दिवसभरात जेवढा रिकामा वेळ मिळतो तो आपण नामाकडे लावत नाही. त्यामुळे निदान दिवसातला ठरावीक वेळ नामाकडे लावण्याचा प्रथम अभ्यास केला पाहिजे. श्रीगोंदवलेकर महाराजच सांगतात की, सुरुवातीला नियम फार करू नये. नाहीतर तो तोडण्यासाठी बुद्धी नाना उपाय शोधील. त्यामुळे नेम थोडा असावा पण तो प्राणाइतका सांभाळावा. एकदा ठरलेला नेम नियमाने, सातत्याने पार पडू लागला की मग दिवसभरातला वाया जाणारा आपला वेळही शोधावा आणि त्याचाही उपयोग करावा. श्रीगोंदवलेकर महाराजांनी एक फार सुंदर रूपक वापरलं आहे. घरात भाज्या, अन्नधान्य फार थोडं असलं तरी एखादी सुगरण स्त्री जसं आहे त्यात उत्तम स्वयंपाक करते तसा आपल्या वेळेचा अत्यंत काटकसरीनं वापर करून उरलेला वेळ साधनेकडे वळवावा, असं श्रीमहाराज सांगतात. ते साधण्याचा एक उपाय आहे तो म्हणजे जगाच्या नादी फारसे न लागण्याचा! खरं तर जग आपल्यातच मश्गुल असतं, पण आपणच जगानं आपलं व्हावं आणि आपण जगाचं व्हावं, यासाठी कितीतरी आटापिटा करत असतो. त्यातून मग आत्मस्तुती, परनिंदा, परदोषचिंतन या सर्व गोष्टी आपोआप सुरू होतात. त्यामुळे जगाच्या मागे अकारण धावण्यात वेळ घालवण्यापेक्षा तो नामात कसा जाईल, याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. या जोडीला श्रीमहाराज सुचवतात की, देवासंबंधी संतांनी लिहिलेली पुस्तके रोज थोडी वाचावी, त्यावर मनन करावे, आणि ते आपल्या आचरणात कसे येईल, याचा सूक्ष्म विचार करावा. आता काहीजण देवाचं म्हणून रोज काही ग्रंथ वाचतात. काहीजण एकत्र येऊनही वाचतात. त्यावर चर्चा करतात. पोथीतला विषय आणि आजचं जगणं, याची तुलना जरूर व्हावी. पण त्याचा हेतू आपल्या जगण्याला वळण लावण्यासाठी असावा. आपल्या चुका टाळण्यासाठी असावा. आपलं कसं होतं? काहीजण एकनाथी भागवत वाचत होते. त्यात वासुदेवांकडे नारदमुनि येतात, तो भाग आला. वासुदेव नारदांना सांगतात की, मला ज्ञान द्या. मुनिश्वर म्हणतात, प्रत्यक्ष परमात्मा तुमचा पुत्र असताना मी काय ज्ञान देणार? वासुदेव म्हणतात, पूर्वीच्या जन्मी मी घोर तपश्चर्या केली आणि परमात्मा प्रसन्न झाला. वर माग म्हणाला. मी पुत्रमोहानं ग्रासलो आणि म्हणालो, तू माझ्या घरी पुत्र म्हणून जन्म घ्यावास. आता तो पुत्र झाला आहे पण मला ज्ञान देत नाही. मी काही विचारलं तर नम्रपणे म्हणतो, आपण वडील, मी आपल्याला काय सांगणार? तो माझं ऐकत नाही.. झालं. मग चर्चा सुरू होते, परमात्म्याचं सोडा हो, पण अलीकडे खरंच मुलं आईवडिलांचं काही ऐकत नाहीत. मग लग्न झाल्यावर मुलं कशी बदलतात, अमकीचं बिचारीचं काय झालं, तमकीनं कसा सुनेला धडा शिकवला.. अशी चर्चा घरंगळत जाते. ते बिचारे वासुदेव आणि नारदमुनी ताटकळत थांबून असतात. मग कुणाला तरी आठवण होते आणि भागवत पुन्हा सुरू होतं. तर असं पोथीवाचन होऊ नये. भौतिक परायणता सुटावी म्हणून पोथीचं पारायण करायचं आहे, हे लक्षात असू द्यावं.
संग्रहित लेख, दिनांक 1st Nov 2013 रोजी प्रकाशित
२१४. पारायण
दिवसभरात जेवढा रिकामा वेळ मिळतो तो आपण नामाकडे लावत नाही. त्यामुळे निदान दिवसातला ठरावीक वेळ
First published on: 01-11-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan 214 preaching