’

नाव आणि राज्य टाइप केल्याबरोबर समोरच्या स्क्रीनवर नेब्रास्का राज्यातल्या त्या नावांची यादी आली. त्यातल्या एका नावावर क्लिक केल्याबरोबर तिचे फोटो, ती कुठे काम करते, कुठे राहते, कुठली गाडी चालवते, तिला मुलं किती, ती कुठल्या शाळेत जातात, तिने कोणाला मत दिलं अशी सगळी माहिती झरझर समोरच्या मोठ्या स्क्रीनवर येऊ लागली. त्याचवेळी ती व्यक्ती फेसबुकवरही होती. तिची ताजी पोस्टही समोर आली. सरकारी जनगणनेचा डेटा आणि क्रेडिट रेटिंग कंपन्या, विमा कंपन्या, विमान कंपन्या, रुग्णालयं, डॉक्टर्स, नॅशनल रायफल असोसिएशन, जीम, क्लब इत्यादी खासगी कंपन्या/संस्था अशांकडून विकत घेततेल्या अनेक डेटाला हा फेसबुकचा डेटा जोडून, त्यात गूगलवरून जमवलेल्या डेटाची भर घालून त्या बाईची खासगी, कौटुंबिक, आर्थिक, आरोग्यविषयक सगळी माहिती उपलब्ध होतीच, शिवाय तिच्या ‘फेसबुक कॉन्टॅक्ट्स’चीही अशीच माहिती मिळवता येत होती.

केंब्रिज अ‍ॅनालिटिकाच्या लंडनच्या बोर्डरूममध्ये ही घटना २०१४च्या सुरुवातीला घडली. साधारण त्याच सुमारास म्यानमारमध्ये फेसबुकची सुरुवात झाली. त्या सव्वापाच कोटींच्या आशियाई देशात फेसबुकचे अडीच कोटी वापरकर्ते झाले. नवीन फोन्समध्ये फेसबुक प्रीइन्स्टॉल होऊनच येऊ लागलं. ऑगस्ट २०१७ पासून म्यानमारमध्ये फेसबुकवर रोहिंग्यांविरुद्ध द्वेष पसरवणाऱ्या पोस्टमध्ये प्रचंड वाढ झाली. मग रोहिंग्यांवर अत्याचार वाढू लागले. अनेकांनी वारंवार इशारे देऊनही फेसबुकनं या द्वेषमूलक प्रचारावर काहीही बंधनं आणली नाहीत. मार्च २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात स्पष्ट उल्लेख आहे की म्यानमारमध्ये द्वेष आणि हिंसा पसरवण्यात फेसबुकचा निश्चित हातभार लागला.

आपली माहिती ज्यांच्याकडे अनाहूतपणे जमा होते ते सरकारी विभाग आणि खासगी कंपन्या-संस्था, आपण स्वत:हून माहिती टाकतो ती समाजमाध्यमं, आणि या प्रचंड माहितीवर अल्गॉरिदम लिहून मशीन लर्निंग व आर्टिफिशिअल इंटिलिजन्स वापरणाऱ्या केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकासारख्या कंपन्या वा सरकारे यातून आपल्या माहितीचा कसाकसा अर्थ लावला जाऊ शकतो, याच्याही पुढे जाऊन आपली मतं, दृष्टिकोन सोयीस्करपणे कसे बदलले जाऊ शकतात, याचे दूरगामी परिणाम कायकाय होऊ शकतात, आणि याला रोखण्याचे पर्याय काय इतकं सगळं या एकाच पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं.

 फेसबुकचा वापर करून इतर सगळा डेटा एकेका व्यक्तीशी जोडायचा, त्याचं मानसशास्त्रीय विश्लेषण करून प्रत्येकाचे स्वभाव, आवडीनिवडी, रागद्वेष अशा मानवी प्रवृत्तींची संगणकीय प्रारूपं बनवायची आणि त्यावर व्यक्तिविशिष्ट वेगवेगळा प्रचार करायचा अशी ही पद्धत. देशातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे ऑटोमेटेड पद्धतीने करणारी केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका ही खासगी क्षेत्रातली आद्य कंपनी. तिथे काम करत असताना, या पुस्तकाचा लेखक क्रिस्तोफर विली (ख्रिस) यानेच या कामाची संकल्पना तयार केली. प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यापर्यंत त्या कामात ख्रिसचा महत्त्वाचा भाग होता. पण देशोदेशीचे ग्राहक हा प्रकल्प अंतस्थ हेतूंसाठी वापरू लागले आहेत आणि जगभर त्याचे भयावह परिणाम होणार आहेत हे जाणवल्यावर ख्रिस स्वत:च हादरून गेला. त्यानं कंपनी सोडली. निव्वळ तेवढं पुरेसं नाही, म्हणून त्यानं जागल्या (व्हिसलब्लोअर) होऊन सगळी बिंगं उघडकीस आणण्याचा निर्णय घेतला. याची कहाणी या आत्मवृत्तवजा पुस्तकात आहे.

हुशार, पण ‘वेगळा’

मज्जासंस्थेच्या व्याधीमुळे व्हीलचेअरला जखडल्या गेलेल्या आणि समलैंगिक आकर्षणामुळे इतरांपासून बाजूला पडलेल्या या मुलाला शाळेत संगणक-ओळख झाली. टारगट मुलांपासून दूर होण्यासाठी तो जास्त वेळ संगणकावर घालवू लागला आणि तिथंच त्याला त्याचा मार्ग सापडला. १९८९ मध्ये पश्चिम कॅनडात जन्मलेल्या या ख्रिसनं  १६व्या वर्षी शाळा सोडली. तिथून तो पूर्वेला राजधानी ओटावात राजकीय पक्षांसाठी सॉफ्टवेअर संबंधित काम करू लागला. २००७ मध्ये अमेरिकेत बराक ओबामा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी करत होते. त्या प्रचारमोहिमेच्या निरीक्षणासाठी त्याला पाठवलं गेलं. त्या मोहिमेत यूट्यूबचा वापर ज्या पद्धतीने केला गेला त्यानं ख्रिस प्रभावित झाला. खरंतर यूट्यूब, फेसबुक वगैरे समाजमाध्यमं त्यावेळी बाल्यावस्थेत होती, पण झपाट्यानं पसरू लागली होती. अमेरिकन जनतेबद्दलचा अधिकृतरीत्या उपलब्ध असेलेला डेटा वापरून, मतदारांचे विविध गट करून, प्रत्येक गटासाठी ‘टार्गेटेड’ घोषणा/ जाहिराती यूट्यूबद्वारे पोहोचवणं हे ओबामा प्रचार मोहिमेनं यशस्वीपणे केलं. हे पाहून ख्रिसच्या सर्जनशील मनापुढं संभाव्य शक्यतांचं विश्व तयार होऊ लागलं. नंतर वर्षभरात त्यानं कायद्याच्या पदवीकरता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये येणं, तिथं त्याला नोकरीचं आमंत्रण येणं, एलएलबी पूर्ण होताच त्यानं फॅशन स्कूलमध्ये पीएचडी करू लागणं, मग ‘केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’ कंपनीचा जन्म आणि वेगाने वाढ… या घटना सांगत असताना, लेखक वाचकाला अजून एका मार्गानं पुढे नेतो- इथं जणू काही एकेक संकल्पना म्हणजे एकेक पात्र आहे. संगणक, सॉफ्टवेअर, डेटा, मानसशास्त्र, फॅशन, राजकारण, धर्मकल्पना, तत्त्वज्ञान, वंशवाद,  दहशतवाद, भांडवलशाही, मशीन लर्निंग, आर्टिफिशिअल इंटिलिजन्स अशा बहुविध कल्पना एकमेकींशी कधी भांडतात कधी संबंध प्रस्थापित करतात, त्यांच्या संबंधांतून संकल्पनांचीच अपत्यं जन्माला येतात, त्यांच्यावर संस्कार घडतात, काही खुंटतात, काही वृद्धिंगत होतात. त्याच वेळी मानवी भावभावना, विचारधारा, रागद्वेष, श्रद्धा, निष्ठा, हव्यास यांचं त्या संकल्पनांवर संस्करण होतं. रात्र जागवत चालणाऱ्या चर्चेत तरुणांचा जो उत्साह, मोकळेपणा, उत्कटता असते तीच ऊर्जा आपल्याला या संकल्पनांच्या कादंबरीत अनुभवायला मिळते.

फॅशन आणि दहशतवाद

एलएलबी संपवून ‘एससीएल’ कंपनीत दहशतवादाविरुद्ध अल्गॉरिदम लिहिण्याचं काम करत असताना ख्रिसनं फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये पीएचडीसाठी प्रवेश घेतला (‘एससीएल’ने त्याची फी भरली). ही पीएचडी तो कशात करणार होता तर मशीन लर्निंगमध्ये! वैयक्तिक आणि सामाजिक ओळख (आयडेंटिटी), संस्कृती यांत फॅशन रुजलेली असते. फॅशनची संगणकीय प्रारूपं तयार करायची आणि त्यांच्यावर मशीन लर्निंगमध्ये वापरली जाणारी न्यूरल नेटवक्र्स, ऑटोएनकोडर्स वापरून फॅशनचे भविष्यातले कल ओळखायचे असं त्याच्या अभ्यासाचं स्वरूप होतं. त्याच्या मते दहशतवाद आणि फॅशन या दोन्ही गोष्टी आयडेंटिटी आणि संस्कृती यांतून तयार होतात, आणि व्यक्तिमत्त्वामधून तसंच सौंदर्यकल्पनांमधून व्यक्त होतात. दहशतवाद्यांचे व्हिडीओ बघताना ख्रिसला दहशतवादी प्रचारामागची वैशिष्ट्यपूर्ण शैली जाणवली. समान पेहराव, हातातली शस्त्रं, देहबोली, घोषणा अशा सगळ्यातून दहशतवादी गट आपली ओळख, धारणा व्यक्त करत असतात. समूहातल्या सगळ्यांना एकसारखं वाटणं, त्यांनी एकाच प्रकारे व्यक्त होणं याला फॅशनच्या परिभाषेत ‘ट्रेंड’ म्हणतात. या रीतीने फॅशनचा अभ्यास जसा दहशतवादाच्या अभ्यासाशी साधम्र्य दाखवतो तसाच तो राजकारणाशीही जोडता येतो. या तिन्ही गोष्टींकडे समाजशास्त्र आणि मानसशास्त्र यांद्वारे बघता येतं. वैयक्तिक स्वकल्पना, अहंगंड, न्यूनगंड, असुरक्षितता, श्रद्धा यांतून समूहवृत्ती, संस्कृती, सामाजिक ओळख तयार होत असते आणि फॅशन, राजकारण यांतून व्यक्त होत असते. याला सामावून घेणारं संगणकीय प्रारूप बनवायचं म्हणजे अख्खं मानवी भावविश्व संगणकात समाविष्ट करणं होतं.

  ट्रम्पची सुपारी!

प्रत्येक व्यक्तीच्या इंटरनेटवरील वागण्यावरून त्यांचं संगणकीय प्रारूप तयार करायचं. या प्रारूपाद्वारे वैयक्तिक वृत्तीप्रवृत्तीतले कच्चे दुवे हेरून प्रचारपद्धती आखायची. मग ती वापरून ऑटोमेटेड पद्धतीने दहशतवादाविरुद्ध लक्ष्यित (टार्गेटेड) मोहीम राबवायची असं ख्रिसच्या ‘एससीएल’मधल्या कामाचं स्वरूप. ते सुरू होत असतानाच त्यांच्याकडे अमेरिकेहून एक प्रकल्प आला. त्यामध्ये बाजारात विकत मिळणारा डेटा आणि फेसबुक यांची सांगड घालून संपूर्ण अमेरिकी समाजाचं प्रारूप करायचं होतं. बाजारात आकडेवारी मिळते; पण फेसबुकवर वापरकर्तेच अतिशय खासगी अशी माहिती, नातेसंबंध, भावभावना सगळं आपणहून टाकत असतात. असं म्हणतात की तुमचा जोडीदार तुमच्याबद्दल सांगेल त्यापेक्षा अचूक माहिती संगणकीय अल्गॉरिदम फेसबुकवरच्या तुमच्या केवळ ३०० लाइक्सवरून सांगू शकतो. याला बाजारातल्या डेटाशी जोडल्याने प्रत्येक वापरकत्र्याबद्दल सगळंच कळणार होतं. हे म्हणजे संपूर्ण अमेरिकी समाजच संगणकावर बनवायचा होता- यातून मोठी क्रांती होऊ शकणार होती. गरिबी, दहशतवाद यांना कारणीभूत असणारे मनुष्य स्वभावातले दुवे शोधून प्रवृत्तींमध्ये बदल घडवणं शक्य होणार होतं! इतकं मोठं काम करायचं तर पैसा तितकाच लागतो. मग गुंतवणूकदार आला, त्याचे हितसंबंधही आले, त्यानुसार आपल्या कामात बदल करणं आलं. म्हणून अमेरिकेत एक वेगळी कंपनी काढायचं ठरलं, ती केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका ऊर्फ ‘सीए’. गुंतवणूकदार होता उजव्या विचारसरणीचा रॉबर्ट मर्सर. त्याने त्याचा प्रतिनिधी म्हणून अतिउजव्या विचारसरणीच्या स्टीव्ह बॅनॉनला (जो पुढे डोनाल्ड ट्रम्पचा रणनीतीकार झाला) नेमलं. या लेखाच्या सुरुवातीला सांगितलेलं संभाषण बॅनॉन आणि ‘सीए’चा चमू यांच्यातलं! त्यानंतर ‘सीए’ जे करू लागली होती त्याची जगड्व्याळ ताकद बॅनॉनला पक्की उमगली. त्यानं ‘सीए’चं सुकाणू स्वत:च्या उद्दिष्टांकडे वळवायला सुरुवात केली. अमेरिकेतल्या ज्या लोकांच्या मनात कुठल्यातरी प्रकारची असुरक्षितता, राग, साशंकता अशी कुठलीही नकारात्मक भावना साचली आहे अशी सावजं ‘सीए’चा अल्गॉरिदम वापरून हेरायची आणि त्यांच्या प्रत्येकाचा वैयक्तिक कल निर्धारित करून त्यानुसार त्यांच्या मनात वंशभेद, लिंगभेद, वर्णवर्चस्व यांची बीजं पेरायची. संशय, भीती, राग-लोभ, द्वेष इतके तीव्र करत न्यायचे की जेणेकरून ते लोक तार्किकतेला पूर्ण फाटा देऊन केवळ भावनांच्या भरात मतं बनवतील, अविचारी निर्णय घेतील. या निगेटिव्ह भावना स्थलांतरित, काळे, लॅटिनो अशा अल्पसंख्याकांच्या विरुद्ध पेटवायच्या आणि अमेरिकी समाजात कलह निर्माण करून कडव्या गोऱ्या ख्रिश्चनांचं वर्चस्व पुनप्र्रस्थापित करायचं असं बॅनॉनचं उद्दिष्ट. आपल्या कामात रमून गेलेल्या ख्रिसला त्याचं काम कुठल्या दिशेनं वळवलं जातंय हे उमगायला वेळ गेला.  खरंतर बॅनॉनच्या बोलण्यातून आणि ‘सीए’च्या अमेरिकी चमूकडून जे अहवाल येत होते त्यातून सूचित होत होतं की अमेरिकन समाज दुभंगला आहे, भावनिक कडेलोटाशी येऊन पोचलेला आहे. आधीच अशा अवस्थेत असलेल्या समाजावर अल्गॉरिदम वापरल्यानं काय भीषण दुष्परिणाम होतील याचं विश्लेषण स्वत: अमेरिकन नसल्यामुळे ख्रिस नि:पक्षपातीपणे करू शकला असता. आजूबाजूच्यां पेक्षा वेगळं असणाऱ्या माणसांना काय सहन करावं लागतं ते तो स्वत: लहानपणापासून भोगत होता. अशा वेगळ्या, अल्पसंख्य लोकांविरुद्ध बहुसंख्याकांच्या भावना कशा धारदार होऊ शकतात हे त्याने अनेकदा अनुभवलं होतं. तरीही कामाच्या प्रेमात पडलेल्या ख्रिसनं अहवालांतून निघणाऱ्या निष्कर्षांकडे कानाडोळा केला. नंतर एकदा ‘सीए’च्या सीईओसह रशियन ग्राहकांशी झालेल्या एका मीटिंगमध्ये जे घडलं, त्यानं मात्र ख्रिस जागा झाला. आपलं काम प्रत्यक्षात समाजात दुफळी माजवण्यासाठी वापरलं जातंय आणि जगभरात कुठेही वापरलं जाऊ शकतंय, आणि त्याविरुद्ध काहीही करणं त्याच्या हाताबाहेरचं आहे हे त्याला स्पष्ट झालं. हे कुकर्म पुढे करत राहण्यापेक्षा त्यानं ‘सीए’तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या काही महिन्यांत ब्रिटनमध्ये ब्रेग्झिटवर जनमत आणि अमेरिकेत ट्रम्पची निवडणूक या दोन्हीत ‘सीए’चा (गैर)वापर करून जे घडलं ते ख्रिसला संबंधितांकडून कळलं. व्हिसलब्लोअर होऊन सगळं उघड करण्याच्या निर्णयाप्रत तो पोचला. अमर्याद पैसा आणि राजकीय लागेबांधे यांच्या विरोधात बोलणं म्हणजे व्यवस्थेच्या विरुद्ध बोलण्यासारखंच आहे. व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्याला ज्या अग्निदिव्यांतून जावं लागतं त्यातून ख्रिसलाही जावंच लागलं. त्याची कहाणी त्यानं पुढे सांगितली आहे.

फ्रान्सिस हॉगनही हेच म्हणतेय…

फेसबुकमधल्या वैयक्तिक माहितीचा लोकांच्या परवानगीशिवाय बेकायदा वापर, द्वेषमूलक प्रचारावर फेसबुकनं काही उपाय न करणं, ब्रेग्झिट प्रचारात डेटाचा असाच गैरवापर, पैशांचाही बेकायदा वापर, ट्रम्पच्या मोहिमेतला रशियाचा सहभाग, ‘सीए’ कंपनीकडून ग्राहक मिळवण्यासाठी आणि दैनंदिन व्यवहारांतही बेकायदा आणि अनैतिक गोष्टींचा सर्रास वापर या सगळ्यांचे भक्कम पुरावे असतानाही संबंधित व्यक्ती वा कंपन्यांवर कुठलीही गंभीर कारवाई झाली नाही. किरकोळ दंडांव्यतिरिक्त काही शिक्षा तर झाल्या नाहीतच पण असल्या गोष्टी भविष्यात पुन्हा घडू नयेत म्हणूनही काही कार्यवाही केली गेली नाही- ना ब्रिटनमध्ये, ना अमेरिकेत. सुधारणा करत असल्याच्या काही जुजबी घोषणा फेसबुकने केल्या पण जवळपास सगळं ‘जैसे थे’ चालू राहिलं. याची प्रचीती आपल्याला नुकतीच आली आहे. फेसबुकमधल्या नोकरीचा राजीनामा देऊन फ्रान्सिस हॉगन यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये वॉल स्ट्रीट जर्नल आणि अमेरिकी लोकप्रतिनिधीगृहाला फेसबुकबद्दल तपशिलवार माहिती पुरवली. धंद्याच्या हितासाठी फेसबुक सेन्सॉरशिप कसं करतं, लोकांच्या माहितीबद्दल फेसबुक कसं बेजबाबदारपणे वागत आहे, फेसबुक लोकांच्या डेटाचा गैरवापर कसं करतं हे हॉगन यांनी स्पष्ट केलं. इतकंच नाही तर द्वेष पसरवणं, हिंसाचाराला प्रोत्साहन देणं, लहान मुलांचं लैंगिक शोषण करणं यासाठी फेसबुकचा सर्रास वापर होतो आणि याबद्दल अनेकांनी वारंवार इशारे देऊनही फेसबुक त्याबद्दल काहीच करत नाही याचे दाखले हॉगननी दिले. सहज शक्य असूनही फेसबुक नकारात्मक गोष्टींना प्रतिबंध का करत नाही हे ख्रिसने पुस्तकात समजावून सांगितलं आहे. राग, द्वेष, हिंसाचार, सेक्स या गोष्टींनी वापरकर्ता फेसबुकला खिळलेला राहातो. वापरकर्ते जितका जास्त वेळ फेसबुकवर घालवतील तितकं जाहिरातींचं उत्पन्न जास्त, म्हणजेच नफा जास्त.

हेच हॉगनच्या साक्षीतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं. नोबेल पुरस्कार विजेत्या मरिया रोसा यांनीही फेसबुकच्या दुष्परिणामांबद्दल आणि ते रोखण्याच्या अनिच्छेबद्दल आवाज उठवला आहे. समाजमाध्यमांचा आणि आपल्या खासगी माहितीचा गैरवापर होतोय याची जाणीव आपल्याला आता होऊ लागलेली दिसते. समाजमाध्यमं वापरण्यात उपयुक्तता आणि फायदे आहेत तसे धोकेही आहेत. आता आपण अशा टप्प्यावर येऊन पोचलो आहोत की समाजमाध्यमांच्या संपूर्ण बाहेर राहाणं जवळपास अशक्य आहे. त्याचवेळी या महाकाय कंपन्यांपुढे ग्राहक हतबल आहेत हीसुद्धा वस्तुस्थिती आहे.

आपल्याला आधीच असलेली ही जाण फक्त पुनरुच्चारित करून या क्षेत्रातला हा तज्ज्ञ लेखक स्वस्थ बसत नाही. यावर उपाय काय असू शकतील याचा आढावा त्याने शेवटी घेतला आहे. ‘एआय’ क्षेत्राला सध्या जे मोकळं रान दिलं गेलं आहे ते आवरतं घेऊन त्या क्षेत्राला जबाबदारीची जाणीव करून देण्याची गरज आहे, कारण या अल्गॉरिदम्सची क्षमता आणि म्हणून त्यांच्यामुळे होऊ शकणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता आणि व्यापकता दिवसागणिक वाढत चाललेली आहे. ‘डिस्क्लेमर’ आणि ‘टम्र्स’ना वापरकत्र्यानं मान्यता दिली म्हणून कंपन्यांना हात झटकू देणं थांबवायला हवं. इतर अनेक क्षेत्रांत व्यावसायिक, तज्ज्ञ आणि कंपन्यांना त्यांच्या कामाच्या संभाव्य दुष्परिणामांची जाण ठेवून जबाबदारीनं काम करणं आपण भाग पाडतो. औषधांचे दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतात म्हणून प्रदीर्घ चाचण्या, बहुपदरीय परवानग्या यांची चाळणी असते, आणि तरीही दुष्परिणाम झालेच तर औषध कंपन्यांना भरपाईत भागीदार व्हावं लागतं.  समजा घर पडलं तर ग्राहकाने अटी मान्य केल्या होत्या म्हणून आर्किटेक्ट चुकांच्या जबाबदारीतून सुटू शकत नाही. याच प्रकारे आयटी कंपन्या आणि तिथे सॉफ्टवेअर लिहिणारे सॉफ्टवेअर इंजिनीअर, सगळ्यांनाच जबाबदारीत सहभागी करणारे कायदे करावे लागतील. ‘वीज, पाणी यांच्याप्रमाणेच आयटी सेवाही आता अत्यावश्यक आहेत. त्यामुळे त्यांच्या सध्याच्या कारभारांना व पुढच्या मार्गांना सामाजिक मूल्यव्यवस्था आणि व्यापक जनहित अशी दोन्ही परिमाणं लावणं आवश्यक आहे,’ असं ख्रिसचं म्हणणं आहे. लेखक स्पष्ट करतो की त्याने सुचवलाय तो एक मार्ग आहे. पुढची वाटचाल कशी करायची हे समाजाने विचार करून ठरवायला हवंय.

दुष्परिणाम कायमस्वरूपी

‘सीए’च्या अल्गॉरिदमचा वापर अमेरिका व ब्रिटनमध्ये यशस्वीपणे कसा केला गेला आणि त्याचे कायकाय परिणाम झाले हे ख्रिसनं दाखवलं आहे. २०१३ पासून पुढे जगभरच्या अनेक निवडणुकांमध्ये उजव्या विचारसरणीचा विजय झालेला दिसतो. हा निव्वळ योगायाग असेल किंवा उअच्या अल्गॉरिदमसारखे दुसरे अल्गॉरिदम ब्रिटन-अमेरिकेशिवाय इतरत्र वापरले गेले असतील. निवडणुकांमध्ये डावे/उजवे असं चालूच असतं. म्हणजे उजवे जिंकले एव्हढ्यावरून काही निष्कर्ष काढता येणार नाहीत. पण या बहुतेक ठिकाणी असे बदल होण्याआधी स्थानिक बहुसंख्याक समुदायात कुठल्या ना कुठल्या नकारात्मक भावना फोफावलेल्या दिसतात. सामूहिक न्यूनगंड, अन्यायग्रस्ततेची भावना, भवितव्याबद्दलची भीती अशा भावनांचा प्रादुर्भाव वाढत जाऊन त्याबद्दल कुठल्या तरी अल्पसंख्याक समाजगटावर किळस, राग, द्वेष, सूड काढणं हे प्रकर्षानं दिसून येऊ लागलं. म्यानमार, चीनसारख्या हुकूमशाही असलेल्या देशांतही अशाच समाजात फूट पाडणाऱ्या भावनांचा उन्माद जाणवतो तो याच काळात. भावना भडकावून तर्कसंगत, तथ्यसंगत विचार करण्याची इच्छाशक्तीच आपल्याकडून कशी हिरावून घेतली जाते हे ख्रिसनं या पुस्तकात व्यवस्थित समजावून सांगितलं आहे. समाजमनाच्या अशा अवस्थेचा गैरवापर राजकीय ईप्सित साध्य करण्यासाठी वा सत्तेचा अंकुश बळकट करण्यासाठी केला जातो. याचे दुष्परिणाम आपल्याला कायमस्वरूपी भोगावे लागू शकतात. म्हणून हे टाळण्यासाठी सगळ्यांनीच सजग राहणं आवश्यक आहे. कोणातरी विरोधातल्या किंवा आपल्या स्वत:लाच कमी लेखायला लावणाऱ्या गोष्टी जर वारंवार आपल्या समोर येऊ लागल्या तर त्यांच्यात वाहवून न जाता त्या गोष्टी शांत डोक्याने तपासायची गरज जगभरच्या सगळ्याच समाजांत आहे असं हे पुस्तक वारंवार अधोरेखित करतं.

हे पुस्तक वाचण्याच्या आधीपासूनच मी आपल्या डेटाच्या गोपनीयतेचं महत्त्व जाणून होतो. बाथरूममध्ये बसवलेल्या कॅमेराने आपल्या नग्नतेची चोरी होते पण आपल्या डेटाच्या चोरीने आपण अक्षरश: नागवले जातो. पण नवराबायकोची मनं एकमेकांविरुद्ध कलुषित करण्यासाठी, आपल्या इन्व्हेस्टमेंट्स एका दिशेने वळवण्यासाठी, आपल्या खर्च करण्याच्या सवयी बदलण्यासाठी, भटक्या कुत्र्यांबद्दलची आपली मतं बदलवण्यासाठी, आपली संस्कारमूल्य बदलवण्यासाठी आपल्या डेटाचा आणि त्या डेटाद्वारे आपण जे व्यक्त होतो त्याचा वापर केला जाऊ शकतो. आपल्याला व्यक्ती म्हणून आणि समूह म्हणून आंतर्बाह्य बदलवण्याची क्षमता या अल्गॉरिदम्समध्ये आहे. याविरुद्ध सरकारने कायदे करणं, कंपन्यांनी नीतिमूल्यं पाळणं यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही असं नाहीये. या अल्गॉरिदमचा प्राण आहे तो म्हणजे डेटा, आणि तो आपल्या हातात आहे. इंटरनेटवर, समाजमाध्यमांवर आपण अवलंबून असलो तरी आपला डेटा किती, कुठे, कसा उघड करायचा याबद्दलचं तारतम्य आपणच बाळगायला हवं. रोजच्या आयुष्यात आपण सतत काहीना काही सावधगिरीचे उपाय योजत असतो. तीच सतर्कता डेटाच्या बाबतीत बाळगायला हवी. आपला डेटाचा आजचा वापर आपल्या ‘उद्या’ला बदलवू शकतो. ‘आपलं भविष्य आपल्याच हातात आहे,’ हे डेटाच्या बाबतीत पूर्ण सत्य आहे.

narendra.damle@icloud.com