जो प्रपंच आपण जन्मापासून करीत आहोत त्याचं खरं स्वरूप जाणायचं असेल तर डोळे मिटून नाम घेता घेता डोळे उघडे ठेवून प्रपंच केला पाहिजे! आज आपण डोळे मिटून प्रपंच करतो आणि डोळे उघडे ठेवून नाम घेतो, त्यातच सगळा गोंधळ आहे. त्यामुळेच खरा परमार्थ साधत नाही. म्हणजे काय? डोळे मिटून प्रपंच करणं म्हणजे मोह आणि भ्रमानं लिप्त होऊन, प्रपंचाचं खरं रूप न जाणताच तो करीत राहाणं. प्रपंचाच्या प्रवाहानुरूप वाहत आणि वाहवत जाऊन आपण जगत असतो. आपण काय करीत आहोत, कशात वेळ घालवत आहोत, कसे वागत आहोत, कसे वावरत आहोत, कसा विचार करीत आहोत, कसल्या कल्पना करीत आहोत; याचा क्षणभरही अंतर्मुख होऊन आपण विचार करीत नाही. आंतरिक ऊर्मीच्या आवेगाच्या प्रवाहात वाहत जाऊन आपण डोळे झाकून जगत आहोत. हा झाला डोळे मिटून सुरू असलेला प्रपंच. आता डोळे उघडे ठेवून नाम घेत आहोत, म्हणजे काय? तर नाम घेत असतानाही, उपासना करीत असतानाही क्षणमात्रदेखील प्रपंचावरची आपली नजर हटलेली नसते, सुटलेली नसते! डोळे उघडे ठेवून प्रपंच केला तरी प्रपंचाचं खरं उग्र रूप जाणवल्याशिवाय राहाणार नाही. डोळे उघडे ठेवून प्रपंच केला तर त्या प्रपंचाचं, त्यातील परिस्थितीचं, त्यातील माणसांचं, त्यातील वस्तुमात्राचं अपुरेपण जाणवल्याशिवाय राहाणार नाही. प्रपंचाचा, त्यातील वस्तुमात्रांचा, माणसांचा अशाश्वतपणा तीव्रपणे जाणवला तर मग आसक्तीचा गुंता कमी व्हायला बरीच मदत होईल. याचा अर्थ माणूस रूक्षपणे जगू लागेल, असा मात्र नाही. उलट दुसऱ्यात न अडकता दुसऱ्याबद्दल तो अधिक सहृदयही होईल. आसक्तीचं मूळ स्वार्थात आहे. स्वार्थ कमी होऊ लागेल तसतसा त्याचा दुसऱ्यासोबतचा वावर अधिक सहज होऊ लागेल. जीवन क्षणभंगूर असलं तरी त्या जीवनातल्या लहान-मोठय़ा गोष्टींचा आनंद त्यात न अडकता तो घेऊ शकेल. जीवनातल्या प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक घडामोडीत श्रीमहाराजांचा सहवासही त्याला जाणवू लागेल. अर्थात या झाल्या अगदी पुढच्या गोष्टी! सध्यापुरते पाहायचे तर जो प्रपंच डोळे मिटून सुरू आहे तोच आपण डोळे उघडे ठेवून करू. त्याचबरोबर जे नाम डोळे उघडे ठेवून सुरू आहे, ते डोळे मिटून करायला पाहिजे. पण ते आपल्या आवाक्यात नाही. तरी काही हरकत नाही. डोळे उघडे ठेवूनही नाम घेतले तरी ते काम करतेच. आता डोळे उघडे ठेवून नाम घेणे, म्हणजे काय याचा थोडा विचार करू. व्यावहारिक जगात प्रयत्न करीत असतानाच त्यातून अमुक एक फळ मिळेल, असे आपण गृहीत धरतो. किंबहुना आपला कोणताही प्रयत्न निर्हेतुक नसतोच. त्यामुळे नाम घेतानाही, त्या नामानं परमात्म्याची कृपा होईल आणि त्यायोगे प्रपंचातली कटकट मिटेल, अशी आपली सुप्त भावना असते. मग ‘डोळे उघडे ठेवून’ नाम घेताना आपली नजर प्रपंचातल्या अडचणी कमी होत आहेत की नाहीत, याकडेच असते. ‘इतकं नाम घेत असूनही जीवनात अडचणी का?’ हा प्रश्न त्यातूनच येतो आणि त्या प्रश्नामुळेच तळमळीची प्रक्रियाही सुरू होते.
संग्रहित लेख, दिनांक 11th Nov 2013 रोजी प्रकाशित
२१९. उघड-मीट
जो प्रपंच आपण जन्मापासून करीत आहोत त्याचं खरं स्वरूप जाणायचं असेल तर डोळे मिटून नाम घेता घेता डोळे उघडे ठेवून प्रपंच केला पाहिजे!
First published on: 11-11-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan 219 spirituality in family life