उद्या, ९ नोव्हेंबरला बर्लिन भिंत पाडायला सुरुवात केल्याच्या घटनेला २५ वर्षे पूर्ण होतील. त्यानिमित्ताने बर्लिनमध्ये वेगवेगळ्या सफरी, व्याख्याने, चित्रपटांचे खेळ असे बरेच कार्यक्रम होत आहेत. याच आठवडय़ात ब्रिटिश कादंबरीकार केन फॉलेट यांची ‘हॅपी कोइन्सिडन्स’ ही कादंबरी जर्मनीत प्रकाशित झाली असून ती लोकप्रिय ठरली आहे. शीतयुद्धाच्या पाश्र्वभूमीवर घडणाऱ्या या कादंबरीमध्ये बर्लिन भिंतीच्या कोसळण्याचा बराच इतिहास आहे. सत्यकथा, फोटोंतून उलगडणारा इतिहास आणि ग्राफिक नॉव्हेल अशी वैशिष्टय़ं असणारी ही कादंबरी सध्या चर्चेचा विषय झाली आहे. त्यानिमित्ताने बर्लिन भिंतीला मध्यवर्ती ठेवून लिहिलेल्या इतर काही कादंबऱ्यांची संक्षिप्त ओळख करून घेणं रोचक ठरेल.
प्रसिद्ध ब्रिटिश गुप्तचर कादंबरीकार जॉन ले कॅरे यांच्या ‘द स्पाय हू केम इन फ्रॉम द कोल्ड’ या १९६३ साली प्रकाशित झालेल्या कादंबरीला त्या वर्षीचा ‘बेस्ट क्राइम नॉव्हेल’ हा पुरस्कार मिळाला, तसेच १९६५ साली या कादंबरीवर चित्रपटही आला- ज्यात रिचर्ड बर्टन यांनी नायकाची भूमिका केली आहे. शीतयुद्धाच्या भराचा काळ. पूर्व-पश्चिम जर्मनीच्या मध्ये बर्लिन भिंत उभी आहे. अशा वेळी ब्रिटिश गुप्तचर अलेक लीमास काही गोपनीय माहिती मिळविण्यासाठी पूर्व जर्मनीत येतो; पण त्याची ही पहिली मोहीम फसते. त्याचे सहकारी मारले जातात; पण त्याला पुन्हा दुसऱ्या कामगिरीवर बर्लिनमध्येच पाठवलं जातं. तिथे त्याला जर्मन गुप्तचर पकडतात. एका अधिकाऱ्याला आपला वरिष्ठ हा ब्रिटिशांचा एजंट आहे, हे त्याच्याकडून सिद्ध करून घ्यायचं असतं, तर दुसऱ्याला ब्रिटिशांची गुप्तचर यंत्रणेतील काही महत्त्वाची माहिती हवी असते. कॅरे यांची विलक्षण हातोटी, गुंतागुंतीचं कथानक आणि रहस्यमयता यांनी भरलेली ही कादंबरी खूप खपली आणि वाचलीही गेली आहे.
ब्रिटिश कादंबरीकार लेन डेग्टन यांची ‘बर्लिन गेम’ ही गुप्तचर कादंबरी ‘गेम’ आणि ‘सेट अ‍ॅण्ड मॅच’ या त्रि-कादंबरीधारेतली पहिली कादंबरी १९८३ साली प्रकाशित झाली. पूर्व जर्मनीतील एका ब्रिटिश गुप्तचर एजंटला पश्चिम जर्मनीत जायचं असतं. त्याला मदत करण्यासाठी नायक बर्नार्ड सॅम्पसनची नेमणूक केली जाते. खरं तर तो पाच वर्षांपूर्वीच नोकरीतून निवृत्त झालेला असतो; पण ही कामगिरी त्याच्यावर सोपवली जाते. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की, कुणी तरी त्याच्या मागावर आहे. तो त्याचा शोध घेतो आणि शेवटी ठरल्याप्रमाणे आपली कामगिरी फत्ते करतो.
‘द डे बिफोर द बर्लिन वॉल- कुड वुइ हॅव स्टॉप्ड इट?’ (२०१०) या अमेरिकन कादंबरीकार थॉमस एन्रिच एडवर्ड हिल यांच्या लांबलचक शीर्षकाच्या कादंबरीला ‘अ‍ॅन अल्टरनेटिव्ह हिस्ट्री ऑफ कोल्ड वार एस्पिओनेज’ असं उपशीर्षकही आहे. ही कादंबरी दंतकथेवर आधारित आहे आणि अर्थात गुप्तचरही.
बर्लिन भिंत पडत असताना अमेरिकेला कसा दोष दिला जातो, असं  कथानक असलेली अमेरिकन कादंबरीकार जॉन मार्क्‍स यांची ‘द वॉल’ (१९९९) हीसुद्धा गुप्तचर कादंबरीच आहे.
‘वेस्ट ऑफ द वॉल’ (२००८) ही कादंबरी उत्तर अमेरिकेत ‘टड्रीज प्रॉमिस’ या नावानं प्रकाशित झाली आहे. भिंतीमुळे नवऱ्यापासून ताटातूट झालेल्या बायकोची आणि तिच्या मुलाची ही गोष्ट आहे. (कादंबरीकार मार्सिया प्रिस्टन हेही अमेरिकनच.)
पीटर श्नायडर ( रूँल्ली्रीि१) यांची १९८२ साली मूळ ‘ऊी१ टं४ी१२स्र्१्रल्लॠी१’ या नावाने जर्मनमध्ये आणि १९८४ साली ‘द वॉल जम्पर’ या नावाने इंग्रजीत अनुवादित झालेल्या या कादंबरीतली मध्यवर्ती व्यक्तिरेखाच बर्लिन भिंत आहे. शारीरिक विभागणीपेक्षा मानसिक पातळीवरील फरकांना अधोरेखित करणारी ही कादंबरी भिंत ओलांडून जाणाऱ्या अनेकांच्या कहाण्या सांगते.
जर्मन कादंबरीकार थॉमस ब्रुसेग यांची ‘हेल्डन वीइ वुइर’ ही कादंबरी जर्मनीत १९९५ साली प्रकाशित झाली. तिचा इंग्रजी अनुवाद ‘हीरोज लाइक अस’ या नावानं १९९७ साली प्रकाशित झाला. पूर्णपणे राजकीय असलेली ही कादंबरी तिच्यातील उपहासात्मक शैलीमुळे वाखाणली गेली. या कादंबरीचा न-नायक हा नोबेल पारितोषिकापासून वंचित राहिलेला लेखक असतो. यातून दुसरं महायुद्ध, शीतयुद्ध आणि बर्लिन भिंत पाडण्याचं कारस्थान यांच्यातील धागेदोरे स्पष्ट केले आहेत. पूर्व जर्मनीतील कम्युनिझमचा पाडाव रेखाटणारी ही कादंबरी समीक्षकांनी गौरवली आहे.
‘फ्रेया ऑन द वॉल’ (१९९७) ही जर्मन कादंबरीकार टी. डिजेन्स यांची कादंबरी वैयक्तिक आणि राजकीय इतिहासाची तपासणी करते. मोठय़ा प्रमाणावर प्रतीकात्मकता असलेल्या या कादंबरीची नायिका एक किशोरवयीन मुलगी असून तिचे नातेवाईक पूर्व-पश्चिम जर्मनीत असतात. बर्लिनची भिंत कोसळायच्या आधीची ही कादंबरी त्या वेळची सारी गुंतागुंत उलगडून दाखवते.
‘स्लम्बरलॅण्ड’ ही आफ्रिकन-अमेरिकन कादंबरीकार पॉल बिटी यांची कादंबरी २००८ साली प्रकाशित झाली. क्रूर, अवडंबरपूर्ण आणि तरीही उल्हसित करणारी ही कादंबरी आहे. डी जे डार्की हा या कादंबरीचा नायक जॅझचा बादशहा चार्ल्स स्टोनचा शोध घेत बर्लिनला येतो. जिथे एक गोरी बाई हद्दपार केलेल्या काळ्या आणि आफ्रिकन कामगारांना राबवून घेत असते. काळ्यांच्या ओळखीचा शोध घेणारी ही कादंबरी बर्लिन भिंतीच्या साक्षीनं घडते.
‘स्टासीलॅण्ड’ या ऑस्ट्रेलियन कादंबरीकार अ‍ॅना फंडर यांच्या कादंबरीचं ‘स्टोरीज फ्रॉम बिहाइंड द बर्लिन वॉल’ असं उपशीर्षक असून ती ग्रँटा मासिकाच्या प्रकाशन विभागानं २०११ साली प्रकाशित केली. पूर्व जर्मनीतील गुप्त पोलिसांना स्टासी म्हणत. अ‍ॅना यांनी वर्तमानपत्रात रीतसर जाहिरात देऊन गुप्त पोलीस म्हणून काम करणाऱ्या अनेकांच्या मुलाखती घेतल्या. त्याआधारे हिटलर आणि स्टॅलिन यांच्या एकाधिकारशाहीचं चित्र त्यांनी या कादंबरीत मांडलं आहे. जॉर्ज ऑर्वेल यांच्या ‘नाइन्टीन एटी फोर’ या कादंबरीशी ‘स्टासीलॅण्ड’ची तुलना समीक्षकांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Berlin wall novels
First published on: 08-11-2014 at 12:29 IST