आपण मनापासून नाम घेत गेलं की खरा सद्गुरू आपल्या जीवनात प्रवेश करील. आता इथे ‘नाम’ हा शब्द उपासना या अर्थानं घ्या. भौतिकाच्या प्रभावापासून मनाला विलग करणारी आणि आत्मसन्मुख करणारी नेमकी कोणती उपासना मी केली पाहिजे, हे श्रीसद्गुरूच केवळ सांगू शकतो. पण त्याची भेट होईपर्यंत प्रत्येकजण आपल्या मानसिक, भावनिक, वैचारिक पातळीनुरूप काहीबाही उपासना करतो. मग कुणी रोज नित्य नियमानं एखादं स्तोत्र वाचत असेल, कुणी नित्यनियमानं कोणत्या तरी सद्ग्रंथाचं पारायण करीत असेल, कुणी इष्टदेवतेची पूजाअर्चा आणि त्याच्या तीर्थस्थान वा मंदिराचं दर्शन घेत असेल, कुणी निर्विचार होण्याच्या विचारानं ध्यानाभ्यास करीत असेल, कुणी तत्त्वाच्या अंगानं परमात्म्याला जाणून घेण्यासाठी संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करीत असेल, तर कुणी नाम घेत असेल! ‘वाचवा वाचवा’ ओरडण्याचे मार्ग भिन्न असू शकतात पण आर्तता एकच असली तर तो धावत येईलच! नामाचा उल्लेख अशासाठी कारण ते सार्वत्रिक, सर्वपरिचित, सर्वगम्य आणि सर्वात सोपं भासणारं असं आहे. आपण काहीबाही उपासना सातत्यानं करू लागतो तेव्हा ‘सद्गुरू’ची प्राप्ती व्हावी, असंही आपल्याला वाटू लागतं. अर्थात परमात्म्याचं दर्शन त्याच्याशिवाय अशक्य आहे, असं अनेक संतांनीही सांगितल्यामुळे प्राथमिक पातळीवर आपल्याला सद्गुरू हवा, असं आपल्याला वाटतं. थोडक्यात एखाद्या मध्यस्थासारखं आपण त्याच्याकडे पाहात असतो. या सद्गुरूचा शोध मग आपण घेऊ लागतो. श्रीगोंदवलेकर महाराज मात्र स्पष्ट सांगतात की, सद्गुरूच्या शोधाच्या फंदात पडू नका. का? कारण आपला शोध हा आपल्या बुद्धीप्रमाणे, आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या कुवतीप्रमाणेच होणार. मग बाह्य़ वेशावरून एखाद्याला भुलण्याचा धोकाही मोठा. मग खरा संत-सद्गुरू कोणता आणि वरकरणी व स्वयंघोषित गुरू कोणता, हे कळणार नाही. काही फार सत्शील वृत्तीचे श्रेष्ठ साधकही गुरुवत भासतील, पण ते मला या जंजाळातून सोडवू शकणार नाहीत. काही तर साक्षात्कारी संतच भासतील, त्यांचं रूप-तेज आणि हजारो अनुयायी; यांचाही प्रभाव पडेल. पण जे स्वत:च भौतिकात अडकले आहेत ते माझी भौतिकातली आसक्ती सोडवू शकणार नाहीत. श्रीगोंदवलेकर महाराज स्पष्ट सांगतात, ‘‘संत पुष्कळ सापडतील पण पतिव्रता सापडणे कठीण असते’’(चरित्रातील संतविषयक वचने, क्र. ७३). म्हणजे वरकरणी, बाह्य़वेशधारी संत बाजारात भरपूर सापडतील. असे स्वयंघोषित आणि स्वकल्पित संत बरेच असतात पण पतिव्रता ही जशी पतीशिवाय काहीच जाणत नाही, अशा पतिव्रतेप्रमाणे केवळ एका परमात्म्याच्याच एकरसात निमग्न होऊन त्याच्याशी एकरूप झालेले संत सापडणे फार कठीण! पण हेच खरे सद्गुरू माझ्या सततच्या, चिकाटीच्या आर्त उपासनेनं स्वत:हून माझ्याकडे येतात. माझ्या जीवनात प्रवेश करतात. त्यासाठी आधी आपण जी काही उपासना करीत असू ती भावयुक्त अंत:करणानं व्हावी, यासाठी त्यांचीच प्रार्थना करीत दृढतेनं अभ्यास केला पाहिजे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Oct 2013 रोजी प्रकाशित
२०३. पतिव्रता
आपण मनापासून नाम घेत गेलं की खरा सद्गुरू आपल्या जीवनात प्रवेश करील. आता इथे ‘नाम’ हा शब्द उपासना या अर्थानं घ्या
First published on: 17-10-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cahaitanya chintan 203 faith towards spiritual teacher