आधाराशिवाय या जगात कोणीच जगत नाही. माणसाला आधार तरी का लागतो? तर आपल्यात जी अपूर्णता आहे ती भरून काढण्यासाठी आपण आधार शोधत असतो. तो आधार आपण इतर माणसांमध्ये शोधतो, म्हणून आपल्या उपयोगाची अशी माणसं जोडत राहतो. त्यांच्याशी नातं टिकावं आणि त्यायोगे त्यांचा आधार टिकावा, अशी धडपड करतो. हा आधार आपण पैशातही शोधतो. पैसा आहे तर जगात मान आहे, पैसा आहे तर भौतिक सुविधा आहेत, या भावनेतून शक्य त्या सर्व मार्गानी आपल्याकडे पैसा यावा आणि तो साठावा, असा प्रयत्न आपण करतो. हा आधार आपण परिस्थितीतही शोधतो. आपल्या भोवतालची तसेच आपली स्वत:ची परिस्थिती चांगली राहिली तर आपलं जीवन सुखाचं होईल, या भावनेतून परिस्थिती सतत आपल्याला अनुकूल राहावी, अशी धडपड आपण करतो. तेव्हा व्यक्ती, पैसा आणि परिस्थिती यात आपण आपला आधार सतत शोधत असतो. या आधारानं आपण निश्िंचत होऊ, निर्भय होऊ, अशी आपली कल्पना असते. पण जसे आपण अपूर्ण असतो तेच अपूर्णत्व पैसा, व्यक्ती व परिस्थितीतही आहे. पैसा, व्यक्ती, परिस्थितीलाही मर्यादा आहेत. परिस्थिती, व्यक्ती आणि पैसा कधीच स्थिर नसतो; त्यामुळे आपले हे आधार कधीच कायमचे राहू शकत नाहीत. श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘प्रत्येक माणसाला आधार लागतो. पण आपण अपूर्णाचा आधार धरल्यामुळे आपल्याला निर्भयता येत नाही. यासाठी भगवंताचा आधार हवा’’(चरित्रातील भक्तीविषयक वचने, क्र. २६). जिथे अपूर्णता आहे तिथे अस्थिरता आहे, भय, अशांती, असमाधान आहे. त्या अपूर्णतेवर मात करण्यासाठी आपण आधार शोधतो आणि असा आधार मिळाला की जीवनातील उणिवेवर, त्रुटीवर मात केल्याच्या भावनेतून समाधानीही होतो. पैसा गाठीशी बराच साठला की मनाची वृत्ती समाधानी होते. हाच पैसा आटला की ते समाधान ओसरते. समाजात नावलौकिक असलेल्या व्यक्तीचा आधार लाभला तर वृत्ती समाधानी होते, हाच आधार तुटला की ती लगेच असमाधानी होते. त्यामुळेच श्रीमहाराज सांगतात- ‘‘आपली वृत्ती परिस्थितीत अडकली असल्यामुळे ती स्थिर राहात नाही, म्हणून आपल्याला समाधान नाही’’, ‘‘वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच’’ आणि ‘‘समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळच मिळते, आणि ती मिळविण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही’’ (चरित्रातील समाधानविषयक वचने, क्र. ५, ६, ९). तेव्हा जगण्यात खरी निश्िंचती, निर्भयता, समाधान, शांती ही केवळ भगवंताच्याच आधारानं मिळेल, अशी सर्वच सत्पुरुषांची ग्वाही आहे. हा परम आधार मिळावा म्हणून प्रयत्न करणं, अभ्यास करणं, भक्ती करणं हा दुबळेपणा नाही. उलट तो व्यक्तीच्या आत्मिक विकासाचा मोठा मार्ग आहे. कोणत्याही वयातला, कोणत्याही स्थितीतला, कोणत्याही वृत्तीचा माणूस या मार्गानं गेला तर मुक्कामाला पोहोचल्याशिवाय राहाणार नाही. त्यासाठी या परम आधाराचा आग्रह संतांनी का धरला, हे सूक्ष्मपणानं जाणून घेऊ.