अजिंक्य कुलकर्णी
लांडग्यांची शिकार वाढल्याने नद्यांच्या प्रवाहांत बदल झाले किंवा मासे आणि झाडांची वाढ यांच्यात थेट संबंध आहे, हे दावे अविश्वसनीय वाटतील. हे पुस्तक असे दावे करतेच, पण त्यांची तथ्यांनिशी उकलही करून दाखवते..
‘द हिडन लाइफ ऑफ ट्रीज्’ आणि ‘द इनर लाइफ ऑफ अॅनिमल्स’ या निसर्गातील अज्ञात रहस्यांचा शोध घेणाऱ्या पुस्तकांनंतरचे जर्मन जीवशास्त्रज्ञ व लेखक पीटर व्होलेबीन यांचे तिसरे पुस्तक म्हणजे- ‘द सीक्रेट नेटवर्क ऑफ नेचर’! या मूळ जर्मन पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला आहे जेन बॅलिंगस्ट यांनी. जर्मनीच्या जंगल आयोगासाठी केलेल्या कामाचा जवळजवळ २० वर्षांचा अनुभव पीटर व्होलेबीन यांच्या गाठीशी आहे. पर्यावरणाचे संतुलन कायम राहील अशा मोहिमांमध्ये त्यांचा लक्षणीय सहभाग राहिलेला आहे. या अनुभवाच्या आधारावरच त्यांचे लेखन असते; ‘द सीक्रेट नेटवर्क ऑफ नेचर’ हे पुस्तकही त्यास अपवाद नाही.
या पुस्तकातील १६ प्रकरणांतून विविध प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती यांची नैसर्गिक साखळी व्होलेबीन उलगडून दाखवतात. निसर्गात जलचर, भूचर प्राणी यांची अदृश्य साखळी आहे. या साखळीतील एक कडी जरी मानवी हस्तक्षेपामुळे तुटली, तरी त्याची मोठी किंमत मानवजातीला मोजावी लागते. जंगलातील लांडग्यांचे अस्तित्व हे याचे उत्तम उदाहरण ठरेल. ते कसे, हे पुस्तकातील पहिल्याच प्रकरणात वाचायला मिळते. अमेरिकेतील पहिले राष्ट्रीय उद्यान असलेल्या ‘यलोस्टोन’ या निसर्गरम्य भागात शिकारीमुळे लांडग्यांची संख्या प्रचंड कमी झाली होती. तिथे लांडग्यांचीच शिकार का व्हायची? तर जंगलतोड करताना लांडगे माणसांवर हल्ला करत होते म्हणून. थंडीपासून संरक्षणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या घरांच्या बांधकामाकरिता लाकूडफाटा मिळवण्यासाठी ही जंगलतोड केली जात असे. मात्र, याचा परिणाम म्हणून लांडग्यांची संख्या यलोस्टोनमध्ये झपाटय़ाने कमी झाली. लांडग्यांच्या या घटलेल्या संख्येमुळे यलोस्टोनमध्ये ‘याल्क’ जातीच्या हरणांची संख्या बेसुमार वाढली. हरणांनी नदीकाठची कुरणे चरून फस्त केली. त्यामुळे जमिनीची प्रचंड धूप होऊ लागली. परिणामी यलोस्टोनमधील नद्यांचे प्रवाह आश्चर्यकारकरीत्या बदलत गेले. हा सर्व अनर्थ केवळ लांडग्यांच्या शिकारीमुळे झाला आहे हे अभ्यासाअंती लक्षात आल्यावर यलोस्टोनमध्ये कॅनडाहून लांडगे आयात केले गेले. मग काही वर्षांनी यलोस्टोनमधली परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.
मासे आणि वृक्ष यांचा थेट काही संबंध असेल असे कोणास वाटणार नाही. पण या दोघांमधला संबंध किती गुंतागुंतीचा आहे, हे व्होलेबीन उलगडून सांगतात. मासे हे या चक्राचा आरंभबिंदू, तर वृक्ष हे त्या चक्राचा अंतिम बिंदू. माशांचा नद्यांच्या पाण्यातील पोषणद्रव्यांच्या (न्यूट्रिशन) वितरणात किती मोठा सहभाग असतो, हे व्होलेबीन दाखवून देतात. पॅसिफिक महासागरास खेटलेला उत्तर अमेरिकेचा वायव्य किनारा आहे. तेथील नद्यांमध्ये ‘सामन’ नावाची अधिक प्रमाणात खाल्ली जाणारी माशांची जात आढळते. हे मासे नदी प्रवाहात खूप जास्त प्रवास करतात. त्यामुळे त्यांची वाढ दीड मीटर लांब आणि वजनात ३० किलोपर्यंत होत जाते. असे हे धष्टपुष्ट मासे अस्वलांचे अगदी आवडीचे खाद्य. नद्यांचा प्रवाह जिथे अगदी संथ होत असतो, तिथे सामन मासे खायला अस्वले येतात. पकडलेल्या माशांपैकी हलक्या प्रतीचे मासे न खाता अस्वले ते नदी किनाऱ्यावर फेकून देतात. दीर्घ प्रवास केलेल्या या सामन माशांच्या शरीरात ‘एन-१५’ हे नायट्रोजनचे समस्थानिक मोठय़ा प्रमाणात आढळते. त्या किनाऱ्यावर अस्वलांनी फेकलेल्या माशांवर कोल्हे, मिंक तसेच पक्षी ताव मारायचे. त्यामुळे नदीकिनाऱ्यावरील व जंगलातील झाडांना उत्तम प्रतीचे खत या प्राण्यांच्या विष्ठेतून मिळत असे. एका अहवालानुसार, झाडामध्ये आढळणारे ‘एन-१५’ हे समस्थानिक त्यांच्या वाढीसाठी सर्वात जास्त उपयुक्त असते; ते झाडामध्ये आढळण्याचे कारण फक्त सामन हा मासा! जर्मनीतील नदीकिनाऱ्यांवरील झाडांमधील ७० टक्के ‘एन-१५’ हे सामनमुळेच आहे, असेही त्या अहवालाचे म्हणणे आहे. पण या साऱ्याला घरघर लागली, कारण नद्यांवर धरणे बांधली गेली. धरणांमुळे सामनचा प्रवास थांबला.
व्होलेबीन यांनी झाडांवर आढळणाऱ्या विविध किडींविषयीचेही गैरसमज खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच वेळेस आपले एखाद्या कीटकाविषयीचे गैरसमज पक्के झालेले असतात. कोणताही ठोस आधार नसताना आपण त्यांच्याविषयी गैरसमज करून घेतलेले असतात. उदाहरणार्थ, झाडांची साल पोखरणाऱ्या ‘बार्क बीटल्स’ या किडय़ाविषयी व्होलेबीन सांगतात की, हे बार्क बीटल्स जेव्हा ‘स्पृस’ (देवदारसारखा वृक्ष) या झाडाच्या खोडावर छिद्र करतात, तेव्हापासून ते झाड वठण्यास सुरुवात होते. ते खरेदेखील आहे. जर्मनीतील ‘बव्हेरिअन फॉरेस्ट नॅचरल पार्क’मध्ये व्यावसायिक स्वरूपात स्पृसांची लागवड केली गेली; पण ती सर्व बार्क बीटल्सनी पोखरली. एका अख्ख्या डोंगरावरची झाडे अशाने वठली होती. इथे व्होलेबीन प्रश्न उपस्थित करतात की, मग बार्क बीटल्स ही कीड आहे का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल. कारण व्होलेबीन सांगतात की, बार्क बीटल्स फक्त त्याच स्पृसांच्या झाडांना पोखरतात जी अगोदरच कमकुवत झाली आहेत. म्हणजे आधीच कमकुवत झालेली झाडे बार्क बीटल्सचे भक्ष्य बनतात. त्याचबरोबर जिथे जिथे माणसांनी स्पृसांसंबंधी नैसर्गिक नियम मोडले, तिथेच बार्क बिटल्सने स्पृसांना फस्त केले. स्पृसांच्या नैसर्गिक अधिवासाला धक्का लावला नाही, तर तिथल्या स्पृसांना बार्क बिटल्स भक्ष्य करत नाहीत.
विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे मानवी भौतिक जीवन सुखी तर होते आहे; पण त्याच्या याच प्रगतीमुळे त्याच्या नकळत काही परिसंस्था नष्टही होत आहेत. जसे निशाचर असलेल्या पतंगांच्या काही जाती, काजवे आणि कासवे ही आज धोक्याच्या सीमारेषेवर येऊन ठेपली आहेत. याचे कारण हे जीव रात्री विहार करतात तेव्हा त्यांना चंद्राचा मंद प्रकाश, ताऱ्यांचा प्रकाश हे दिशादिग्दर्शनाचे काम करतात. पण आजकाल समुद्राकाठच्या हॉटेल्समध्ये हॉटेल्सबाहेर लावण्यात येणाऱ्या झगमगीत दिव्यांच्या प्रकाशामुळे या जीवांची रात्री दिशाभूल होते. रात्री आपला नैसर्गिक आडोसा शोधत असताना हे जीव या कृत्रिम प्रकाशाकडे आकर्षित होतात. आडोसा न मिळाल्यामुळे साहजिकच त्यांची शिकार होते. कासवांची संख्या कमी होण्याच्या अनेक कारणांपैकी हेही एक कारण आहे. हा कृत्रिम प्रकाश केवळ फक्त कीटक, पक्षी यांनाच त्रास देत नाही, तर त्याचा माणसालादेखील त्रास होतो. मानवी शरीररचनेत प्रकाशाचे महत्त्व आहे. मानवी डोळ्यांत ‘मेल्यानोप्सिन’ नावाचे एक प्रकाश-रंगद्रव्य असते. त्यावर सूर्यकिरणातल्या निळा रंगाचा प्रकाश पडला, की आपल्याला झोपेतून जाग येते. संध्याकाळी जेव्हा याच रंगद्रव्याला लाल प्रकाशाचा स्पर्श होतो, तेव्हा आपल्याला थकवा जाणवायला सुरुवात होते. सतत टीव्ही पाहात राहिल्याने झोपेच्या समस्या उद्भवत आहेत हे काही नवीन नाही. टीव्हीमुळे झोपमोड होते, कारण टीव्हीच्या प्रकाशात निळ्या रंगाच्या प्रकाशाचे प्रमाण अधिक असते. असा प्रकाश आपल्या झोपेचे खोबरे करतो!
आज जगभरातील स्मार्टफोन कंपन्या याच समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. २०१७ साली ‘नेटफ्लिक्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रीड हेस्टिंग्ज म्हणाले होते की, ‘‘नेटफ्लिक्सची सर्वात मोठी स्पर्धा ही मानवी झोपेबरोबर आहे.’’ माणसे मोबाइल, टीव्ही, संगणकाचा पडदा सुधारू शकतील. पण कीटक, प्राणी, पक्षी यांचे काय? व्होलेबीन यासंबंधी काही सोपे उपाय सुचवतात. जसे की, (१) घराबाहेरील दिवे रात्रभर चालू ठेवण्याची गरज नाही. (२) घरातल्या खिडक्यांना प्रकाशरोधक पडदे वापरणे. (३) जंगलाच्या जवळ राहणाऱ्यांच्या घराबाहेर किंवा जंगल सफारी करण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वास्तव्यासाठी तयार करण्यात आलेल्या लॉजच्या बाहेर पतंगासंबंधीचे गती-संवेदक बसवावेत. (४) गरजेपुरताच प्रकाश वापरावा. (५) पथदिव्यांमध्ये वापरण्यात येणारे सोडियम व्हेपर आणि टंगस्टनची तार असलेले घरगुती वापरातील दिवे (या दोन प्रकारच्या दिव्यांनी पृथ्वीचे रात्रीचे तापमान वाढवण्यात हातभार लावला असल्याने) यांच्याऐवजी एलईडी दिवे वापरावेत.
व्होलेबीन यांची या पुस्तकातील लेखनशैली ही काहीशी युवाल नोव्हा हरारी या मानववंशशास्त्रज्ञ-लेखकाच्या लेखनशैलीशी मिळतीजुळती वाटते. तसेच हे पुस्तक व्होलेबीन यांच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या दोन पुस्तकांचे एकीकरण वाटते. पुस्तक प्रामुख्याने जर्मनी आणि मध्य युरोपातील जंगलांच्या अभ्यासावर आधारित आहे. इतर खंडांतील वने, पशू-पक्ष्यांबद्दल फारशी माहिती यात आढळत नाही, ही म्हटली तर त्रुटी आहेच. पुस्तकातील शेवटची काही प्रकरणे हवामान बदल, जंगलांना लागणारे वणवे आणि मानवी उत्क्रांती यांविषयी चर्चा करतात, मात्र ती फारशी जमून आलेली नाहीत. याचे कारण मजकुराचे अतिसुलभीकरण. त्यामुळे आपण निसर्गविज्ञानाबद्दलचे पुस्तक वाचतो आहोत की एखादी ललित कथा, हा प्रश्न पडतो. हे सुलभीकरण टाळता आले असते. तसेच शेवटच्या काही प्रकरणांतील व्होलेबीन यांची मते पचणे जरा अवघड आहे. उदा. ‘अवर रोल इन नेचर’ या प्रकरणाच्या सुरुवातीलाच ते म्हणतात, ‘निसर्गसंवर्धनाच्या आधुनिक पद्धती चुकीच्या आहेत.’ परंतु असे सरधोपट विधान करताना, त्या पद्धती का चुकीच्या आहेत यास मात्र काही आधार व्होलेबीन देत नाहीत. त्याच प्रकरणात पुढे ते म्हणतात की, ‘निसर्ग आणि संस्कृती यांना एकमेकांपासून वेगळे करता येत नाही.’ पण संस्कृती ही मुळात प्रवाही असते हे व्होलेबीन कसे विसरतात? पुढे ते म्हणतात की, ‘अंटार्टिकावर मानवाने जाऊच नये!’ पण विश्वाबद्दल मानवाला वाटणारे कुतूहल आणि त्या कुतूहलापोटी नवीन प्रदेश पादाक्रांत करण्याची मानवी ऊर्मी कशी दडपणार? या काही बाबी सोडल्यास, निसर्गातील कित्येक सजीवांच्या एकमेकांबरोबरच्या अदृश्य साखळीबद्दल विचार करण्यास हे पुस्तक नक्कीच उत्तेजन देते!
ajjukul007@gmail.com