डॉ. जयदेव पंचवाघ

प्रचंड उंची, विचित्र शरीररचना यामागचं कारण शोधणाऱ्या डॉ. कुशिंगसारख्या संशोधकांचे मानवजातीवर अगणित उपकार आहेत. 

Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

मागच्या आठवडय़ात पिटय़ुटरी ग्रंथींच्या गाठींमुळे निर्माण होणाऱ्या लक्षणांविषयी आपण पाहिलं. पिटय़ुटरी ग्रंथीमधून स्रवणारी संप्रेरकं म्हणजेच हार्मोन्स अतिप्रमाणात किंवा अत्यंत कमी प्रमाणात तयार झाल्यास शरीरात काय हाहाकार उडतो याची थोडक्यात चर्चा आपण केली. या ‘ग्रंथींची राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पियुषिका ग्रंथीविषयी आणखी उद्बोधक माहिती समजून घेऊ या.

जून १९०९ हा महिना पिटय़ुटरी (पियुषिका) ग्रंथीच्या इतिहासाच्या दृष्टीनं अत्यंत उल्लेखनीय होता. त्या काळी शस्त्रक्रिया शास्त्राविषयी अमेरिकेत अत्यंत महत्त्वाचं समजलं जाणारं व्याख्यान डॉ. हार्वे कुिशग यांनी या जून महिन्यात अटलांटिक सिटीमध्ये दिलं. प्रसंग होता अमेरिकन वैद्यकीय परिषदेचं १६ वं अधिवेशन. अमेरिकेतील जवळजवळ सर्व आघाडीचे डॉक्टर उपस्थित होते. विषय होता पिटय़ुटरी ग्रंथीचं कार्य. संप्रेरकं योग्य पातळीपेक्षा अधिक किंवा कमी प्रमाणात स्रवल्याने होणारे आजार. आजही, म्हणजे २०२२ सालीसुद्धा, हा विषय क्लिष्ट आहे. १९०९ साली तर रक्तातील विविध घटक मोजण्याच्या बहुतांश तपासण्या उपलब्ध नव्हत्या. मेंदूचे विविध ‘स्कॅन’ वगैरे तर ७५ वर्ष दूरची गोष्ट होती. मेंदूच्या आत प्रत्यक्ष डोकावून बघायचं ते शस्त्रक्रिया किंवा शवविच्छेदनाच्याच वेळी. नेमका आजार कळण्यासाठी केवळ रुग्णाच्या आजाराच्या व लक्षणांच्या इतिहासाचं वैचारिक पातळीवरचं सूक्ष्म विच्छेदन व तर्कमीमांसा आजाराच्या निदानाविषयी (बऱ्याच वेळेला अगदी अस्पष्ट) संकेत देत असे. त्या गृहीतकाच्या आधारावर केलेली तपशीलवार शारीरिक तपासणी निश्चित निदानापर्यंत पोहोचवण्याची शक्यता असायची.

नाही म्हणायला १९०९ साली बऱ्या दर्जाचा (उत्तम नव्हे) एक्स रे उपलब्ध झाला होता. पण दुसरं काहीही नव्हतं. थोडक्यात सांगायचं तर पिटय़ुटरी ग्रंथीचं सूक्ष्म कार्य, ते बिघडल्यामुळे होणारे आजार वगैरेंबद्दल बोलण्यासाठी असामान्य बुद्धिमत्ता आणि त्याहीपेक्षा शास्त्रीय संशोधनात सर्वाधिक लागणारी जिद्द व चिकाटीची गरज होती. नवीन विचार मांडून काम करण्याची पात्रता दाखवणाऱ्यांना मागे खेचण्याची अक्षरश: स्पर्धा लावल्यासारखे वागणारे महाभाग त्याही वेळी होतेच आणि त्यांच्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करून अत्यंत आत्मविश्वासाने पुढे जाण्याची कुवतही महत्त्वाची होतीच. हे सर्व गुण कुिशगमध्ये भरभरून होते आणि म्हणूनच तो जून १९०९ साली या गुंतागुंतीच्या क्लिष्ट विषयाची दिशा बदलण्याची क्षमता असलेलं व्याख्यान देऊ शकला.

ग्रोथ हार्मोनचा अतिरिक्त स्राव झाल्यामुळे जे शारीरिक बदल होतात, ते झालेल्या एका स्त्रीचे वर्णन १५६७ साली ‘विअर’ नावाच्या डच डॉक्टरने करून ठेवलेलं आहे. अर्थातच त्या वेळी हा आजार कशामुळे होतो हे माहीत नव्हतं. या स्त्रीचा बांधा थोराड व उंची प्रचंड होती. संवेदनशीलतेने त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी ना त्या समाजात होती, ना आज आहे! या व्यक्ती सर्कस किंवा तत्सम कार्यक्रमातून  गावोगाव फिरून उदरनिर्वाह करत. डॉ. विअरने मात्र तिच्याशी संवाद साधला. लहान असताना ती चारचौघांसारखी होती. वयाच्या १४ व्या वर्षांपासून तिचा आकार वाढत गेला. निसर्गसुलभ पौगंडावस्थेतच तिची सुरू झालेली मासिक पाळी बंद झाली. याविषयीच्या आज उपलब्ध माहितीवरून हे स्पष्ट दिसतं की १४ व्या वर्षी ग्रोथ हॉर्मोन तयार करणारी गाठ तिच्या पिटय़ुटरी ग्रंथीत झाली असणार आणि त्यामुळे पिटय़ुटरीमधील लैंगिक कार्य नियंत्रित करणाऱ्या पेशींवर दाब येऊन तिची मासिक पाळी व लैंगिक कार्यच बंद झालं असणार. आजच्या युगात या गाठीचं वेळेत निदान होऊन व शस्त्रक्रियेने ती पूर्ण बरी होण्याची शक्यता आहे. (अर्थात या लक्षणाचा अर्थ योग्य पद्धतीने लावला गेला तरच). यानंतरच्या २०० वर्षांच्या काळात अशा प्रकारच्या विविध केसेस लिहिल्या गेल्या.

१८६० च्या दशकात एक महत्त्वाची घटना घडली. १८६० साली आंद्रे व्हर्गा या डॉक्टरने एका थोराड व उंच स्त्रीची तपासणी केली. १८६२ साली टायफसने ही स्त्री दगावली. आंद्रे व्हर्गाने तिचं शवविच्छेदन केलं तेव्हा त्याला मेंदूच्या तळाशी अक्रोडाच्या आकाराची पिटय़ुटरी ग्रंथीची गाठ दिसली. त्या गाठीने दृष्टीच्या नसांवर कमालीचा दाब आणला होता. हे लक्षात ठेवलं पाहिजे की ग्रोथ हॉर्मोन अशी काही गोष्ट असते हे तेव्हा माहीतही नव्हतं. ( ग्रोथ हॉर्मोन हे संप्रेरक १९४५ साली प्रथम रक्तातून अलग करण्यात आलं व त्याचं रासायनिक स्वरूप निश्चित करण्यात आलं .)

साधारण १८९५ ते १९१० या काळात हार्वे कुशिंग आणि इतर काही संशोधकांनी कुत्र्यांच्या व मांजरांच्या पिटय़ुटरी ग्रंथींवर प्रयोग केले. त्यातून एक महत्त्वाची गोष्ट सिद्ध झाली ती अशी, की पिटय़ुटरी ग्रंथी शस्त्रक्रियेने काढून टाकल्यास प्राणी जगू शकत नाहीत. अर्थात मनुष्यप्राण्यातही असं  घडणार असा निष्कर्ष ओघानेच आला.

अशाच आणखी एका हॉर्मोनच्या अतिरिक्त स्रवण्याच्या आजाराचा लक्षणसमूह १९०० ते १९३० दरम्यान विविध डॉक्टर संशोधकांच्या अभ्यासातून पुढे आला. या लक्षणसमूहाला ‘कुशिंग्स सिन्ड्रोम’ हे नाव आजही आहे. या व्यक्तीमध्ये चेहरा गोल होणं (मून फेस), पोट गोल गरगरीत होणं, अंगावर काळसर गुलाबी रंगाचे चट्टे उमटणं, हात व पाय बारीक होणं, स्नायूंमध्ये अशक्तपणा येणं, रक्तदाब वाढणं, चेहऱ्यावर व शरीरावर अतिरिक्त केस येणं, स्त्रियांमध्ये पाळीची अनियमितता दिसणं, पुरुषांमध्ये नपुंसकत्व येणं, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं ही लक्षणं दिसतात. गोल गरगरीत व मोठं झालेलं पोट आणि काडय़ांसारखे बारीक पाय यामुळे ‘लेमन ऑन मॅचस्टिक्स’ (काडय़ांवर ठेवलेलं िलबू)असं याचं वर्णन केलेलं आहे. या आजारावर १९३२ साली हार्वे कुशिंगने शोधनिबंध लिहिला. पिटय़ुटरी ग्रंथीच्या कॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन या संप्रेरकाच्या अतिरिक्त स्रवण्याने मूत्रिपडांच्या वर स्थित असलेल्या अ‍ॅड्रिनल ग्रंथींवर परिणाम होऊन कॉर्टिसॉल हे संप्रेरक अतिरिक्त प्रमाणात स्रवल्याने हा आजार होतो हे त्यानंतर सिद्ध झालं. पिटय़ुटरीत काहीही दोष नसतानासुद्धा फक्त अ‍ॅड्रिनल ग्रंथींच्या अतिरिक्त स्रवण्यानेसुद्धा कधीकधी हा आजार होऊ शकतो हेसुद्धा सिद्ध झालं.

यानंतरच्या काळामध्ये इतरही संप्रेरकांच्या कमीजास्त स्रवण्याने होणारे आजार वैद्यकशास्त्राला माहीत झाले. पण या सर्व विषयाची सुरुवात ग्रोथ हॉर्मोन व एक्रोमेगेलीपासून झाली आणि हार्वे कुशिंग या देदीप्यमान कालखंडाच्या केंद्रस्थानी होता.

आपण परत १९०९ च्या कुशिंगच्या व्याख्यानाकडे येऊ. १९०९ मधील कुशिंगचं संशोधन त्यापूर्वीच्या काही तुटक निरीक्षणांवर आधारित होतं.  या वर्षांमध्ये एवढंच माहीत होतं की शरीराचा असा विचित्र आकार होण्यामागे पिटय़ुटरी ग्रंथीची वाढ किंवा गाठ संबंधित असू शकते. तसंच या रुग्णांमध्ये दृष्टी व लैंगिक कार्यावर विपरीत परिणाम झालेला असतो. १९०९ साली कुशिंग लिहितो..‘‘मी तपासलेले ‘अ‍ॅक्रोमेगेली’चे रुग्ण आणि माझ्या आधीच्या संशोधकांनी केलेला विचार बघता हा आजार पिटय़ुटरीतून तयार होणऱ्या विशिष्ट द्रावांच्या अतिरिक्त स्रवण्यामुळे होतो की कमी स्रवण्यामुळे याच्या ठोस निष्कर्षांप्रत मी आज आलो आहे, असं म्हणता येणार नाही. तसंच या ग्रंथीच्या स्रावांमुळे होणारे आजार जसे आपल्याला कळत जातील, तसं भविष्यातल्या सर्जनना अशा गाठी फार मोठय़ा व्हायच्या आतच काढणं भाग पडेल. आणि म्हणूनच मेंदूच्या तळाशी खोलवर असलेल्या या गाठी काढण्याच्या निरनिराळय़ा प्रकारच्या शस्त्रक्रियांचा आणि उपकरणांचा विचार करावा लागेल’’ कुशिंगच्या या वक्तव्यापासून आपण आता ११२ वर्ष पुढे आलो आहोत. मधल्या काळात इतर अनेक व्यक्तींनी या विषयावर पुढचं संशोधन केलं, तंत्रज्ञानही पुढे जात राहिलं!

आज या गाठी काढण्यासाठी अतिप्रगत मायक्रोस्कोप, एण्डोस्कोप आणि इतर उपकरणं उपलब्ध आहेत. एमआरआयसारखी तपासणी व हॉर्मोनसाठी रासायनिक चाचण्या उपलब्ध आहेत. या खोलवरच्या गाठींपर्यंत पोहचण्यासाठी ‘नॅव्हिगेशन’ उपकरणांची संगणकीय पद्धतीची मदत हाताशी आहे. गाठींमुळे कमी झालेली संप्रेरकांची पातळी भरून काढण्यासाठी शस्त्रक्रियेनंतर आज हार्मोनच्या गोळय़ा किंवा इंजेक्शन आम्ही आज देऊ शकतो व रुग्णाचं आयुष्य जवळजवळ पूर्वपदावर आणू शकतो.

या क्लिष्ट विषयावर संशोधन करून शस्त्रक्रिया शोधणं तर झालंच पण या विषयाच्या भविष्याचं भाकीत १९०९ साली एका व्यक्तीने करून ठेवलं आहे. कुिशगच्या या मानवजातीवरील उपकारांना त्रिवार वंदन करून हा विषय आज थांबवतो.

(लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत. brainandspinesurgery60@gmail.com