अभिजीत ताम्हणे  

त्या त्या काळामधल्या कलाकारांनी सौंदर्यनिर्मितीचा धर्म पाळला आणि इतरांनीही त्यांना तो पाळू दिला. ही परंपरा प्रवाही ठेवण्याची जबाबदारी आपलीही आहे, नाही का?

nagpur wedding ceremony marathi news
आगळा वेगळा विवाह सोहळा! वर- वधूकडून एक हजारांवर औषधी वनस्पतींचे पाहुण्यांना वाटप
Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
kolhapur, mahalaxmi mandir, mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मी देवी मूर्ती संवर्धनास स्थगिती देण्यात यावी, जबाबदारी निश्‍चित करा; महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!

सौंदर्याची काही एक कल्पना करणं, त्यानुसार प्रतिमा तयार करणं आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक बदलांच्या ओघात सौंदर्यकल्पनांमध्येही बदल होणार हे ओळखून नवनवी रूपनिर्मिती करत राहाणं, हे सजीवांपैकी फक्त मानवाला जमतं.. त्या अर्थानं, प्रतिमांमधून सौंदर्यनिर्मिती ही मानवालाच लाभलेली ‘दैवी देणगी’ आहे. या देणगीचा वापर मानव पुन्हा, त्याच्या मते दैवी असलेल्या प्रतिमांच्या निर्मितीसाठी करत आलेला आहे. प्रतिमा कोणत्याही धर्मात असतातच. मूर्तिपूजक धर्मामध्ये त्या अधिक ठसठशीतपणे ओळखू येतात. ख्रिस्ती धर्माला मूर्तिपूजक धर्म म्हणता येईल का हा प्रश्नच आहे, पण चर्चमध्ये क्रूसाला खिळलेल्या येशूची मूर्ती (काही पंथ वगळता) असते, बायबलमधल्या किंवा येशूच्या आयुष्यातल्या प्रतिमा असतात. ग्रीक परंपरा मूर्तिपूजक होती आणि त्यांच्या अपोलो, हर्मिस, आर्टेमिस वगैरे देव-देवतांना अगदी ठरावीक रूपवैशिष्टय़ं होती. पण ती ग्रीक परंपरा आता ‘जिवंत’ नाही. मुस्लिमांकडे मूर्तीच नाहीत, ईश्वराची प्रतिमा नाही पण अन्य धर्माप्रमाणेच इस्लामी वास्तूंच्याही दृश्यवैशिष्टयांतून काही प्रतिमा प्रस्थापित झालेल्या आहेत.. अगदी आफ्रिकेतल्या आदिम धर्मामध्येही मुखवटे, स्मृतिस्तंभ, वस्त्रं यांच्या परंपरा धर्माशी जोडलेल्या आहेत. पण या सर्वच्या सर्व धर्मापेक्षाही कितीतरी अधिक प्रमाणात प्रतिमांचं, मूर्तीचं वैविध्य आपल्या देशात बहुसंख्येनं असलेल्या हिंदू धर्मात आहे. इथली मूर्तिपूजक परंपरा ही जिवंत परंपरा आहे हे पहिलं कारण आणि हिंदू धर्मातली सहिष्णुता टिकून असल्यामुळे इथं एकाच दैवताच्या- विशेषत: ज्या देवतांबद्दलची कथनं आणि भक्तीच्या पद्धती प्रवाही राहिल्या, त्या दैवतांच्या प्रतिमा तर कितीतरी निरनिराळया.

हेही वाचा >>> भूगोलाचा इतिहास : शून्य मैल दगड!

यासंदर्भात एक मुद्दा मात्र आधीच मांडला पाहिजे. धर्मातल्या सहिष्णुतेचा पैलू म्हणा किंवा आणखी काही, पण अनेक मूर्ती वा अनेक प्रतिमांकडे निव्वळ पूजनीय म्हणून न पाहाता संस्कृतीच्या प्रवाहाचा भाग म्हणून पाहण्याची धडाडी हिंदूंनी वेळोवेळी दाखवलेली आहे. त्यामुळे अनेक दैवतांची नवनवी रूपनिर्मिती करण्यात कलाकारांना वाव मिळत राहिला आहे. गणपती हे असं एक दैवत. शिल्पकार भगवान रामपुरे यांनी केलेले गोलसर गणपती मोटारींमध्ये अजूनही दिसतात किंवा गिफ्ट शॉपमध्ये विकायला असतात, ते ‘पेणच्या गणेशमूर्ती’पेक्षा अर्थातच निराळे (गणेशोत्सवात ‘उत्सवमूर्ती’ आणि ‘पूजेची मूर्ती’ यांत फरकही केला जातोच), ‘पेशवेकालीन गणेश मंदिरां’मधल्या सुबक संगमरवरी गणेशमूर्ती आणखीच निराळया आणि अष्टविनायक काय किंवा दशभूज, द्विभूज गणपती काय ते या सर्वांपेक्षा वेगळे. नाही म्हणायला दत्त, कार्तिकेय, शनी अशा प्रतिमा ठरावीकच रूपाच्या दिसतात. हेच विठ्ठलमूर्तीबद्दलही आत्तापर्यंत म्हणता येत होतं पण भास्कर हांडे यांनी नुसत्या भौमितिक आकारांतून विठ्ठल साकारल्यानं काही कलाकारांचा मार्ग खुला झाला. हांडे यांची ती भौमितिक विठ्ठलप्रतिमा किंवा रामपुरे यांची गणेशप्रतिमा या काही पूजेतल्या प्रतिमा नव्हेत, हे कबूलच. पण कृष्णाच्या प्रतिमा तर पूजेतल्याही निरनिराळया दिसतात. महाराष्ट्रातल्या अनेक घरांमधल्या देव्हाऱ्यांतला रांगता बाळकृष्ण, उत्तर भारतातल्या संगमरवरी मूर्ती किंवा ‘इस्कॉन’चा कृष्ण, गुजरातेतला ‘बाँकेबिहारी’.. या साऱ्या मूर्ती एकाच काळात पुजल्या जाताहेत.

म्हणजे, संस्कृतीतून आलेल्या विचारांतला फरक केवळ कालांतरानेच होत नाही तर भूभागांनुसारही दिसत असतो, असा निष्कर्ष यातून काढता येईल का? की, प्रांताप्रांतांनी आपापल्या दैवत-रूपांबद्दलच्या ज्या काळातल्या सांस्कृतिक कल्पनांना शिरोधार्य मानून त्यांचा स्वीकार केला त्यातून त्या-त्या प्रांतातल्या मूर्ती-रूपांची ‘परंपरा’ स्थिरावलेली दिसते आहे? ही दुसरी शक्यता अधिक पटणारी वाटते. तिचा अर्थ असा की, सौंदर्यकल्पनेच्या प्रवाहीपणापेक्षा सांस्कृतिक कल्पनांचं स्थैर्य हे दैवतांच्या पूजनीय रूपांबाबत अधिक महत्त्वाचं ठरतं.

इथवरचा सगळा मजकूर नेहमीचा वाटेल. पण मग पूजनीय दैवतांचीच काही रूपं आज पूजनीय गणली जात नाहीत, असं कसं काय? उदाहरणार्थ, इथल्या या दोन प्रतिमा पाहू. यापैकी जे चित्र आहे ते राजा रविवर्मा यांच्या स्टुडिओतून, आजपासून शंभर वर्षांपूर्वी घरोघरी पोहोचलेल्या अनेक शिळाप्रेस (लिथोग्राफ) चित्रांपैकी आहे. रविवर्मा यांनी पौराणिक विषय पाश्चात्त्य यथातथ्यवादी चित्रणपद्धतीनं साकारले, हे त्यांचं एक यश आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून या चित्रांच्या घाऊक उत्पादनाची व्यवस्थाही कलात्मकतेशी तडजोड न करता त्यांनी वापरली हे दुसरं यश. धार्मिक अथवा पौराणिक कल्पनेशी संबंधित मिथकातला एखादा नेमका नाटयमय, कल्पनारम्य क्षण निवडून त्याचं चित्र करणं, हे कौशल्य रविवर्मा यांनी भारतीय संदर्भात वापरलं (त्याआधी युरोपमध्ये बायबल-कथा वा येशूचरित्र मांडणाऱ्या चित्रांसंदर्भात हे तंत्र बरंच वापरलं गेलं होतं). इथं दिसणाऱ्या चित्रातही, समुद्र हटवण्यासाठी बाणातून वरुणावरच अस्त्र सोडण्याच्या तयारीत राम असताना वरुणानं प्रकट होऊन रामाला असं न करण्याची विनंती केल्याचा क्षण दिसतो आहे. रविवर्मा यांचं निधन १९०६ साली झालं. त्यानंतर ५० वर्षांनी- म्हणजे १९५६ मध्ये चित्रकार एस. एम. पंडित यांनी टेम्परा रंगांमध्ये केलेलं समुद्रकाठी धनुष्य सरसावून ठाम उभ्या राहिलेल्या रामाचं चित्र अनेकांनी मूळ स्वरूपात नाही तरी राजकीय पोस्टरवर पाहिलं असेल. पण रविवर्मा यांच्या चित्रात वरुणानं वीज आणि जलदेवता यांच्यासह येऊन केलेली विनंती मान्य करण्याच्या पवित्र्यातला राम दिसतो. मानवी भावनांचं आरोपण एका दैवतावर झालेलं स्पष्ट दिसतं.

याउलट दुसरी प्रतिमा. ही चोल कालखंडाच्या पूर्वार्धातली- नवव्या शतकातली मूर्ती रामाचीच आहे, हे आज मुद्दाम सांगावं लागेल. पण त्या कालखंडातल्या आणि कांस्यधातू-मिश्रणातून घडवलेल्या अनेक दैवतांच्या मूर्तीची सारी वैशिष्टय़ं या राममूर्तीतही आहेत. अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया राज्य संग्रहालयानं विकत घेतलेली ही मूर्ती, ‘त्रिभंगी धाटणीनं उभी’ आहे. कंबर, छाती आणि चेहरा यांचा विषमतोल साधणारी ही धाटणी ओडिसी नृत्यप्रकारातही दिसते. चोल राजघराणं तंजावूरचं, पण चंदेल राजवंशानं साधारण याच काळात (नववं ते अकरावं शतक) खजुराहोमध्ये बांधलेल्या मंदिरांमधल्या अनेकानेक मूर्तीमध्ये त्रिभंगी डौल दिसतो. अकराव्या शतकात चालुक्यवंशीय भीमदेव राजाच्या काळात गुजरातमध्ये जी ‘रानी की वाव’ बांधली गेली, तिथली एक ‘परशुराम’ मूर्तीदेखील अशाच त्रिभंगी धाटणीनं उभी आहे! आता सरळ विकिपीडियावर जा आणि ‘त्रिभंग’ असं इंग्रजीत शोधून पाहा- तिथं तर मोहेंजोदडोच्या नर्तकीपासून ते वरहुतच्या यक्षीपर्यंत आणि गांधारशैलीच्या काही बौद्ध शिल्पांपर्यंत अनेक प्रतिमांचे त्रिभंगी डौल दिसतील. अजिंठयातला प्रसिद्ध पद्मपाणी बोधिसत्त्व विकिपीडियावर नाही, पण तोही त्रिभंगी डौलानं उभा आहेच. कधी पाश्चात्त्य यथातथ्यवादी परंपरा, कधी त्रिभंगी डौल, आणि मधल्या काळात तर जैन/ मुघल/ कांगडा या लघुचित्र-शैलींमध्येही रामाच्या प्रतिमा साकारल्या गेल्या आहेत. या प्रतिमा घडवणाऱ्यांना त्या-त्या कौशल्य-पद्धतींचं भान होतंच, पण ते भान निरनिराळया काळांत, निरनिराळया प्रदेशांत, म्हणजेच संस्कृतीच्या निरनिराळया टप्प्यांवर जिवंत ठेवणाऱ्या या कलाकारांनी जणू एकच धर्म मानला.. सौंदर्यनिर्मितीचा धर्म! आणि त्या-त्या काळात कलाकार वगैरे नसलेल्यांनी, तेव्हातेव्हाच्या कलाकारांना तो धर्म पाळू दिला. हा धर्म यापुढल्या काळातसुद्धा प्रवाही राहायला हवा, यासाठी आपण काय करतो आहोत, याचं चिंतन कलाकार नसलेल्यांनीही करायला हवं, ते या संदर्भात.

abhijit.tamhane@expressindia.com