एल. के. कुलकर्णी

विसाव्या शतकात स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही भारतात झालेले सर्व प्रकारचे सव्‍‌र्हे, नकाशे व विकास कार्ये ही ‘ट्रिग्नोमेट्रिक सव्‍‌र्हे’ या महान कामाच्या पायावर उभी राहात गेली.

credit card spending soar to 27 percent
क्रेडिट कार्ड उसनवारी २७ टक्क्यांनी वाढून १८.२६ लाख कोटींवर
Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Government decision not to increase read reckoner for elections
रेडीरेकनर वाढीला निवडणुकीची वेसण; घरांच्या किमती घटणार? रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवर काय परिणाम?

पुण्यात जनरल पोस्ट ऑफिसजवळ किंवा नागपूरच्या सिव्हिल लाइन्समध्ये ‘शून्य मैल दगड’ ( झिरो माइल स्टोन) कदाचित तुम्ही पाहिला असेल. भारतात होऊन गेलेल्या ग्रेट ट्रिग्मोमेट्रिक सव्‍‌र्हेच्या त्या स्मृतिशिला आहेत.

‘कोणत्याही तत्कालीन युद्धापेक्षा अधिक मनुष्यबळाचा वापर तसेच जीवितहानी ज्यात झाली’ असे या प्रकल्पाचे वर्णन काही अभ्यासकांनी केले आहे. कारण या प्रकल्पात जेवढे लोक, जितकी वर्षे सहभागी झाले होते, तेवढे इतिहासात कोणत्याही मोहिमेत सामील झाले नव्हते.

१८०२ मध्ये लॅम्ब्टन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनीने सुरू केलेला सव्‍‌र्हे पाच वर्षांत पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात त्याला पूर्ण होण्यास ७० वर्षे लागली.

हेही वाचा >>> दृष्टिकोन : संरक्षण दलाने पुढे जाताना मागचेही धडे गिरवावेत!

१८२३ मध्ये लॅम्ब्टन यांच्या मृत्यूनंतर या कार्याची धुरा जॉर्ज एव्हरेस्ट यांच्याकडे आली. त्यांनी १८२३ ते १८४३ या आपल्या कालावधीत ही मोहीम अक्षरश: हिमालयाला नेऊन पोचवली आणि हिमालयाएवढेच भव्य कार्य केले. १८३० मध्ये त्यांना सव्‍‌र्हेयर जनरल ऑफ इंडियाचे पद देण्यात आले. त्यांच्याच नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते हिमालय या ७८ अंश पूर्व रेखावृत्तीय कंसाची (आर्क) वक्रता मोजण्याचे कार्य पूर्णत्वास गेले. त्यामुळे हा प्रकल्प ‘ग्रेट आर्क मेरिडियन ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध झाला.

त्यांच्यानंतर मेजर जनरल सर अँडर्य़ू वॉघ हे १८४३ ते १८६१ पर्यंत सव्‍‌र्हेयर जनरल बनले. त्यांच्या कारकीर्दीत पश्चिमेस अफगाणिस्थानची सीमा ते पूर्वेस ब्रह्मदेश, तसेच उत्तरेस पूर्ण हिमालय हा भूप्रदेश त्रिकोणमालिकांनी पिंजून काढण्यात आला. पुढे जेम्स वॉकर यांनी १८६१ ते १८८३ या काळात सव्‍‌र्हेयर जनरल पद सांभाळले. त्यांच्याच काळात १८७१ मध्ये ‘ग्रेट आर्क’ किंवा ‘त्रिकोणमितीय सर्वेक्षण प्रकल्प’ अधिकृतरीत्या पूर्ण झाला.

या कालावधीत भारतात अनेक वादळी घटना घडत होत्या. राज्ये खालसा होत होती. ठिकठिकाणी संस्थानिक व इंग्रज यांच्यात युद्धे, लढायांची धामधूम चालू होती. १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त होऊन दुसऱ्या बाजीरावांना विठूरला पाठवण्यात आले. १८५७ मध्ये तेजस्वी स्वातंत्र्यसंग्रामाचे यज्ञकुंड पेटले. १८५८ मध्ये बहादूरशाहला पदच्युत करून ब्रह्मदेशात नजरकैदेत पाठवण्यात आले. १८५८ मध्येच ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार गुंडाळून भारतावर इंग्लंडच्या राणीचा प्रत्यक्ष कारभार सुरू झाला. पण या सर्व वादळी काळात, कशाचाही परिणाम न होऊ देता या प्रकल्पाचे काम मात्र अव्याहत चालू होते. अनेक अडचणी आणि संकटांचे पर्वत ओलांडून सव्‍‌र्हे करणे हेही एक अविरत युद्धच होते.

सव्‍‌र्हे ताफ्यात सव्‍‌र्हेयर, पोर्टर, सैनिक इ. अनेक प्रकारची किमान १५० माणसे असत. पण कधी कधी ताफ्यात ७०० पर्यंत लोक असत. हे सर्व लटांबर दऱ्या, खोरी, पर्वत शिखरे, वाळवंटे यातून शेकडो किलोमीटर अखंड फिरत होते. एकाच वेळी असे अनेक चमू विविध कामात गुंतलेले असत. राजस्थानात भयानक उष्णता आणि धुळीची वादळे, मृगजळ यांनी सव्‍‌र्हेयर्सचा अंत पाहिला. हिमालयात गोठवणारी थंडी, हिमवादळे यांना तोंड देत शिखरांचे वेध घेतले जात. वन्य प्राण्यांचे हल्ले, साथीचे व इतर आजार व अपघात यातून लोक जायबंदी होत. मृत्युमुखीही पडत. लॅम्ब्टन, एव्हरेस्ट इ.सह इतर प्रमुखही आजारपणे व मृत्यूच्या छायेत वावरत होते. मानवी बुद्धी, साहस आणि चिकाटीची परीक्षा घेणारीच ही मोहीम होती.

१००-२००  कि.मी. अंतरावरून थिओडोलाइटने वेध घेण्यासाठी जो ‘निशाणीध्वज’ उभारावा लागे, त्यासाठी किमान १२ ते १५ जण लागत. तो काटकोनात व स्थिर उभा करण्यासाठी लंबक घेऊन तज्ज्ञ व मजूर उभे असत. वेध उंच ठिकाणावरूनच (उदा. टेकडी, किल्ला, उंच इमारती) घ्यावे लागत. पण उत्तर भारत, बंगाल इ. ठिकाणी, गंगेच्या खोऱ्यात सर्वत्र विशाल मैदानी प्रदेश आहेत. त्यामुळे तेथे निरीक्षणासाठी मुद्दाम उंच मनोरे बांधावे लागले. हे मनोरे किमान ४० फूट ते ८० फूट (आठ मजली इमारत) उंचीचे, विशिष्ट रचनेचे व मजबूत असावे लागत. कारण त्यावर थिओडोलाइटचे अर्धा टनी धूड सुरक्षितपणे वर चढवून पुन्हा उतरवावे लागे. हे मनोरे फक्त वेध घेण्याच्या कामापुरते उभारण्यात आले होते. पण आज २०० वर्षांनंतरही बंगाल, बिहार व गंगेच्या  खोऱ्यात त्यापैकी अनेक मनोरे तेवढयाच ठामपणे उभे आहेत. पाच दहा वर्षांत कोसळणाऱ्या आजकालच्या पुलांच्या तुलनेत विचार केल्यास ते काम किती निष्ठेने, प्रामाणिकपणे व गुणवत्तापूर्ण केले गेले होते हे लक्षात येते.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : सब माया है..

या सव्‍‌र्हेतून वर्षांनुवर्षे गोळा होणारी आकडेवारी एवढी प्रचंड होती, की ती अभ्यासून निष्कर्ष काढण्यास कित्येक महिने गणिते करावी लागत. त्यासाठी गणकांचा (म्हणजे गणितज्ञ) ताफा डेहराडून व कलकत्ता येथे अव्याहत कार्यरत असे.

वैज्ञानिक क्षेत्रात या संशोधनाचा फार मोठा जागतिक प्रभाव पडला. एका रेखावृत्ताच्या सुमारे २४ अंश मापाचा कंस – आर्कची अचूक मोजणी करणारा हा जगातील पहिला यशस्वी प्रयत्न ठरला. तसेच पृथ्वीचा एकूण आकार आणि त्यातील विसंगती (geodesic anamoly) यांचेही अचूक व यशस्वी मापन यात करण्यात आले होते. हिमालयाचा विस्तार व विविध शिखरांच्या उंचीचे मापन ही या प्रकल्पाची एक महत्त्वाची उपलब्धी होय. जगातील सर्वोच्च शिखर अँडीज पर्वतात नसून हिमालयात असल्याचा शोधही या ग्रेट आर्क मोहिमेची सर्वोच्च फलश्रुती मानली जाते.  त्याचमुळे हा प्रकल्प सर्वार्थाने ‘ग्रेट’ ठरला.

१९०२ मध्ये मद्रासच्या समुद्रकिनारी १२ किमी लांबीची मूळरेषा (बेस लाइन) आखून जणू एक शिवधनुष्यच लॅम्ब्टन यांनी उचलले आणि त्यांच्या नंतर ७० वर्षे हजारो लोकांनी अकल्पित संकटे झेलून, जिवावर खेळून ते पेलून धरले.

या महान कार्याची फळे मात्र भावी पिढयांना मिळाली. विसाव्या शतकात स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही भारतात झालेले सर्व प्रकारचे सव्‍‌र्हे, नकाशे व विकास कार्ये ही या महान ‘ट्रिग्नोमेट्रिक सव्‍‌र्हे’च्या पायावर उभी होत गेली.

आजही भारतभर बंगळूरु, कोलकाता, पुणे, नागपूर इ.  ठिकाणी शून्य मैल दगड व उंच मनोऱ्यांच्या रूपात त्या ऐतिहासिक प्रकल्पाच्या खुणा शिल्लक आहेत. ‘ग्रेट आर्क’ प्रकल्प अधिकृतरीत्या पूर्ण झाल्यावर १८७२-७३ मध्ये या महान कार्यात ज्यांनी बलिदान दिले त्या लोकांच्या स्मरणार्थ अशी स्मृतिचिन्हे उभारण्यात आली. पुणे येथील ‘शून्य मैल’ दगडासमोर एक स्मृतिशिळा आहे. त्यावरील ओळी पुढीलप्रमाणे आहेत.

‘आज आपल्याला माहीत असलेल्या भारताचे मोजमाप करण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्या सव्‍‌र्हेयर्सच्या प्रिय स्मृतीत.’

म्हणजे आज आपल्याला माहीत असलेली भारताची प्राकृतिक रचना व नकाशे ही या लोकांचे कष्ट व बलिदानाचे फलित आहे. अशा कार्यात बलिदान देणाऱ्यांच्या स्मृतींना ‘प्रिय’ म्हटले जावे, हे किती स्पर्शून जाणारे आहे !

याच स्मृतिशिळेवर वरच्या बाजूस एक वाक्य आहे.

‘तुमच्या पूर्वजांची स्मृतिचिन्हे पुसून टाकू नका’ असा त्याचा भावार्थ. ते वाक्य आता फारच समर्पक वाटते. कारण अशी मोजकीच स्मृतिचिन्हे उजेडात आली आहेत किंवा शिल्लक आहेत. त्यांच्या नावात ‘शून्य’ असले तरी ती अमूल्य आहेत. कारण ती स्मृतिस्थळेच सांगतात – त्या ‘ग्रेट आर्क’च्या छायेत हजारोंनी केलेला त्याग आणि भावी पिढयांतील कोटयवधी लोकांच्या फुलण्या- बहरण्याची कहाणी. आणि देतात प्रेरणाही – अशाच भव्य स्वप्नांची. लेखक भूगोलकोशाचे लेखक आणि भूगोलाचे निवृत्त शिक्षक आहेत.  lkkulkarni@gmail.com