टोपणनावाने लेखन करणे हे तसे नवीन नाही. अमेरिकन भयकथा-लेखक स्टीव्हन किंगच्या बाबतीत तर नाहीच नाही. याचे कारण, सत्तर-ऐंशीच्या दशकात लिहिलेल्या ‘रेज’, ‘द लाँग वॉक’, ‘रोडवर्क’ यांसारख्या लघुकादंबऱ्या त्याने रिचर्ड बाकमन या नावाने लिहिल्या आहेत. किंवा जॉन स्विदन या नावाने लिहिलेल्या ‘द फिप्थ क्वॉर्टर’सारख्या लघुकथेचा कर्ताही तोच होता. काही काळाने हे गुपित उघडही झाले. परंतु, बुधवारी जाहीर झालेल्या एका बातमीने किंगच्या टोपणनावांत आणखी एकाची भर पडली आहे. हे नाव म्हणजे, बेरिल इव्हान्स. या बेरील इव्हान्सची ‘चार्ली द चू चू’ ही नवी कादंबरी नोव्हेंबरात प्रकाशित होत आहे.. ही नवी कादंबरी म्हणजे ‘पिक्चर बुक’च्या स्वरूपातील बालकादंबरिकाच!
या नव्या कादंबरिकेच्या कथानकासाठी आपल्याला वळावे लागते ते ‘द डार्क टॉवर’ या स्टीव्हन किंगच्याच गाजलेल्या कादंबरी-मालिकेकडे. आठ भागांच्या या मालिकेतील तिसऱ्या भागाशी या नव्या कादंबरिकेचे कथानक जोडलेले आहे. १९९१ मध्ये प्रकाशित झालेल्या या तिसऱ्या भागाचे शीर्षक आहे- ‘द वेस्ट लॅण्डस्’. वास्तव आणि कल्पित जग यांच्या जोडबिंदूवरील प्रदेशाचे किंगला नेहमीच आकर्षण राहिले आहे. ते आकर्षण त्याच्या इतर लेखनाप्रमाणेच ‘द डार्क टॉवर’ मालिकेतही त्याने प्रकर्षांने जपले. रोलॅण्ड नावाच्या पात्राच्या नजरेतून अनेक मितीय विश्वाच्या मध्यबिंदूवरील प्रदेशाचा शोध या मालिकेत त्याने घेतला; त्यातील जेक चेंबर्स नावाचे पात्र हे या रोलॅण्डचेच एक रूप, पण ते निराळ्या जगातील आहे. हा जेक जेव्हा ‘आपल्या’ पृथ्वीवर (किंगच्या कल्पनेतील कीस्टोन अर्थवर) येतो, तेव्हा मितींच्या फरकाने त्याचा बराच गोंधळ उडतो. ‘कीस्टोन अर्थ’वर जॅक जे काही करतो, त्यातील एक म्हणजे बेरिल इव्हान्स लिखित ‘चार्ली द चू चू’ या गोष्टींच्या पुस्तकाची खरेदी.. असा काहीसा भाग या कथानकात येतो.
आता खरोखरच, ते ‘बेरिल इव्हान्स’चे ‘चार्ली द चू चू’ नामक पुस्तक येते आहे.. खुद्द किंगमुळेच हे शक्य झाले. ते बॉब नावाचा एक अभियंता, ज्याच्याकेड एक चालती-बोलती, भावना असलेली रेल्वे आहे. तिचे नाव चार्ली. ही चार्ली त्याची खूप जवळची मैत्रीण. बॉब आणि चार्लीच्या मैत्रीचा प्रवास यात आपल्याला वाचण्याबरोबरच पाहायलाही मिळतो. कारण नेद दॅमेरॉन यांच्या बोलक्या चित्रांचाही यात समावेश आहे. (याच दॅमेरॉन यांनी वरील ‘द वेस्ट लॅण्ड’चीही चित्रे रेखाटली होती.) त्या चित्रांमुळे ही बालकादंबरिका कॉमिकइतकी सचित्र होणार आहे. तर ‘द डार्क टॉवर’ मालिकेवरला पहिला चित्रपट २०१७ च्या सप्टेंबरात येतो आहे.