श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘संत शोधण्याच्या फंदात पडू नये, आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करीत आपल्याकडे चालत येतील’’(चरित्रातील संतविषयक वचने, क्र. ९९). इथे जी इच्छा बलवत्तर हवी आहे, ती कोणती? तर अर्थातच जीवनातलं सत्य शोधण्याची, परमात्मप्राप्तीची इच्छाच इथे अभिप्रेत आहे. त्या हेतूनंच तर आपण आपली उपासना सुरू केली असते. ती उपासना जसजशी सातत्यानं, चिकाटीनं आणि आर्ततेनं वाढत जाईल तसतशी आपली ही इच्छा बलवत्तर होईल. श्रीमहाराज सांगतात, ‘‘ज्याप्रमाणे खडीसाखर ठेवली म्हणजे मुंगळ्यांना आमंत्रण देण्याची जरूर नाही, ते आपोआपच तिचा शोध काढीत येतात, कारण ती त्यांना फार आवडते; त्याचप्रमाणे तुम्ही खडीसाखर बना, म्हणजे संत तुमच्या भेटीला धावतच येतील आणि तुमचे काम करून देतील. ‘खडीसाखर बना’ म्हणजे संतांना आवडेल असे वर्तन करा. संतांना काय आवडते? भगवंताचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याशिवाय त्यांना कोणतीही गोष्ट प्रिय नाही. म्हणून आपल्या हृदयामध्ये अखंड नामाची ज्योत तेवत ठेवा’’(चरित्रातील संतविषयक वचने, क्र. १००). आता एखाद्याच्या मनात येईल की जो पतिव्रतेप्रमाणे परमात्म्याशी एकरूप आणि त्यामुळेच अभिन्न झाला आहे, तो माझ्यासारख्या क्षुद्र जिवाकडे कशाला धावत येईल? पतिपुढे त्याला ‘खडीसाखरे’ची काय गोडी असणार? श्रीमहाराज त्याचं उत्तर देताना सांगतात, ‘‘संत आत्मानंदाच्या मानसरोवरातच न राहता प्रपंचाच्या डबक्यात आणि त्यातल्या चिखलात आले, त्या घाण पाण्याची संतांनी भगवंताच्या प्रेमाची गंगा बनविली, हीच त्यांची खरी करामत होय. त्या डबक्यातले पाणी अर्थात मुळामध्ये शुद्ध उगमातूनच आलेले आहे’’ (चरित्रातील संतविषयक वचने, क्र. ९८). तेव्हा संत प्रपंचाच्या डबक्यात आले कारण त्यातलं घाण झालेलं पाणी हे मुळात शुद्ध उगमातून आलेलं आहे. शुद्ध उगम म्हणजे परमात्मा! तर प्रत्येक जीव परमात्म्याचाच अंश आहे. त्याला पुन्हा परमात्ममय करण्यासाठीच सद्गुरू या जंजाळात स्वत: उतरले. त्यांनी माझ्या बाह्य़रूपात बदल केला नाही, माझा प्रपंच, माझं घरदार तसंच ठेवलं पण त्याच घाण पाण्यात भगवंताच्या प्रेमाचं औषध टाकून त्यांनी त्याच पाण्याची गंगा बनवून दाखविली. प्रपंच वरकरणी तसाच ठेवला पण त्यातला संकुचितपणा काढून टाकला. माझं बाह्य़रूप तेच ठेवलं पण अंतरंग पूर्ण बदलून टाकलं. हे सगळं घडावं यासाठी मी याच डबक्यात राहून त्या एकाच नामाचा घोष मात्र करीत राहिलं पाहिजे. त्या नामाच्या हाकेला सद्गुरू धावत येतात आणि ते नाम काम करतं, हेच सिद्ध करतात! माझ्यासारख्या सामान्य जिवाचं, त्याच्या कुवतीनुसार होणारं नामसुद्धा परमात्म्यापर्यंत पोहोचतं आणि म्हणूनच सद्गुरू त्या हाकेला ‘ओ’ देतात हे माझ्या जीवनातील त्यांच्या प्रवेशानंच सिद्ध होतं. श्रीमहाराज सांगतात, ‘‘भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात थोर उपकार आहे!’’ (चरित्रातील संतविषयक वचने, क्र. ६८).
संग्रहित लेख, दिनांक 18th Oct 2013 रोजी प्रकाशित
२०४. श्रेष्ठ उपकार
श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘संत शोधण्याच्या फंदात पडू नये, आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच
First published on: 18-10-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitany chintan 204 great kindness