जो तिथीवार सांगून येत नाही, त्याला अ-तिथी म्हणतात. तसा आपल्या जीवनात परमात्मा हा अतिथी बनून आला आहे, तो कसा? आपण आपल्याशीच विचार करा. हे सदर तुम्ही वाचत आहात, त्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे अध्यात्माकडे तुमचा ओढा आहे. मनात भगवंताविषयी काहीतरी प्रेम आहे. हे प्रेम तुमच्या मनात नेमकं कधी उत्पन्न झालं, याची तिथीवार सांगता येते? नाही! भक्तीकडे आपण कसे वळलो, हे फार तर सांगता येईल पण त्या भक्तीचं बीज मनात कधी पेरलं गेलं होतं आणि त्याला पहिला कोंब कधी फुटला, हे सांगता येणार नाही. तर परमात्मा असा आपल्या जीवनात कधीचाच आला आहे. तो तिथीवार न सांगता जसा आला आहे तसाच कोणत्याही तिथीला तो जाणाराही नाही. त्यामुळेच तो अतिथीच आहे. मग असा जो माझ्या जीवनात कधीचाच आला आहे, त्याला मी माझ्या प्रपंचात आणखी वेगळं ते काय आणायचं, असा प्रश्न कुणाच्या मनात येईल. त्याला मी प्रपंचात आणायचं याचं कारण की, तो माझ्या जीवनात आहेच, माझ्या जीवनाचा प्रवाह त्याच्याच सत्तेनं वाहात आहे, याचं मला विस्मरण झालं आहे. आपण रामाचा जन्म करतो, कृष्णाचा जन्म करतो. त्या जन्माच्या दुसऱ्या दिवसापासून परमात्म्याचा जन्म आपल्या घरी झाला आहे, हे मानतो का? नाही. आपलं जगणं पूर्ववत देहबुद्धीच्याच तालावर सुरू राहातं. भगवंताच्या जन्माचं विस्मरण होतं म्हणून तर त्याचं स्मरण राखण्यासाठी दरवर्षी जन्म करावा लागतो! तसा परमात्मा माझ्या जीवनात आहेच पण त्याचं विस्मरण झाल्यामुळे त्याला त्या प्रपंचात आणल्याचा भाव रुजवावा लागतो. आता पुन्हा एकवार तोच प्रश्न येईल की जगताना परमात्म्याची गरज काय? काहीजण त्याहीपुढे जाऊन सांगतील की, परमात्म्याच्या आधाराची गरज वाटणे ही मानसिक दुर्बलताच आहे. माणसानं स्वत:च्या जोरावर काय ते करावं. जे असं मानत असतील आणि खरोखर त्याप्रमाणे जगत असतील त्यांना मन:पूर्वक नमस्कार! पण स्वकर्तृत्वाच्या घमेंडीतून जो अहंभाव वाढतो तो आपल्या क्षमतांविषयीही गैरसमज रुजवतो आणि हा अहंभाव आपल्याइतकाच दुसऱ्यांसाठीही त्रासदायकच ठरतो. काहीजण दुसऱ्या माणसांचा आधार खरा मानतात आणि परमात्म्यापेक्षा माणसानंच माणसासाठी उभं राहिलं पाहिजे, असं मानतात. पण यापैकी कुणीच परमात्म्याच्या आधाराचा जो आग्रह संतांनी धरला, त्यामागचं रहस्य जाणून घेत नाहीत. परमात्म्याचा आधार म्हणजे काय हो? जो खऱ्या अर्थानं परमात्म्यावर विसंबून जगतो तो कर्तव्यात कुचराई करीत नाही पण कर्तव्यफळाच्या आसक्तीतून सुटतो. तो अनाग्रही, अनासक्त होत जातो. त्याच्यातला दुराग्रह, हट्टाग्रह कमी होऊ लागतो. दाता एक भगवंतच आहे, या जाणिवेतून त्याच्यातली परिस्थितीशरणता आणि लाचारी कमी होऊ लागते. जो या घडीला अज्ञात आहे, त्याचा आधार धरून कर्तव्य बजावत जगणं हा कमकुवतपणा नाही. त्यासाठी मनाची फार मोठी ताकद लागते. श्रद्धा म्हणजे दुबळेपणा नव्हे, ती फार मोठी शक्ती आहे. या परम आधाराचं रहस्य त्यासाठी अधिक जाणून घेऊ.