scorecardresearch

चेतासंस्थेची शल्यकथा : गाठींच्या लक्षणांचा गुंता!

चेतासंस्थेच्या बाकीच्या आजारांची लक्षणंसुद्धा इतर आजारांपेक्षा समजून येण्यास कठीण असतात.

मेंदूतली मोठी गाठ; या व्यक्तीच्या वर्तणुकीत बदल झाला होता.

डॉ. जयदेव पंचवाघ

कोणत्याही आजाराचं प्रत्येक लक्षण गंभीर असतंच असं नाही, पण म्हणून त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं तर गंभीर आजार लक्षातच आला नाही असं घडू शकतं. हेच मेंदूशी संबंधित आजारांच्या लक्षणांनाही लागू आहे, म्हणून सतत सतर्क राहणं गरजेचं..

‘बाईसाहेब, तुम्ही नििश्चत होऊन मला घडलेल्या घटना सांगा. खात्री बाळगा की तुमचं हे कथन मी फक्त नीट ऐकतोच आहे असं नाही तर.. त्याचं प्राण कानात आणून अर्थग्रहण करतो आहे.’

      – एरक्युल पॉएरो (Hercule Poirot)

अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांच्या प्रसिद्ध एरक्युल पॉएरो या व्यक्तिरेखेच्या तोंडी हे वाक्य आहे. एखादा असामान्य डिटेक्टिव्ह जसा घडलेल्या घटना फक्त ऐकूनच नव्हे तर त्यांचं ‘अर्थग्रहण करून’ निष्कर्ष काढतो तसंच उत्कृष्ट आणि अचूक पद्धतीने रोगनिदान करणारा डॉक्टर रुग्णांनी सांगितलेल्या आजाराच्या लक्षणांवरूनच रोगनिदान करू शकतो. आजाराच्या लक्षणांचं महत्त्व इतकं अनन्यसाधारण आहे.

ख्रिस्तपूर्व ४०० वर्षांपूर्वी हिप्पोक्रेटस नावाचा प्रसिद्ध डॉक्टर होऊन गेला. त्याने रोगांच्या निदानशास्त्राला शास्त्रीय व तर्कसंगत दिशा दिली. झटके येण्याचा आजार म्हणजेच ‘एपिलेप्सी’ या आजाराविषयी तो लिहितो, ‘हा आजार कुठल्याही प्रकारच्या जादूटोण्यामुळे किंवा देवतांचा कोप झाल्यामुळे होतो असं मला अजिबात वाटत नाही. या आजाराची कारणं कुठल्याही अधिभौतिक गोष्टींशी जोडणं चुकीचं तर ठरेलच पण असं केल्यास त्यावर तर्कसंगत उपचार शोधता येणार नाहीत.’ २५०० वर्षांपूर्वीचे हे विचार आहेत. अगदी आत्ता-आत्तापर्यंत झटके येण्याच्या प्रकारांना जगातल्या अनेक भागात ‘अधिभौतिक शक्ती शरीरात शिरून त्यांनी शरीराचा ताबा घेण्याचा प्रकार’ समजला जात असे.

 चेतासंस्थेच्या बाकीच्या आजारांची लक्षणंसुद्धा इतर आजारांपेक्षा समजून येण्यास कठीण असतात. याचं पहिलं कारण म्हणजे आजाराच्या ठिकाणापासून (मेंदू व मज्जारज्जूपासून) शरीरात ती दूरवर दिसतात. आणि दुसरं म्हणजे ही लक्षणं जरा ‘चमत्कारिक’ प्रकारची असतात. नेमकं त्याचं वर्णन शब्दात कसं करावं हे भल्या-भल्यांना समजत नाही. काही लक्षणं तर मानसिक आजारांची असावीत अशी भासतात.

मागच्या लेखात, ब्रेन टय़ूमर (मेंदूतील गाठी) सारख्या आजाराचं निदान लवकर झालं तर तो बरा होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते हे आपण पाहिलं. ब्रेन टय़ूमरची सुरुवात होऊन तो वाढू लागल्यावर कवटीच्या पोकळीतील जागा तो व्यापू लागतो. या मर्यादित जागेतला दाब वाढल्यामुळे डोकेदुखी, मळमळ, उलटय़ा होणं, वस्तू दोन दोन दिसणं, डोळय़ासमोर अंधारी येणं, उत्तरोत्तर ग्लानी येणं अशी लक्षणं दिसतात. मात्र यातील प्रत्येक लक्षण हे इतर अनेक कारणांमुळेसुद्धा दिसू शकतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रकारची लक्षणं ती नेहमी न होणाऱ्या व्यक्तीला नावीन्यानं आणि प्रलंबित काळापर्यंत दिसू लागली तर त्यांच्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.

ब्रेन टय़ूमरमुळे प्रत्येक वेळी डोकेदुखी होतेच असं नाही. तसंच टय़ूमरमुळे होणारी डोकेदुखी वेगळी समजून येण्यासारखी असतेच असंही नाही. इतर प्रकारच्या डोकेदुखीच्या तुलनेत ती हळूहळू वाढत जाते. त्याबरोबर टय़ूमरची इतरही लक्षणं दिसणं ही एक खूण म्हणता येईल. ज्या व्यक्तीला सर्वसामान्यपणे वारंवार अर्धशिशी (मायग्रेन) किंवा मानसिक ताणामुळे होणारी डोकेदुखी वगैरे प्रकारच्या डोकेदुखीचा त्रास होत नाही,  तिला तीव्र डोकेदुखीचा त्रास झाला तर त्याकडे संशयाने बघितलं पाहिजे.

मेंदूतील गाठीचं दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे फिट किंवा झटके येणं. ब्रेन टय़ूमर सेंटरमध्ये ‘पहिल्यांदाच फिट आल्यामुळे स्कॅन केला गेला आणि त्यात गाठ दिसली’ असे अनेक रुग्ण येतात. अशा वेळेला मला वाटतं की फिट येणं हे खरं तर त्यांच्यासाठी वरदानच ठरतं. कारण ती आली नसती तर त्या व्यक्तीच्या मेंदूतल्या गाठीचं निदान झालंच नसतं. झटके येण्याचे अनेक प्रकार आहेत आणि मेंदूत ज्या ठिकाणी गाठ निर्माण होते त्याप्रमाणं त्या प्रकारचा झटका आलेला दिसतो. उदाहरणार्थ उजव्या बाजूच्या ‘फ्राँटल लोब’च्या मागच्या एक तृतीयांश भागात गाठ असेल तर हा झटका डाव्या बाजूचा चेहरा, हात किंवा पायापासून सुरू होते. डाव्या बाजूचा चेहरा व हात अचानक वारंवार ‘उडायला’ लागतो. हे डाव्या पायातही पसरू शकतं. हा झटका काही सेकंद किंवा मिनिटं टिकतो. या काळात व्यक्तीची शुद्ध हरपू शकते. अशा ‘मर्यादित’ भागाच्या झटक्याला ‘फोकल फिट’ म्हणतात. फोकल फिट म्हणजे मेंदूतील विशिष्ट भागापासून सुरू झालेली आणि त्या केंद्राशी संबंधित असलेल्या शरीरातील मर्यादित भागातच उमटणारा झटका.

हा झटका काही सेकंदात सर्व शरीरभर पसरू शकतो आणि मग त्याला ‘जनरलाईज्ड फिट’ म्हणतात. अशा झटक्यात व्यक्तीच्या तोंडातून जोरात आवाज येणं, तोंडातून फेस येणं, दातखीळ बसणं, जीभ चावली जाणं, संपूर्ण शरीर थाडथाड उडणं, काही सेकंद श्वास बंद होणं, अनियंत्रित मूत्रविसर्जन होणं अशा गोष्टी घडू शकतात. या झटक्यानंतर व्यक्ती काही वेळ बेशुद्ध राहते. ज्या हाता किंवा पायापासून झटका सुरू झालेला असतो तो भाग काही काळ कमजोर राहू शकतो.

‘टेम्पोरल लोब’ या भागातल्या गाठीमुळे येणारा झटका वेगळा असतो. यात व्यक्तीला अचानक वेगळय़ा प्रकारचा वास यायला लागतो किंवा अचानक असंबंधित स्मृती मनात येऊ लागतात.. आणि डोळे उघडे असले तरी व्यक्तीचा आजूबाजूच्या परिस्थितीशी संबंध तुटतो. झटक्यादरम्यान वर्तणुकीत अचानक बदल होऊ शकतो. व्यक्ती शून्यात बघून वारंवार स्वत:चे कपडे चिवडण्यासारख्या हालचाली नकळत करू लागते. आपण त्या करतो आहोत याचं भान त्या व्यक्तीला नसतं.

हायपोथॅलॅमस या मेंदूतल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि खोलवर स्थित असलेल्या भागात गाठ झाली तर एक विचित्र प्रकारचा झटका येऊ शकतो. या फिटला ‘जिलॅस्टिक फिट’ म्हणतात. यात व्यक्ती काहीही बाह्य कारण नसताना अनियंत्रित पद्धतीने हसत सुटते. अक्षरश: ‘हसण्याचे झटके’ येतात. ग्रीक ‘जिलोस’ म्हणजे हसणं.. या शब्दावरून आलेलं हे नाव आहे. अशा हसण्याच्या झटक्यादरम्यान सभोवतालशी संपर्क सुटू शकतो.

थोडक्यात म्हणजे मेंदूत ज्या ठिकाणी गाठ झालेली असेल त्यावरून झटक्याचा प्रकार ठरतो. असं असलं तरी झटके येणे, म्हणजेच ‘एपिलेप्सी’ हा खूपच सर्वसामान्य आजार आहे. किंबहुना एपिलेप्सीच्या रुग्णांपैकी बहुसंख्य रुग्णांना ब्रेन टय़ूमर हे कारण नसतं.

ब्रेन टय़ूमरचं पुढचं लक्षण म्हणजे ज्या भागात ही गाठ होते त्या भागाचे कार्य हळूहळू कमी किंवा बंद पडत गेल्यामुळे शरीरावर उमटणारं लक्षण. उदाहरणार्थ डाव्या बाजूच्या ‘परायटाल लोब’ या भागात गाठ झाल्यास समोरची व्यक्ती काय बोलते आहे हे न कळणं, वाचताना वाक्यांचा अर्थ न कळणं अशा गोष्टी घडतात. दृष्टीच्या नसेजवळ गाठ झाल्यास त्या नसेतील संदेशवहन खंडित होऊन दिसणे बंद होईल वगैरे.

काही वेळा ब्रेन टय़ूमरच्या रुग्णांमध्ये मानसिक आणि वर्तणुकीतील बदल हेच सुरुवातीचं लक्षण असू शकतं. व्यक्ती अचानक शांत-शांत राहायला लागणं, अचानक खूप विसरभोळी होणं, आजूबाजूच्या लोकांकडे दुर्लक्ष करून संवाद कमी होणं.. अशा गोष्टी झाल्या तर मेंदूत गाठ नाही ना हे बघावं लागतं. काही वर्षांपूर्वी मी दोन्ही बाजूच्या फ्राँटल लोब या भागावर दाब आणणारी मेिनजिओमा या जातीची गाठ झालेल्या स्त्रीवर शस्त्रक्रिया केली. तिच्या मुलींनी मला तेव्हा सांगितलं होतं, ‘डॉक्टर गेलं एक वर्ष आमची आई ही ‘नेहमीची’ व्यक्ती नसून दुसऱ्याच व्यक्तिमत्त्वाची कोणी व्यक्ती आमच्यात राहते आहे असं आम्हाला वाटत होतं आणि त्यासाठी मनोरुग्णतज्ज्ञ उपचार करत होते.

अचानक, काही कारण नसताना असं का व्हावं असं वाटून मी त्या आईचा एमआरआय करून घेतला आणि ही गाठ दिसली! त्या एमआरआयचा फोटो या लेखासोबत मी दिला आहे. मात्र दुसरीकडे हेही लक्षात घ्यावं लागेल की हे लक्षण असलेल्या लोकांपैकी अगदी मर्यादित व्यक्तींमध्येच ब्रेन टय़ुमरचं निदान होतं.

काही गाठींनी मेंदूतील पाण्याचा प्रवाह अचानक रोखला गेल्यामुळे पाणी तुंबून अचानक दाब वाढतो. तीव्र डोकेदुखी आणि झपाटय़ाने ग्लानी येत जाणं ही अशा वेळची लक्षणं असतात. वेळीच उपचार न झाल्यास या रुग्णांची शुद्ध हरपू शकते. विशेषत: कोलॉईड सिस्ट या गाठीमुळे ही घटना घडू शकते.

ही सर्व लक्षणं खोलात जाऊन सांगण्याचं कारण म्हणजे कुठल्याही व्यक्तीला स्वत:ला किंवा आजूबाजूच्या व्यक्तींना याचा अनुभव आला, तर सतर्क होणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही की ही लक्षणं दिसली तर ब्रेन टय़ूमर असेलच. किंबहुना एक एका लक्षणांचा स्वतंत्रपणे विचार केला तर इतर अनेक आजारातही ही लक्षणं दिसू शकतात. पण समूहानं दिसल्यास त्यांचं महत्त्व आणखी वाढतं. म्हणूनच यांचा बागुलबुवा न करता सतर्क राहणं मात्र गरजेचं आहे.

(लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत. brainandspinesurgery60@gmail.com

मराठीतील सर्व संपादकीय ( Sampadkiya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Brain cyst brain tumor symptoms of brain related diseases zws

ताज्या बातम्या