पु. ल. देशपांडे यांनी कुतूहल मारून टाकणाऱ्या वृत्तीला ‘गप्प बसा संस्कृती’ म्हटले होते. ही संस्कृती गेली अनेक दशके आपल्या राज्यकर्त्यांनी मनोमन जपली. सीबीएसईच्या नव्या ‘मुक्त पाठय़क्रम परीक्षा’ पद्धतीत विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शिक्षकांची जबाबदारी वाढणार आहे.
जगातील सर्वात कठीण कामे दोन असतात. एक म्हणजे आपल्या डोक्यातील विचार दुसऱ्याच्या डोक्यात उतरवणे आणि दुसरे म्हणजे दुसऱ्याच्या खिशातील पैसा आपल्या खिशात आणणे. पहिले काम करता येणाऱ्याला शिक्षक म्हणतात आणि दुसरे काम यशस्वीपणे करणारा व्यापारी असतो. शिक्षकाचे हे काम यासाठी अधिक महत्त्वाचे, की पैसा कसा मिळवायचा हे सांगत असताना, जगायचे कसे आणि कशासाठी, याचेही भान तो देतो. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एक्झामिनेशन्स (सीबीएसई) या केंद्रीय संस्थेने येत्या वर्षांपासून शिक्षण देण्याच्या आणि ज्ञानाचे मूल्यमापन करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवण्याचा निर्णय घेताना नेमक्या याच मुद्दय़ाला हात घातला आहे. गेली किमान २०० वर्षे या देशात शिकवलेले ज्ञान किती प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे, याची तपासणी करण्यासाठी जी परीक्षा पद्धती अवलंबिली जात आहे, त्यात जरासाही बदल झाला नाही. जो काही बदल झाला, तो ही पद्धत अधिक सोपी करण्यासाठीच झाला. म्हणजे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहिण्याऐवजी एका शब्दात किंवा वाक्यात उत्तर लिहिण्याची नवी पद्धत रूढ झाली. वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून देशातील मुलांना शाळा नावाच्या व्यवस्थेतून जे ज्ञान दिले जाते, ते जगण्यासाठी किती उपयोगाचे असते, याचा विचार करण्याची गरज जेव्हा जेव्हा व्यक्त झाली, तेव्हा तेव्हा अभ्यासक्रमात बदल केले गेले. नवे विषय अंतर्भूत करण्यात आले किंवा नवेच अभ्यासक्रम निर्माण करण्यात आले. पण वर्षभर शिकायचे आणि शेवटी जे काही शिकले, ते परीक्षानामक व्यवस्थेतील उत्तरपत्रिकेमध्ये उतरवायचे, ही पद्धत मात्र बदलली नाही. वर्षांतून तीन किंवा चार परीक्षा, आठवडा-पंधरवडय़ाने चाचणी अशा पद्धतीने मुलांच्या शैक्षणिक प्रगतीची तपासणी करण्याची पद्धत कालबाह्य़ होत चालली आहे, याचे जे भान सीबीएसईला आले आहे, ते इतर परीक्षा मंडळांना कधी येईल?
अभ्यासक्रम ठरवताना कोणत्या विषयातील कोणत्या भागाला किती प्राधान्य द्यायचे, याचा विचार करावा लागतो. त्या त्या विषयातील तज्ज्ञ, विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीचा विचार करून असा अभ्यासक्रम ठरवतात आणि मार्गदर्शक म्हणून पाठय़पुस्तके तयार करतात. या पाठय़पुस्तकाच्या आधारे शिक्षक वर्गात शिकवतात आणि त्यांनी शिकवलेले किती कळले, हे तपासण्यासाठी याच पाठय़पुस्तकाच्या आधारे प्रश्नपत्रिकाही तयार केली जाते. पाठय़क्रमाबाहेरचा प्रश्न विचारला गेला म्हणून, बहुतेक पालक दरवर्षी आंदोलनाचा पवित्रा घेतात, तेव्हाही पाठय़पुस्तकांपलीकडे मुलांनी काही शिकू नये आणि त्यांना काही विचारू नये, असाच सूर असतो. शिकणे ही एक प्रक्रिया असते. वाढत्या वयानुसार होणारी मेंदूची वाढ आणि त्यामुळे वाढणारी समज हा या क्रियेचा पाया असतो. पहिलीतल्या मुलाला पायथागोरसचा सिद्धान्त काय आहे, हे विचारणे त्यामुळेच मूर्खपणाचे ठरते. परंतु वाढत्या वयानुसार शिक्षणातून अधिक अवघड गोष्टी समजणे आवश्यक असताना, आपल्याकडे मात्र नेमके उलटे घडत आहे. सोपेपणाकडून कठीणतेकडे असणारा शिक्षणाचा हा प्रवास बरोबर उलटय़ा दिशेने सुरू आहे. त्यामुळे सोप्यातून अधिक सोपेपणाकडे अशी नवी शिक्षणपद्धती रूढ होत आहे. त्यामुळे शिक्षण पूर्ण करून त्याच्या आधारे नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. परीक्षेत सर्वाधिक गुण मिळाले म्हणजे ज्ञान संपादन करण्याची क्षमता सर्वात अधिक आहे असे घडत नाही, कारण ही परीक्षा पद्धत ज्ञानाची नव्हे, तर पाठांतराची चाचणी घेत असते. असे पाठांतर पुढील आयुष्यातील समस्या सोडवण्यास पुरेसे नसते. त्यासाठी विचार करण्याची क्षमता विकसित व्हावी लागते. मुलांना एखादा विषय सर्व बाजूंनी समजणे आणि त्यावर त्यांनी स्वत: विचार करणे हे कौशल्य आताच्या शिक्षण पद्धतीत समाविष्ट नाही, याबद्दल शिक्षणक्षेत्रातल्या कुणालाही जराही खंत नाही. मात्र, सीबीएसईने नेमके हेच केले आणि विद्यार्थ्यांला विचार करण्यास प्रवृत्त करता येणारी ‘मुक्त पाठय़क्रम परीक्षा’ अशी नवी पद्धत अमलात आणण्याचे ठरवले आणि २०१४ च्या मार्चमध्ये नववी आणि अकरावीच्या परीक्षा याच पद्धतीने घेण्यासाठी तयारीही नुकतीच पूर्ण केली.
‘कोण कोणास म्हणाले’, ‘एका वाक्यात उत्तर द्या’, ‘जोडय़ा लावा’, ‘अर्थ लिहा’ अशा प्रश्नांमधून विद्यार्थ्यांला विषय किती खोल समजला आहे, ते कळू शकत नाही. केवळ पाठांतराने अशा प्रश्नांची अचूक उत्तरे देता येतात. घोकंपट्टीने विषय समजत नाही, मात्र उत्तम गुण मिळतात. गेल्या काही दशकांत ज्ञानाच्या कक्षा ज्या प्रचंड गतीने रुंदावत आहेत, ती गती पकडण्यासाठी आपली शिक्षणपद्धती कुचकामी आहे आणि ती अजूनही मेकॉलेच्या मानसिकतेतून बाहेर येऊ शकलेली नाही. आधीच दिलेल्या अभ्यास विषयावरील संकल्पनेवर भर देणारे प्रश्न विचारणारी सीबीएसईची ही नवी पद्धत आहे. त्यामुळे एखाद्या विषयाच्या सर्व बाजू तपासून पाहण्याची सवय लागते. ही सवय जगताना येणारे प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. नवे ज्ञान मिळवताना कुतूहल जागे राहणे आवश्यक असते. पु. ल. देशपांडे यांनी कुतूहल मारून टाकणाऱ्या वृत्तीला ‘गप्प बसा संस्कृती’ म्हटले होते. ही संस्कृती गेली अनेक दशके आपल्या राज्यकर्त्यांनी मनोमन जपली. त्यात त्रास कमी असतो आणि नवे प्रश्न निर्माण होत नाहीत. झापडबंद सरकारी यंत्रणा नेहमीच अशा सोप्या व्यवस्थेला शरण जातात. जे सीबीएसईला जमले, ते महाराष्ट्राला का जमले नाही, याचे उत्तर शिक्षणातील राजकारण्यांची वाढती ढवळाढवळ असे आहे. सव्वाशे कोटींच्या देशात सर्वात कमी कष्टात सर्वाधिक पैसा मिळवून देणाऱ्या शिक्षणाच्या व्यवसायाचे धंद्यात रूपांतर होण्यास राजकारण्यांनी सर्वात जास्त हातभार लावला. त्यामुळे शिक्षण संस्था काढणे हा एक प्रतिष्ठेचा आणि तरीही बक्कळ पैसा मिळवून देणारा धंदा सुरू झाला. मोठय़ा कढईत एकाचवेळी शेकडो जिलब्या तळून बाहेर काढतात, तसे विद्यार्थी परीक्षेच्या ठरीव मांडवाखालून बाहेर काढायचे. शिक्षकांच्या नेमणुकांमध्ये वशिलेबाजी करायची आणि विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत भ्रष्टाचार करायचा. त्यामुळे वर्गात प्रश्न विचारणाऱ्या मुलांना उत्तरे देऊ न शकणारे शिक्षक हाच आदर्श निर्माण झाला.
सीबीएसईच्या नव्या पद्धतीत विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शिक्षकांची जबाबदारी वाढणार आहे. नव्या जगातील नवे ज्ञान संपादन करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली क्षमता वाढवणे हे अधिक आवश्यक ठरणार आहे. एखाद्या विषयातील सर्व बाजू समजावून घेणे हे कर्तव्य ठरणार आहे. ज्ञानार्जनाच्या पद्धतीत असा विधायक बदल होणे यापूर्वीच आवश्यक होते. तसे न झाल्याने दहावी आणि बारावी झालेल्या प्रत्येकाला विशिष्ट अभ्यासक्रमासाठी पुन्हा प्रवेश परीक्षा देणे भाग पडते आहे. सध्याच्या परीक्षा पद्धतीवरील हा अविश्वास दूर करण्यासाठी नव्या कल्पनांना सामोरे जाण्याएवढी स्वागतशीलता जर शिक्षकांनी बाळगली, तर पुढची पिढी विचार करू शकणारी होऊ शकेल. ‘ज्ञान असे दिले पाहिजे, की शिक्षकाची गरज हळूहळू संपत गेली पाहिजे,’ हा केवळ सुविचार नाही; ती कृतीत आणायची संकल्पना आहे. महाराष्ट्रात सरकारी बाबू आणि अनभिज्ञ मंत्री यांचे साटेलोटे झाल्याने, असे बदल घडणे दुरापास्त आहे.