नामात भगवंत आहे, हे जाणून घेण्यास श्रीगोंदवलेकर महाराज सांगत आहेत. थोडक्यात नामातलं सत्यत्व जाणलं पाहिजे. नाम ‘खरं’ कधी वाटेल? समजा रस्त्यानं जात असताना लांबवर एक व्यक्ती तुम्हाला दिसली. तिचं नेमकं नाव तुम्हाला आठवत नाही, पण त्याचं अमुक एक नाव आहे, असं वाटून त्या नावानं तुम्ही त्याला हाक मारलीत. ते नाव ऐकूनही त्यानं जर लक्ष दिलं नाही, तर ते नाव त्याचं नाहीच! जर त्यानं लगेच लक्ष दिलं तर तेच त्याचं खरं नाव आहे, हे उघड होईल. तेव्हा नामात भगवंत आहे, हे कधी जाणता येईल? जेव्हा त्या हाकेला तो ‘ओ’ देईल! त्या हाकेकडे लक्ष देईल. आता आपण रस्त्यानं जाताना कुणी आपल्या नावानं समजा हाक मारली तर, ‘हे नाव काय शेकडो माणसांचं आहे,’ असं मानून आपण त्या हाकेकडे दुर्लक्ष करीत नाही. उलट आपल्यालाच हाक मारली आहे, असं वाटून लगेच वळून पाहातो. मग नामापासून जो अभिन्नच आहे, तो ते नाम उच्चारताच लक्ष देणार नाही का? एकमेव अट मात्र आहे! ते नाम ‘भक्ती’नं घ्यायला हवं, तळमळीनं घ्यायला हवं, आर्तपणे घ्यायला हवं. समजा आपण खोल पाण्यात पडलो आहोत आणि आपल्याला पोहता येत नाही तर ‘वाचवा वाचवा’ हे आपण किती आर्तपणे ओरडू! दिवसातून किती वेळा तसं ओरडलं की पुरेल, पुटपुटल्यासारखं ओरडावं का, माळेवर ओरडावं का, आधी शुचिर्भूत होऊन ओरडावं का; वगैरे नियम काही आपण पाहाणार नाही. आपण वाचवले जाईपर्यंत किंवा आपल्याला वाचवायला कुणी येईपर्यंत आपण न थकता, न थांबता ओरडू; त्या सातत्यानं, त्या कळकळीनं, त्या तळमळीनं नाम घ्यायला पाहिजे. (आता याचा अर्थ स्नान न करताच, शुचिर्भूत न होताच, माळ न घेताच नाम घ्यावं, असा नाही, पण ते झालं नाही तरी नाम घेणं मात्र सोडू नये, हा आहे.) मग जेव्हा कुणी वाचवायला येईल तेव्हा त्या ‘वाचवा वाचवा’चा उपयोग झाला, हे लक्षात येईल. त्या ओरडण्याचं सार्थक वाटेल. ज्याचं नाम घेतलं तो मदतीला आला, हे जाणून ‘नामात भगवंत आहे’ याची प्रचीती येईल! आता ती प्रचीती कशी येते, हे नंतर पाहूच. पण ती येण्यासाठी नाम सोडता कामा नये. ते अखंड घेण्याचा प्रयत्न सोडता कामा नये. श्रीमहाराज सांगतात, ‘‘कोणतीही वृत्ती मनात उठू न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही. देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच. नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. नाम एकदा मुखात आले म्हणजे देव हातात आलाच. मुले पतंग उडवितात; त्यावेळी एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनासा होतो. तरी तो पतंग उडविणारा म्हणतो, ‘माझ्या हातात पतंग आहेच’. कारण पतंगाचा दोरा त्याच्या हातात असतो. जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला!’’(१३ जुलैच्या प्रवचनातून). तेव्हा नाम अखंड हवं आणि ते मनात कोणतीही वृत्ती उठू न देता हवं, मग देव लांब नाहीच. किंबहुना वृत्ती उठत असते त्यामुळेच हातातून नामाची दोरी सुटत असते!
संग्रहित लेख, दिनांक 14th Oct 2013 रोजी प्रकाशित
चैतन्य चिंतन २००. पतंग
नामात भगवंत आहे, हे जाणून घेण्यास श्रीगोंदवलेकर महाराज सांगत आहेत. थोडक्यात नामातलं सत्यत्व जाणलं पाहिजे. नाम ‘खरं’ कधी वाटेल?
First published on: 14-10-2013 at 01:00 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan 200 kite