प्रत्येक काळाचे काही शब्द असतात. उदाहरणार्थ, आपल्याकडील ‘गरीबी हटाव’ किंवा ‘अच्छे दिन’ यांसारखे शब्दप्रयोग. भारतीय राजकारणातील लोकानुरंजनवादाचा गेल्या चार दशकांचा प्रवास हे शब्दप्रयोग उलगडून दाखवतात. या शब्दप्रयोगांची निर्मिती आणि त्यांच्या जनमानसावरील प्रभावातून आपल्याला त्या काळाचे चित्र स्पष्ट होते. असेच काही शब्द गेल्या काही महिन्यांत जगभर प्रचलित झाले. हे शब्द आजचा काळाचे चरित्र घेऊन आले. त्यामुळेच ते सर्वतोमुखी झाले. अशा शब्दांपैकी एक म्हणजे, ‘ब्रेग्झिट’. ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या घटनेशी हा शब्द जोडलेला. गेले काही महिने या शब्दाने जगभरचे माध्यमविश्व तसेच सर्वसामान्यांवरही प्रभाव पाडला होता. ब्रिटनच्या स्पेलिंगमधील ‘बी’ आणि ‘आर’ ही अक्षरे व ‘एग्झिट’ हा शब्द यांच्या संयोगातून ‘ब्रेग्झिट’ या नव्या शब्दाची निर्मिती झाली. या नव्या शब्दाचा समावेश नुकताच ‘कॉलिन्स’च्या शब्दकोशात करण्यात आला आहे. २०१६ मध्ये नव्याने भर पडलेल्या शब्दांच्या यादीत ‘ब्रेग्झिट’ला ‘कॉलिन्स’ने पहिले स्थान दिले आहे. या शब्दकोशाच्या कर्त्यांच्या मते, ब्रेग्झिट या शब्दाचा वापर पहिल्यांदा २०१३ साली झाला. परंतु यंदा त्याचा वापर सुमारे साडेतीन हजार पटींनी वाढला.
असाच आणखी एक शब्दाचा कॉलिन्सने समावेश केला आहे, तो म्हणजे ‘ट्रम्पिझम’. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकांतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकंदर प्रचारात जे दिसले, त्यातून हा शब्द आला. ‘वादग्रस्त वक्तव्ये करून गदारोळ उडवणे’ किंवा ‘ट्रम्प यांच्या पावलावर पाऊल ठेवून आखलेली अतिराष्ट्रवादी धोरणे’ असा आशय या नव्या ‘ट्रम्पिझम’ या शब्दात दडलेला आहे, तो आता कॉलिन्स शब्दकोशानेही नोंदवला आहे. राजकीय नेत्यांच्या नावावर आधारित नव्या शब्दाच्या निर्मितीचे हे काही पहिले उदाहरण नाही. याआधीही असे शब्द प्रचलित झाले आहेत. ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या नावे रूढ असलेला, सरकारी सेवांच्या खासगीकरणाचा सपटा लावणारा ‘थॅचरिझम’ किंवा त्याच अर्थानं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन यांच्या नावावरून तयार झालेला ‘रिगॅनॉमिक्स’ हा शब्द ही काही उदाहरणे. राजकीय-आर्थिक घटनांच्या विश्लेषणात या शब्दांचा वापर होत असे. परंतु पुढे काळाच्या ओघात त्यांचा वापर कमी होऊ लागला. त्यामुळे ट्रम्पिझम या शब्दाचे भवितव्यही ट्रम्प यांच्या निवडणूक-यशावर अवलंबून असणार आहे.
कॉलिन्सच्या शब्दकोशात भर पडलेला आणखी एक शब्द म्हणजे – ‘ऊबरायझेशन’. उबर टॅक्सी व्यवसायातून या शब्दाची निर्मिती झाली. ‘सुविधा पुरविणारे आणि त्यांचा लाभ घेणारे यांच्यातील थेट संवादावर आधारलेले (कोणतेही) व्यवसाय’ या अर्थानं या शब्दाचा उपयोग गेल्या काही दिवसांपासून होऊ लागला. किंवा , आपलं मूल दिसामाशी वाढतानाचे अनुभव वारंवार ट्विटर-फेसबुकादि समाजमाध्यमांवर ‘शेअर’ करणाऱ्या पालकांमुळे पालकत्वाची जी नवीच तऱ्हा दिसते आहे, त्यासाठी ‘शेरेन्टिंग’ हा शब्द यंदाच रूढ झाला, त्यामुळे कॉलिन्सच्या शब्दकोशात त्याचा समावेश झाला आहे.