नारायणे दिला वसतीस ठाव। ठेवूनिया भाव ठेलो पायी।। सद्गुरूंनी चरणांपाशी आश्रय दिला आणि मी सर्व भावानिशी त्या चरणांशी, म्हणजेच सद्गुरूंनी दाखविलेल्या बोधरूपी वाटेशी एकरूप झालो. केवळ भावबळानंच हे साधता येतं, असं तुकाराममहाराज सांगतात. ‘भाव तोचि भगवंत’ असं सूत्रच तुकाराममहाराजांनी एका अभंगात सांगून टाकलं आहे. म्हणजेच भाव शुद्ध असेल तर भगवंताची प्राप्ती होते. एका अभंगात ते सांगतात, ‘‘भाव तैसें फळ। न चले देवापाशीं बळ।।’’ जसा भाव असेल तसेच फळ प्राप्त होईल. भगवंतापाशी शुद्ध भावाशिवाय इतर सर्वच गोष्टी निष्प्रभ ठरतात. आपण साधना का करतो? नेहमीच्या जगण्याच्या धावपळीत मनाला थोडी विश्रांती मिळते, मन थोडा वेळ शांत होते म्हणून सुरुवातीला आपण काहीबाही साधना करू लागतो. नंतर मनाला कायमची विश्रांती, कायमची शांती, कायमचे स्थैर्य, कायमची निश्चिंती व निर्भयता मिळावी, ही आस निर्माण होते. आपल्या जीवनातील अपूर्णतेचं नेमकं स्वरूप उकलत नसलं तरी त्या अपूर्णतेची जाणीव अस्वस्थ करू लागते. परमपूर्ण असा भगवंतच आहे, आपलं आत्मस्वरूप त्याचाच अंश आहे, असं संत सांगतात. त्या भगवंताची प्राप्ती झाली तर जीवनातील सर्व अपूर्णता दूर होईल, ती दूर झाली की जीवन संकटरहित, अडचणीरहित, सतत आनंदी होईल, या भावनेनं आपण मग साधना करू लागतो. भगवंत म्हणजे नेमका काय, आत्मस्वरूप म्हणजे नेमकं काय, याचं पूर्ण आकलन नसतानाही आपण त्याच्या प्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित होऊन साधना करू लागतो. ही साधना जसजशी प्रामाणिकपणे आणि सातत्याने होत जाते तसतशी जगण्याची दृष्टीच बदलू लागते. साधनेनं जगण्याची चौकट बदलत नाही पण जगण्याची दृष्टी बदलते. जगणं संकटरहित, अडचणीरहित, दु:खमुक्त होऊच शकत नाही, या वास्तवाची जाणीव होते. त्या संकटांनी, अडचणींनी, दु:खांनी पूर्वीसारखं उन्मळून पडायला होत नाही. धैर्य आणि सहनशीलता वाढत असते. ‘तो’ सांभाळतोच आहे, ही भावना वाढीस लागते. श्रीगोंदवलेकर महाराजांनी साधनेचं हे मर्म प्रकाशित करताना म्हटलं आहे की, ‘‘भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे; एक, प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी, आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी’’ (प्रवचने, १२ जानेवारी). याचाच अर्थ, साधनेनं प्रपंचाचं खरं स्वरूप समजू लागतं. खरं स्वरूप एकदा जाणवू लागलं की भ्रामक आसक्तीपायी त्यातलं आपलं गुंतणं आणि आपली फरपट कळू लागते. ती फरपट संपत नाही पण निश्चितच कमी होऊ लागते. प्रपंचाचं वास्तविक अर्थात संकुचित स्वरूप उकलू लागतं आणि अज्ञात पण व्यापक भगवंताच्या प्राप्तीची ओढ वाढू लागते. भाव शुद्ध होत जातो तसतशी ही प्रक्रिया घडत जाते. हा भाव शुद्ध कसा व्हावा? श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘संतांच्या घरी नुसते पडून राहिल्यानेही शुद्ध भाव येईल’’ (प्रवचने, ६ जुलै). भाव शुद्ध होण्याचा हा अत्यंत सोपा आणि तितकाच अत्यंत कठीण असा उपाय आहे!
संग्रहित लेख, दिनांक 29th Aug 2013 रोजी प्रकाशित
१७०. भावशुद्धी
नारायणे दिला वसतीस ठाव। ठेवूनिया भाव ठेलो पायी।। सद्गुरूंनी चरणांपाशी आश्रय दिला आणि मी सर्व भावानिशी त्या चरणांशी, म्हणजेच सद्गुरूंनी दाखविलेल्या बोधरूपी वाटेशी एकरूप झालो.
First published on: 29-08-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan emotional purification