नायजेरियातील ‘बोको हराम’  या कडव्या इस्लामवादी संघटनेने धुमाकूळ घातला असून आता तर २५० हून अधिक मुलींना पळवून त्यांना विकून टाकण्याचा या संघटनेचा डाव आहे. ज्वालामुखीच्या तोंडावरील नायजेरियाचे हे दर्शन चिंतित करणारे असल्याने बराक ओबामा यांनी आता या मुलींच्या सुटकेसाठी लष्करामार्फत प्रयत्न सुरू केले. पण यामुळे तेथे हिंसाचार वाढून परिस्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता प्रगतीची हमी देतेच असे नाही. पश्चिम आशियाच्या वाळवंटातील वा अमेरिका खंडातील व्हेनेझुएलासारखे अनेक तेलसंपन्न देश या विधानाची खात्री देतील. जगाने ज्याच्या आधारे आपली भौगोलिक प्रगती साधली ते खनिज तेल या आणि अशा देशांच्या मातीत सापडले. परंतु म्हणून त्या देशातील जनतेचे काही भले झाले असे नाही. या तुलनेत अमेरिका वा कॅनडा वा युरोपातील अनेक देशांत अशी नैसर्गिक साधनसंपत्तीची श्रीमंती नाही. परंतु ते प्रगती करू शकले. याचे साधे कारण म्हणजे व्यवस्था. या देशांनी मानवी प्रेरणांना वाट करून देतील अशा संधी उपलब्ध केल्या आणि त्या सर्वाना उपलब्ध होईल अशी व्यवस्था केली. याचा परिणाम असा की या देशांतून टोकाच्या वा अतिरेकी भावभावनांना हात घालेल अशा व्यक्ती वा संस्था निपजल्या नाहीत. प. आशिया वा अन्य साधनसंपत्ती श्रीमंत देशांत असे झाले नाही. संपत्ती आहे. परंतु तिचे समान वाटप नाही आणि मूठभरांचीच तिच्यावर मालकी. यामुळे या प्रदेशांतून मोठय़ा प्रमाणावर असंतोष खदखदत राहिला आणि त्याचेच पर्यवसान पुढे हिंसक उद्रेकात होत राहिले. काही काळाने या हिंसक उद्रेकास संघटनात्मक स्वरूप आले आणि दहशतवादाचा उदय झाला, असे म्हटले जाऊ लागले. सौदी अरेबियासारख्या अत्यंत श्रीमंत देशातच ओसामा बिन लादेन जन्माला आला आणि अत्यंत एकारलेल्या धार्मिक विद्वेषाचा उगमही याच परिसरात झाला. अशाच स्वरूपाच्या हिंसाचाराचा प्रत्यय नायजेरिया या देशात सध्या येतो आहे. अत्यंत क्रूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि स्वत:ला इस्लामचा शुद्ध अवतार मानणाऱ्या संघटनेने जवळपास २५० वा अधिक मुलींना पळवून तीन आठवडे ओलीस ठेवले असून त्या मुली आपण आता विकून टाकू अशी घोषणा केली आहे. त्यांचा काहीही ठावठिकाणा अद्याप लागलेला नसून त्यामुळे नायजेरियात मोठय़ा प्रमाणावर अस्वस्थता आहे. तिची दखल घेत या मुलींच्या सुटकेसाठी सर्व ते प्रयत्न करण्याचे आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिले असून त्याप्रमाणे लष्करी आणि तांत्रिक कुमक नायजेरियाकडे रवाना केली आहे. या प्रसंगाने ज्वालामुखीच्या तोंडावरील नायजेरियाचे दर्शन जगास झाले. ते चिंतित करणारे आहे.    
याचे कारण नायजेरिया हा अफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश. मुबलक खनिज तेल असलेला. परंतु या तेलाचे उत्खनन करण्याचे तंत्रज्ञान त्या देशाकडे नाही आणि भांडवलाचाही अभाव. या देशाच्या लोकसंख्येतील साधारण निम्मे इस्लामचे पालन करतात तर उर्वरित ख्रिश्चन आहेत. इस्लामींमध्येही प्राधान्य सुन्नींचे आहे आणि त्यातील बरेच मलीकी पंथीय आहेत. दारिद्रय़ या देशाच्या पाचवीलाच पुजलेले असल्यामुळे ही जनता कडव्या धर्मवादाला बळी पडण्यास कायमच सज्ज होती. त्यातही विशेषत: कॅमेरून वा चाड या देशांना सीमावर्ती असलेला नायजेरियाचा उत्तर भाग अधिक मागास असून त्या परिसरात कडव्या इस्लामचा प्रभाव अधिक आहे. वास्तविक नायजेरियात तेल मोठय़ा प्रमाणावर आहे. परंतु या तेलावर पाश्चात्त्य कंपन्यांची मालकी असल्यामुळे या तेलकंपन्या आणि आपल्या देशातील ख्रिस्ती धर्मीय यांच्यात साटेलोटे असल्याचा सोयीस्कर समज इस्लामी धर्मीयांकडून पसरवला गेला. हा समज पसरवणाऱ्यांचा आधुनिक शिक्षणालाही विरोध असल्याने त्या समजास बळी पडणाऱ्यांना इस्लामी धर्ममरतडांच्या शाळेतच आपापल्या पाल्यांना घालावे लागते. याचाच फायदा जमाते अहलिस सुन्ना लिदावती वल जिहाद या संघटनेने घेतला. ही नायजेरियातील कडवी इस्लामवादी संघटना. प्रेषित महंमदाच्या विचार प्रचारार्थ आणि जिहादसाठी सज्ज असलेले, असा तिच्या नावाचा अर्थ. पाश्चात्त्य आणि ख्रिश्चनांना आपल्या देशातून घालवून देणे हे या संघटनेचे प्राथमिक ध्येय असून नायजेरिया हा पूर्णपणे इस्लामच्या तत्त्वावर चालणारा देश व्हावा असे या संघटनेस वाटते. त्यामुळे जे जे आधुनिक ते सर्व या संघटनेस नकोसे आहे. विचार म्हणून एखाद्यास अशी मते बाळगण्याचा अधिकार आहे. परंतु ही संघटना विचारांच्या पातळीवर नसून नृशंस हत्या घडवणे, महिलांवर अत्याचार करणे आदी मार्गाने आपल्या मतांचा प्रचार तिला करायचा आहे. महंमद युसूफ हा या संघटनेचा प्रमुख. त्याचे अत्यंत निर्घृण उद्योग पाहून या संघटनेस स्थानिकांनी नवे नाव दिले बोको हराम. जे जे आधुनिक ते ते हराम, म्हणजे नकोसे, असा त्याचा अर्थ. आता ही संघटना बोको हराम याच नावाने ओळखली जाते. या युसूफने संघटना स्थापनेनंतर लगेचच, म्हणजे २००२ साली, मैदुगुरी शहरात स्वतंत्र आणि भव्य मशीद बांधली आणि परिसरातच इस्लामी शिक्षण देऊ शकेल अशी शाळाही सुरू केली. स्थानिक, गरीब मुसलमान कुटुंबांतील मुलांसाठी हीच शाळा हा आधार होता. या क्षेत्रात स्थिरावल्यावर युसूफ याच्या राजकीय प्रेरणा वाढू लागल्या आणि पुरेसे अनुयायी जमल्यावर २००९ साली त्याने मोठय़ा प्रमाणावर नायजेरियाभर हिंसाचार घडवून आणला. अखेर सरकारने लष्कर पाठवून हे बंड मोडून काढले. मैदुगुरी येथील बोको हरामच्या मुख्यालयावर हल्ला केला. त्या वेळच्या चकमकीत युसूफ मारला गेला आणि मग या संघटनेची सूत्रे अबुबकर शेकाव याच्याकडे आली. संघटनेचे पावित्र्य राखण्याचा भाग म्हणून अबुबकर याने पहिल्यांदा युसूफ याच्या पाच विधवांना आपल्या पंखाखाली घेतले आणि त्याच्या अपत्यांनाही दत्तक घेतले. हा अबुबकर धर्मविचारांच्या बाबत युसूफ इतकाच, वा अधिकच कडवा आहे आणि महिलांची, तरुणींची विक्री करणे हे आपले नियत कर्तव्य आहे, असा त्याचा दावा आहे. पंथप्रमुखच असे म्हणू लागल्यामुळे बोको हरामच्या छोटय़ामोठय़ा कार्यकर्त्यांकडूनही नायजेरियात सर्रास लैंगिक अत्याचार होतात आणि गावातून हवी ती तरुणी वा महिला पळवून नेली जाते. हजारो तरुणींची आयुष्ये यातून उद्ध्वस्त झाली असून या तरुणींना आता त्यांचे पालकही घरी घेण्यास तयार नाहीत. अत्यंत दारिद्रय़ आणि कमालीचे मागासलेपण यामुळे नायजेरियात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण अतिशय कमी असून बोको हरामच्या दहशतीने ते अधिकच घटू लागले आहे. केवळ याच नव्हे तर अन्य आघाडय़ांवरही या संघटनेने नायजेरियात उच्छाद मांडला आहे. २०१० साली तुरुंगांवर हल्ले करून कैद्यांची सुटका करणारी संघटना हीच आणि नंतर नाताळाच्या दिवशी वा नववर्षदिनी हत्याकांड घडवून आणणारी संघटनाही हीच. गेल्या काही वर्षांत जवळपास चार हजारांहूनही अधिक निरपराधांचे बळी या संघटनेने घेतले आहेत.
या अशा संघटनांचे फावते ते प्रशासन अकार्यक्षमांच्या हाती गेले की. नायजेरियात तेच घडले असून अध्यक्ष गुडलक जोनाथन यांना काही सुधरत असल्याची चिन्हे नाहीत. त्याचमुळे अमेरिकेने मदत देऊ केल्या केल्या या गुडलकाने ती घेतली असून बोको हरामने पळवून नेलेल्या मुलींचा शोध आता अमेरिकी फौजा घेतील. यामुळे परिस्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता असून त्या देशातील ख्रिश्चनांच्या विरोधात अधिकच हिंसाचार होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांना केवळ लष्करी मार्गानी उत्तर शोधता येत नाही. प्रथम विकासाचे मार्ग प्रयत्नपूर्वक आखावे लागतात. ते करायची त्यांची इच्छा नाही. तेव्हा     या जोनाथन यांनी काय गुडलक आणले, असा प्रश्न सामान्य नायजेरियनांना पडत असेल तर ते योग्यच.