‘भारत आणि रत्न’ हा अग्रलेख (१८ नोव्हेंबर) आणि लगेच दुसऱ्या दिवशी दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया (लोकमानस, १९ नोव्हेंबर) हे अपेक्षितच होते. किंबहुना लोकसत्ताचा हा गेल्या काही वर्षांतला ट्रेंडच बनला आहे. मुळात ‘भारतरत्न’ या सन्मानाच्या नावातच आहे की ही भारतातील रत्ने आहेत. हिराही रत्न असते आणि पुष्कराजही रत्न असते. प्रत्येक रत्न आपापल्या जागी श्रेष्ठ असते आणि त्यांची तुलना करणे वेडगळपणाचे ठरते. या भारतातील रत्नांबद्दलही हाच निकष लावता येईल. त्यामुळे खेळाच्या मदानावरची तपश्चर्या थिल्लर आणि प्रयोगशाळेतली थोर असा विचार करणे योग्य नाही. यामुळे तेंडुलकरचा उल्लेख क्रिकेटमधले राव करणे किंवा प्रा. रावांना रसायनशास्त्रातले तेंडुलकर म्हटल्याने कोणाचाच अपमान होत नाही. जसे ६० विद्यापीठांतली मानद डॉक्टरेट, १५०० शोधनिबंध आणि ४५ पुस्तके हे काम पर्वताएवढे आहे तसेच २०० कसोटी, ४६३ मर्यादित षटकांचे सामने, १०० शतके, ३६ हजारांवर धावा, जगातल्या ५९ मदानांवर टेस्ट क्रिकेट खेळणे हेही पर्वताएवढेच आहे. हिमालय त्याच्या जागी असतो तर आल्प्स त्याच्या जागी. दोघांचे सृष्टीसौंदर्य वेगळे तसेच दोघांची वारी करणारे गिर्यारोहक वेगळे, त्यांच्या अडचणी वेगळ्या म्हणूनच यात तुलना करू नये.
‘आयुष्यभराच्या तपश्चय्रेचा आणि इतरांचे आयुष्य उंचावण्याच्या साधनेचा सन्मान ‘भारतरत्न’ या उपाधीने करायचा असतो’ हे अग्रलेखातील वाक्य पटले; पण ‘सचिनोन्माद’ असू शकतो तसा ‘रावोन्माद’ होऊ शकणार नाही. कारण दोघांची कार्यक्षेत्रे सर्वस्वी भिन्न आहेत.  ‘सचिनोन्मादाने’ आयुष्य उंचावायला कदाचित प्रत्यक्ष मदत झाली नसेल (ज्याला ‘टँजिबल बेनिफिटस्’ म्हणू) पण अप्रत्यक्षपणे लाखो, कोटय़वधी लोकांच्या मनात त्याच्या खेळीने ‘आनंदाचे मळे’ तर फुलवलेच पण ‘आपण हे करू शकतो’ हा आत्मविश्वास निर्माण केला ज्याची फुटपट्टीने मोजणी करता येणार नाही. हेच परिमाण आधीच्या काही भारतरत्नांबद्दल वापरता येईल पण दुर्दैवाने तेव्हा कोणी  ‘रविशंकरोन्माद’, ‘बिस्मिलोन्माद’, ‘भीमसेनोन्माद’, किंवा ‘लतोन्माद’ म्हटले नाही.
भारतरत्न हा एक सन्मान आहे आणि तो वागवण्याचा भार नाही. एखाद्या परदेशी उत्पादनाची जाहिरात जर सचिन तेंडुलकरने  केली तर जोपर्यंत ते उत्पादन देशविघातक नसेल, त्यात भारतरत्न उपाधीचा संबंध यायची गरज नाही. तसेच, सचिन तेंडुलकरने सट्टेबाजी आणि भ्रष्टाचार रोखण्याकरिता काय करायला पाहिजे होते, हेही अग्रलेखात दिले असते तर बरे झाले असते. त्याने स्वत: कधी खेळाशी प्रतारणा केली नाही आणि अगदी शेवटच्या क्षणीही आपल्या सहकाऱ्यांच्या मनावर हेच िबबवले. कदाचित त्याने कराचीला जाऊन दाऊद, छोटा शकील किंवा छोटा राजनबरोबर, ‘भारतातील क्रिकेटमधील सट्टेबाजी कशी थांबवता येईल’ यावर बठका घेतल्या नसतील. बहुसंख्य देशात ‘बेटिंग’ हे अधिकृत असते आणि लोक कर भरून मनसोक्त बेटिंगची ‘मजा’ घेतात पण आपल्या देशात ते नाही. त्यामुळे अनधिकृतपणे (आणि राजकारण्यांच्या आश्रयाने) चालते ते थांबवायला तेंडुलकर काय करणार?
सलग २४ वष्रे कोणत्याही वादविवादात न पडता आपली तपश्चर्या चालू ठेवणे ही साधी गोष्ट नाही. मला माहीत आहे काही लोक फेरारीच्या करमाफीचा विषय काढतील, पण अशा चुका काढायच्या तर प्रा. रावांच्याही काढता येतील डिसेंबर २०११ च्या ‘अ‍ॅडव्हान्सड् मटेरियल्स’च्या जर्नलमधल्या शोधनिबंधात दुसऱ्या संशोधकाचे लिखाण वापरल्याचा आरोप झाला होता. हा भाग त्यांच्या विद्यार्थ्यांने लिहिला होता म्हणून ही गफलत झाली होती. थोडक्यात एवढय़ा देदीप्यमान कारकिर्दीत चुका होऊ शकतात.
सरकारने भारतरत्नच काय पद्म पुरस्कारांसाठीही निकष जाहीर करावेत हे मात्र खरे! कदाचित यूके, ऑस्ट्रेलियासारख्या देशांत इमिग्रेशनकरिता ‘पॉइंट्स’ असतात तसे पात्रता निकषाकरिता प्रत्येक विभागाकरिता गुणांक द्यावेत जेणेकरून कोणाला पंतप्रधानांच्या कविता गाऊन पद्मश्री मिळायला नको आणि चाळीस चाळीस वष्रे ‘ओंकार स्वरूपाचे’ ध्यान करून अथवा ‘लागली कुणाची उचकी’ म्हणत वादविवादात पडायला नको.
– निमिष वा. पाटगांवकर, विलेपाल्रे (पूर्व)

वैचारिक गुलामगिरी संपेल, तर!
राष्ट्रकुल संघटनेला मूठमाती द्यायला हवी, ही ‘चोगमचोथा’ या अग्रलेखात (१९ नोव्हेंबर) व्यक्त केलेली अपेक्षा योग्य असली तरी आपली बौद्धिक व वैचारिक गुलामगिरी संपेपर्यंत ते अशक्यच आहे. १९९७ साली आपल्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जात असताना आपल्या तत्कालीन सरकारने ब्रिटनच्या राणीला भारतात बोलावले होते. आपल्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी ब्रिटनची राणी कशाला? पारतंत्र्याच्या, गुलामगिरीच्या आठवणींना उजाळा द्यायला?  एवढेच नाही तर, त्यानिमित्ताने जो एक सरकारी समारंभ (अर्थातच भारत सरकारने ) आयोजित केला होता, त्या  कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत पहिले नाव  ब्रिटनच्या राणीचे व त्यानंतर आपल्या राष्ट्रपतींचे होते. एकाही राजकीय पक्षाने या दोन्ही गोष्टींना आक्षेप घेतल्याचे स्मरत नाही; अगदी भाजपनेसुद्धा.
ज्यांनी या दोन्हींच्या विरोधात निदर्शने केली, त्यांच्यावर ब्रिटिश सरकारला शोभेल  असा लाठीमार भारत सरकारने केला. ‘तुमचे राज्य आमच्यावर अजून कायम आहे ’, हे भारत सरकारने ब्रिटनच्या राणीला दाखवून दिले. राणीचा देश हल्ली जरी हातात वाडगा घेऊन उभा असला तरी आपल्याला असलेले त्यांच्याविषयीचे (खरे तर सर्वच गोऱ्या लोकांविषयीचे) कौतुक, प्रेमादर अबाधित आहे. या कारणास्तव आपण अजूनही बौद्धिक व वैचारिकदृष्टय़ा राष्ट्रकुलाचेच सदस्य आहोत, हे कटू वास्तव आहे.  
केदार अरुण केळकर, दहिसर (प.)

तळपायाची आग मस्तकात जाणारच; पण..  
‘भारत आणि रत्न’ या अग्रलेखात  परखड विचार मांडल्याबद्दल भावनांच्या आहारी जाऊन शिव्यांची लाखोली वाहणारे तर अनेक असतील. परंतु यातील एकही मुद्दा कोणीही सचिनप्रेमी स्वीकारणार नाही आणि बौद्धिक पातळीवर खोडूनही काढू शकणार नाही. कारण अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे आपला देश हा बुद्धी गहाण टाकून लोकप्रियतेच्या मागे वाहवणाऱ्यांचा आहे.
अशाच भावनाप्रधान लोकांनी निवडून दिलेले राजकारणी त्यांच्या भावनांना जोजवत आपली सत्ता भक्कम करण्याचा धंदा करत असतात, हे या लोकांना कधी कळतच नाही. या टीकाकारांची एक खोड म्हणजे एखाद्या आक्षेपाबाबत निषेध नोंदविताना तो आक्षेप कसा चुकीचा आहे हे न सांगता (कारण कोणत्याही बौद्धिक कसोटय़ांवर तसे करणे शक्य नसते) तोच आक्षेपार्ह प्रकार ‘इतर’ कसे करतात हे सांगणे. पण त्या ‘इतरांना’ कोणी भारतरत्न देऊन त्यांचा गौरव करीत नाही.
आणि क्रिकेटमधील भ्रष्टाचार आणि सट्टेबाजी थोपविण्याची ताकद म्हणाल तर सचिनएवढी ती कोणाजवळ नाही. कारण तो क्रिकेटचा देवच आहे ना? देवाएवढा पॉवरफुल दुसरा कोण असू शकतो? त्याने क्रिकेटमधील भ्रष्टाचार आणि सट्टेबाजीविरुद्ध निषेधाचा किमान एक शब्द जरी उच्चारला असता तरी खरे सचिनभक्त आणि क्रिकेटप्रेमी सट्टेबाजीपासून लांबच राहिले असते. भ्रष्टाचाराचा प्रश्नच निकालात निघाला असता. एवढी साधी गोष्ट करणे त्याच्या विश्वविक्रमांच्या आड नक्कीच आले नसते. अशी मते मांडली की कोटय़वधी क्रिकेटप्रेमींच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि मस्तकात तर बुद्धीपेक्षा भावनांचा कल्लोळ!
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स आणि बीसीसीआय या ( प्रा. सीएनआर राव आणि सचिन यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या) संस्थांची अग्रलेखात केलेली तुलनाही उल्लेखनीय आणि विचार करायला लावणारी आहे.
भारतरत्नच्या निकषांबाबत मांडलेला मुद्दाही योग्यच आहे आणि आंबेडकर, सरदार पटेल यांना भारतरत्न मिळण्यास लागलेला दीर्घकाळ; परंतु एमजीआर आणि आता सचिन यांना भारतरत्न देण्यातली तत्परता यांच्याबद्दलचा उल्लेखही बरेच काही सांगून जातो. असा सर्वार्थाने परिपूर्ण आणि डोळे उघडणारा अग्रलेख, संपादकीय लिखाणाचा एक उत्कृष्ट नमुना ठरावा. पण झोपेचे सोंग घेणाऱ्या भाबडय़ा भावुकांना हे कसे कळावे?
सचिनला भारतरत्न तर मिळालेच आहे. आताचे राजकारणी दिलेल्या पदव्या परत मागण्याएवढे निर्ढावलेले असतात; या पाश्र्वभूमीवर हे पद टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक ती प्रगल्भता पुढच्या वर्षांच्या आयुष्यात सचिनला मिळो!
मुकुंद जोगळेकर

वैज्ञानिकांचे प्रमाण अडीच टक्के
भारतरत्न सन्मानाने फारसे हुरळून न जाता विज्ञान क्षेत्राकडे आजवर दाखवल्या गेलेल्या उदासीनतेवर प्रा. चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांनी ओढलेले ताशेरे बोध घेण्यासारखे आहेत, यात तिळमात्र शंका नाही. विज्ञानक्षेत्राला तुटपुंजे (जेमतेम एक टक्का) अनुदान मिळूनही याक्षेत्रात उपयुक्त व दर्जेदार कार्य करणाऱ्यांना या सन्मानातही डावलण्याची परंपरा आपल्याकडे आहे, हे आजवर भारतरत्न किताब प्राप्त झालेल्यांच्या नामावलीवर नजर टाकल्यास लक्षात येते.
आजपर्यंत एकूण ४३ व्यक्ती भारतरत्न ठरल्या, त्यात माजी पंतप्रधान आणि माजी राष्ट्रपती यांचे प्रमाण प्रत्येकी १४ टक्के (म्हणजे एकंदर २८ टक्के) असून अन्य राजकारणी व स्वातंत्र्यपूर्व काळातील जननेते यांना हा सर्वोच्च किताब मिळण्याचे प्रमाण प्रत्येकी तितकेच आहे! समाजसुधारकांची संख्या फक्त दोन (पाच टक्क्यांहून कमी) आहे. भारत रत्न मिळाल्याच्या नामावलीत विज्ञान, तंत्रशास्त्रज्ञ यांचे प्रमाण अडीच टक्क्यांहून कमी आढळते. डॉ. अब्दुल कलम यांना भारतरत्न मिळाले, पण तेही त्याची राष्ट्रपतीपदाची कारकीर्द संपल्यावर!
डॉ. श्रीकांत परळकर, दादर

अपयश झाकण्यासाठी!
सचिन तेंडुलकरला भारत रत्न पुरस्कार देण्यात येणार, हे काही महिन्यांपूर्वी त्या पुरस्काराचे निकष बदलण्यात आले त्याच वेळी स्पष्ट झालेले होते. योग्य राजकीय टायिमगची वाट पहिली जात होती आणि या पेक्षा जास्त योग्य टायिमग असू शकत नाही याची खात्री झाली, म्हणूनच बहुधा सहयोगी पक्षांशी चर्चा न करता, केंद्रीय मंत्रिमंडळाला देखील विश्वासात न घेता हा पुरस्कार पंतप्रधान कार्यालयाने (सोनियाजी,राहुल गांधी यांच्या परवानगीने) घोषित केला.  मदानावरील सचिनच्या टायिमगइतकेच हे टायिमग अचूक होते. केंद्रातील यूपीए सरकार त्याच्या कारकीर्दीतील कुप्रसिद्धीच्या ‘सर्वोच्च शिखरावर’ आहे. अशा वेळी सचिनच्या प्रसिद्धीचा वापर करून आपलं अपयश झाकण्याचा हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे.
उमेश मुंडले,  वसई.

एक लाख कोटी रुपयांची ‘अधिकृत चोरी’?
रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार (लोकसत्ता, १८ नोव्हेंबर) गेल्या १३ वर्षांत एक लाख कोटी रुपये पाण्यात गेले! यापकी ९५ टक्के प्रमाण मोठय़ा कर्जदारांचे आहे.
हे मोठे कर्जदार कोण? अचानक आलेल्या विपन्नावस्थेमुळे कर्जफेड करू न शकणारे की कायदा आणि नियम हवे तसे वाकवण्याची सत्तेची ताकद असल्याने जाणीवपूर्वक बुडवणारे? राजकीय वजन वापरून मंजूर झालेले कर्ज वसूल तरी कसे होईल? कोणत्याही कारणाने कर्ज बुडाले तर ठेवीदारांचेच नुकसान होते. या सर्वाचा विचार करून कर्ज बुडाले की ‘अधिकृत चोरी’ झाली हे तपासले पाहिजे.
– भाग्येश लक्ष्मण जावळे, इंदापूर.