– शुद्धोधन कांबळे
अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ रोजी भीषण दहशतवादी हल्ला झाला त्याचं हे पंचविसावं वर्ष. त्या हल्ल्याचे पडसाद पुढे प्रदीर्घ काळ साहित्यातून उमटत राहिले. काहींनी वास्तव जसेच्या तसे जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी वास्तवाधारित काल्पनिक लेखनातून ते शल्य व्यक्त केलं…
पहिली प्रतिक्रिया कवितेतून उमटली. लोकांनी स्वत:ची वेदना कागदावर उतरवली. अनेकांनी आपल्या घराच्या दारावर, शहराच्या भिंतींवर, पोस्टरवर कविता चिकटवल्या. ‘अमेरिकन पोएट्री फाउंडेशन’ला हजारो कविता प्राप्त झाल्या. यातील बहुतेक कविता साध्या, तुटक भाषेत होत्या, पण त्या थेट हृदयातून आलेल्या असल्याने अत्यंत प्रभावी ठरल्या. ‘पोएट्री आफ्टर ९/११’ हे संकलन या भावनांचं प्रतिनिधित्व करतं. उदाहरणार्थ, ‘मी काल रात्री वडिलांना फोन करणार होतो, पण केला नाही. आज फोन करण्यासाठी नंबरच उरला नाही,’ या एका ओळीत कित्येकांचा सामूहिक शोक दडला होता. कविता या माध्यमाने तातडीचा दिलासा दिला. भारतीय समाजात संकटकाळात लोकगीतं, ओव्या, पोवाडे आधार देत आले आहेत, तसंच काहीसं ९/११नंतर अमेरिकी समाजात झालं. पण कविता फक्त दु:ख व्यक्त करते की ती भविष्यातील समाज घडवण्याची शक्तीही देते, हा प्रश्न मात्र उरतोच.
या हल्ल्याची वेदना मांडणाऱ्या अनेक कादंबऱ्याही लिहिल्या गेल्या. जोनाथन सफ्रन फोअर यांची २००५मध्ये प्रकाशित झालेली ‘एक्स्ट्रीमली लाऊड अँड इन्क्रेडिबली क्लोज’ ही कादंबरी एका नऊ वर्षांच्या मुलाच्या नजरेतून लिहिलेली आहे. ‘ऑस्कर’ नावाचा हा मुलगा आपल्या वडिलांना गमावतो. त्याला वडिलांच्या वस्तूंमध्ये एक चावी सापडते आणि त्या चावीचा मालक कोण आहे, याचा शोध तो सुरू करतो. या प्रवासात तो अनेक लोकांना भेटतो, शहराच्या जखमा पाहतो. मुलाच्या निरागस नजरेतून समग्र समाजाचा, एका महासत्तेचा शोक समोर येतो. डॉन डेलिल्लो यांनी या हल्ल्यानंतरच्या मानसिक अवस्थेचं चित्रण ‘फॉलिंग मॅन’ (२००७) या कादंबरीत केलं आहे. या कादंबरीत ‘फॉलिंग मॅन’ नावाचा एक परफॉर्मन्स आर्टिस्ट वारंवार येतो. तो स्वत:ला टॉवरवरून पडणाऱ्या माणसासारखं लटकवतो. ही प्रतिमा वाचकाला सतत हादरवत राहते. कादंबरी पात्रांच्या आयुष्यातील भीती, असुरक्षितता आणि मनावर झालेल्या जखमांचे प्रतिनिधित्व करते. अनेक समीक्षकांच्या मते, ही कादंबरी हल्ल्याविषयीच्या साहित्याचं एक ‘स्मारक’ आहे.
पाकिस्तानी लेखक मोहसिन हामिद यांनी लिहिलेली ‘द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट’ (२००७) ही कादंबरी उपखंडीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाची आहे. चंगेझ हा पाकिस्तानी युवक अमेरिकेत शिक्षण घेतो, नोकरी करतो, प्रेम करतो. पण या हल्ल्यानंतर त्याच्याकडे संशयाने पाहिलं जाऊ लागतं. अमेरिकेतला त्याचा विश्वास डळमळतो आणि शेवटी तो आपल्या मातृभूमीकडे परततो. या कादंबरीतून ‘ओळख’ हा प्रश्न तीव्रतेने पुढे येतो. आपण कोण, कुठले, हा प्रश्न स्थलांतरितांना सतत भेडसावतो. हामिद यांनी पश्चिम आणि पूर्व यांच्यातल्या अविश्वासाचं चित्रण अत्यंत प्रभावीपणे केलं आहे.
इयान मॅक्युवन लिखित ‘सॅटरडे’ (२००५) ही कादंबरी थेट या हल्ल्यावर आधारित नसली तरी अमेरिकेतील हल्ल्यानंतर युरोपीय समाजात निर्माण झालेल्या असुरक्षिततेची आणि दहशतीची छाया या कादंबरीत जाणवते. ही एका शल्यविशारदाच्या आयुष्यातील दिवसाची कथा असली तरी त्याच्या विचारांतून जागतिक राजकारणाची झलक दिसते.
एमी वॉल्डमन लिखित ‘द सबमिशन’ (२०११) या कादंबरीत ९/११च्या स्मारकासाठी आयोजित स्पर्धेतून मुस्लीम वास्तुविशारदाची निवड होते आणि त्यावरून अनेक वाद निर्माण होतात. स्मरण आणि संशय या दोन भावना एकाच वेळी कशा जागृत होतात, हे या कादंबरीचे सूत्र आहे.
हल्ल्याचे प्रतिबिंब आपल्याला ‘नॉन-फिक्शन’मध्येही दिसते. हल्ल्यानंतरच्या पहिल्या १०२ मिनिटांचा वृत्तान्त जिम ड्वायर व केविन फ्लिन यांच्या ‘१०२ मिनिट्स’ (२००५) या माहितीपटात आहे. यात फोन कॉल्स, पोलीस नोंदी, अग्निशमन दलाचे अनुभव, हल्ल्यातून वाचलेल्यांच्या प्रतिक्रिया इत्यादींचा समावेश आहे. गॅरेट एम. ग्राफ यांचे ‘द ओन्ली प्लेन इन द स्काय’ (२०१९) हे पुस्तक मौखिक इतिहासाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. शेकडो साक्षीदारांच्या अनुभवांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. हे साहित्य वाचताना काही गोष्टी ठळकपणे जाणवतात…
● स्मरण आणि विस्मरण : लोकांना विसरायचं आहे, पण विसरणं शक्य नाही. स्मारकं स्मृती जपतात, पण ती दु:ख पुन्हा जागं करतात.
● ट्रॉमा आणि पुनर्निर्मिती : वैयक्तिक आणि सामूहिक जखम कशी भरते, साहित्य समाजाला कशाप्रकारे मानसिक आधार देतं, हे यातून अधोरेखित होतं.
● ओळख आणि संशय : स्थलांतरित, विशेषत: मुस्लीम समाज, सतत संशयाच्या छायेखाली राहतो.
● नैतिकता आणि न्याय : हिंसा, बदला, युद्ध या विषयांवरील नैतिक प्रश्न उपस्थित होतात.
● भाषेची मर्यादा : इतक्या मोठ्या आपत्तीला शब्दांत बांधणे कठीण आहे. भाषा तुटते, पण तरीही लेखक प्रयत्न करतात.
भावनिक आघाताचे भांडवल केल्याची किंवा सहानुभूतीची विक्री केल्याची टीकाही या साहित्यावर झाली, मात्र बहुतेक समीक्षकांनी हे साहित्य त्या घटनेचे संवेदनशील दस्तऐवजीकरण असल्याचे निरीक्षण नोंदवले. हा वाद महत्त्वाचा आहे कारण तो प्रश्न उभे करतो. फक्त कथा सांगणे, घडलेला वृत्तांत कथन करणे एवढीच साहित्याची भूमिका असते का? की समाजाला प्रश्न विचारण्यास भाग पाडणे ही साहित्याची जबाबदारी असते.
समीक्षकांची मते
समीक्षक रिचर्ड ग्रे यांनी ९/११ नंतरच्या अमेरिकी साहित्यात ‘सायलेन्स, ट्रॉमा अँड रिप्रेझेंटेशन’ या संकल्पना मध्यवर्ती असल्याचं म्हटलं आहे, तर कॅथी कारुथ यांच्या मते या साहित्याने वैयक्तिक व सामूहिक शोक यांची गुंफण दाखवली आहे. प्रसिद्ध भाषातज्ज्ञ नोम चॉम्स्की यांनी ९/११नंतरच्या अमेरिकी धोरणांवर कठोर टीका केली. डॉन डेलिलो यांनी म्हटले आहे की ९/११ ही घटना आधुनिक कल्पनाशक्तीच्या केंद्रात घुसली आहे. डॉमिनिक लाकाप्रा यांनी ‘ट्रॉमा, अॅबसेन्स अँड लॉस’ या संकल्पनांद्वारे ९/११सारख्या घटनांचे विश्लेषण केले. ज्यूडिथ बटलर यांनी ‘प्रीकॅरियस लाइफ’मध्ये ज्यांच्यासाठी शोक करावा, अशी आयुष्य कोणती, असा प्रश्न केला. फिलिप ट्यू आणि पीटर बॉक्सॉल यांनी ९/११ नंतरच्या कादंबऱ्यांतील शैलीगत प्रयोगांकडे लक्ष वेधले. भारतीय वंशाचे साहित्यिक अमिताव घोष यांनी दहशतवाद, स्थलांतर आणि जागतिकीकरणाच्या प्रश्नांना आपल्या लेखनातून स्पर्श केला. समीक्षक मायकल रॉथबर्ग यांनी ‘बहुदिश स्मरणशक्ती’ ही संकल्पना मांडली, तर होमी के. भाभा यांच्या सिद्धांताने ९/११च्या साहित्यातून ‘आपण विरुद्ध ते’ हे द्वंद मांडून त्या चौकटीला आव्हान दिले. या साहित्याचे भाषांतर करण्यासंदर्भात लॉरेन्स वेन्यूटी म्हणतात, ‘९/११’सारख्या घटनांचे अनुवाद करताना सांस्कृतिक संदर्भ गमावण्याचा धोका असतो. शैक्षणिक संदर्भात जॉन एन. डुवाल यांनी विद्यापीठीय अभ्यासक्रमांत ९/११विषयक साहित्याचा समावेश कसा करावा यावर लिखाण केले. सॅम्युअल हंटिंग्टन यांनी ९/११ हे ‘सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक’ असल्याचे म्हटले, पण एडवर्ड सईद आणि अमर्त्य सेन यांनी या मताशी असहमती दर्शवली.
आज जगाच्या विविध भागांना युद्धाने वेढलेलं असताना, निर्घृणपणे मनुष्यहानी होत असताना, दहशतवाद, युद्ध, स्थलांतर, धार्मिक द्वेष वाढत असताना या साहित्यातून काही धडा घेणं गरजेचं आहे.
kamblesp13@gmail.com