-प्रमोद मुनघाटे

गेल्याच महिन्याच्या वीस तारखेला मी नंदा खरेंना पुण्यात अखेरचा भेटलो. तब्येतीच्या देखभालीसाठी ते पुण्यात मुक्कामी असले तरी त्यांचे मन नागपुरात होते. दोन तास केवळ ते नागपूरच्या सामाजिक-राजकीय घडामोडीबद्दल बोलत होते. खरे-तारकुंडे कंपनीतून अभियंता म्हणून ते निवृत्त झाले होते आणि निवृत्तीनंतर त्यांच्या लेखनाला अधिक बहर आला होता. त्यांच्या कादंबऱ्या आणि वैचारिक व ललितपर लेखन सतत चर्चेत राहिले. राजकीय हुकुमशाही, आर्थिक भ्रष्टाचार आणि पर्यावरणाची नासाडी हे त्यांच्या सर्वच लेखनाचे मुख्य सूत्र होते. त्यांच्यासारखे नैतिक भूमिका घेऊन व्यवस्थेच्या विरोधात उभे राहणारे लेखक दुर्मीळ. म्हणूनच त्यांच्या ‘उद्या’ कादंबरीला जाहीर झालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांनी नाकारला होता.

Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
ग्रामविकासाची कहाणी

नंदा खरे हे पेशाने बांधकाम अभियंता असले तरी वृतीने कायम ‘सुधारक’ होते. नागपुरातील ‘आजचा सुधारक’ हे केवळ त्यांचे एक मासिक नव्हते, तर ती जीवननिष्ठा आणि चळवळ होती. त्यांच्या शिवाजीनगरातील घरी ‘माग्रस’च्या (माझा ग्रंथ संग्रह) ग्रंथचर्चा होत. तिथे लोक तावातावात एखाद्या पुस्तकावर चर्चा करत आणि बंगल्याचे मालक चहा-पाणी करत, असे ते दृश्य आजही आठवते. (या घराबद्दल आणि त्यांच्या एकूण स्वत:बद्दल खरेंच्या ‘ऐवजी’मध्ये बरेच वाचायला मिळते.)

हेही वाचा >> श्रीलंकेला प्रतीक्षा ‘नरसिंह रावांची’

नागपुरात राजन गवस किंवा संदेश भंडारे सारखे मित्र आले की खरेंच्या घरी जाण्याचे प्रसंग येत. बरेचदा त्यांच्या घरी तरुण मुला-मुलींचा जमघट दिसे आणि त्यांच्यात चर्चा सुरू असे. जगभरातील अनेक घटना-प्रसंग-साहित्यावर या चर्चा असत. मला आमच्या विद्यापीठीय चर्चासत्रांपेक्षा खरेंच्या बैठकीतील चर्चा अधिक अर्थपूर्ण वाटत. कारण त्यात औपचारिकता नसे. स्पर्धाही नसे. खरे आपल्या आवाजाचा टोन न बदलता कितीतरी घटनांचे संदर्भ देत. जुन्या इंग्रजी कथा-कादंबऱ्यांचे दाखले देऊन ते आपली मते मांडत.

अनुभवविश्व मोठेच…

नंदा खरे यांची पहिली भेट ‘आजचा सुधारक’मधूनच. पण त्यांचे मी वाचलेले पहिले पुस्तक म्हणजे ‘अंताजीची बखर’(१९९७). मला आवडायचे एक कारण म्हणजे, माझ्या पीएच. डी.चा विषय अठराशे सत्तावनवरील कादंबऱ्या हाच होता. ‘अंताजीची बखर’ ही सत्तावनच्या काळात सामान्य शिपाई नायक असलेली अफलातून कादंबरी आहे. अशा पद्धतीने इतिहास वाचता येतो आणि फिक्शन म्हणून का होईना इतिहास ‘रचता’ येतो, हे मराठीला नवीन होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर ‘बखर अंतकाळाची’ (२०१०) आली. इतरांना फक्त भूगोल असतो, मराठी माणसाला ‘इतिहास’ असतो; अशी एक दर्पोक्ती आहे. पण तो इतिहास आहे कसा? राजेरजवाड्यांची सत्ता, सनावळ्या, त्यांच्या लढाया, त्यांचीच बाहेरची प्रकरणं म्हणजेच इतिहास का? या काळात सामान्य लोक काय करत होते, कसे जगत होते? ते एका शिपुर्ड्याच्या तोंडून कथन करणाऱ्या या कादंबऱ्या आहेत. सामान्यांची भूक-पीडा, आणि वासनाविकारांनाही इतिहास असतो आणि त्यातूनच खरा गतकाळाचा परिचय होतो. अशी जाणीव देणाऱ्या या कादंबऱ्या आहेत.
आज धर्म, भाषा, नीती आणि लैंगिक आचारविचारांच्या क्षेत्रात ‘मूल्य’ राहिले नाही, बाजार झाला आहे; असे आपण म्हणत असताना तेंव्हा तरी मूल्य होते का? कुणाला मूल्य होते? कसे होते? बाजार तेंव्हा नव्हता का? व्यापार नव्हता का? अशा प्रश्नांची उत्तरे न विचारता मिळतात. त्यातून लेखकाची मूल्यांकडे पाहण्याची दृष्टी लक्षात येते. इतिहासाचे ‘विपरीत’ वाचन हा लेखक काही रंजनासाठी करत नाही, हे त्यांच्या इतर पुस्तकातून वाचायला मिळते. ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’, ‘संप्रति’, नांगरल्याविन भुई’ आणि ‘दगडावर दगड… विटेवर वीट’ या पुस्तकांमधून या लेखकाची जगण्याकडे पाहण्याचे तत्त्वज्ञान दिसते. हे तत्त्वज्ञान ‘स्वतःचे’ असे खास म्हणून उदात्तीकरण केलेले नसते. ते एकूणच ऐतिहासिक-भौतिकवादी दृष्टीतून विकसित (किंवा अधोगतीत) झाले आहे, अशा भूमिकेतून असते. त्यांच्या या भूमिकेची संदर्भचौकट आपला देश, आपला समाज-आपली संस्कृती अशी नसते. ती वैश्विकच असते. ते फक्त जैविक उत्क्रांतीचा विचार करीत नाही. तर वैचारिक-तात्त्विक आणि मूल्यात्मक उत्क्रांतीचा वेध घेऊ पाहतात. त्यासाठी अनुभवाच्या कक्षा वैश्विकच असाव्या लागतात असे नाही. ‘दगडावर दगड…विटेवर वीट’ या पुस्तकात लिहिलेल्या अत्यंत व्यक्तिगत अनुभवातूनही त्यांच्या ‘अनुभूतीच्या’ कक्षा किती विशाल आहेत, हे जाणवते.

हेही वाचा >> मिझोरममुळे केंद्र सरकार निर्वासितांबाबत मवाळ होणार?

सहज ज्ञान देणारे …

नंदा खरेंची ज्ञाताच्या कुंपणापलीकडे जाण्याची विजिगीषा व्यक्तिगत नव्हती. ते आपल्या सोबतच्या सर्वांचे हात हातात घेऊन जाऊ पाहात. म्हणूनच ‘कहाणी मानवप्राण्याची’ ‘वारूळ पुराण’ अशी पुस्तके त्यांनी लिहिली. ही त्यांची ‘कृती’! लेखकाला त्याची भूमिका हवी. तत्त्वज्ञान हवे असे ते प्रत्यक्ष सांगत नसले तरी त्यांची सगळी पुस्तके हेच सांगतात. साहित्य म्हणजे केवळ ‘काव्यशास्त्रविनोद’ अशी भूमिका बाळगणाऱ्या आणि सभोवतालच्या वास्तवाशी अस्पृश्यता बाळगणाऱ्या तथाकथित ‘रसिकतेला’ त्यांची पुस्तके प्रेमानेच थप्पड लगावतात. ही प्रेमाची थप्पड खात खात, बराचसा संयम ठेवून आपण त्यांची पुस्तके वाचत राहिलो, तरच त्यांच्या ‘उद्या’पर्यंत जाता येते.

हेही वाचा >> विश्लेषण: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना करोनाचा कितपत धोका? वयस्कर असल्याने जोखीमही वाढलीये का?

लेखकाची कोणतीही कृती ही राजकीयच असते, कारण त्याचे लेखन काही एकाएकी आकाशातून पडत नाही, असे खरेंना वाटे. त्यामुळेच त्यांची ही ‘कृती’ केवळ पुस्तकी कृती राहात नसे. ते प्रत्यक्ष कृतीत सहभागी होत. वर्तमान अघोषित आणीबाणीच्या विरोधात जे जे कोणी रस्त्यावर उतरतात आणि निषेध करतात, त्यांच्या बाजूने नंदा खरे उभे राहत. २०१५-१६ मध्ये आम्ही नागपुरात केलेल्या ‘दक्षिणायन’च्या अभियानाला त्यांचा मोठा आधार होता.
विषमता आणि अज्ञानाच्या विरोधात कृती करण्याची खरेंची शैली मात्र आणखी वेगळी होती. त्यासाठी त्यांनी ‘शिक्षण’ हे माध्यम निवडले होते. हे शिक्षण कधी औपचारिक तर कधी अनौपचारिक असे. आयुष्यभर अभियंता आणि कंत्राटदार म्हणून काम केलेल्या खरेंनी लेखन तर केलेच पण शाळेतल्या मुलांना विज्ञान शिकवत. भाषिक कौशल्यासोबतच पृथ्वी, खगोलशास्त्र आणि पर्यावरण काय असते ते सांगत.

हेही वाचा >> विश्लेषण : एका महिन्यात २० पेक्षा अधिक विमानांमध्ये तांत्रिक बिघाड; यामागे नेमके कारण काय आहे?

नंदा खरे ‘उद्या’ या कादंबरीत मनुष्याच्या तात्त्विक उत्क्रांतीचा कथात्मक शोध घेतात. युटोपिया किंवा डिस्टोपिया (याला खरे आणि त्यांच्या तरुण मित्रांनी स्वीकारलेले मराठी शब्द अनुक्रमे सुनस्थान आणि कुनस्थान) अशा पद्धतीने विचार न करता ‘उद्या’ ही कादंबरी खरे यांनी मांडलेला मानवाच्या मूल्यात्मक उत्क्रांतीचा पटच आहे. गुहेत राहणारा, शिकार करणारा माणूस सामाजिक-राजकीय व्यवस्था निर्माण करतो. पण पुढे त्या व्यवस्थेशीच संघर्ष करत करत सत्य-न्याय आणि स्वातंत्र्य या मूल्यांचे स्वप्न पाहतो. या प्रवासात मूळचा माणूस किती उरला आहे? प्राण्याहून वेगळे होण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा, ज्या व्यवस्थेचा आधार माणसाने घेतला, त्या व्यवस्थेच्या, त्या तंत्रज्ञानाच्या सापळ्यात तो स्वतःच अडकला का? हे काही प्रश्न आहेत. अनेक तत्त्वप्रणाली, अनेक राजकीय प्रणाली यांच्या दीर्घ प्रवासात लोकशाहीसारख्या व्यवस्थेत ‘स्वातंत्र्याचा’ शोध लागल्याचा मनुष्याचा आनंद क्षणिक ठरतो की काय, असे ‘उद्या’चे चित्र पाहताना वाटते. खरे यांना दिसणारे उद्याचे चित्र त्यांच्या अपेक्षेपेक्षा लवकरच नजरेच्या टप्प्यात येऊ घातले आहे की काय असे वाटते.

हेही वाचा >> विश्लेषण : अती मद्यसेवनाचे प्रमाण किती? वयोगटानुसार मद्याचा शरीरावर काय होतोय परिणाम?

जॉर्ज ऑर्वेलने ‘१९८४’ ही कादंबरी १९४८ मध्ये लिहिली होती. खरे यांनी ‘उद्या’ ही कादंबरी सद्यकाळात लिहिली आहे. ऑर्वेलच्या कादंबरीतील वास्तव प्रत्यक्षात यायला जितका काळ लागला, त्यापेक्षा खरेंच्या कल्पनेतील ‘उद्या’ प्रत्यक्षात येण्याचा वेग कितीतरी पट अधिक आहे. कारण ज्या वेगाने माणसाची ‘माहिती’ त्याच्या सांकेतिक क्रमांकात आणण्याचे तंत्रज्ञान प्रगत होत आहे, त्या वेगाने लोकशाही, न्याय, समता आणि स्वातंत्र्य या गोष्टी इतिहासजमा होत आहेत, असा या कादंबरीचा विषय आहे. अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनीच्या राडारवर गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगलातील आदिवासींना आणण्याची घाई आता कोण्या एका राजकीय सत्तेला करावी लागत नाही. ते कुणाच्या हातातच उरले नाही. माणसाने आपला विवेक आणि नीती अशा यांत्रिक-अतिमानवी हातात कधीच सोपवले आहे, की उद्याची फार वाट पहावी लागणार नाही. आजची रात्रच काळरात्र आहे की काय असे वाटावे अशी स्थिती आहे. ‘उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ असे आपण एकमेकांचे हात हातात घेऊन पुढे येणे, एवढेच आपल्या हाती आहे. हाच संदेश फार न बोलता नंदा खरे आपल्याला आज देऊ पाहतात.
नंदा खरेना आदरांजली.