नामाची सतत धार धरली की ते नाम वृत्तीपर्यंत पोहोचते, असं श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात. एखाद्या पाषाणावरही सतत पाण्याची धार पडत असेल तर त्या पाषाणाचा आकारही कालांतराने बदलतो. तसं पाषाणहृदयी अशा माझ्यावर नामाची संततधार परिणाम करीलच! श्रीमहाराज सांगतात, ‘‘आपली वृत्ती आणि नाम यांना जोडणारी साखळी म्हणजे भगवंताचे नाम होय. म्हणून आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी’’ (चरित्रातील नामविषयक वचने, क्र. २९). आज आपली वृत्ती ही आपल्याला भौतिकाकडे, अशाश्वताकडे प्रवृत्त करणारी आहे. ती भगवंताकडे एकदम प्रवृत्त होणे शक्य नाही. त्यासाठी माझी आताची वृत्ती कशीही असली तरी भगवंताचं नाम मी घेऊ शकतो. ते नामच हळुहळू माझ्या अंतरंगात भगवंताची जाणीव निर्माण करील आणि वाढवील. भगवंत कसा आहे, आपल्याला माहीत नाही. त्याचं रूप आणि खरं स्वरूपही आपण जाणत नाही. जो आपल्या परिचयाचा आहे, त्याचं नावही म्हणूनच आपल्या लेखी सजीव असतं. पण ज्या भगवंताला आपण जाणत नाही, ज्याचं कधी दर्शन झालेलं नाही, त्याचं नाम आपण कोरडेपणानं घेत असतो. तरीही काही हरकत नाही. कारण ते नाम भगवंताचं आहे, एवढी तरी जाणीव सूक्ष्मपणे असते आणि तीच हळूहळू भगवंताची जाणीवही निर्माण करते. या प्रक्रियेचा उलगडा करताना श्रीमहाराज म्हणतात, ‘‘एखाद्या माणसाची आपली ओळख असेल तर पहिल्याने त्याचे रूप पुढे येते आणि नंतर नाम येते; पण आपली त्याची ओळख नसेल, आणि आपण त्याला बघितलेला नसेल, तर त्याचे नाव आधी येते आणि नंतर रूप येते. आज आपल्याला भगवंताची ओळख नाही म्हणून त्याचे रूप माहिती नाही. परंतु आपल्याला त्याचे नाम घेता येईल. आजसुद्धा त्याचे नाम घेताना त्याचीच आठवण होते, हा आपला अनुभव आहेच. समजा, राम या नावाचा आपला एक मित्र आहे आणि राम या नावाचा आपला एक गडीही आहे. पण आपण ‘श्रीराम श्रीराम’ असा जप करीत असताना आपल्याला आपल्या मित्राची किंवा गडय़ाची आठवण होत नाही. आपल्याला भगवंताची आठवण होते’’ (चरित्रातील नामविषयक वचने, क्र. ५२). तेव्हा भौतिकात वृत्ती रूतली असली तरी भगवंताचं नाम घेत असताना अगदी सूक्ष्मपणे भगवंताचं स्मरण अंतरंगात शिरकाव करतं. या नामानं आपले अवगुण कळू लागतात, हाच नामाचा पहिला अनुभव असतो. नाम घ्यायला लागलं की मनात विचारांचा झंझावात सुरू होतो, अनेक गोष्टींची काळजी मनात निर्माण होते, असं आपण म्हणतो. प्रत्यक्षात हा देखील नामाचाच परिणाम असतो. एखादं घाण पाणी, गाळ आणि कचऱ्यानं साचलेलं गटार आहे आणि त्याच्यावर जोरात पाणी पडू लागलं तर काय होईल? घाण पाणी वेगानं भसभसा बाहेर उडेल. तसंच नामाच्या माऱ्यानं आपल्याच मनातला विचारांचा कोलाहल, गोंधळ, अस्वस्थता, अस्थिरता, विसंगती, विकार, वासना वगैरे उसळून बाहेर पडू लागतील. अवगुण आणि विकारांच्या उग्र दर्शनानं मन भांबावून जाईल.