scorecardresearch

पवित्र पापी

मुंबईतल्या पुस्तकांच्या एका सेलमध्ये ‘हमास’ हाती लागलं आणि इस्लामी दहशतवादाच्या गुंतागुंतीचे पदर उलगडताना हमास, हेझबोल्लाह, तालिबान आदींमधले कंगोरे लक्षात आले.. ‘अ कम्पॅरेटिव्ह स्टडी’ने हमास अन् हेझबोल्लाह यांच्यातील नक्की फरक अधोरेखित केले..

मुंबईतल्या पुस्तकांच्या एका सेलमध्ये ‘हमास’ हाती लागलं आणि इस्लामी दहशतवादाच्या गुंतागुंतीचे पदर उलगडताना हमास, हेझबोल्लाह, तालिबान आदींमधले कंगोरे लक्षात आले.. ‘अ कम्पॅरेटिव्ह स्टडी’ने हमास अन् हेझबोल्लाह यांच्यातील नक्की फरक अधोरेखित केले..हमासने पॅलेस्टाईनची सत्ता काबीज केल्यानंतर ‘परमेश्वराची पवित्र भूमी-इस्रायल’ला पुन्हा युद्धभूमीचे स्वरूप आले असताना अशा पुस्तकांमुळे गृहपाठ पक्का झाला.

एखादी दहशतवादी संघटनाच एखाद्या प्रांताच्या निवडणुकीत विजयी झालीय आणि सत्तेवर आलीय.. असं झालं तर काय? म्हणजे अल कईदाच समजा पाकिस्तानात निवडणुकीत उतरली किंवा तालिबानी मंडळींनी त्या नावाचा पक्ष काढून निवडणुका लढवल्या आणि ते सत्तेवर आले तर काय?
२००६ सालच्या जानेवारी महिन्यात असं खरोखरच घडलं. पॅलेस्टाईनच्या भूमीत निवडणुकांत जनतेनं चक्क हमासला निवडून दिलं आणि जगापुढे पेचच उभा राहिला. मुळात पॅलेस्टाईनचा प्रश्न हे आपलं दुकान आहे, असं इतके दिवस यासर अराफत यांना वाटायचं. त्यांचा तसा दावाच असायचा, पण अराफत यांना आव्हान देणाऱ्या संघटना याच परिसरात उभ्या राहत होत्या. हमास एक त्यातली. अराफत हे पाश्चात्त्यधार्जिणे आहेत, असा आरोप त्यांच्यावर व्हायचा. त्याचप्रमाणे अराफत यांना हवं तिथं वळवणं हे पाश्चात्त्य राष्ट्रांना जास्त सोयीचं आणि सोपं होतं, अशीही टीका त्यांच्यावर केली जायची. खेरीज अराफत यांची धर्मनिष्ठा संशयास्पद होती, असंही कडव्या इस्लामी समर्थकांना वाटतं. त्यामुळे त्यांच्यापेक्षा अधिक कडवे या परिसरात तयार होत गेले. नंतर त्यातून अराफत यांची संघटना फताह आणि या नवधर्मवाद्यांच्या नवनव्या संघटना यात संघर्ष व्हायला लागला. अतिरेक्यांमधला संघर्ष इतर संघर्षांपेक्षा अधिक वाईट. याचं साधं कारण असं की, दोघेही जास्त कोण अतिरेकी हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे इतरांचे हाल. अफगाणिस्तानात रशीद दोस्तम हा त्याच्या शत्रुपक्षातल्या जमेल त्यांना एकत्र पकडून, त्यांचा एकेक पाय बांधून जीपच्या मागे फरफटत नेऊन मारायचा, तर गुलबुद्दीन हिकमत्यार हा त्याच्या शत्रुपक्षवाल्यांचा जीव जाणार नाही याची काळजी घेत त्यांची कातडी सोलून काढायचा. दोघांनाही आपल्या ‘कलेचा’ भलताच अभिमान होता. ते तसं मिरवायचेही. तेव्हा मुद्दा हाच की, अतिरेक्यांची स्पर्धा वाईट. त्यामुळे फताह या कडव्या संघटनेची स्पर्धा अतिकडव्या अशा संघटनांशी होत गेली.    
त्यात कालबाहय़ झालेली फताह ही संघटना अधिकच कालबाह्य़ झाली. पॅलेस्टाईनमधल्या वैफल्यग्रस्त तरुणांना फताह मिळमिळीत वाटू लागली असेल. कारण काहीही असो, पण हमाससारख्या संघटनांचा पाठिंबा वाढू लागला. २००६ साली त्यामुळेच चक्क राज्य करायची संधीच या संघटनेला मिळाली. तेव्हा आपला विजय हा आपल्या कडवेपणाचा विजय आहे, असा त्यांचा समज झाला. ते साहजिकच म्हणायला हवं.
पण या संघटनेचं दुर्दैव हे की, तिचा मुकाबला होता तो क्रूरतेबाबत तिच्यापेक्षाही अधिक तगडय़ा अशा इस्रायलशी. सर्वसाधारणपणे इस्रायलला गरीब बिचारा मानायची आपल्याकडे पद्धत आहे. इतक्या मुस्लीम राष्ट्रांत एकटा लढतोय बिचारा.. अशी एक सरसकट प्रतिक्रिया इस्रायलचं नाव निघाल्यावर व्यक्त होते. हे असं होतं याची कारणं दोन. एक म्हणजे वास्तवाचं अज्ञान आणि दुसरं म्हणजे आपणही इस्लामी साम्राज्यवादाचे काही प्रमाणात बळी असल्यानं वरकरणी तरी इस्लामविरोधी मुखवटा धारण करणारा इस्रायल आपल्याला जवळचा वाटत असावा. त्यातूनच आपण इतिहास आणि वर्तमानाचं सुलभीकरण करतो. त्यामुळे जगाचा, संयुक्त राष्ट्र संघाचा विरोध डावलून इस्रायल त्या प्रदेशात मोठय़ा प्रमाणावर घुसखोरी करतोय आणि इतरांना चिथावतोय हे आपल्याला जाणवत नाही आणि ते जाणवत नाही म्हणून वर्तमान समजत नाही. असो. विषय अर्थातच इस्रायल हा नाही, तर इस्रायलच्या विरोधात लढणारी हमास ही संघटना.
तिची स्थापना केली शेख यासीन यानं. हमास ही मुस्लीम ब्रदरहूडची सहोदर. ब्रदरहूड जन्माला आली पन्नाशीच्या दशकात. आज याच ब्रदरहूडचं सरकार इजिप्तमध्ये सत्तेवर आहे आणि ब्रदरहूड सर्वच अतिरेकी इस्लामी संघटनेचं आद्यपीठ मानलं जातं. तेव्हा अशा ब्रदरहूडची शाखा पॅलेस्टाइनच्या खदखदत्या रणात सत्तेवर आल्यानं हिंसक अपेक्षा वाढल्या असल्यास नवल नाही. पूर्णपणे इस्लामी धर्मतत्त्वांवर आधारित आपली संघटना त्याच तत्त्वांच्या आधारे पॅलेस्टिनी भूमीवर राज्य करेल आणि इस्रायलच्या तावडीतून या प्रदेशाची मुक्ती करेल, इतक्या स्पष्ट शब्दांत हमासनं आपलं ध्येयधोरण जाहीर केलं होतं, पण या संघटनेतही काही विचारी मंडळी असावीत. त्यातलाच एक म्हणजे खलिद मशाल. त्याचं म्हणणं होतं, आपण इस्रायलशी चर्चा करून प्रश्न मिटवू, नाही तरी सोडवू शकतो. अमेरिकेचे या प्रांतासाठीचे शांतिदूत माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्याशी खलिदच्या बऱ्याच चर्चा व्हायच्या. त्यातूनच हमासच्या राज्याची संकल्पना जन्माला आली.
हा सगळा इतिहास मुळापासून समजावून घ्यावा असाच आहे. त्यासाठी ‘हमास : पॉलिटिक्स, चॅरिटी अँड टेररिझम इन द सव्‍‌र्हिस ऑफ जिहाद’ या नावाचं पुस्तक उत्तम. ते लिहिलंय मॅथ्यू लेविट यांनी. ते वॉशिंग्टनमधल्या एका दहशतविषयक अभ्यास संस्थेशी संबंधित आहेत. इस्रायल, पॅलेस्टाईन आणि एकूणच प. आशियातील दहशतवाद हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. लिहीत असतात ते कुठे कुठे या अनुषंगानं. हे पुस्तक त्यांच्या या विषयाच्या एकूणच व्यासंगाचं दर्शन घडवतं. एका पाठय़वृत्तीच्या निमित्तानं त्यांनी या विषयाचा अधिक अभ्यास केला आणि त्यातून हे पुस्तक जन्माला आलं. मुंबईत सुंदराबाई सभागृहात पुस्तकांचा सेल लागतो वर्षांतून दोन-पाच वेळा. कोणत्या ना कोणत्या सेलच्या शोधात असलेली मंडळीच बऱ्याचदा फिरकतात तिथं, कारण पुस्तकांत बऱ्याचदा संगणक, स्वमदत, आरोग्य, कामक्रीडा वगैरे अशीच खपाऊ पुस्तकं असतात, पण तरी तिथं जाण्याचा मोह काही आवरत नाही. जाऊन तर पाहूया.. लागलं हाताला चांगलं तर ठीकच आहे.. नाही तर नाही.. असं समानधर्मी पुस्तकप्रेमींस सांगत तिकडे जाणं होतंच. अशाच २००९ सालातल्या सेलमधे एका कोपऱ्यात हे पुस्तक पडलेलं होतं. त्या आधी परदेशात काही मित्रांना त्याबाबत विचारणा केलेलीच होती, पण तिकडून आणायचा प्रयत्न सुरू असलेलं हे पुस्तक असं समोर सहज पडलेलं पाहून खरंच वाटलं नाही. ते मी अर्थातच घेतलं. अशी आणखी काही आहेत का.. असं तिथल्या विक्रेत्याला विचारलं तर म्हणाला.. त्या खोक्यात पहा.. कोणाला हवीयेत ही असली पुस्तकं?
बरंच वाटलं अशा पुस्तकांना मागणी कमीच आहे ते ऐकून. नाही तरी चांगल्या गोष्टी कमीच खपतात, पण ज्यांनी हे पुस्तक वाचलं असेल त्यांना त्यातल्या ऐवजाचा दर्जा लक्षात आला असेल. जे नंतर वाचतील त्यांनाही तो जाणवेल. याचं कारण असं की, इस्लामी दहशतवाद हा विषय मोठय़ा गुंतागुंतीचा आहे. हमास, हेझबोल्लाह, तालिबान आदींमधले कंगोरे बारकाईने माहीत असावे लागतात. बारा टक्के असलेल्या सब घोडय़ांप्रमाणे केवळ इस्लामी दहशतवादी संघटना एवढाच उल्लेख करून चालत नाही, कारण धर्माच्या दहशतवादालाही शाखा, उपशाखा वगैरे कप्पे असतात. जागतिक राजकारणाचेही संदर्भ दहशतवादास असतात. लेव्हिट ते सहजतेने उलगडून दाखवतात. १९९७ सालच्या फेब्रुवारी महिन्यात न्यूयॉर्कमधल्या एम्पायर स्टेट इमारतीत अली हसन अबू कमाल या दहशतवादय़ानं अंदाधुंद गोळीबार केला होता. त्याने मागे ठेवलेल्या चिठ्ठीतून पुढे बऱ्याच गोष्टी उघड झाल्या, पण अनेक मुसलमानी तरुणांना अमेरिका, ब्रिटन आदी देश हे शत्रू का वाटतात याचा सविस्तर ऊहापोह मॅथ्यू करतात. दहशतवाद समजून घेताना हे समजून घेणं जास्त आवश्यक आहे, कारण दहशतवाद ही प्रत्यक्ष घडणारी घटना असली तरी तिच्यामागे बऱ्याच प्रेरणा असतात. त्या समजल्याशिवाय दहशतवादही समजून घेता येणार नाही.
हमास समजून घेतल्यानंतर या सगळ्याच प्रकरणाची भूक वाढते. समोर दिसू लागते हेझबोल्लाह. या संघटनेतली मंडळी स्वत:ला परमेश्वराचाच दल समजतात. पण माणसानं परमेश्वराचेही कप्पे करून टाकलेत. म्हणजे हमासचा आणि हेझबोल्लाह या दुसऱ्या संघटनेचा परमेश्वर जरी एकच असला तरी हे दोन्ही पंथ वेगळे आहेत. म्हणजे हमास ही प्राधान्यानं सुन्नी असेल तर हेझबोल्लाह शिया आहे. त्यामुळे हेझबोल्लाहचा जन्मही झालाय तो शियाबहुल अशा इराणात. जन्मदाते इराणचेच अयातोल्ला रूहल्ला खोमेनी. हिची जन्मभूमी जरी इराण असली तरी कर्मभूमी आहे लेबनॉन. एकेकाळी ख्रिश्चनबहुल असा हा देश इस्रालयनं जणू गिळंकृतच केला होता. त्या देशातून इस्रायलची हकालपट्टी करणं या एकाच उद्देशानं हेझबोल्लाह जन्माला आली, पण दहशतवादी संघटना जन्माला येणं आणि टय़ूबमधून टूथपेस्ट बाहेर काढणं, दोन्हीही सारखंच. बाहेर आलेली पेस्ट ज्याप्रमाणे परत टय़ूबमध्ये घालता येत नाही, तसंच दहशतवादी संघटनेचंही आहे. हेझबोल्लाह याला अपवाद नाही. लेबनॉनमधून इस्रायल कधीच बाहेर पडलं, पण हेझबोल्लाहचं अवतारकार्य काही संपलेलं नाही. काही भयंकर हत्याकांडं तिच्या नावावर आहेत. हमास आणि हेझबोल्लाह, या दोघांत नक्की फरक काय?
तो समजून सांगण्यासाठीच जोशुआ ग्लेस आणि बेनेडेट्टा बर्टी यांनी ‘हेझबोल्लाह अँड हमास: अ कम्पॅरेटिव्ह स्टडी’ या नावाचं पुस्तक लिहिलंय. आपला अनुभव असा की, तुलनात्मक अभ्यास वगैरे शब्द आले की सर्वसाधारण वाचकाच्या पोटात गोळा उठतो, कारण पीएचडी वगैरे मिळवण्यासाठीच्या हमखास मार्गावर हा शब्दप्रयोग कायमचा मुक्कामाला असतो. हा शब्दप्रयोग असलेली पुस्तकं वाचायची नसतात, ही आपली सवय. ती मोडायची असेल तर हे पुस्तक वाचायला हवं.
या लेखकद्वयींनी दोन्ही संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षनेते, या संघटनेच्या दहशतवादी कृत्यांत जायबंदी झालेले, सुरक्षा तज्ज्ञ, मुत्सद्दी अशा अनेकांशी बोलून आपला ऐवज जमा केलाय. भरपूर रेखाचित्रं, नकाशे असा अन्य संदर्भमूल्यांचा सकस ऐवजही या पुस्तकांत आहे.
दोन्हीही पुस्तकं वाचून जाणवतं ते हे की, या दोन्ही संघटनांचा शत्रू एकच आहे, तो म्हणजे इस्रायल. परमेश्वराची पवित्र भूमी म्हणून ज्या प्रदेशाकडे इतिहासानं पाहिलं तो प्रदेश आज अनेक दहशतवादी संघटनांच्या रागाचा केंद्रबिंदू झालाय. मोझेसची ती पवित्र भूमी आज पापी अशा दहशतवादाचा केंद्रबिंदू झालेली आहे. बायबलमधील या पवित्र भूमीचे आधुनिक शाप आपल्याला माहीत असायलाच हवेत. गेल्याच आठवडय़ात इस्रायल आणि हमास यांच्यात चांगलाच संघर्ष पेटला होता. त्यातून अगदी इस्रायलच्या तेल अविव शहरापर्यंत बाँबफेक झाली आणि आता हे युद्ध पेटणार की काय, असे वाटावे इतकी परिस्थिती बिघडली होती. अमेरिकेने नेहमीप्रमाणे शेवटच्या क्षणी दादागिरी करत तो प्रश्न मिटवला, पण तो तात्पुरताच, हे उघड आहे.
तेव्हा त्या संघर्षांला नव्याने तोंड फुटायच्या आधी त्या विषयाचा आपला गृहपाठ पक्का झालेला बरा. त्यासाठीच या पवित्र पापींची ओळख ..
१. हमास: पॉलिटिक्स, चॅरिटी अँड टेररिझम इन द सव्‍‌र्हिस ऑफ जिहाद
ले. मॅथ्यू लेविट/प्रकाशक. येल युनिव्हर्सिटी/पृ. ३२४/किंमत.. १५ डॉलर्स.
२. हेझबोल्लाह अँड हमास: अ कम्पॅरेटिव्ह स्टडी
ले. जोशुआ ग्लेस, बेनेडेट्टा बर्टी/ प्रकाशक. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी प्रेस/पृ. २६४./कि. १४ डॉलर्स
(वि. सू. पुस्तकांच्या उपलब्धतेविषयी लेखकाकडे चौकशी करू नये.)

मराठीतील सर्व बुक-अप! ( Bookup ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bookup

ताज्या बातम्या