सरकारमध्ये जबाबदारीच्या पदांवर बसलेल्या व्यक्तींनी चुका तरी किती कराव्यात? आणि याच सरकारची सूत्रे सांभाळणाऱ्यांनी त्यावर पांघरूण तरी किती काळ घालायचे? राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची एकामागून एक अशी बेताल वक्तव्ये बघून कुणालाही हे प्रश्न पडावेत. भर सभागृहात रमीचा डाव खेळून वादात अडकलेल्या या मंत्र्यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना सरकारलाच भिकारी ठरवून टाकले. हे तोल सुटल्याचेच लक्षण. याच वेळी त्यांनी राजीनामा द्यायला मी काय विनयभंग केला काय असेही उद्गार काढले.
म्हणजे आधी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी, नंतर ज्या सरकारमध्ये ते आहेत तेच भिकारी अशी विधाने विनयभंगाएवढी गंभीर नाहीत असे या कोकाटेंचे म्हणणे. तरीही त्यांची हकालपट्टी का केली जात नाही? त्यांना अभय का दिले जात आहे? ही मुख्यमंत्र्यांची अगतिकता की उपमुख्यमंत्री अजित पवारांची? सरकारची वर्षपूर्ती होण्याच्या आधी धनंजय मुंडेंना जावे लागले. आता कोकाटेंना घालवले तर पक्षाची इभ्रत जाईल असे अजितदादांना वाटते काय? राज्यातील जनता महत्त्वाची की फुटून तयार झालेला यांचा पक्ष? हे सरकार नेमके कुणाला बांधील आहे? या कोकाटेंची मंत्री म्हणून कामगिरीसुद्धा अतिशय सुमार दर्जाची आहे.

आधीच्या कृषिमंत्र्यांसारखीच. तरीही त्यांना निभावून नेण्याचा अट्टहास कशासाठी? कोकाटेंनी एखादे वादग्रस्त विधान केले की मुख्यमंत्र्यांनी ‘हे योग्य नाही’ असे म्हणायचे. इतर दोन उपमुख्यांनी त्याचीच री ओढायची व काहीच कारवाई होत नाही हे बघून कोकाटेंनी पुन्हा वाचाळवीराच्या भूमिकेत यायचे. हे काय चालले आहे?

या सरकारमध्ये कुणाचा पायपोस कुणात नाही असा अर्थ आता काढायचा काय? याच मंत्रिमंडळातील संजय शिरसाठ नावाच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची पैशाच्या बॅगसह चित्रफीत बाहेर येते. ते त्यात पैसे नाहीत, कपडे आहेत असे हास्यास्पद उत्तर देतात. यावरून महायुतीचे पुरते वस्त्रहरण होते. याच पक्षाचे योगेश कदम हे मंत्री त्यांच्याच कुटुंबाच्या नावे असलेल्या डान्स बारमध्ये धाड पडल्याने अडचणीत येतात. तरीही या सरकारचे धुरीण त्यावर गप्पच बसतात. याचा अर्थ काय काढायचा? शिंदेंच्या शिवसेनेचा संजय गायकवाड नामक आमदार उपाहारगृहात ‘राडा’ करतो. त्यावरून राज्यभर वादळ उठते. तरीही त्याला केवळ समज देऊन सोडले जाते.

प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या या सरकारमध्ये एवढी हतबलता कशामुळे आली? सत्तेत सहभागी असलेल्या दादांच्या राष्ट्रवादीच्या युवा शाखेचा प्रदेशाध्यक्ष एकाला शासकीय विश्रामगृहात ‘ऑन कॅमेरा’ बदडतो. लोकलाजेस्तव त्याला पदावरून काढले जाते. याला सत्तेचा माज म्हणायचे की युतीमुळे आलेली असहायता? या राज्यातील जनतेने महायुतीला दिलेला कौल ‘खरा’ आहे असे गृहीत धरले तर असे बेजबाबदार वर्तन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हायलाच हवी होती. ती होत का नाही? हे सरकार स्थिर असूनही अस्थिर का भासू लागले आहे? सरकारात सामील असलेल्या लोकांवर कुणाचाच वचक राहिलेला नाही का? या अशा गणंगांना हात लावण्याची हिंमत कुणी दाखवत नाही याचा अर्थ साऱ्यांचेच हात दबलेले आहेत असे म्हटले तर वावगे काय? वारंवार वादग्रस्त विधाने करून कोकाटे सरकारलाच आव्हान देत आहेत.

काँग्रेसच्या सत्ताकाळातसुद्धा असे प्रकार व्हायचे. त्याची जबर किंमत या पक्षाला मोजावी लागली. आता शिस्तबद्ध म्हणवणाऱ्या भाजपच्या काळात हा प्रकार सुरू झालाय. तो काँग्रेसच्या वळणावर जाणारा असा अर्थ काढायचा काय? राज्यात भाजप व सेनेची युती दीर्घकाळ टिकली. त्यातून जे समन्वयाचे वातावरण निर्माण झाले त्याचा फायदा या युतीला सरकार चालवताना व निवडणुकीत यश मिळवताना झाला. मूळ शिवसेना व राष्ट्रवादी फोडून तयार केलेल्या या दोन नव्या मित्रपक्षांत व भाजपमध्ये फारसा समन्वय नाही हेच या प्रकारांतून दिसते आहे. अंतिमत: याचा फटका आपल्यालाच बसेल हे ठाऊक असूनसुद्धा भाजपने घेतलेली सौम्य भूमिका धक्कादायक आहे.

असे असभ्य वर्तन वा विधाने करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली व त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेऊन ‘नको ते’ बोलायला सुरुवात केली तर पंचाईत व्हायची अशी भीती कदाचित सरकारच्या धुरीणांना वाटत असावी. तसे असेल तर ते प्रचंड बहुमतामुळे धष्टपुष्ट झालेल्या सरकारच्या प्रकृतीसाठी धोकादायक. वैयक्तिक लाभाच्या योजना आणून व प्रचंड जाहिरातबाजी करून सरकारने जनतेचा विश्वास जिंकला हे मिथक फार काळ जनतेच्या मनावर ठसवता येत नाही. त्यासाठी सरकारमधील प्रत्येकाचे वर्तनही योग्य असावे लागते. सरकारला जनता आपले मायबाप मानत असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमका त्याचाच विसर महायुतीला पडला आहे. आपण कसेही वागलो तरी भाजपच्या सोबतीने राहिलो तर येणारी प्रत्येक निवडणूक जिंकताच येते असा समज साऱ्यांनी करून घेतला आहे. त्यातून आलेल्या उन्मादाचे दर्शन वारंवार घडू लागले आहे. हे राज्याचे दुर्दैव नाही तर आणखी काय?