आपण सद्गुरूंचं व्हायचं म्हणजे नेमकं काय हो? सद्गुरू म्हणजे नुसतं व्यक्तिरूप नव्हेच. सत्पुरुषाच्या चरित्राबद्दल एकदा श्रीगोंदवलेकर महाराज म्हणाले होते की, ‘सत्पुरुषाचं चरित्र हे मानसिकच अधिक असतं!’ म्हणजे काय? तर तो कोणत्या प्रांताचा, तो कसा राहतो, काय खातो, कोणते कपडे घालतो; याची शाब्दिक नोंद म्हणजे सत्पुरुषाचं चरित्र नव्हे. तर त्याची धारणा, परमात्ममयता, आंतरिक रसमयता याचा वेध म्हणजे चरित्र! तेव्हा सद्गुरूंचं होणं म्हणजे त्यांच्यासारखी वस्त्रं घालणं वा त्यांच्यासारखं बाहय़रूप राखणं नव्हे. त्यांची नक्कल नव्हे. त्यांचं होणं म्हणजे त्यांच्याशी आंतरिक ऐक्यता होऊ  लागणं. त्यांचा विचार तोच माझा विचार, त्यांची धारणा तीच माझी धारणा होणं. ही ऐक्यता अभ्यासानं, साधनेनं दृढ होते म्हणूनच अखंड साधनात, सद्गुरू बोधाच्या चिंतनात राहिलं पाहिजे. प्रपंचात राहून परमार्थ साधू इच्छितो अशासाठी पू. बाबा बेलसरे यांनी जे दहा बोधमणी सांगितले आहेत त्यातला आठवा बोधमणी आपण जाणून घेतला तो म्हणजे, ‘आपल्या साधनाबद्दल आणि सद्गुरूबद्दल चुकूनदेखील वादविवाद करू नये, कारण दोन्ही फार पवित्र असतात.’ आता बोधमण्यांच्या माळेतला नववा बोधमणी सांगतो की, ‘व्यवहार न सोडता मनामध्ये संतोषाची वृत्ती बाळगण्याचा अभ्यास करावा.’ अर्थात व्यवहारात राहूनच मनात संतोष बाळगावा. या सांगण्यात एक मोठी मेख आहे आणि ती पटकन लक्षात येत नाही. हे वचन वाचून आपल्याला पटकन वाटतं की, आपला जगासोबत सध्या जो काही व्यवहार सुरू आहे तो बाबांना मान्यच आहे! पण आपण खरा व्यवहार करत असतो का हो? तर नाही! व्यवहार पाळणं म्हणजे जे उचित आहे तेच पार पाडणं. आपल्या व्यवहारात अनेकदा अव्यवहारीपणाच असतो! म्हणजे आपल्या मनाचं पारडं जिथं झुकतं तिथं आपण उधळपट्टी करतो आणि जी गोष्ट मनाला अनाठायी वाटते तिथं हात आखडता घेतो. म्हणजे दोन्ही बाबतींत आपण अव्यवहारीच असतो. तेव्हा व्यवहार पाळणं म्हणजे मनाच्या ओढीला लगाम घालून उधळपट्टी रोखणं आणि मनाचा आडमुठेपणा मोडून व्यवहार पूर्ण करणं. आता व्यवहार हा आर्थिक असो की वर्तनाचा असो, त्यामागे मनाची भावनिक घडण हीच मुख्यत्वे कारणीभूत असते. त्यामुळे व्यवहार काटेकोरपणे करणं म्हणजेच या ना त्या प्रकारे मनाच्या अज्ञानयुक्त घडणीलाच धक्का देणं आहे.. आणि जिथं मनाच्या घडणीला ठेच लागते तिथं असंतोष अटळ आहे. आणि तिथंच संतोष बाळगायला पू. बाबा सांगत आहेत! याचा अर्थ नीट लक्षात घेतला पाहिजे. हा जो व्यवहार आहे त्याचा प्रारब्धाशी संबंध आहे. म्हणजे माझ्या वाटय़ाला जो व्यवहार आला आहे तो प्रारब्धानं आला आहे. मग त्या व्यवहारात मनाच्या मर्जीप्रमाणे काही कमी-अधिक करणं म्हणजे प्रारब्धकर्म शेष राखणं वा त्यात वाढ करणं आहे. ते टाळायचं असेल, तर व्यवहार अचूक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग जे घडत आहे ते माझ्या हिताचं आहे, या भावनेची जोड दिली पाहिजे. ती दिली की वृत्ती संतोषाची राखण्याचा अभ्यास सुरू होईल. या अभ्यासाचा पायाच असलेला दहावा बोधमणी सांगतो की, ‘आपले जीवन अर्थात आपला प्रपंच आणि परमार्थ भगवंताच्या इच्छेने चालला आहे अशी भावना वाढीस लावावी.’