भौतिकपरायणता सुटावी म्हणून पोथीचं पारायण आहे. पारायणच नव्हे तर कोणत्याही उपासनेचा हेतू एकच आहे, तो म्हणजे जगाला चिकटलेलं मन परमात्म चिंतनात चिकटावं. जगात विखुरलेलं मन परमात्म्याकडे केंद्रित व्हावं. जगाच्या अधीन असलेलं मन परमात्म तत्त्वात विलीन होण्याच्या इच्छेसाठी सन्मुख व्हावं. हे मन जगाला सुखाशेनं चिकटून आहे आणि त्यामुळेच अपेक्षाभंगाच्या दु:खाच्याही कचाटय़ात आहे. त्या ‘सुखा’च्या शोधासाठी वणवण भटकत हे मन जगात इतस्तत: विखुरलं आहे आणि म्हणूनच अशांत आहे. हे मन जगाच्या अधीन आहे, अर्थात ‘सुखा’साठी जगावर अवलंबून आहे. घट, बदल, नाश हा जगाचा नियम आहे. त्यामुळे जग सतत बदलणारं, सतत अस्थिर होणारं आहे. अशा जगाच्या अधीन असलेलं मनही त्यामुळेच अस्थिर आहे. त्या मनाला अशाश्वत जगापासून हळूहळू विलग करीत शाश्वताकडे वळविण्यासाठी उपासना आहे. आता जगानं कितीही थपडा मारल्या तरी जगाचा मोह सुटता सुटत नाही आणि परमात्म्याचा कृपास्पर्श लाभूनही त्याची जाणीवच नसल्याने त्याची ओढ वाटत नाही, अशी आपली स्थिती आहे. आता कुणी म्हणेल, जीवनात एवढं दु:खं आहे, मग त्यात कृपास्पर्श कुठला? श्रीगोंदवलेकर महाराजांचंच एक वाक्य आपण पाहिलं होतं, ‘आधी शक्ती येते, मग भोग येतो. शक्ती नसेल तर सांगायला माणूसच शिल्लक राहाणार नाही.’ आज आपल्या जीवनात दु:ख आहे. प्रत्येकाच्या जीवनात कमी-अधिक प्रमाणात दु:ख आहे. काहींचं जीवनच जणू दु:खाच्या मालिकेनं भरलं आहे. तरीही काही शक्ती आहे म्हणून प्रत्येक जण त्या दु:खातही तगून आहे. त्या दु:खावर मात करण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. ही आंतरिक शक्ती क्षीण स्वरूपात वाहात आहे. तिचा प्रवाह खुला करण्यासाठी, रुंद करण्यासाठी आणि अखेरीस अंतरंग शक्तीनेच भरून जावं, यासाठीच तर उपासना आहे. हा प्रवाह खुला कशानं होईल? तर निव्वळ तळमळीनंच तो खुला होईल. आंतरिक शक्तीच्या त्या प्रवाहाच्या मार्गात भ्रम, मोहजनित इच्छांची दगडमाती मीच टाकत गेलो, त्यामुळे तो प्रवाह आकुंचित झाला आहे. ती दगडमाती दूर करीत तो प्रवाह रुंदावण्यासाठीच तर उपासना आहे. जगाची ओढ कायम ठेवून म्हणजेच त्या आंतरिक प्रवाहावर अधिकाधिक दगड-माती टाकत जाऊन तो प्रवाह मी रुंद करू शकणार नाही. त्यामुळे मला जसजशी तळमळ लागेल तसतसा हा प्रवाह विस्तारत जाईल आणि तो पूर्ण वेगानं वाहू लागला की मला परमसुखाच्या मूळ उगमाकडेच नेईल! कारण हा प्रवाह जगाच्या दृष्टीने उलटा आहे. उगमापासून दूर वाहात जाणे, हा जगाच्या प्रवाहाचा क्रम आहे, तर बाहेरून उगमाकडे वाहात जाणे, हा आंतरिक प्रवाहाचा क्रम आहे! त्यासाठीच उपासना आहे. जप आहे. नामाने जसजशी तळमळ वाढत जाईल तसतसा हा प्रवाह खुला होत जाईल. ती तळमळच उपासनेचा प्राण आहे. आता प्रश्न असा की, नामातच जिथे तळमळ नाही, तिथे नामाने तळमळ वाढणे अशक्यच नाही का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan 215 passion
First published on: 04-11-2013 at 01:02 IST