रॉबर्ट फ्रॉस्ट यांची ‘द रोड नॉट टेकन’ ही कविता अलीकडेच शंभर वर्षांची झाली, त्यानिमित्त तिच्या आजवर झालेल्या समीक्षेची समीक्षा करणारं पुस्तकही आलं! त्या पुस्तकाचा आणि कवितेचाही हा मागोवा..

 

एक नि:श्वास टाकून मी सांगत राहीन
इथून पुढे कधी तरी युगानुयुगे :
जंगलात दोन रस्ते फुटले होते आणि मी-
मी जो कमी मळलेला होता तो निवडला
आणि त्यामुळंच सारं काही बदलून गेलं.

या ओळी झळकताहेत न्यूझीलंडमधील एका रस्त्यावर लावलेल्या फोर्ड मोटार कंपनीच्या जाहिरातीच्या निमित्तानं. रॉबर्ट फ्रॉस्ट या अमेरिकन कवीच्या ‘द रोड नॉट टेकन’ या कवितेच्या शेवटच्या, पण अतिशय मशहूर ओळी असल्याचं आजही अनेकांनी ओळखलं असेल. आपल्याकडे रॉबर्ट फ्रॉस्टची ही किंवा अन्य कविता पाठय़पुस्तकात साधारणपणे असायची.
या कवितेच्या स्वाक्षरी ओळी तर कॉफी मगपासून, रेफ्रिजरेटरच्या मॅग्नेटपासून ते मेन्टोज, निकोरेट, एआयजी इन्शुरन्स कंपनी, मॉन्स्टर डॉट कॉम या वेबसाइटपर्यंत अनेक कंपन्यांनी वापरून प्रचंड मोठी उलाढाल केली. ब्रूस हॉर्न्सबी, मेलिसा एथरिज, तालिब क्वेली या संगीतविश्वातील दिग्गजांनी तसेच डझनावर टी.व्ही. सीरिजनी, स्प्राय फॉक्सच्या ‘रोड नॉट टेकन’ या व्हिडीओ गेमनी तर आपल्या व्यवसायात मोठी बरकत आणली. केवळ गेल्या ३५ वर्षांतच ४०० विविध पुस्तकांची शीर्षकं, उपशीर्षकं किंवा प्रकरणात या ओळीतील शब्दांचा वापर केला आहे. एम. स्कॉट पेक यांच्या ‘द रोड लेस ट्रॅव्हल्ड : न्यू सायकॉलॉजी ऑफ लव्ह, ट्रॅडिशनल व्हॅल्यूज अॅण्ड स्पिरिच्युअल ग्रोथ’ या आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर पुस्तकाच्या ७० लाख प्रती अमेरिका व कॅनडा येथे विकल्या गेल्या आहेत.
रॉबर्ट पिन्स्की यांनी ‘आवडती कविता प्रकल्पा’द्वारे अमेरिकेतील लोकांना आवडती कविता निवडण्यासाठी आवाहन केले होते. १८००० निवडलेल्या कवितांमध्ये सर्वात जास्त ‘द रोड नॉट टेकन’ला पसंती दर्शविली होती.
रॉबर्ट फ्रॉस्ट हे टी. एस. एलिएट व ए-ाा पाऊंड यांचे समकालीन कवी. गुगलने २०१२ मध्ये एक तुलनात्मक पाहणी केली होती. त्यात एलिएट यांच्या ‘द वेस्ट लॅण्ड’ आणि ‘प्रुफ्रॉक’ या गाजलेल्या कवितांपेक्षा चौपटीनं अधिक ‘द रोड नॉट टेकन’ याचा संदर्भ लोक वापरतात असं आढळून आलं. या सर्वाचा विचार केला, तर अमेरिकन साहित्यातील सर्वात लोकप्रिय साहित्य असं या कवितेबद्दल म्हणावं लागेल.
ऑगस्ट १९१५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या २० ओळींच्या कवितेला आता शंभर र्वष पूर्ण झाली आहेत. या अत्यंत लोकप्रिय कवितेच्या शंभरीनिमित्त ऑगस्ट २०१५ मध्ये अमेरिकेतील जाणकार समीक्षक डेव्हिड ऑर यांनी ‘द रोड नॉट टेकन’ हे पुस्तक लिहून गेल्या शंभर वर्षांच्या कालावधीत या कवितेच्या आकलनाबाबत मांडण्यात आलेल्या मतांतरांचा थेट परामर्श घेतला आहे. ऑर यांच्या मते ही कविता तिच्या निर्मितीपासून गेली शंभर र्वष जितकी वाचकप्रिय झाली तितकीच ती वाचकांना तसेच समीक्षकांनाही संभ्रमात टाकत आली आहे. बहुतेकदा वाचकांकडून या कवितेचे शीर्षक ‘द रोड नॉट टेकन’ऐवजी ‘द रोड लेस ट्रॅव्हल्ड’ अशी गफलत केली जाते. एवढंच नव्हे, तर काही समीक्षकांनीही ही ओळ शीर्षक म्हणून वापरली आहे. समीक्षक कॅथरिन शूल्झ हिनं आपल्या एका निबंधात फ्रॉस्टच्या एकाच वेळी दोन बाबी सांगण्याच्या हातोटीबद्दल लिहितानाही ‘द रोड लेस ट्रॅव्हल्ड’ असंच म्हटलं आहे.
या कवितेतल्या शेवटच्या तीन ओळी म्हणजे त्या सवरेत्कृष्ट आहेत असे नव्हे; पण एकदा या ओळी वाचल्या, की वाचकांच्या मनात प्रतिमा तयार होते. अनेक युगांनंतर कवीला सांगायचं आहे की, त्या वेळी कमी मळलेला रस्ता निवडला म्हणून सारं काही बदलून गेलं. याचा पुढे जाऊन असा अर्थ लावला जातो की, आजच्या माझ्या सुखावह अगर क्लेशदायक परिस्थितीला माझे निर्णय कारणीभूत आहेत वगैरे. (म्हणजे या स्थितीला आपलं प्राक्तन किंवा नियतीचा संबंध होता या अर्थाच्या अगदी उलट.) म्हणजे ही कविता जणू माणसाच्या आत्मप्रकटीकरणाच्या विजयाचं एक गीतच. ऑर यांच्या मते बहुतेक सगळे जण या कवितेचा असा अभिप्रेत नसलेला अर्थ लावतात. कदाचित या गैरसमजुतीमुळेच या कवितेनं लोकप्रियतेचं शिखर गाठलं असावं. ही कविता म्हणजे ‘कॅन डू’ अशा व्यक्तिवादाला सलाम नव्हे, तर आपल्या जीवनाची कथा रचताना आपण आपली जी आत्मप्रतारणा करतो त्यावरचं हे भाष्य आहे. गेल्या शंभर वर्षांत अमेरिकन अनुभवाचं मर्म इतक्या ताकदीनं अन्य कुठल्या लेखकाला पकडता आलं नाही. ‘द रोड नॉट टेकन’ ही कविता म्हणजे एक वाङ्मयीन चमत्कृती व त्याबरोबरच एक तात्त्विक पेच असल्याचं ऑर म्हणतात. फ्रॉस्टला पहिला अमेरिकन चारित्र्याचा कवी म्हटलं गेलं. ही कविता जेव्हा अप्रस्तुत वाटते तेव्हा ती गंभीर असते, तर जेव्हा गंभीर स्वरूपाची वाटते तेव्हा ती हलकेच उपहासात्मक असते. म्हणूनच तिचं आकलन करून घेणं हे दुसऱ्या अर्थानं अनाकलन होत जाणं असं आहे.
‘द रोड नॉट टेकन’ म्हणजे जो रस्ता घेतला नाही तो; पण लोक त्यालाच ‘रोड लेस ट्रॅव्हल्ड’ असं म्हणू लागले. म्हणजे शीर्षक ‘काय केलं’ हे नसून ‘काय केलं नाही’ हे आहे. म्हणून या कवितेबद्दल जितका अर्थ लावत बसू तितकं कोण काय करीत आहे आणि का हे सांगणं कठीण होत जातं. मार्क रिचर्डसन विचारतो की, निवेदकानं कोणता रस्ता घेतला नाही? कमी मळलेला रस्ता घेतला की शीर्षकात सूचित केल्याप्रमाणे अधिक मळलेला रस्ता तो घेऊ शकला नाही?
फ्रॉस्टनं सुरुवातीला ‘टु रोड्स’ असं शीर्षक दिलं होतं; पण नंतर ते बदलून ‘द रोड नॉट टेकन’ असं दिलं, ते जाणीवपूर्वकच. कारण रिचर्डसनप्रमाणं वाचकांच्या मनात दोन प्रश्न निर्माण व्हावेत. एवढंच नव्हे, तर त्याच्या मनात हे दोन दृष्टिकोन म्हणजेच दोन कविता समोरासमोर ठेवायच्या होत्या. पहिल्या कवितेत निवेदक नकळतपणे स्वत:चं अभिनंदन करतो, की आपण इतरांनी न घेतलेला असा वेगळा रस्ता निवडला, तर दुसऱ्या विडंबनात्मक कवितेत (जी फ्रॉस्टनं मूलत: मनात असल्याची कबुली दिली होती.) निवेदकानं जो रस्ता निवडला नाही याबद्दल खंत वाटल्याचं नाटक आहे. ढग जसे एकमेकांपासून दूर होतात व पुन्हा एकमेकांना झाकोळतात त्याप्रमाणं या दोन्ही कविता एकमेकांभोवती फिरत राहतात, जेणेकरून कुठलाच अर्थ स्पष्टपणे उमगत नाही.
रिचर्ड व्हॉटले या तर्कशास्त्रज्ञानं ‘पर्यायांचा भ्रम’ संकल्पना स्पष्ट करताना पक्षी व पिंजरा ही दोन चित्रं आलटून पालटून दाखवत राहिल्यास पिंजऱ्यातला पक्षी असं एक चित्र असल्याचं वाटतं. त्याप्रमाणं या दोन्ही कविता एका क्षणी एकमेकांत सम्मीलित होतात असं वाटतं, तर ऑर यांच्या मते एक कविता स्पष्ट होऊ लागताच दुसरी मध्येच येऊन तिला धूसर करते असं काहीसं घडतं. त्यामुळे ही कविता वाटते किंवा समजली जाते तितकी सरळ, सोपी नक्कीच नाही. ‘निवड’ आणि ‘निवड करणारा’ या संज्ञांद्वारे कवितेचे संदर्भ एक देश म्हणून अमेरिकेच्या वैशिष्टय़ांशी जोडण्याचा प्रयत्न ऑर यांनी केला आहे.
ही कविता निर्णयन करण्याच्या काठिण्याबाबत असल्यासारखी वाटते, पण त्याच वेळी ते करण्याची निरीच्छाही सूचित होते. निवेदक पर्याय निवडायला विलंब करतो. ‘लाँग आय स्टुड/ अॅण्ड डाऊन वन अॅज फार अॅज आय कुड’ या ओळीत विलंब सूचित होतो. प्रत्यक्ष निवडीच्या वेळी तो थोडं थांबतो. कारण त्याला निवडीची प्रक्रियाच गमवायची नाही आहे. निर्णय किंवा निवड झाली तर सारी प्रक्रियाच थांबेल. ते त्याला नको आहे. फ्रॉस्टला प्रक्रिया, सातत्य, अविरत सर्जन, न संपणारे रस्ते- हे सारं शाश्वत ठेवायचं आहे. म्हणून एका ठिकाणी म्हणतो, ‘खरा आनंद स्थिर असलेला कुणाला आवडेल!’
ही कविता म्हणजे कोणतंही निर्णयन न करणाऱ्या निवडीच्या स्वायत्ततेचं एक सुंदर रेखाचित्र आहे. या अर्थानं ही कविता अमेरिकेचं वैशिष्टय़ ध्वनित करणारी आहे. म्हणून फ्रॉस्टला व्हिटमननंतर अमेरिकेचा अस्सल देशी स्वर म्हटलं गेलं आहे. अमेरिका हा संदिग्धतेच्या सर्व छटांसह निवडीचा देश आहे. दोन रस्ते फुटतात ती जागा निवडीची आहे- बदल, सुटका, उदय आणि नाहीसे होण्याच्या शक्यतांच्या निवडीची. ऑर हा धागा पकडून म्हणतो की, जपान म्हटलं की माऊंट फुजी, फ्रान्स म्हटलं की आयफेल टॉवर, इंडिया म्हटलं की ताजमहाल, तर अमेरिकेचं वैशिष्टय़ म्हणजे स्वातंत्र्यदेवीचा पुतळा- व्यक्ती म्हणून प्रत्येक माणसाच्या स्वातंत्र्याचं मूर्तिमंत प्रतीक- पुढे जाण्याच्या अनेक वाटांचं प्रतीक. प्रत्येक वाट म्हणजे नवी सुरुवात आहे. ही कविता आकलनाच्या प्रांतात कितीही चकवे देणारी असली तरी ती एक सृजनाचा अनाहत नाद आणि संस्कृतीचा आदिम वेध आहे.
jitbalwant@gmail.com