गुलाबराव महाराज सांगतात की, जोवर विषयांबाबत मनात वैराग्यभाव उपजत नाही, तोवर विषयांच्या प्रभावातून सुटण्याचा अभ्यास काही उपयोगाचा नाही. वैराग्यावाचून अभ्यास केला तर उलट वासना अधिक तीव्र मात्र होते. (जोंवरी विराग नुपजे विषयीं। तों अभ्यास कांही करूं नये॥ वैराग्यावांचोनि केलिया अभ्यास। तंव वासनेस तीव्रता ये॥) जर अशुद्ध पाणी साठवून ठेवलं, तर त्यात किडेच उत्पन्न होतात. त्याप्रमाणे मन जर अशुद्ध असेल, तर त्या अशुद्ध मनाची एकाग्रता ही आपसूक विषयांचीच एकाग्रता होते आणि त्यानं आत्मघात होतो. (मलिन सलील सांठवितां घरी। किडे त्या माझारीं होति तेव्हां॥ अशुद्ध मनाची तेिव एकाग्रता। होय आत्मघाता कारण ती॥) खरं पाहता अभ्यास हा मध्यस्थाप्रमाणे आहे. वैराग्य असेल तर चित्ताचं समत्व लाभतंच. वैराग्यावाचून विवेक निर्माण होत नाही आणि विवेकावाचून आत्मस्वरूपाची जाणीव होत नाही. (शेवटीं समाधी वैराग्याचे फळ। तो विरागावीणें न घडेचि॥). यात दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वैराग्यभाव अर्थात विषयांची विरक्ती आणि मनाची शुद्धता.. आणि या दोन गोष्टींबद्दल आपल्या मनात उलटसुलट कल्पना आणि धास्तीही असते. तेव्हा आधी विषय म्हणजे काय, याचा संक्षेपानं विचार करू. विषय म्हणजे ‘कामविषय’ असंच आपण पटकन गृहीत धरतो. प्रत्यक्षात कामविषयाचा आपल्या जीवनावरील प्रभाव, त्याची व्याप्ती आणि आवाका फार मोठा असला, तरी कामविषयापलीकडेही अनेक विषय असतात, जे आपल्याला अधिक चिकटले असतात! आता हे विषय म्हणजे काय? तर प्रत्येक इंद्रियाद्वारे ज्या माध्यमातून जगाशी आपला संपर्क आहे, संग आहे आणि ओढ आहे ते विषयच आहेत. अर्थात डोळ्यांनी आपण पाहतो तेव्हा पाहणं, नेत्रसुख हा डोळ्यांच्या माध्यमातून उपभोगला जाणारा विषय आहे. त्याचप्रमाणे ऐकणं हा कानांचा विषय आहे, हुंगणं हा नाकाचा विषय आहे, रुची हा रसनेचा विषय आहे, स्पíशणं हा त्वचेचा विषय आहे. तर हे विषय इंद्रियजन्य आणि इंद्रियगम्य आहेत. ते सहज आहेत. देह नावाच्या उपकरणात अंतर्भूत आहेत. त्याद्वारे जगातला आपला वावर सुकर व्हावा, हा हेतू आहे. पण.. हा ‘पण’च आड येतो! जीव पण करतो की इंद्रियांद्वारे तो सर्व सुख ओरबाडून घेईल. आणि मग जे जे देहबुद्धीला आवडतं, जे जे त्याच्या अहंकाराला पोसतं त्या त्या गोष्टीत तो अडकत जातो. त्यातून त्याची देहासक्ती, देहप्रेम घट्ट होत असतं. तेव्हा साधनेसाठी माणूस कामविषयाला एकमेव मुख्य शत्रू मानतो, पण त्यापलीकडेही हे जे अनंत कामना प्रसवणारे विषय आहेत, ते त्याला जाणवतही नाहीत. तेव्हा या विषयांची विरक्ती नाही तोवर निर्वषिय होण्याचा अभ्यास करून उपयोग नाही, असं हा अभंग सुचवतो. आता प्रश्न असा उद्भवतो की, ज्या वासनेत आपला जन्म झाला आहे, तिची विरक्ती ही सोपी आहे का आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ती आवश्यक आहे का? प्रपंचात राहून परमार्थ साधण्याचा उपदेश अनेकानेक सत्पुरुषांनी दिला आहे, तेव्हा वैराग्य नसेल, तर अभ्यासच नको, हे टोक समर्थनीय आहे का? याचा थोडा विचार करू. विषय आणि कामविषय यांचं जीवनातलं स्थान आणि महत्त्व कोणी नाकारत नाही. पण जेव्हा कुठलीही गोष्ट आपल्या ताब्यात न राहता आपण त्या गोष्टीच्या ताब्यात जात असू, तर ती गोष्ट आपल्याला मानसिक, भावनिक, वैचारिक, बौद्धिक गुलामगिरीत कैद करते, हे वास्तव लक्षात घेतलं पाहिजे. अशा गुलामगिरीत जे अडकतात त्यांचं राजकारण, समाजकारण, लोककारणही डागाळतं, अडचणीत येतं. मग आध्यात्मिक वाटचाल खुंटणार नाही?

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com