माझं शरीर, माझं मन, असं आपण म्हणतो म्हणजेच शरीर आणि मन माझं असलं तरी त्यापलीकडेही मी आहेच, हे आपणही जाणतो, असं ज्ञानेंद्र म्हणाला.
हृदयेंद्र – अगदी बरोबर.. फरक इतकाच की दृश्य जग आपल्याला खरं वाटतं आणि शरीर आणि मनाशिवाय या जगात आपण वावरण्याची कल्पनाच करू शकत नाही. त्यामुळे या दोन्हींशिवाय आपल्याला अस्तित्वच नाही, असं आपण पक्कं मानतो. मग हे शरीर म्हणजेच मी, तर माझ्याबरोबर मृत्यूनंतरही ते का येत नाही? ते तर इथेच जाळलं किंवा पुरलं जातं.. जर मन म्हणजेच मी तर तेही प्रत्येक जन्मी सोबत का करीत नाही?
कर्मेद्र – पण या जन्मीही तर मला शरीर आहे, मन आहे..
हृदयेंद्र – हो पण शरीर तर नवं आहे.. मनाची गोष्ट आणखीनच गुंतागुंतीची आहे. मन म्हणजे काय, हे सांगता येत नाही, पण स्मृतीशिवाय मन जगत नाही. जन्मभर स्मृतींचे संस्कार मनावर होत असतात आणि त्या स्मृतींमधून शिकत मन व्यवहार करीत असतं. जन्माबरोबरच त्या जन्माच्या स्मृतीही संपतात आणि दुसऱ्या जन्मी जणू नवं मन माझ्याबरोबर जन्मतं. मनाची घडण, वासनात्मक रूप तेच असतं, पण त्यात गतजन्मीच्या स्मृती नसतात. गेल्या जन्मी माझ्या मनाचं दु:खं नेमकं काय होतं, मनाला नेमकी ओढ कशाची होती, मन नेमकं कशात गुंतलं होतं, हे काही आठवत नाही.. पण मनाचा हा स्वभावधर्म या जन्मीही तसाच असतो आणि म्हणून या जन्मीचं सुख-दु:खंच मला माझं एकमात्र सुख-दु:खं वाटतं, या जन्मीची ओढच मला खरी एकमात्र ओढ वाटते.. तरीही थोडा खोलवर विचार केला तर जाणवेल शरीर आणि मनापेक्षाही मी वेगळा आहेच. तसं नसतं, मनच जर मी असतो, तर मन खचतं तेव्हा ते माझं मीच सावरूही शकलो नसतो! एखादा मानसिक आघात होतो, तेव्हा कितीही बाह्य़ उपचार केले तरी जोवर तुम्हीच मन खंबीर करीत नाही तोवर तो आघात पचवता येत नाही की त्यातून बाहेर पडता येत नाही. याचाच अर्थ मनापेक्षाही तुम्ही वेगळे असता. माझ्याच मनाला ताब्यात आणणारा, वळण लावणारा, धीर देणारा, सावरणारा ‘मी’ त्या मनाहून वेगळा नसतो का?
ज्ञानेंद्र – फार सुंदर.. हृदू मनापेक्षा आपण वेगळे कसे आहोत, हे तू फार छान सांगितलंस. फक्त तुझ्या सांगण्याचा जो पूर्वार्ध आहे ना? ज्यात पुनर्जन्म गृहित धरला आहे, तो प्रत्येकालाच पटेल असा नाही..
हृदयेंद्र – पण पुनर्जन्म नाही का?
ज्ञानेंद्र – मी तो आहे किंवा नाही, असं विधान करीत नाही. माझं म्हणणं इतकंच की तो आहेच, असं गृहित धरून तू युक्तिवाद केला आहेस.. मी गेला जन्म जाणत नाही की पुढचा जन्मही जाणत नाही. हा जन्म जाणतो. तो माझ्या अनुभवाचा आहे. त्यामुळे या जन्मापुरतंच बोललं पाहिजे, असं मला वाटतं.
योगेंद्र – काही धर्म आणि पंथ तर पुनर्जन्म मानत नाहीत. हाच एकमेव जन्म आहे, असं ते सांगतात..
हृदयेंद्र – आता पुनर्जन्म सोडा, बौद्ध धर्म वगळता ईश्वर तर सर्वच धर्माना मान्य आहे.. (योगेंद्र होकार भरतो) तो दयाळू आहे, हेही मान्य आहे.. (ज्ञानेंद्रही होकारार्थी मान हलवतो) मग जर ईश्वर दयाळू आहे, तर मग अवघ्या एका जन्माची संधी असताना तो एकाला गरीब तर दुसऱ्याला श्रीमंत, एकाला धडधाकट तर दुसऱ्याला अपंग का बनवतो? एखाद्याचं आयुष्य यशानं भरलेलं तर एखाद्याचं कष्ट आणि दु:खानं का भरलं असतं? तेव्हा पुनर्जन्माचा सिद्धांत मानावाच लागतो. माझ्या कर्माचीच फळं मी कधी सुखाच्या, यशाच्या रुपात भोगतो तर माझ्याच कर्माची फळं मी कधी दु:खाच्या, अपयशाच्या रुपात भोगतो..
योगेंद्र – तरीही पुनर्जन्माचा सिद्धांत सर्वमान्य का नाही?
हृदयेंद्र – हिंदू धर्म काय शिकवतो? तुमच्या वाटय़ाला आलेली दु:खं ही गतजन्मातील तुमच्या कृत्यांचं फळ आहे, आता पुढला जन्म चांगला हवा असेल तर या जन्मी तरी चांगलीच कृत्यं करा! म्हणजेच विपरीत परिस्थितीतही माणसाच्या मनाला सत्कृत्याचंच वळण लागतं. आता पुनर्जन्म नाही, हे सांगण्यामागेही एक मोठी सकारात्मक बाजू आहे! ती अशी, हा एकच जन्म आहे, नंतर फैसला आहे! तेव्हा सावधानतेनं जगा, सदाचरणीच व्हा, हीच शिकवण त्यातून ठसते.. ती शिकवण जरी लक्षात ठेवली तरी शरीर आणि मनाच्या आसक्तीपलीकडे माणूस जाईल. कारण ही आसक्तीच तर त्याला वाईटाकडे नेत असते!
चैतन्य प्रेम
संग्रहित लेख, दिनांक 28th Apr 2015 रोजी प्रकाशित
८२. मौनाभ्यास -३ / शरीर आणि मनापलीकडे..
माझं शरीर, माझं मन, असं आपण म्हणतो म्हणजेच शरीर आणि मन माझं असलं तरी त्यापलीकडेही मी आहेच, हे आपणही जाणतो, असं ज्ञानेंद्र म्हणाला.
First published on: 28-04-2015 at 02:45 IST
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Body and beyond the mind