प्रियदर्शिनी कर्वे

पर्यावरण-विज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, न्याय

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

पृथ्वीचे ‘पुनर्जीवन’ करायचे आहेच, पण म्हणून पूर्णत: निसर्गाधारित जीवनशैली तर परवडणारी नाही… जगाची लोकसंख्या येत्या काळात १० अब्जांवर जाणार, तेव्हा पृथ्वीचेही आरोग्य टिकवण्यासाठी आपण काय करणार आहोत?

२२ एप्रिल हा दिवस जगभरात ‘वसुंधरा दिवस’- अर्थ डे- म्हणून साजरा केला जातो. पहिला वसुंधरा दिवस २२ एप्रिल १९७० रोजी अमेरिकेत साजरा झाला. यामागे दोन प्रेरणा होत्या. १९६२ साली रेचल कार्सन यांचे ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यामध्ये कीटकनाशकांच्या अतिरेकी वापराचे जीवसृष्टीवर कसे अनिष्ट परिणाम होत आहेत, याचे अत्यंत प्रभावी वर्णन केलेले होते. अनेक भाषांमध्ये या पुस्तकाची भाषांतरे झाली. पृथ्वीच्या पर्यावरणात माणसांचा वाढणारा हस्तक्षेप आणि त्याचे परिणाम यांबद्दल चर्चा आणि चिकित्सा या पुस्तकामुळे अमेरिकेतच नाही, तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीची फळे चाखणाऱ्या आणि चाखू पाहणाऱ्या सर्वच देशांमध्ये सुरू झाली.

या विचारचक्राला जोड मिळाली ती एका अनोख्या छायाचित्राची. २४ डिसेंबर १९६८ या दिवशी अपोलो-८ या अमेरिकेच्या यानातील तीन अंतराळवीर (फ्रँक बोरमन, जेम्स लॉवेल आणि विल्यम अँडर्स) हे चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारे पहिले मानव ठरले. माणसाने चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या प्रवासातला हा एक महत्त्वाचा टप्पा होता. या यानाने चंद्राला दहा प्रदक्षिणा घातल्या. चौथ्या प्रदक्षिणेत चंद्राच्या अंधाऱ्या बाजूकडून पुन्हा उजेडाकडे येत असतानाच या तिघांनी यानाच्या एका खिडकीतून एक विलक्षण आविष्कार पाहिला… चंद्राच्या क्षितिजावर पृथ्वीचा उदय होत होता. विल्यम अँडर्स हे या मोहिमेतील अधिकृत छायाचित्रकार होते. त्यांनी चपळाईने आपला कॅमेरा उचलून या दृश्याची छायाचित्रे टिपली. पण त्या वेळी कॅमेऱ्यात कृष्णधवल चित्रफीत होती. कॅमेऱ्यातील चित्रफीत बदलेपर्यंत खिडकीतून पृथ्वी दिसेनाशी झाली. पण काही सेकंदातच ती पुन्हा अवतरली; यानाच्या दुसऱ्या खिडकीबाहेर. पटकन अँडर्स यांनी काही रंगीत छायाचित्रेही टिपली. २७ डिसेंबरला हे यान सुखरूप पृथ्वीवर परतले आणि त्यानंतर काही दिवसांनी ही छायाचित्रे जगापुढे आली.

१९६०च्या दशकाची अखेरची वर्षे खूपच अशांततेची आणि अस्वस्थतेची होती. अमेरिका व रशियातील शीतयुद्धाचे पडसाद जगभर उमटत होते. अण्वस्त्रसज्ज अशा या दोन महासत्ता वेगवेगळ्या आघाड्यांवर एकमेकींशी भिडत होत्या आणि तिसऱ्या व सर्वात विनाशकारी महायुद्धाचा भडका उडतो की काय, अशी परिस्थिती होती. त्याच वेळी खनिज इंधने, इतर विविध प्रकारची रसायने यांचा विविध क्षेत्रांतला वापर वाढत चालला होता. विकसित जगात हवा व पाण्याच्या प्रदूषणावर कोणाचेही नियंत्रण नव्हते. याचे नैसर्गिक परिसंस्थांवर आणि मानवी आरोग्यावरही होत असलेले दुष्परिणाम पुढे येत होते.

या अशा परिस्थितीत ‘अर्थराइझ’ या शीर्षकासह ही कृष्णधवल आणि रंगीत छायाचित्रे प्रथम अमेरिकन प्रसारमाध्यमांमधून आणि नंतर जगातील इतर ठिकाणच्या प्रसारमाध्यमांद्वारे कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली. चंद्राचा निर्जीव असा करडा पृष्ठभाग, त्याच्यामागे अनंत विश्वाची पूर्ण काळी पार्श्वभूमी, आणि या दोन्हीच्या मध्ये एकाकी, विलक्षण देखणी अशी निळी-पांढरी पृथ्वी. आजही हे छायाचित्र बघणाऱ्याला एका वेगळीच अनुभूती देते. पहिल्यांदाच पृथ्वीचे अवकाशातून दिसणारे रूप पाहणाऱ्यांची मनोवस्था काय झाली असेल, याची आज आपण फक्त कल्पनाच करू शकतो.

अपरिमित अशा विश्वाच्या एका कोपऱ्यातली आपली ही सौरमाला आणि त्यातली आपले घर असलेली ही निळी वसुंधरा. विश्वाच्या या मोठ्या पोकळीत आपली आणि आपल्या तंत्रज्ञानाची नजर जाऊ शकते तेवढ्या अवकाशात तरी ही एकच अशी जागा आहे की, जिथे जीवन फुलले आहे. हा नैसर्गिक चमत्कार घडण्यासाठी अब्जावधी वर्षे लागली आहेत. आपले मानापमान, आपल्या राजकीय धारणा, आपल्या आर्थिक चढाओढी, हे सारे याच्यापुढे तुच्छ आहे. आपल्या तात्कालिक भांडणांपायी आपण आपल्या प्रजातीचेच नाही, तर अवकाशातल्या एका दुर्मीळ गोष्टीचे अस्तित्व धोक्यात आणतो आहोत, ही भावना या छायाचित्रांबरोबरच पसरू लागली. त्यामुळे जागतिक शांततेच्या तसेच पर्यावरणरक्षणाच्या बऱ्याचशा चळवळी या १९७०च्या दशकात सुरू झाल्या हा योगायोग नाही.

२२ एप्रिल २०२१ रोजी एकावन्नावा वसुंधरा दिन जगभर साजरा केला जाईल. या वर्षीचा विषय आहे, ‘रिस्टोअर द अर्थ’- पृथ्वीचे पुनर्जीवन करा. पण यातून काही प्रश्न उभे राहतात.

भूतकाळात कधी तरी पृथ्वीची एक आदर्श स्थिती होती आणि त्या स्थितीला आपल्याला परत जायचे आहे, असे काहीसे म्हणायचे आहे का? ‘डायनोसॉर्सच्या दृष्टीने आदर्श परिस्थिती’पर्यंत मागे जायचे, की माणसांच्या दृष्टीने? अर्थात याचे उत्तर सोपे आहे, पण ‘माणसांच्या दृष्टीने आदर्श परिस्थिती’ नेमकी कोणती? माणसांच्या उत्क्रांतीपासूनच्या गेल्या वीस लाख वर्षांत पृथ्वीवरील नैसर्गिक परिस्थिती वेगवेळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बदलत गेली आणि या बदलांशी जुळवून घेत घेत माणसांची जैविक- सामाजिक उत्क्रांती झाली. यापैकी सर्वात मोठा कालावधी हा हिमयुगाचा होता. या काळातच आपली प्रजाती आफ्रिकेतून बाहेर पडून जगभर पसरली. जेमतेम दहा-बारा हजार वर्षांपूर्वीच हे हिमयुग संपले आणि त्यानंतर बदललेल्या परिस्थितीत आपले पूर्वज भटके जीवन सोडून शेती करू लागले. स्थिरावले. पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांत माणसांनी तिथल्या हवामानाशी, भौगोलिक परिस्थितीशी वेगवेगळ्या प्रकारे जुळवून घेतले. खनिज द्रवइंधनांचा शोध लागून तंत्रज्ञानावर आधारित जीवनशैलीकडे आपली वाटचाल सुरू झाल्याला तर दोनशे वर्षेही झालेली नाहीत. गेल्या दहा हजार वर्षांत पृथ्वीवरील परिस्थिती इतर नैसर्गिक कारणांपेक्षा अधिक मानवी हस्तक्षेपामुळे बदलत गेली हे खरे; पण त्या जोडीने आपणही बदलत गेलो आहोत, हे विसरून चालणार नाही. तेव्हा यातली माणसांसाठी आदर्श स्थिती नेमकी कोणती समजायची? हिमयुग संपल्यासंपल्या होती ती? पण मग त्याच्याशी सुसंगत मानवी जीवनशैली कोणती? आज जगभरात माणसांच्या जगण्यामध्ये आणि सृष्टीच्या इतर घटकांबरोबरच्या नातेसंबंधांमध्ये कमालीचे वैविध्य आहे. तेव्हा हे सारे तथाकथित ‘रिस्टोरेशन’ नेमके कोणी आणि कोठे करणे अपेक्षित आहे?

भटक्या जीवनशैलीमध्ये माणूस निसर्गाच्या व्यवहारांत सर्वात कमी हस्तक्षेप करतो. त्याचा उदरनिर्वाह सर्वस्वी परिसरात सहजी मिळणाऱ्या संसाधनांवर भागवला जातो. वैज्ञानिकांच्या मते सर्वस्वी निसर्गाच्या जोरावर जगण्यासाठी माणशी सरासरी दहा चौरस किमी जागा उपलब्ध असायला हवी. पृथ्वीवरील जमिनीच्या भूभागाचे एकूण क्षेत्रफळ पाहिले आणि त्याच्या प्रत्येक भागात- अगदी एव्हरेस्टच्या टोकावरही- माणसे राहू शकतील आणि सर्व ठिकाणी मुबलक संसाधने उपलब्ध असतील, असे गृहीत धरले तरी संपूर्ण पृथ्वीवर या पद्धतीने जास्तीत जास्त फक्त दीड कोटी माणसे राहू शकतील. आपले पूर्वज एका ठिकाणी राहून शेती करू लागले, तेव्हा त्यांनी इतर ठिकाणहून संसाधने (उदा. पाणी) आणून आपल्या ताब्यातल्या जागेची उत्पादन क्षमता वाढवली. यामुळे दहा चौरस किमी जागेत एका नाही, तर ५० माणसांच्या गरजा भागू लागल्या. पण यासाठी आपल्याला पृथ्वीवरील निसर्गचक्रात लक्षणीय हस्तक्षेप करावा लागला. मात्र असे जीवनही जास्तीत जास्त ७५ कोटी लोकसंख्येसाठी शक्य आहे. आज जगाची लोकसंख्या साडेसात अब्ज आहे, आणि आणखी काही वर्षांत ती दहा अब्जच्या आसपास स्थिरावेल, असे दिसते.

माणसांनी आपल्या बुद्धीचा वापर करायला सुरुवात केल्यापासून एका अर्थाने आपल्या उत्क्रांतीवर ताबा मिळवला आहे. आपल्या अस्तित्वामुळे पृथ्वीवरील परिस्थिती बदलणे अनिवार्य आहे. एखाद्या सजीव प्रजातीमुळे पृथ्वीवर कायमस्वरूपी बदल होण्याची ही पहिली वेळ नाही, आणि सगळे बदल अनिष्टच असतात, असेही नाही. आपल्यामुळे होत असलेल्या बदलांवर आपले नियंत्रण आहे, हे बदल आपल्याच प्रजातीचे भविष्यातील अस्तित्व धोक्यात आणत नाहीत ना, याचा विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. इतिहासापासून धडा घेऊन भविष्यात पूर्वीच्या चुका कशा टाळायच्या, दहा अब्ज माणसांसाठी चांगले आणि निसर्गस्नेही जीवन कसे निर्माण करायचे, विश्वाच्या या कोपऱ्यात घडलेला पृथ्वी आणि माणूस हा जैवी चमत्कार दीर्घकालीन भविष्यात टिकवून कसा ठेवायचा, अशा  पुढल्या काळाचा विचार करणाऱ्या विषयावर वसुंधरा दिनाच्या निमित्ताने ऊहापोह झाला, तर ते अधिक उचित ठरेल.

लेखिका पर्यावरणनिष्ठ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असून ‘समुचित एन्व्हायरो-टेक’च्या संस्थापक आहेत.

ईमेल : pkarve@samuchit.com